माझी पत्नी स्वाती हिच्या पुस्तकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते मातोश्रीवरच २००६ मध्ये झाले होते. ‘इस्लामिक दहशतवाद: जागतिक आणि भारतीय’ हे पुस्तक तिने त्यांनाच अर्पण केले आहे.
१९८६ सालची गोष्ट आहे. मी तेव्हा ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक होतो आणि तेच शिवसेनेचे मुखपत्र होते. तेव्हा ‘सामना’ सुरू झाला नव्हता. त्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये माझ्या धाकट्या भावाचे लग्न होते. शिवसेनाभवनातच ‘मार्मिक’चे कार्यालय होते. आठवड्यात दोन दिवस तिथे प्रमोद नवलकर यायचे. त्या दिवशी संध्याकाळी मी त्यांना भावाच्या लग्नाची पत्रिका दिली. त्यांनी लगेच विचारले, ‘साहेबांबा दिली का?’ मी नकारार्थी मान हलवली. तर नवलकरांनी मातोश्रीवर पत्रिका गेलीच पाहिजे म्हणून आग्रह केला. मग काम आटोपल्यावर रात्री आठच्या सुमारास बाळासाहेबांना मी पत्रिका द्यायला गेलो. त्यांनी पत्रिका घेतली आणि विचारले शिरीला दिली का? शिरी म्हणजे राज ठाकरेंचे पिता श्रीकांत ठाकरे. बाळासाहेबांचे धाकटे बंधू आणि ‘मार्मिकचे भागिदार व प्रकाशक. झाले, माझी पंचाईत झाली. खरे तर मी नवलकरांच्या आग्रहाखातर उपचार म्हणुन साहेबांना पत्रिका द्यायला गेलो होतो. ते कशाला येतील लग्नाला, अशी आझी समजूत होती. पण त्यांनी नुसता शिरीला पत्रिका देण्याचाच विषय काढला नाही तर लग्नाला नक्की येतो; असे सांगून मला धक्का दिला. मग काय मला वांद्रा येथून उलट दादरला यावे लागले. तिथे जुन्या जागेत श्रीकांत ठाकरेंचे वास्तव्य होते. नऊ वाजून गेले होते, त्यामुळे मला बघून ते वैतागले. इतक्या रात्री काय, हा प्रश्न त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. तर ऑफ़िस उरकून आलो अशी त्यांना थाप मारत त्यांना पत्रिका दिली. दुसर्या दिवशी मी संपुर्ण दिवस लग्नात हजर होतो. माझ्या घरच्या वा अन्य कुठल्याही विवाहाला मी कधीच इतका वेळ खर्ची घातला नाही. साहेब येणार म्हणून मला थांबावेच लागले होते.
मला असले सोहळे अजिबात आवडत नाहीत. म्हणूनच कितीही जवळचे लग्न असेल, तरी मी चेहरा दाखवण्यापुरती हजेरी लावतो. हा एकमेव अपवाद होता. दिवस मावळला आणि समारंभ आवरत असताना स्वारी हजर झाली. मीनाताई, श्रीकांतजी व कुंदाताई असे एकत्र आले आणि हॉलमध्ये गडबड उडाली. भावाचे अनेक मित्र केवळ त्यासाठीच थांबुन होते. त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिलाच; पण मी आईची ओळख करून दिल्यावर मीनाताईंसह त्यांनीच माझ्या वृद्ध आईसमोर वाकून अशीर्वाद घेतला. हे सर्वच विचित्र होते. व्हिडीओ टेप चालू होती. मग त्यांनी बाजूला घेऊन माझ्याशी कानगोष्ट केली. ती ऐकून कोणालाही हसू आल्याशिवाय रहाणार नाही. मी नेहमी भावंडांच्या लग्नपत्रिका विचित्र पद्धतीने बनवल्या होत्या. या धाकट्या भावाची आमंत्रण पत्रिका आंतरदेशीय निळ्या पत्रावर मालवणी भाषेत छापून पोस्टाने पाठवून दिली होती. पत्रिका सहसा वाचल्या जात नाहीत म्हणून मी असा काहीतरी उद्योग करायचो. त्या लग्न समारंभात बाजूला घेऊन साहेबांनी माझ्याकडे तीच पत्रिका मागितली होती. कारण त्यांना दिलेली पत्रिका नेहमीसारखी इंग्रजी पद्धतीची होती. पण अशीही पत्रिका असल्याचे कोणीतरी त्यांच्या कानावर घातले होते. आणि त्याविषयीची उत्सुकता त्यांनी अजिबात लपवली नाही. तिथे समारंभातच त्यांनी मला उद्या ती मालवणी पत्रिका मातोश्रीवर आणून दे; म्हणून फ़र्मावले. ते गेल्यावर प्रत्येकजण मला खाजगीत काय बोलले, त्याबद्दल विचारत होता.
असा हा माणुस होता. ज्याला अर्धशतकभर लोक हुकूमशहा, ठोकशहा किंवा एकाधिकारशाही राबवणारा किंवा कायदा वगैरे झुगारणारा; म्हणून आरोप करीत होते. मी ‘मार्मिक’चा कार्यकारी संपादक होण्यापुर्वी माझेही असेच काहीसे मत होते. जेव्हा ती जबाबदारी घेण्याची बोलणी झाली; तेव्हा थेट भेटीत मी त्यांना म्हणालो, ‘मी शिवसैनिक नाही आणि तुमच्या राजकीय भूमिका मला मान्य नाहीत. तेव्हा साप्ताहिकाचा अंक काढण्याची जबाबदारी घेतो, पण तुमच्या राजकीय भूमिका मांडण्याचे काय?’ फ़ोटोत हसताना दिसतात, तसेच हसून ते उत्तरले, ‘हरकत नाही. शिवसेनेच्या भूमिकेच राहूदे. तुझी जी काही भूमिका आहे तीच मांडत जा. शिवसेनेला तुझी भूमिका मान्य आहे.’ मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. तर पुन्हा मिश्कील हसत म्हणाले, ‘आता मला जरा तुझी काय भूमिका आहे ते सांगशील का? जिथे अन्याय दिसेल तिथे ठोकायचे, ही भूमिका तर तुला मान्य आहे ना? तुला कार्यकारी संपादक करतोय; तेव्हा संपादकाचे काम तू करायचे. त्यात कोणाची ढवळाढवळ सहन करू नको; अगदी माझीसुद्धा.’
१९८५ सालात शिवसेनेने मुंबई महापालिकेत बहूमताने आपली सत्ता पहिल्यांदाच प्रस्थापित केली आणि त्या वर्षीचा ‘मार्मिक’चा वाढदिवस अंक काढून त्याचे प्रकाशन थांबवण्यात आले होते. नव्या स्वरूपात त्याचे प्रकाशन सुरू करायचे चालले होते. त्यात पंढरीनाथ सावंत याने माझी व नवलकारांची भेट घडवून आणली. त्यांनीच बाळासाहेबांकडे नेले. त्यानंतर तिसर्या भेटीत आम्ही बोलत असतानाचा वरील संवाद आहे. ज्या माणसाला पुरेसा ओळखत नाही, किंवा ज्याचे काही मोजके लेख वाचले आहेत आणि ज्याने शिवसेनेच्या राजकारणावर बोचरी टिका केली आहे, त्याच्यावरच पक्षाच्या मुखपत्राच्या संपादनाची जबाबदारी टाकताना हा माणूस इतका विश्वास कसा दाखवू शकतो; याचे रहस्य मला तेव्हा उलगडले नव्हते. पण जसजसा कामाच्या निमित्ताने संपर्क वाढत गेला व सहवास वाढला; तेव्हा त्याचा उलगडा होत गेला. आम्ही नव्या स्वरुपातल्या ‘मार्मिक’चे दोन अंक काढल्यानंतरची गोष्ट आहे. आढावा घ्यायला त्यांच्यासोबत बैठक झाली होती. तेव्हा मी त्यांच्या व्यंगचित्राचा विषय काढला. त्यांनी ठामपणे व्यंगचित्र होणार नाही, असे सांगून टाकले. आपण सवड नसल्याने व्यंगचित्र काढायचे बंद केले आहे, तेव्हा त्याचा आग्रह नको; असे म्हणत त्यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. पण मी हटून बसलो. संपादक मी असेन तर मला उपलब्ध असलेला जगातला एक यशस्वी व्यंगचित्रकार मी हातचा कशाला सोडू; असा सवाल मी त्यांना केला आणि थक्क झाल्यासारखे बाळासाहेब माझ्याकडे बघत राहिले. क्षणभर मला निरखून माझ्याकडे पाहिल्यावर ते म्हणाले, ‘कोणाशी बोलतोयस? मी शिवसेनाप्रमुख आहे.’ मीही म्हणालो,‘इथे शिवसेनेची बैठक नाही, ‘मार्मिक’च्या मालक, संपादक मंडळाची बैठक आहे’.
हा माणुस जागेवरून उठला आणि आम्ही सगळेच उठलो. पण ते बैठक संपवायला उठले नव्हते. माझ्याजवळ आले आणि पाठ थोपटून म्हणाले, ‘शाब्बास, मला असाच संपादक हवा होता. आता कळले शिवसेना किंवा शिवसैनिकाची भूमिका कशी असते?’ मग त्यांनी माझ्या मागणीचा विचार करून तोडगा काढला. श्रीकांत ठाकरे स्वत: उत्तम व्यंगचित्रकार होतेच. साहेबांनी त्यांच्याशी लगेच फ़ोनवरून बोलणे केले आणि तिसर्या अंकापासून नवा ‘मामिक’ व्यंगचित्राच्या मुखपृष्ठासह प्रसिद्ध होऊ लागला. त्यात बाळासाहेबांची कल्पना ते कच्ची रेखाटून द्यायचे, त्याचे चित्रण व रंगकाम श्रीकांतजी पार पाडायचे. मग पुढे तर मी त्यांच्याकडून कव्हरस्टोरी नुसार मुखपृष्ठाच्या व्यंगचित्राचा हट्ट पुर्ण करून घेतला. त्याच वर्षीच्या ३१ आक्टोबरला इंदिराजींच्या हत्याकांडाला एक पहिले वर्ष पुर्ण व्हायचे होते. त्या अंकात ‘इंदिराजी, तुम्हालाही न्याय नाही’ अशा शिर्षकाचा लेख मी लिहिला होता आणि साहेबांनी अगतिक इंदिराही तराजू घेतलेल्या न्यायदेवतेसमोर बसलेल्या; असे व्यंगचित्र काढून दिलेले अजून डोळ्यासमोर आहे. पुढे काही महिन्यांनी शरद जोशी त्यांना भेटून गेले आणि नंतर त्यांनी सेनेवर टिकास्त्र सोडले. डॉ. दत्ता सामंत यांच्याशी जोशींच्या शेतकरी संघटनेने हातमिळवणी केली. त्यावर मला टिका करायची होती. पण सेनेने जोशींबद्दल मौन पाळण्याचे धोरण स्विकारले होते. मला ते पटले नाही. मी साहेबांशी बोललो, तर त्यांनी माझ्याशी सहमत नसतानाही लिहायचे स्वातंत्र्य दिले. पण लेख प्रसिद्ध झाला, तेव्हा दिलखुलास अभिनंदन सुद्धा केले. त्याच दिवशी शिवाजी पार्कवर सामंत जोशींची सभा होती. तिथे शेतकर्यांचे स्वागत करायला महापौर म्हणून भुजबळ पोहोचले, तर उपस्थितांनी त्यांची हुर्यो उडवली होती. तोच तो दिवस होता. पण सेनानेत्यांची नाराजी पत्करून बाळासाहेब माझ्यामागे ठामपणे उभे राहिले होते.
अगदी अलिकडे त्यांची गाठ पडली होती, ती माझ्या पत्नीच्या, स्वातीच्या पुस्तकाचे मातोश्रीमध्येच प्रकाशन झाले तेव्हा. ‘इस्लामिक दहशतवाद; जागतिक आणि भारतीय’ असे त्या पुस्तकाचे नाव. तेव्हा आम्ही सगळे कुटुंबिय तिथे हजर होतो. पहिल्यांदाच माझ्या घरचे त्यांना जवळून भेटत होते व व्यक्तीगत बोलत होते. पण कित्येक वर्षापासूनची ओळख असल्याप्रमाणे सहज गप्पा मारणारा हा माणूस घरच्यांना थक्क करून गेला होता. राज शिवसेना सोडुन गेल्यानंतरची ही गोष्ट आहे. पहिल्यांदाच मला त्यांच्या आवाजातली जरब व आकांक्षा हरवली असे वाटले. जे सभोवती घडते आहे, त्यापासून त्यांनी स्वत:ला अलिप्त करून घेतले असावे; असेच मला त्या पावणेदोन तासाच्या गप्पातून वाटले. पुढे तर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. मग भेट होऊच शकली नाही. पण आयुष्याला व अनुभवाला श्रीमंत करून गेलेला माणूस, इतकेच माझ्या गाठीशी राहिलेले बाळासाहेब आहेत.
‘मार्मिक’च्या निमित्ताने त्यांना जवळून बघता आले व त्यांच्याशी वादविवाद सुद्धा झाले. त्यामुळेच मला वाटते हा माणूस सामान्य जनतेला जेवढा सहजपणे कळू शकला; तेवढा विचारपुर्वक त्याच्याकडे बघणार्यांना कधीच कळला नाही. दुरून डोंगर साजरे म्हणतात, त्याच्या नेमकी उलट परिस्थिती इथे होती. त्यांचा आणखी एक किस्सा डॉ. य. दि. फ़डके यांनी सांगितलेला आठवतो. युती सरकारच्या काळात प्रबोधनकारांच्या समग्र साहित्याने संकलन प्रकाशन करायची योजना राबवली गेली. त्यात फ़डके यांचा पुढाकार होता. त्याच्या प्रकाशनाच्या वेळीच फ़डक्यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी समारंभाला हजर राहू; पण फ़ुले हार वगिरे घेणार नाही, असे नवलकरांना आधीच सागितले होते. प्रत्यक्ष समारंभात प्रबोधनकारांच्या प्रतिमेला हार घालण्यापलिकडे कोणालाच फ़ुले हार देण्यात आले नाहीत, म्हणून मग फ़डक्यांनी चौकशी केली. तर तशी बाळसाहेबांची आज्ञा होती, असे नवलकरांनी त्यांना सांगितले. हा किस्सा सांगुन फ़डके मला म्हणाले, ‘यापेक्षा माणसाच्या सभ्यतेचा कुठला पुरावा द्यायला हवा?’ पण हा बाळासाहेब ठाकरे माध्यमांनी लोकांसमोर कधीच आणला नाही. शक्यतो त्यांची उर्मट, उद्धट, अतिरेकी, अरेरावीची प्रतिमा रंगवण्यात माध्यमांनी धन्यता मानली. त्यामुळेच खरा त्यांचा चेहरा लोकांच्या मनात ठसला होता, त्याचे दर्शन देशभरच्या माध्यमांना गेल्या रविवारच्या गर्दींमुळे झाले आणि सर्वांना थक्क व्हायची पाळी आली. जर हा माणूस हिटलर, हुकूमशहा होता आणि हिंसेचा व द्वेषाचा पुरस्कार करणारा होता, तर त्याच्यासाठी इतकी गर्दी लोटली कशाला, हे म्हणूनच अनेकांना कोडे वाटले. पण ज्यांनी कुठलाही चष्मा न लावता व पुर्वग्रह न ठेवता त्या माणसाला बघितले, अनुभवले, ऐकले वा समजून घेतले; त्यांना त्याचा साधेपणा जसा भावला तसाच त्याची महत्ताही उमगली होती. आपल्या एका आदेशाने मुंबई कधीही बंद करू शकणारा हा माणूस इहलोक सोडून गेला, तर त्याचा आदेश नसतानाही शेकडो पटीने अधिक लोक त्याला निरोप द्यायला जमले, लोटले. सामान्य माणसातून असमान्य होताना आपले सामान्यपण न सोडणार्या माणसाला त्याच्या अलौकिक असण्याची सामान्य जनतेने दिलेली ती पावती होती. ज्या कायदा व प्रशासनाला त्याच्या जिवंतपणी अपवाद करावे लागले; त्याच्या निधनानंतरही अंत्यविधीसाठी अपवाद करावाच लागला.
कित्येक वर्षे व कित्येक पिढ्या ज्याच्या आख्यायिका व दंतकथा सांगितल्या जातील; असा एक अजब माणूस होता, ज्याचे नाव बाळासाहेब ठाकरे. कारण त्यांना व्यक्तीगत भेटलेले व त्यांच्या सहवासाची संधी मिळालेले जेवढ्या भल्याबुर्या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगतील, तेवढ्यच नव्हेतर त्यापेक्षा अधिक गोष्टी त्यांना न भेटलेले लोक त्यांच्याबद्दल सांगतील व सांगत रहातील. कारण ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. एक सहजपणे जीवन जगलेला व सहजपणे कुठल्याही परिस्थितीला सामोरा जाणारा, साधासरळ माणूस होता बाळासाहेब. आणि राजकीय अभ्यासक वा विश्लेषक म्हणुन विचाराल; तर ज्याला आपली अफ़ाट राजकीय तकद कळली सुद्धा नाही म्हणुन ज्याने तिचा पुरेपुर वापर केला नाही असा एक अनैच्छिक राजकारणी; असे मी या मनस्वी माणसाचे वर्णन करीन. ज्याने करोडो लोकांच्या मनात स्वत:विषयी चांगुलपणा जोपासण्यात आयुष्य वेचले व राजकारण शोधले, असा अलौकीक मानव.
bhau ekdam jakkas
ReplyDeleteकित्येक वर्षे व कित्येक पिढ्या ज्याच्या आख्यायिका व दंतकथा सांगितल्या जातील; असा एक अजब माणूस होता, zakass zakaas
ReplyDeleteBhau Namaskar! Kharach khupach chan lihita ho tumhi,tumhala mi ajpasun Guru manato!!!!
ReplyDeleteVithal Jaybhaye, Sonpeth Dist Parbhani
sahi...
ReplyDeletechan swanubhav aahe tumche sahebanvishayi...........Tumche
ReplyDeleteहृदयस्पर्शी ...
ReplyDeleteअप्रतिम । मोजक्या शब्दात व्यक्तिमत्व समर्थपणे उभे केले आहे
ReplyDeleteApratim...Khupach chan
ReplyDeleteJay Maharashtra................
ReplyDeleteसर्वांचे बापच ते...
ReplyDeleteJay Maharashtra
ReplyDeleteएक अजब माणूस
ReplyDeleteMahan manasachya aushyaver samarth likhan
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteकाय लिहिलं आहे, भाऊ! अप्रतिम..!
ReplyDeleteEk tha Tiger !!!
ReplyDeletegreat Human Great Memories
ReplyDeleteभावपूर्ण आदरान्जली ..
ReplyDeleteमुंबईत बाळासाहेब म्हटल्यावर फक्त ठाकरे हेच आडनाव होतं. दुसऱ्या आडनावाबद्दल विचार येण्याचंही कारण नव्हतं. जरी बाकीचेही बाळासाहेब त्यावेळी होते!!
ReplyDeleteapratim
ReplyDeletenice bhau
ReplyDelete