Thursday, December 19, 2013

तारतम्याचा दुष्काळ

   आपल्या देशातला बुद्धीवाद किती रसातळाला गेला आहे, त्याचा नवा प्रत्यय देवयानी खोब्रागडे या महिला अधिकार्‍यावर अमेरिकेत ओढवलेल्या संकटानंतर येतो आहे. भारतीय दूतावासामध्ये वरीष्ठ अधिकारी असलेल्या देवयानीला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली व तिची अक्षरश: धिंड काढण्यात आलेली असताना देशाच्या प्रतिष्ठेला बाधा आलेली आहे. अशावेळी संपुर्ण देशाने एकमुखाने तिच्या समर्थनासाठी उभे रहायचे असते. भले इथे भारतात या महिलेने वा अन्य कुणा भारतीय नागरिकाने कसलेही अवैध काम केलेले असो, किंवा त्याच्यावर कुठला गंभीर आरोप असो; आपला देशबांधव म्हणून आपण त्याचा बचाव करायचा असतो. डेव्हीड हेडली याच्यासारखा खतरनाक घातपाती अमेरिकन नागरिक होता, म्हणून त्याच्या पापावर पांघरूण घालायला अमेरिकन कायदा यंत्रणा कंबर कसून उभी ठाकली. त्याला भारताच्या ताब्यात द्यायची पाळी येऊ नये, म्हणून अमेरिकेने सगळे कायदेशीर हातखंडे वापरले. तेव्हा अमेरिकेत कायद्याचे कठोर पालन होते, असली भाषा को्णी पाजळण्याचे कारण नाही. शिवाय देवयानी यांच्यावर जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, ते धादांत खोटे आहेत. म्हणूनच अमेरिकेसारख्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची आता कारवाईनंतर सारवासारव करताना तारांबळ उडाली आहे. खोटे पडण्य़ाच्या भयाने त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे. म्हणूनच इथे देवयानी खोब्रागडे ही व्यक्ती नसून संपुर्ण भारताच्या अब्रुचा विषय आहे. त्या एका व्यक्तीभोवती देशाच्या सार्वभौमत्वाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशावेळी आदर्श घोटाळ्यातला वा अन्य कुठल्या बाबतीतला संदर्भ शोधून टिप्पणी करणे निव्वळ हलकटपणा म्हणावा लागेल. पण तेवढे तारतम्य आजच्या भारतीय बुद्धीवाद्यांमध्ये उरले आहे कुठे?

   बुद्धीवाद इतका एकांतिक व पक्षपाती झाला आहे, की आपण देशहित वा समाजहित सुद्धा आपल्या राजकीय मतलबाच्या चष्म्यातून बघू लागलो आहोत. मग त्यासाठी देशाची अब्रू पणाला लागली तरी बेहत्तर, इतके ताळतंत्र सोडले गेले आहे. इथे देवयानी या व्यक्तीपुरता हा विषय मर्यादित नाही. ज्या नोकराणीच्या तक्रारीवरून ही सगळी कारवाई झाली, तिच्या पतीला बेकायदा भारतातून अमेरिकेत पळवून नेण्यात आले. त्याच्यासाठी भारतीय कायदे व न्यायव्यवस्थाही धाब्यावर बसवली गेली आहे. म्हणजे देवयानी यांना गोत्यात घालण्यासाठी अमेरिकन सरकारची संपुर्ण यंत्रणाच पाताळयंत्रीपणे वापरली गेली आहे. त्यामुळे हे प्रकरण एका व्यक्तीचे बघता येत नाही. तक्रारदार भारतीय महिलेला भारतात न्याय मिळू शकत नाही, उलट तिच्या पतीलाही इथे त्रास दिला जाऊ शकतो, म्हणून त्याचे अपहरण केल्याप्रमाणे त्याला गुपचुप अमेक्रिकेला घेऊन जाण्याचे काय कारण होते? कुठल्याही मार्गाने देवयानीला त्यात गुंतवण्यामागे काय हेतू असू शकतो? जेव्हा अशा वकीलाती व दूतावासातील अधिकार्‍याला गोवण्याचा प्रयत्न होतो; तेव्हा त्यामागे नक्कीच काही भयंकर कारस्थानी हेतूच असू शकतो. पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या ओसामाला मारण्यासाठी अमेरिकेने लष्करी घुसखोरी केली होती. इथे त्यांनी नागरी शासनाच्या भारतीय अधिकारावर गदा आणलेली आहे. भारतच आपल्या नागरिकांना स्वदेशी न्याय देऊ शकत नाही वा न्यायाने वागवत नाही, असे ठरवून त्यांनी भारताच्या स्वयंभू अस्तित्वालाच पायदळी तुडवलेले आहे. म्हणूनच अशा विषयाकडे व्यक्तीकेंद्री प्रश्न म्हणून बघता कामा नये. पण अमेरिका आज इतकी हिंमत कशी करू शकली, तेही विसरता कामा नये. त्यालाही इथल्या दळभद्री बौद्धिक दिवाळखोरीनेच खतपाणी घातलेले आहे.

   अवघ्या काही महिन्यांपुर्वी असेच एक प्रकरण खुप गाजलेले होते. तिथे अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या भारतीय वंशाच्याच काही प्राध्यापक बुद्धीमंतांनी नरेंद्र मोदी यांना व्हिसा देऊ नये म्हणून तिथल्या सरकारला विनंती केलेली होती. भारतातल्या काही खासदारांनी मोदींच्या व्हिसाच्या बंदीवर फ़ेरविचार करू नका असे पत्र अमेरिकन सरकारला पाठवलेले होते. त्याचा अर्थ काय होतो? जी व्यक्ती इथे आहे आणि मायदेशी शेकडो चौकश्या होऊन त्याच्यावर साधा कुठला आरोप तक्रार नोंदवण्यापुरताही समोर येऊ शकलेला नाही, तरी त्याला गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार अशा बुद्धीमंत व इथल्याच काही खासदारांनी अमेरिकन सरकारला बहाल केलेला नव्हता काय? गुजरातच्या दंगल प्रकरणात चौकश्या झाल्या आहेत आणि सुप्रिम कोर्टाने तीनदा खास तपास पथके नेमूनही मोदींच्या विरोधात एकही पुरावा समोर येऊ शकलेला नाही. पण त्यांना अमेरिकन सरकार गुन्हेगार ठरवून मोकळे झालेले आहे. त्यासाठी अमेरिकन सरकारवर दबाव आणणारा कोणी अमेरिकन कारस्थानी नाही. तिथे वसलेले वा इथून त्यांना तसे आवाहन करणारे भारतीय बुद्धीमंतच आहेत. अशा प्रत्येकाने भारतातल्या कायदा व न्यायव्यवस्थेवर अविश्वास व्यक्त करून न्यायाचा अधिकार अमेरिकन सरकारला बहाल केलेला नव्हता काय? सवाल देशाच्या स्वायत्ततेचा व स्वयंभू अधिकाराचा आहे. मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला म्हणजे जणू दंगलपिडीतांना न्यायच मिळाला, अशा फ़ुशारकीच्या भाषेत आजवर बोलणार्‍यांचे काय? आज देवयानीवर चिखलफ़ेक करण्यासाठी ‘आदर्श’चे संदर्भ सांगणारे आणि मोदींच्या व्हिसा प्रकरणात टाळ्या पिटणार्‍यात कितीसा गुणात्मक फ़रक आहे? सगळा बौद्धिक दिवाळखोरीचाच मामला नाही काय? मोदी वा तत्सम प्रकरणात अमेरिकेच्या आगावूपणाचे कौतुक करणार्‍यांनीच देवयानीवर ही पाळी आणली, असे म्हटल्यास वावगे ठरेल काय? म्हणतात ना? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो, त्याची काळजी घ्यायला हवी. अमेरिका सोकावलीय, पण कोणाच्या दळभद्रीपणामुळे?

5 comments:

  1. माफ करा आरोप धादांत खोटे आहेत हा शोधतुम्हाला कसा लागला? हे निश्चित की देवयानींना अतिशय वाईट वागणूक दिली गेली आणि त्यावर आपण अमेरिकेला जाब विचारायलाच हवा - पण आरोप कसे एकदम धादांत खोटे? अमेरिका म्हणजे सद्गुणाचा पुतळा नाही पण आपली न्यायव्यवस्था हे काय प्रकरण आहे हे आपण सर्व जाणतो ना? मग कोणी त्यावर ताशेरे ओढले तर मिरच्या का झोंबाव्यात? "ती संगीता फोटोत खाउन पिउन बरी दिसते - तिच्यावर कसला अन्याय झालाय" अशी टीका आपले देशभक्त आज करतायत - पण तिच्या नवऱ्यावर काय दडपण आणलं गेलं, त्यांच्यावर काय खटले भरले गेले याचं कोणाला काय पडलय? आणि आदर्श घोटाळ्यात देवयानीताईंनी दाखवून दिलच आहे की खोटी affidavits करणे हा त्यांचा स्वभाव असावा.

    ReplyDelete
  2. वसंत ढोबळे ची बदली करा म्हणून रस्त्यावर कोण आलं होतं बरं ? का आले होते बरं ? आमची पोरं सोडा म्हणून कोण गळे काढत होतं ? दारू पिलेली मुलं कुणाची होती ? पब्ज मधे नाचणा-या विवस्त्र मुली कुणाच्या होत्या ? केव्हढा हा कायदेपालनाचा अट्टाहास. काश देवयानी भी देशपांडे या कुबेर होती ! आज ओबामाला राजीनामा द्यायला लागला असता.
    जयराज फाटक, प्रदीप व्यास कोण आहेत बरं ? बघा सापडतंय का गूगल सर्च देऊन ?

    ReplyDelete
  3. मा. बळीराजा, फाटक आणि व्यास हे नक्कीच डागाळलेले आहेत. इथे जातीचा प्रश्न येतोच कुठे? अमेरिका काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही - पण म्हणून एखाद्याचा गुन्हा आपोआप क्षम्य ठरतो का? काल NDTV चर्चेत निर्ढावलेले माजी सनदी अधिकारी सांगत होते - पहा दिल्लीतल्या अमेरिकन शाळेतल्या अमेरिकन शिक्षकाचा आणि भारतिय शिक्षकाचा पगार. मग? उत्तम खोब्रागडे साहेब घरेलू कामगार संघटनेच्या कार्यकर्तीवर ओरडले "तुम्ही air-conditioned कार्यकर्ते आहात - तुम्हाला माहित आहे का, चंद्रपूरचे आदिवासी मला देवदूत म्हणायचे?" मग?

    ReplyDelete
  4. mr abhaymittanpn pl chashma badlun ghyava he uttam..

    ReplyDelete
  5. Mr Abhaymittan , ya post chya purbi chi post vacha

    ReplyDelete