Friday, January 31, 2014

शरद पवारांची बांधीलकी



  दिल्लीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा कृषीमंत्री शरद पवार आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गुप्त भेट झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ माजवली आहे. मात्र अशी बातमी कितपत खरी आहे, त्याचा तपास करावा, असे कोणालाच वाटलेले नाही. अनेकदा अशा बातम्या सुत्रांचा हवाला देऊन पसरवल्या जातात. पण त्यात सहसा कुठे व केव्हा अशा प्रश्नांची उत्तरे नसतात. इथे ही गुप्त भेट राजधानी दिल्लीत व १७ जानेवारी रोजी झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच दिल्लीची वृत्तपत्रे व पत्रकार गडबडून गेले, तर नवल नाही. कारण घटना दिल्लीतली आणि तिचा गौप्यस्फ़ोट मराठी वृत्तपत्रांनी मुंबईत केला आहे. सहाजिकच नुसता बवाल करणार्‍यांची तारांबळ उडाली. ब्रेकिंग न्युज देण्याच्या आपल्या विशेषाधिकारावर गदा आल्याच्या भयाने जणू दिल्लीच्या तमाम वाहिन्या पवारांच्या गुप्त भेटीवर ‘बातम्या तोडू’ लागल्या. पण काही तासातच त्यात तथ्य नसल्याचे खुद्द पवारांनीच ट्विटर मार्फ़त जाहिर करून टाकले. राष्ट्रवादीचे प्रवक्तेही हा निव्वळ खोडसाळपणा असल्याचे छातीठोकपणे सांगू लागले. पण बातम्या तोडणार्‍यांना जोडणारा तपशील कसा खपावा? मग पवार व त्यांच्या पक्षाने मोदींच्या बाबतीत अलिकडे कसे लवचिक धोरण अवलंबले आहे; त्याचेही तपशील पुढे आणले गेले. पंतप्रधानांनी हल्लीच आपल्या पत्रकार परिषदेत मोदी पंतप्रधान होणे देशासाठी संकट असल्याचे म्हटले होते, त्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. नंतर त्यांचेच निकटवर्ति सहकारी प्रफ़ुल्ल पटेल यांनी अलिकडेच राहुलने गुजरात दंगलीबद्दल मोदींवर खापर फ़ोडण्यावर आक्षेप घेतला होता. इतका तपशील बातम्या तोडणार्‍यांसाठी पुरेसा होता. त्यामुळेच १७ जानेवारीला उपरोक्त दोन्ही नेते कुठे होते, त्याची कुणाला फ़िकीर नव्हती.

   गुप्त असो किंवा खुली भेट असो, दोन व्यक्तींना भेटायचे असेल तर त्यांनी त्यावेळी एकत्र व एकाच भूप्रदेशात तरी असायला हवे; याचे भान आजकाल बातम्या तोडणार्‍यांना रहिलेले नाही. म्हणूनच पवार वा मोदी त्या दिवशी दिल्लीत होते किंवा नव्हते; याचे कोणालाच महत्व वाटलेले नाही. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने केलेल्या खुलाश्यानुसार पवार त्या दिवशी दिल्लीतच नव्हते, तर पुणे सांगली येथे दौर्‍यावर होते. म्हणजेच १७ जानेवारी रोजी मोदींना पवार दिल्लीत भेटू शकत नाहीत, याबद्दल वाद होण्याचे कारण नाही. मग अशा गुप्त भेटीबद्दल खुलासे वा तपशील विचारण्याची गरज उरते काय? याचा अर्थ दोन नेते भेटणारच नाहीत वा पवार युपीए सोडून भाजपाच्या गोटात जाणारच नाहीत; असा अजिबात होत नाही. पवारांना असे निर्णय घेण्यासाठी तत्वांची अथवा राजकीय धोरणाची गरज कधी भासत नाही. अकस्मात ते कुठलाही निर्णय घेतात आणि नंतर त्यावर तत्वज्ञानाची वस्त्रेप्रावरणे चढवत असतात. १९९९ सालात वाजपेयी सरकार कोसळले, तेव्हा संसदेच्या पायरीवरून सोनियांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची घोषणा पवारांनीच केली होती. पण ते साधले नाही. तेव्हा अवघ्या तीन महिन्यात त्यांनीच सोनिया जन्माने परकीय नागरिक असल्याने त्यांच्या पंतप्रधानकीला निवडणूकांपुर्वीच विरोध करून राष्ट्रवादीची वेगळी चुल थाटली होती. पुढे त्याच सोनियांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायला पवारांनी मान्यता दिली होती. तेव्हाचे त्यांचे तत्वज्ञान किंवा निकष काय होते? मतदारानेच परकीय नागरिकत्वाचा निवाडा केलेला आहे. मग मतदाराने निवाडा करून मोदींच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब केले, तर पवारांना मोदींच्या सेक्युलर असण्यावर शंका घेण्य़ाचे कारण तरी शिल्लक उरेल काय?

   पवारांची विचारसरणी व राजकीय तत्वज्ञान इतके स्पष्ट व निर्णायक असताना, त्यांना आज मोदींची गुप्त भेट घेण्य़ाचे काही कारण आहे काय? अजून तरी मतदाराने लोकसभेसाठी मतदान केलेले नाही किंवा मोदी यांच्या सेक्युलर असण्याची ग्वाही निवडणूक निकालातून दिलेली नाही. त्यामुळे शरद पवार आजच भाजपाच्या आघाडीत सहभागी होण्याची कुठलीही शक्यता नाही. काही महिन्यांपुर्वीच त्यांनी पुन्हा निवडणूक लढवणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केलेली होती. आता लोकसभेची निवडणूक जाहिर होण्याआधीच पवारांनी राज्यसभेसाठी अर्ज भरून तिथे निवडणूका वा मतदानाची पाळीच येणार नाही, याची काळजी घेतली ना? मतदानाशिवाय राज्यसभेत जाण्यातून त्यांनी आपला ‘निवडणूक न लढवण्याचा’ शब्द काटेकोरपणे पाळला नाही का? मग इतक्या पारदर्शक माणसाला गुपचुप मोदींची गुप्त भेट घेण्याचे काही कारण आहे काय? जोपर्यंत मतदार मोदींना क्लिनचीट देत नाहीत, तोपर्यंत पवार भाजपाच्या आघाडीत जाण्याची अजिबात शक्यता नाही. कारण पवार तत्वांना अत्यंत बांधील राजकारण करतात. पण बातम्या तोडण्यातच धन्यता मानणार्‍यांना पवारांची महती काय कळणार? पवार कुठलीही गोष्ट साफ़ नाकारतात, त्यात त्यांचा होकार लपलेला असतो. मात्र कट्टर लोकशाहीवादी असल्याने मतदारांचा कौल पाहुनच पवार आपले धोरण आखतात व राबवतात. मग सवाल सोनियांच्या बाजूने जायचा असो किंवा डाव्या उजव्या पक्षांच्या सोबत जायचा असो. असे असताना मोदींसाठी अपवाद करून गुप्तभेट घेण्याचा संधीसाधूपणा पवार कशाला करतील? पवार नेहमी मतदाराच्या बाजूचे असतात. कुठला नेता वा पक्षाच्या बाजूचे नसतात. सत्ता मतदार देतो आणि पवार नेहमी त्याच मतदाराच्या कौलाचा सन्मान राखत आलेले आहेत

3 comments:

  1. एकाच परिच्छेदात किती विरोधाभास आहे तुमच्या या लेखात
    तुम्ही आधी लिहिले आहे :
    >>पवारांना असे निर्णय घेण्यासाठी तत्वांची अथवा राजकीय धोरणाची गरज कधी भासत नाही.

    नंतर काही वाक्ये पुढे , आपलाच मुद्दा खोडत लिहिले आहे :
    >>>> कारण पवार तत्वांना अत्यंत बांधील राजकारण करतात.

    जे कोणी मोदींना जवळ करेल त्याच्यावर स्तुती सुमने मुक्ताफळे उधळत आहात काय ?

    ReplyDelete
  2. Goldenmean तुम्हाला उपहासात्मक लिखाण समजत नाही का?

    ReplyDelete
  3. पवार आणि तत्व......

    ReplyDelete