Thursday, June 5, 2014

सायन ते माहिम व्हाया धारावी



(ब्राझिलच्या सावो पावलो या राजधानीतली धारावी न्याहाळताना भाऊ कोरडे}

   मुंबईत सायनला माझा एक खुप जुना मित्र रहातो. गेल्या दोन वर्षात त्याच्याशी झालेल्या चर्चा-वादामुळेच मी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान कसे व का होऊ शकतील, याचे अभ्यासपुर्ण विवेचन करू शकलो, हे आरंभीच सांगतो. भाऊ कोरडे असे त्याचे नाव. गेल्या तीस वर्षात त्याचा सेक्युलर अखंड गोतावळ्यात वावर आहे. पण आमच्या गप्पा नित्यनेमाने होत असतात. त्याने १९९२-९३ च्या भीषण दंगलीनंतर धारावीमध्ये जे काम केले, त्यामुळे त्याची सेक्युलर जगात प्रचंड ख्याती झालेली आहे. वकार खान व भाऊ कोरडे यांच्या संयुक्त प्रयत्नाने धारावीत हिंदू-मुस्लिम सामंजस्य निर्माण होऊ शकले, असे मानले जाते. त्यांच्या त्या कार्यावर टाटा सोशल सायन्सेस या संस्थेने एक तासाचा माहितीपटही निर्माण केलेला आहे. त्यातून भाऊ कोरडेची जगभर ख्याती पसरली. पण पंच्याहत्तरीला पोहोचलेला हा माझा मित्र अन्य मुरब्बी निगरगट्ट सेक्युलर मंडळींसारखा नाही. विवेकबुद्धी शाबूत असलेला व सत्य पडताळून बघायची इच्छा जपलेला असा निरागस माणूस आहे. त्यामुळेच तीस्ता सेटलवाडशी संपर्क असूनही त्याला नरेंद्र मोदी माझ्याकडून समजून घ्यावासा वाटला. खरे बघितले तर त्याच्यामुळेच मी पत्रकार राजकीय अभ्यासक म्हणुन मोदींच्या राजकीय वाटचालीचा जरा तपशीलात अभ्यास करत गेलो. अनेकदा तर आम्ही फ़ोनवर तास दीडतास वाद घालत असतो. तुम्ही कधी मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरलात आणि जिना चढून बाहेर आलात, तर थेट सायन धारावी जोडणार्‍या रेल्वेपुलावर येता. बाहेर पडताच समोर एक सात मजली इमारत दिसते. राजवीर सदन असे तिचे नाव आहे. त्यातच भाऊ कोरडेचे वास्तव्य आहे. इतका तपशील देण्य़ाचे कारण, तो तिथल्या फ़्लॅटमध्ये रहातो हे लक्षात यावे.

   बारा वर्षापुर्वी १९९२च्या दंगलीला दहा वर्षे पुर्ण होत असताना सेक्युलर पत्रकार असलेल्या दोन महिला त्याला भेटायला आल्या आणि त्याची मुलाखत घेऊन गेल्या. त्यांची नावे राधिका राजाध्यक्ष व शबनम मीनवाला. मग त्यांनी छानपैकी बातमी टाईम्स ऑफ़ इंडियामध्ये प्रसिद्ध केली. ती वाचल्यावर मी थक्क झालो आणि त्याला तात्काळ फ़ोन लावला. कारण भाऊ कोरडे हा माझा मित्र झोपडीवासी असल्याचे मला त्याच बातमीमुळे उमगले होते. तो जिथे रहातो, म्हणजे मुलाखतीच्या प्रसंगी जिथे वास्तव्य करीत होता, ती झोपडवस्ती असल्याचे छापून आल्याने मुंबईत सात आठ मजली कॉन्क्रीटच्या झोपड्या कधी उभ्या राहू लागल्या, ते मला जाणून घ्यायचे होते. म्हणून बातमी वाचताच त्याला फ़ोन केला होता. मुद्दा असा, की ज्याच्या फ़्लॅटमध्ये बसून मुलाखत घेतली व छापली, त्याची स्लमड्वेलर म्हणजे झोपडीवासी अशी त्याची संभावना कशाला केली होती? त्यांना बेधडक खोटे लिहायचे असू शकते किंवा त्यांना सभोवती दिसते त्यापेक्षा भलतेच काही बघण्याचा मानसिक आजार तरी असावा. अन्यथा इतक्या मोठ्या जगप्रसिद्ध वर्तमानपत्राच्या बातमीदार, इतकी भयंकर चुक करू शकत नाहीत. मुद्दा असा, की आपण रोज ज्या बातम्या बघतो वा ऐकतो, त्यात कितीसे तथ्य व सत्य असते आणि त्यातला किती तपशील आपल्या मनात काही समजूती निर्माण करण्यासाठी खोटा घुसडलेला असतो, याची प्रचिती यावी. तेव्हापासून भाऊ कोरडेच्या मनात अशा लोकांविषयी शंका निर्माण झालेली होती. त्यामुळेच कुठल्याही सेक्युलर भंपकपणाची शंका आली, मग त्याने माझ्या घरी यावे आणि आम्ही दोनचार तास हुज्जत केल्याप्रमाणे मुद्दे उलथेपालथे करावेत; हा परिपाठ बनून गेला.

   अशा या मित्राने एकदा मला एक मुद्देदूद सवाल केला. त्याचे म्हणणे असे होते, की अनेकदा अशा फ़सव्या गोष्टी वा बातम्या ऐकून वा वाचून त्याला पटलेल्या असतात. पण उहापोह केल्यावर त्याचे शंकानिरसन होते. पण मग आधीच त्याला त्यातला फ़ोलपणा वा खोटेपणा कशाला उमगत नाही? की त्याची बुद्धीच चालत नाही? तेव्हा मी त्याला म्हणायचो, खोटेही खरे ठरवायचे एक तर्कशास्त्र असते. मुद्दे व तपशील सोडून तार्किक युक्तीवादामध्ये वाट वाकडी केली, मग अंधारालाही उजेड ठरवता येत असते. एकदा हा मित्र माझ्या बोकांडी बसला, की हे तर्कटशास्त्र उलगडून सांग. मला थोडावेळ विचार करावा लागला. मग त्याचेच उदाहरण घेऊन तर्कशास्त्राची किमया त्याला उलगडून दाखवली. त्याचा उलगडा व्हावा म्हणूनच आरंभी त्याचे घर आणि स्थानमहात्म्य इथे तपशीलात सांगावे लागले. एव्हाना हा माझा मित्र कुठे वास्तव्य करतो, हे मुंबईत वावरलेल्यांच्या ध्यानी आलेले असेल. तिथूनच मग सुरूवात केली.

   भाऊ कोरडे कुठे रहातो? तो सायनला रहातो. सायनला कुठे रहातो? अगदी सायन स्थानकाच्या समोरच. पण समोर म्हणजे नेमके कुठे? सोपे आहे. सायन स्थानकाच्या समोर उंच इमारत दिसते ना; तिथेच भाऊ कोरडे वास्तव्य करतो. पण सायन स्थानकाच्या दोन बाजू आहेत. पुर्व आणि पश्चिम. त्यापैकी कुठल्या बाजूला त्याचे घर आहे? रेल्वेच्या आधारावर सांगायचे, तर तो सायन पश्चिमेला रहातो.

   आत्ता कसे बोललात. सायन स्थानकाच्या पश्चिमेला तर धारावी पसरली आहे. म्हणजेच तुमचा मित्र सायनला रहात नाही, त्याचे वास्तव्य धारावीमध्ये आहे, थोडक्यात भाउ कोरडे सायनला रहातो, हा मुद्दाच खोडून काढला जातो. मग हेच तर्कशास्त्र पुढे रेटत नेता येते. धारावी म्हणजे तरी काय? पश्चिम रेल्वेच्या माहिम स्थानकाच्या पूर्वेला आणि सायन स्थानकाच्या पश्चिमेला पसरलेल्या भूभागाला धारावी म्हणतात ना? मग धारावीत वास्तव्य करणारा भाऊ कोरडे सायनला रहातो, असा आग्रह तरी कशाला? तो धारावीत रहातो म्हणून तो माहिमला रहातो असेही म्हणता येईल. पण माहिम तर स्थानकाच्या पश्चिमेला पसरलेले आहे. मग भाऊ कोरडे माहिमला रहातो, असे कसे म्हणणार? ठिक आहे. माहिमला नाही, पण धारावीत रहातो, म्हणून तो माहिम स्थानकापाशी रहातो, हे तर मान्य कराल की नाही?

  अशारितीने मग सायन स्थानकाच्या बाहेर वा सायन स्थानकानजीक वास्तव्य करणारा माझा मित्र थेट माहिम स्थानकानजिक वास्तव्य करीत असल्याचे तर्कशास्त्राचा आधार घेऊन सिद्ध करता येते. किंबहूना आपण वाहिन्यांवरील बौद्धिक चर्चा बघितल्या, तर त्याच तर्कटशास्त्राच्या आधारे बहुतेक परिसंवाद नित्यनेमाने चालू असतात. अशा चर्चा ऐकल्यावर शांतपणे त्यांचे मुद्दे व तपशील मनन करावेत व तपासून घ्यावेत. असे आढळून येईल, की त्याची सुरूवात भाऊ कोरडे हा सायन स्थानकापाशी वास्तव्य करतो या मूलभूत माहितीपासून होते आणि अखेर तो माहिम स्थानकापाशी रहातो अशी होते. किती अजब तर्कट आहे ना? एक माणूस सायन स्थानकापाशी वास्तव्य करतो, म्हणूनच तो माहिम स्थानकापाशी रहातो; असे सिद्ध करता येऊ शकते. किंबहूना तेच कानीकपाळी सतत पडत राहिले; मग आपलेही डोके चालेनासे होऊन जाते. त्यामुळे एखादा माणूस निर्दोष आहे; म्हणूनच तो भयंकर मोठा गुन्हेगार असल्याचे आपण निमूटपणे ऐकत असतो. मात्र असली पुराणतली वांगी वाहिन्यांवरून बेधडक खपवली जात असली, तरी व्यवहारी बाजारात त्यांना कोणी ढुंकून विचारत नाही. म्हणूनच मग लोकसभेचे निकाल लागेपर्यंत मोदींच्या पराभवाची भाकिते करणार्‍यांची निकाल समोर आल्यावर तारांबळ उडाली होती. कारण ज्या सामान्य माणसांना सहा महिने तर्कटशास्त्रात गुंतवायचे खेळ खेळले गेले, त्यांनीच असे तर्क उधळून लावत मोदीला थेट देशाचा पंतप्रधान बनवून टाकले होते. ज्यांना सायन म्हणून माहिम स्थानकावर लोकांना घेऊन जायचे होते, त्यांना दाद न देताच लोक सायन स्थानकात पोहोचले. पण ज्यांनी मध्यरेल्वेवरचे सायन स्थानक म्हणजेच पश्चिम रेल्वेवरचे माहिम स्थानक, असा निष्कर्ष काढला होता, ते माहिमला बसून होते. पण निकालाची गाडीच मध्यरेल्वेच्या कुर्ला किंवा भायखळा स्थानकावरून सुटलेली असेल, तर ती पश्चिम मार्गावरून माहिमला जाण्याचीच शक्यता नव्हती.

   अर्थात असले शहाणपण कधी त्या तर्कवीरांना शिकवण्याचा उद्योग आपण करायचा नसतो. कारण असे तर्कटशात्री मग भाऊ कोरडे, त्याचे घर किंवा सायन स्थानक असल्या गोष्टींना बगल देऊन, मध्ये रेल्वे आणि पशिम रेल्वे यांच्या लोहमार्गावरून धावत सुटतात. मग त्यांच्या मदतीला हार्बर रेल्वेमार्ग धावून येतो आणि मध्यरेल्वेची हार्बर लोकल माहिम स्थानकावर येऊ शकते; हे त्यांना सिद्ध करता येत असते. पण मूळ मुद्दा भाऊ कोरडेचे वास्तव्य असलेल्या इमारतीचा व ती सायन स्थानकाच्या समोर असल्याचा त्यांना विसर पडलेला असतो आणि त्याची आठवणही करून दिल्यास ते त्याला विषयांतर ठरवू शकतात. तेव्हा अशा तर्कटशास्त्र्यांना माहिम स्थानकात संपुर्ण आयुष्यभर बसावे लागले; म्हणून तुमचे आमचे काही बिघडत नसते. त्याच्या आनंदात आपण मीठाचा खडा टाकायचे पाप करू नये, असे मी पुर्वीच ठरवले आहे. म्हणूनच मी अशा लोकांच्या वाट्याला जात नाही किंवा असा कुणी समोरून येताना दिसला, तरी रस्ता बदलण्यात धन्यता मानतो. अलिकडल्या काळात माझा मित्र भाऊ कोरडेही तर्कटशास्त्रातून बरा़चसा मुक्त झाला आहे. इथे हे पुराण कथन करण्याचे कारण, आजच अशी एक पोस्ट वा़चनात आली आणि मी मुर्खपणा करून तिथे शंका विचारण्याचा आगावूपणा केला. पोस्टकर्ता माहिम स्थानकाकडे वळल्यावर मी सायन स्थानकापाशी निघून आलो.

1 comment:

  1. अजब तर्कटशास्त्र..... पण अफलातून लेख!

    ReplyDelete