Nikhil Wagle
It's our baby.We create a newspaper or a channel with our blood n sweat. Then a crony capitalist/politician comes n snatches it away! Ha!
कोणीतरी इथे फ़ेसबुकवर निखील वागळे याची ही ट्विटरवरील उपरोक्त प्रतिक्रिया टाकली आहे. बहुधा राजदीप सरदेसाई व त्याची पत्नी सागरिका घोष यांना सीएनएन आयबीएन सोडावा लागल्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे. कारण निखीलचा कायबीइन लोकमतही त्याच नेटवर्कचे भावंड आहे. सहाजिकच येऊ घातलेल्या संकटाचा भयगंड अशा प्रतिक्रीया जन्माला घालत असतो. गेल्या दहा पंधरा वर्षात ज्या क्रोनी जर्नालिझमने, क्रोनी कॅपिटॅलिझमच्या मदतीने देशाच्या राजकारणात व सार्वजनिक जीवनात धुमाकुळ घातला होता, त्याचा अंतकाळ जवळ येऊ घातल्याच्या ह्या खाणाखुणा आहेत. त्यात आज रममाण झालेले सुपातले म्हणून खिदळत असतात आणि जात्यात गेल्यानंतर आक्रोश करू लागतात. निखीलची ही प्रतिक्रीया जात्यात पडल्यानंतरची आहे, की जात्यात जाण्याच्या भयातून आलेली आहे, ते मला आता ठाऊक नाही. पण जी आज त्याची स्थिती व मनस्थिती आहे; त्याला दुसर्या कोणापेक्षाही तोच स्वत: सर्वाधिक जबाबदार आहे. असे म्हटले, की अनेकांच्या भुवया टाळूत जाऊ शकतील. त्या नॉर्मल होण्यासाठी त्यांनी मला शंका विचारण्यापेक्षा त्यांच्याच लाडक्या झुंजार पत्रकार संपादक निखील वागळे, याने अठरा वर्षापुर्वी लिहीलेले दोन लेख अगत्याने शोधून वाचावेत आणि त्यालाही मुद्दाम वाचायला द्यावेत.
त्या काळात आजचे लोकभारती नामक एकखांबी पक्षाचे एकमेव विधान परिषद आमदार कपील पाटीलही झुंजार पत्रकार संपादक होते आणि त्यांनी चालविलेले ‘आज दिनांक’ नावाचे सायंदैनिक बंद पडले होते. तेव्हा कधीकाळी एकत्र टोळीबाजी करणार्या या दोघा झुंजार पत्रकारांत चिखलफ़ेकीची जुगलबंदी रंगली होती. त्यातल्या तीनपैकी दोन लेख निखीलचे होते. पहिला ‘आज दिनांक’च्या अकाली मृत्यूच्या सोहळ्याचा ‘एका सायंदैनिकाचा मृत्यू’ (कॅलिडोस्कोप, महानगर २५ आक्टोबर १९९६) आणि दुसरा त्यावर कपीलने झाडलेल्या दुगाण्यांवर दिलेली सफ़ाई म्हणून लिहीलेला ‘बुडत्याचा पाय खोलातच की हो’ (कॅलिडोस्कोप, महानगर १५ नोव्हेंबर १९९६). आपले लेख कपीलने रागलोभ बाजूला ठेवून गंभीरपणे वाचावेत. त्यावर चिंतन मनन करावे असाही आग्रह निखीलने त्यातून धरला होता. अर्थात आपल्यावरचे किटाळ दूर करण्यासाठी निखीलने असा आग्रह धरला नव्हता. तर एकूणच पत्रकारिता व अविष्कार स्वातंत्र्यापासून माध्यमे, यांच्या मुक्त स्वातंत्र्याविषयीच्या आग्रहास्तव निखीलने तसा सल्ला दिलेला होता. पण जे आपण विचारपुर्वक लिहीले, ते निदान निखीलने तरी कधी गंभीरपणे वाचले होते काय? असते आणि त्यानुसार आचरण केले असते, तर आज त्याला ट्विटरवरून क्रोनी कॅपिटॅलिझमच्या नावाने शिमगा करायचा प्रसंगच आला नसता. किंबहूना त्याला तसल्या पैशाच्या वाट्याला जाण्याचाही प्रसंग आला नसता.
पण निखील असो किंवा कपील असो, अशी सेक्युलर मंडळी नेहमीच मानभावीपणा करण्यात वाकबगार असतात आणि इतरांना शहाजोगपणाने शहाणपणा शिकवण्यात धन्यता मानत असतात. आपण मात्र कोरडे पाषाण रहातात. त्याहीपेक्षा घाणेरडी गोष्ट म्हणजे क्रोनी कॅपिटॅलिझमच्या नावाने आज शंख करणारे अगोदर त्याच क्रोनी कॅपिटॅलिझमचा लोणी कॅपिटॅलिझम म्हणून उपभोग घेतात आणि जेव्हा त्यातले लोणी संपून ताक चाखायची वेळ येते, तेव्हा नाके मुरडून क्रोनी कॅपिटॅलिझमचा उद्धार सुरू करतात. ज्या पैशावर यांनी मौजमस्ती केलेली असते ‘तो अमाप पैसा हाती आला मग विवेक सुटतो’ आणि आपण कुणाचे दलाल हस्तक झालोत त्याचे भानसुद्धा उरत नाही. असले सल्ले अठरा वर्षापुर्वी कपील पाटलांना देणार्या निखीलला कायबीइन लोकमत नावाचे चॅनेल उभे करताना तिथला पैसा गंगेत धुवूनपुसून आणलेले पवित्र भांडवल वाटले होते काय? नसेल तर त्याच वहात्या गंगेत हात धुवून नव्हे यथेच्छ डुंबून झाल्यावर आक्रोश कशाला? जे चॅनेल रक्त व घाम गाळून उभे केले असा निखीलचा दावा आहे, त्यात भांडवल ओतणार्या विजय दर्डा यांच्यावर कोळसा घोटाळा प्रकरणात आरोप झाल्यावर संपादक निखील वागळे यांचे अविष्कार स्वातंत्र्य कुठल्या खाणीत तोंड लपवून बसले होते? अठरा वर्षापुर्वी कपीलवर दुगाण्या झाडताना मुकेश पटेल व लालसिंग राठोड यांच्या पैशाचे पावित्र्य तपासणार्या निखीलला, नव्या चॅनेलमध्ये ओतला जाणारा फ़ंड कुठून आला, त्याची चिट तपासायची बुद्धी कशाला झाली नव्हती?
अशा सेक्युलर शहाण्यांच्या भंपकपणाचे शहाजोग बुद्धीप्रदर्शन कवडीमोलाचे असते आणि त्याला कुठलेही ऐतिहासिक मोल नसते. पण तरीही असली रद्दी जपायची मला एक वाईट सवय आहे. कारण हे शहाणे आपलेच ‘उत्सर्जित’ पांडित्य विसरतात, तेव्हा त्यांना व त्यांच्या समर्थकांना त्याचे स्मरण करून देणे अगत्याचे असते. अन्यथा निखीलच्याच भाषेत व शब्दात ‘चुकीच्या गोष्टीचीच इतिहास म्हणून नोंद होऊन जाते ना?’ कायबीइन लोकमत वाहिनीसाठी रक्त आटवल्याचा व घाम गाळल्याचा दावा निखीलने केला आहे. पण नुसत्या रक्त व घामातून वृत्तपत्रे व चॅनेल उभे राहू शकत असतील, तर असल्या महान पत्रकारांनी भांडवलदारांना सोबत घ्यावेच कशाला? नुसत्या श्रम व बुद्धीने ही माध्यमे उभी रहात नाहीत, तर त्यासाठी असल्या महान बुद्धीमंतांच्या मिजाशीला संभाळणारा अतिरीक्त पैसा त्यामध्ये ओतावा लागतो. तो ओतण्याची ‘अतिरीक्त’ क्षमताच त्या माध्यमांच्या उभारणीचा खरा पाया असतो. जेव्हा अशी माध्यमे विश्वासार्हता गमावतात, तेव्हा गुंतलेला पैसा बुडीत जाण्याची शक्यता निर्माण होते आणि ज्याचे पैसे, त्याला भांडवलाची जपणूक करण्यासाठी मिजासखोर दिवाळखोर बुद्धीमत्तेला डच़्चू द्यावा लागतो. थोडक्यात लोणी कॅपिटॅलिझम संपून ताकावर समाधान मानायचा क्रोनी कॅपिटॅलिझम सुरू होतो. तेव्हा बुद्धी गुंडाळून चोराच्या उलट्या बोंबा सुरू होतात. अर्थात हे सर्व माझे निष्कर्ष वा आरोप समजण्याचे कारण नाही. मी अत्यंत संयमी भाषेत मतप्रदर्शन केले आहे. असल्या ‘रक्त व घाम गाळणाच्या’ ढोंगाविषयी निखीलचे शब्दच अधिक बोलके व बोचरे आहेत. तेव्हा त्याने ते कपीलसाठी लिहीले होते. आजच्या निखीलला त्याचेच अठरा वर्षापुर्वीचे शब्द किती चपखलपण बसतात, ते वाचून त्याचेच चहाते थक्क होतील. जमल्यास पुढल्या आठवड्य़ात सवडीने टाईप करून मुद्दाम सादर करीन.
भाऊ म्हणजे वागळेने कायबीइन लोकमत सोडले वाटते.
ReplyDeleteBhau, forget about Nikhil or Rajdeep, will you welcome such acquisition of media by the capitalists like Adani or Ambani ?? will it remain authentic or transparent?? will it speak against the vested interests of these capitalists??
ReplyDeleteI admit that media today is not genuine, but situation will be even worse post acquisition. Media will be a puppet in the hands of these capitalists.
गॅन्गवॉरमध्ये कोण शकील दाऊदचा आणि कोण गवळी राजनचा इतकाच फ़रक असतो. त्यातले शार्पशुटर होणार्यांनी सुपारीबाजी करण्याच्या मी विरोधात नाही. त्यांनी हौतात्म्याचा आव आणू नये इतकाच माझा दावा आहे.
Deleteअगदी बरोबर भाऊ ! मी आपल्या मतासी पूर्णपणे सहमत आहे. ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे याला काही अर्थ नाही.
Deleteभाऊ, आपल 'हौतात्म्य' वाल वाक्य म्हणजे, वाह वाह!
ReplyDeleteवागळ्यांनी ते वाचल तर ते म्हणतील की चपलांनी मारा पण असल्या शब्दास्त्रांचा मारा नको!