Thursday, May 22, 2014

आम्मा पकोडा

   चार दशकांपुर्वी गाजलेला मेहमूदचा ‘बॉम्बे टु गोवा’ हा चित्रपट ज्यांनी बघितला असेल वा ज्यांना आठवत असेल; त्यांनाच आम आदमी पक्ष व केजरीवाल यांच्या पोरखेळातले मनोरंजन उलगडू शकेल. मुंबईहून गोव्याला निघालेल्या एका बसमधल्या प्रवाश्यांच्या भोवती घोटाळणारी ती कथा होती. त्यात अठरापगड जाती-भाषांचे स्वभाव, व्यवहाराचे लोक एकमेकांशी जसे वागतात, त्यातून हे मनोरंजन होते. परस्परांशी कुठलाही व्यवहारी संबंध नसलेले आणि तितक्या प्रवासासाठी केवळ योगायोगाने एकत्र आलेल्यांची ती कहाणी होती. गेल्या दोन वर्षात आम आदमी पक्ष अशा नावाचा जो घोळका देशाच्या विविध शहरात वा राज्यातून धुमाकुळ घालतो आहे, त्याची कहाणी सुद्धा त्याच चित्रपट कथेपेक्षा तसूभर वेगळी नाही. ती बस निघते तेव्हा त्यात काही प्रवासी असतात आणि मध्यंतरी नवनवे प्रवासी त्यात भरती होत जातात. त्यांच्यापाशी प्रवासाखेरीज कुठलेही समान ध्येय नसते. आपले ठिकाण आले, की उतरून जायचे आणि प्रवास करायचा म्हणून सोबत असतील, त्यांच्या संगतीत रहायचे असा हा घोळका आहे. आम आदमी पक्षाच्या टोप्या डोक्यावर चढवून मिरवणार्‍यांचे परस्पर संबंध तसेच नाहीत काय? कोण कुठल्या मीरा सन्याल किंवा विनोदवीर भगवंत मान, मेधा पाटकर, अभिनेत्री गुल पनाग. कुठल्याही व्यावसायिक वा सामाजिक हेतूने कधीही एकत्र येऊ शकली नाहीत, अशी ही मंडळी आहेत. पण अकस्मात त्यांनी डोक्यावर टोप्या घातल्या आणि ते या नव्या पक्षाचे लोकसभेतील उमेदवार बनले. देशाचे राजकारण शुद्ध स्वच्छ करायला निघाले. प्रवाशाने तिकीट काढावे, की झाला सोबती. तशी डोक्यावर टोपी आणि हाती झाडू घेतली, की झाला हरिश्चंद्राचा अवतार; अशीच काहीशी गंमत या लोकांनी करून ठेवलेली आहे. त्याच चित्रपटात एक पात्र चक्क केजरीवाल यांच्याशी जुळतेमिळते आहे.

   मुक्री नामक नटाने त्यात एक दाक्षिणात्य पात्र रंगवले होते. आपल्या पत्नी व मुलासह तो बसमधून प्रवास करत असतो. बारातेरा वर्षाचा एक गबदूल मुलगा कंबरेला लुंगी गुंडाळून कायम तोंडात अंगठा घालून चोखत असतो. त्याच्या बडबडीला कंटाळून बाप पोराचे तोंडच बांधून ठेवतो. कारण ते पोर खुपच बेशिस्त व उनाड असते. मध्यंतरी एका जागी बस उपाहारासाठी थांबते. सगळे प्रवासी उतरतात आणि ढाब्यासारख्या शाकारलेल्या हॉटेलात शिरतात. असित सेन नावाच्या नटाने हॉटेल मालकाची भूमिका केलेली होती. मुलाचे तोंड बांधलेले बघून सेन मुक्रीला म्हणतो, माणुस आहात की हैवान? पोराचे तोंड बांधून ठेवता? त्या दोघात खुप हुज्जत होते आणि अखेरीस मुक्री पोराच्या तोंडाला बांधलेला कपडा मोकळा करतो. तात्काळ पोर धावत भजी ठेवलेल्या परातीकडे धावत सुटते आणि अखंड ओरडत असते, आम्मा पकोडा’. त्या धटींगण पोराला आवरताना मातापित्यासह तिथल्या नोकरांचीही तारांबळ उडते. तेव्हा भयभीत झालेला असित सेन म्हणतो, याचे तोंडच काय, हातपाय असेल ते सगळेच बांधून ठेवा. काय वाटेल ते करून धिंगाणा घालणार्‍या त्या पोराच्या पात्राने त्या काळात धमाल उडवून दिलेली होती. ‘आम्मा पकोडा’ प्रेक्षकांच्या तोंडी फ़िट्ट बसले होते. केजरीवाल या शेफ़ारलेल्या पोराने आज राजकीय क्षेत्रात जो धिंगाणा घातला आहे, त्यामुळे अनेकांचा असित सेन झाला असल्यास नवल नाही. राजकारण वा सार्वजनिक जीवनाचे सर्व संकेत, नियम वा प्रथापरंपरा धाब्यावर बसवून हा माणूस रोज कसले ना कसले नाटक करतो. इतका धिंगाणा घालू लागला आहे, की कायद्याने नसेल तर कायदा गुंडाळून त्याच्या मुसक्या बांधाव्यात; असे हळूहळू सामान्य लोकांना वाटू लागणार आहे. त्याचा जनलोकपाल नको आणि त्याचा भ्रष्टाचारमुक्तीचा लढा नको, म्हणायची वेळ येऊ घातली आहे.

   दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत थोडेफ़ार नवे प्रयोग करून केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी जे यश मिळवले, त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते आणि ते योग्यच होते. वर्षभरापुर्वी स्थापन झालेल्या या पक्षाला दिल्लीच्या नागरी राज्यात नेत्रदिपक यश मिळाले, तर कौतुक व्हायलाच ह्वे. पण असे कौतुक केजरीवाल यांच्या इतके डोक्यात गेले, की आपण साक्षात देशाचा व समाजाचा कायापालट घडवण्यासाठी अवतार धारण केलेले महात्मा आहोत; अशा थाटातच हा माणूस भरकटत गेला. राजकीय परिस्थितीमुळे कॉग्रेसने त्यांना पाठींबा दिला आणि थेट मुख्यमंत्री होण्यापर्यंतची मजल मारल्यावर केजरीवाल यांना राजकारण म्हणजे पोरखेळच वाटू लागला. त्यांनी तमाशाच सुरू केला. प्रत्येक नियम परंपरा व संकेत झुगारून, आपण नवेच काही राजकारण करीत असल्याचे सांगत सर्वकाही धाब्यावर बसवण्याचा मार्ग चोखाळला. ज्याला बुद्धीमंत व जाणकार रोखू शकले नाहीत, त्याला अखेर मतदारानेच धरून आपटले. मग त्याचेच सहकारी व पाठीराखे प्रश्न विचारू लागले, तेव्हा त्याला नव्या नाटकाची पळवाट शोधावी लागली. त्यातून मग बुधवारी कोर्टाला व त्याच्या अधिकारालाचा आव्हान देण्यापर्यंत केजरीवाल यांनी मजल मारली. आपण म्हणू तेच योग्य व तोच न्याय असल्या मस्तीतून हा प्रकार चालला आहे. प्रत्येक घटना व गोष्टीचा विपर्यास करण्याच्या खेळाचा अतिरेक झाला आहे. वास्तविक दिल्लीकर मतदार व सहकारी यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तोंड लपवायला जागा हवी, म्हणून त्यांनी जामीन घ्यायचे नाकारून तुरूंगात आश्रय घेतला आहे. पण कोर्टाची कारवाई असताना जणू मोदींची सत्ता आली म्हणूनच आपल्याला तुरूगात डांबल्याचा कांगावाही सुरू केला आहे. बुद्धीमंत माध्यमांइतके सामान्य लोक बुद्दू नसतात, हे त्यांच्या लौकरच लक्षात येईल. कारण आम्मा पकोडाच्या कथेसारखी स्थिती येत चालली आहे.

9 comments:

  1. अम्मा पकोडा :)

    ReplyDelete
  2. वावा एकदम झकास उपमा आणि योग्य परामर्श. केजरीवाल म्हणजे एक अस्सल बनिया आहे. त्याला फक्त सत्ता हवी आहे आणि ती पण डायरेक्ट केंद्रात. दिल्लीच्या छोट्या डबक्यात त्याला रस नाहीये.

    ReplyDelete
  3. " बुद्धीमंत माध्यमांइतके सामान्य लोक बुद्दू नसतात."

    क्या बात है। वाह वाह वाह।

    ReplyDelete
  4. Ok. Bhau Hyncha porkhel aani khotepanacha veet yet chalalay aata.

    ReplyDelete
  5. भाऊ आपला 'बुद्धीमंत माध्यमांइतके सामान्य लोक बुद्दू नसतात' हा एक आता सुविचारच होयला हवा. केजरीवालचे विश्लेषण अगदी योग्य आहे. काल हमिपत्र देण्यास नकार देऊन कळसच केला आहे. आता आणखी पंधरा दिवस कोठडित जाऊन त्याने माध्यमांचा ससेमीरा वाचविला आहे.

    ReplyDelete
  6. लोक बुद्दू कसे नस्तात....केजरीवाल ला निवडून त्यानी सोदाहरण स्पष्ट केले आहे...मीडियावाले तर पोटासाठी करतात बिचारे...जिकडे पैसा तिकडे जलसा....लोकाना हुशार करायची गरज आहे....जागता पहारा आजून कडक करवा लागेल....

    ReplyDelete
  7. अतिशय छान पोस्ट। वाचा व विचार कला।

    ReplyDelete
  8. In Marathi News paper what is going ? Be it be Loksatta or Maharashtra Times and off course Sakal( which is obviously NCP paper)but all against the government of day and joined the bad wagaon of 'Intolarant' Mr. Chavake the representative of MT has cross all his limits of Intolarance while reporting against the BJP.On this back ground your's blog reflects the real image of news reporting. Kudos.

    ReplyDelete