गेल्या आठवड्यात निवडणूकीच्या प्रचाराला एक वेगळेच
वळण मिळाले. वास्तविक राजकारणापासून प्रियंका गांधी यांना सातत्याने दूर
ठेवण्यात आलेले होते. त्यांना मैदानात उतरावे लागले. मागल्या दोन वर्षात
राहुल गांधी यांच्या राजकीय मर्यादा स्पष्ट झाल्यावर अनेक भागातून प्रियंका
यांना राजकारणात आणायची मागणी कॉग्रेस पक्षातून झालेली होती. एका ठिकाणी
तर तसे पोस्टर लावून धरणेही काही कार्यकर्त्यांनी धरले होते. पण त्यांना
गप्प करण्यात आले. त्याचे कारण उत्तर प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणूकीत
राहुल गांधींनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. दिग्विजय सिंग यांच्या
सोबत तीन महिने राहुलनी रान उठवले होते. कारण कॉग्रेसला पुन्हा जुने वैभव
प्राप्त करून द्यायचे, तर उत्तरप्रदेश व बिहार या राज्यात पक्षाला प्रबळ
बनवणे आव्श्यक होते. पाच वर्षापुर्वी वीस लोकसभेच्या जागा कॉग्रेसने
जिंकल्या, तेव्हा त्याचे श्रेय राहुलना देण्य़ाची स्पर्धा लागली होती. पण
वास्तवात ते राहुलचे यश नव्हते, तर केंद्रातील सरकार बनवू शकणार्या
आघाडीतला मोठा पक्ष म्हणून मिळालेला तो प्रतिसाद होता. पण राहुलनी
उत्तरप्रदेशची हवा फ़िरवली, असा डंका पिटण्यात आला आणि त्यात लक्ष्य विसरले
गेले. पुढे विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांना हाताशी
धरून राहुलच्या राज्यातील प्रत्येक हालचालींना वारेमाप प्रसिद्धी देऊनही
उपयोग झाला नाही. २० खासदार निवडून आणणार्या राहुलना पन्नास आमदारही
निवडून आणता आले नाही. त्याच दरम्यान बिहारमध्ये असाच एकला चालोरे प्रयोग
करून राहुलनी असलेल्या पक्ष संघटनेचा पुरता बोर्या वाजवला. तरीही चार
महिन्यापुर्वी राहुलना चार विधानसभांच्या मतदानात प्रचारासाठी पुढे
केल्यावर त्यांचे अपयश अधोरेखित झाले होते.
एकीकडे
स्वपक्षातला विरोध गुंडाळून मोदी आक्रमक होत चालले होते आणि देशभर
जनमानसावर आपली छाप उठवत होते. त्यांच्या तुलनेत राहुलचे अपयश अधिक ठळकपणे
दिसू लागल्यावर कॉग्रेसने नवा चेहरा पुढे आणावा, असाही सूर लागला होता.
त्यात निदान प्रियंकाला प्रचारासाठी समोर आणायची मागणी होती. पण
पक्षाध्यक्षा सोनियांनी ठामपणे नकार दिला. लोकसभेच्या रणभेरी वाजू
लागल्यावर मोदींच्या तुलनेत राहुल यांचा टिकाव लागेना, तेव्हा पुन्हा
प्रियंकाचा आग्रह सुरू झाला. शेवटी रायबरेली व अमेठीही धोक्यात असल्याचे
जाणवले; तेव्हा घाईगर्दीने प्रियंकाला मागल्या आठवड्यात पुढे आणले गेले.
महिनाभर आधी रायबरेलीत सोनिया उमेदवारी अर्ज भरायला गेल्या; तेव्हाही
प्रियंकाला दूर ठेवण्यात आले होते. पण नंतरच्या भयगंडाने अमेठीत राहुल अर्ज
भरायला जाताना प्रियंकाला समोर आणावे लागले. पती वाड्राच्या घोटाळ्याचे
सावट त्यांच्यावर असल्याने काहूर माजेल, अशी भिती असूनही धोका पत्करावा
लागला होता. आधी कौटुंबिक आवाहन करणार्या प्रियंकांना अखेर मोदींवर
व्यक्तीगत आरोप करायची पाळी आली. त्यांच्या आरोपात नवे काहीच नाही. पण
चेहरा नवा असल्याने त्यांना निदान प्रसिद्धी मिळणार, हाच हेतू होता. हेच
शिळे आरोप करून दोन महिन्यांपुर्वी केजरीवाल यांनी प्रसिद्धीचा झोत
आपल्यावर ओढून घेतला होता. प्रियंका त्यापेक्षा काहीही नवे बोलत नाहीत. पण
त्यांनी मोदींवर तोफ़ा डागल्याने आता अधिकृतपणे भाजपाने प्रियंकाचा पती
वाड्रा याच्या भानगडी चव्हाट्यावर मांडायची संधी साधली आहे. ते आरोप होताच
प्रियंका आपली संयमी भाषा विसरून गेल्या आणि तावातावाने बोलू लागल्या.
त्यांचा संयम सुटावा, हीच भाजपा किंवा मोदींची रणनिती असावी काय?
गेल्या बारा
वर्षात शेकडो आरोप आणि अखंड टिकेचे घाव झेललेल्या मोदींना असल्या आरोपाचे
भय आता उरलेले नाही. डझनावारी कोर्टाच्या चौकश्या तपास यातून मोदी तावून
सुलाखून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर होणार्या आरोपांची धार
संपलेली आहे. त्याच आरोपांनी माध्यमे बोथटली आणि आता सोनिया, राहुल व
केजरीवाल यांचीही धार बोथट झालेली आहे. अशावेळी नवे व विश्वासार्ह वाटणारे
काही प्रियंका बोलल्या, तर उपयोग होता. पण प्रसिद्धीच्या झोतात तेच जुने
आरोप करताना प्रियंकाचा नवेपणा मात्र लयास चालला आहे. म्हणजेच कॉग्रेसने
अजून मागे ठेवलेला प्रभावी मोहरा, याच निवडणूकीत वापरून निकामी होतो आहे.
येत्या ७ मे रोजी अमेठीतले मतदान व्हायचे आहे. तोपर्यंत प्रियंका तेच तेच
बोलणार आहेत. त्या आरोपाचा जनमानसावर कुठला प्रभाव पडण्याची शक्यता नाहीच.
पण त्या गडबडीत खुद्द प्रियंका मात्र पतीच्या घोटाळ्यात गुरफ़टून जाणार आहे.
त्यामुळे भविष्यकाळात कॉग्रेसला नवा आकर्षक चेहरा म्हणून वापरता येऊ
शकणारा मोहरा यावेळीच संपून जाणार आहे. राहुलची जागा प्रियंका घेऊ शकतील
आणि भावी काळात मोदीं व भाजपाच्या राजकारणाला शह देण्यासाठी मैदानात येऊ
शकतील,; ही शक्यता त्यामुळे निकामी होऊन गेली आहे. म्हणूनच मोदींनी
जाणिवपुर्वक प्रियंकाना आक्रमक व्हायची वेळ यावी; असा डाव खेळला की काय,
अशी शंका येते. पुर्वी जेव्हा वाड्रा यांच्यावर आरोप झाले, तेव्हा प्रियंका
समोर आल्या नव्हत्या आणि आज त्या पतीचा बचाव मांडत रायबरेली व अमेठीत फ़िरत
आहेत. म्हणजे याच निवडणूकीत राहुलची जागा घेऊ शकणारा मोहराही मोदींनी
कॉग्रेसच्या हातून काढून घेतला ना? गेल्या आठवड्यात निवडणूकीने घेतलेल्या
या वळणाने कॉग्रेसच्या हातातला अखेरचा तुरूपाचा पत्ताही गमावला का? काळच
त्याचे उत्तर देईल.
भाऊ,
ReplyDeleteसोनिया आणि कंपनीचे बोलाविते धनी वेगळेच आहेत हे सगळ्यांना माहितीये. राजीव गांधी होता तोवर तो मते खेचत असे आणि सोनिया पडद्याआडून सूत्रे हलवीत असे. आत्ता या घडीला मते खेचणारा कोणीच नाही. प्रियांकाला मते खेचायला उभी केली तर बोलवित्या धन्यास ती इंदिरा गांधीसारखी डोईजड होण्याची शक्यता आहे. यामुळे तिला प्रायोजित केली नसावी. मात्र असं असलं तरी मोदींचा उदय होण्याची शक्यता प्रसृत होताच काँग्रेसने काहीच हालचाल का केली नाही? मला एकंच कारण दिसतंय. ते म्हणजे राजीव गांधीप्रमाणेच प्रियांकाला स्वत:लाच राजकारणात काही रस नसावा.
आपला नम्र,
-गामा पैलवान
ज्या प्रकारे प्रियंका वड्रा केवळ प्रचारासाठी येते पण निवडणूकीसाठी उभी राहात नाही, त्यावरून हे स्पष्ट होतंय की तिची पात्रता माहित आल्यामुळेच बोलवित्या धन्याने तिला केवळ प्रचारापुरतं वापरून घेण्याचं ठरवलं आहे.
ReplyDeletethoda wel ghya
ReplyDelete