Monday, August 11, 2014

सोमगो गेलो नि पाटपरूळा पावन इलो



   मालकांनी सोमा नावाच्या गड्याला रात्री झोपण्यापुर्वी सुचना दिली, की सकाळी लौकर उठायचे आहे. पाटपरूळे नावाच्या गावी जायचे असल्याने लौकर उठायचे आहे. मान डोलावून सोम्याने होकार भरला आणि वळकटी उचलून तो झोपायला गेला. दुसर्‍या दिवशी पहाटे उठल्यापासून मालक सोम्याची चाहुल घेत होता व कुठे त्याचा थांगपत्ता नव्हता. अखेरीस त्याला हाका मारूनही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर मालकाने आपली आवराआवर सुरू केली. प्रातर्विधी उरकले, अंघोळ झाली, निघायची तयारी झाली; तरी सोम्याचा ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे सगळा ठरवलेला बेत उधळला गेलेला होता. वैतागून कुठे गेला हा सोम्या मरायला, असे शिव्याशाप देत मालकाने पाटपरूळ्याला जाण्याचा बेतच रद्द केला. सकाळची कोवळी उन्हे उभी झाली आणि दुपार होत आली. जेवणे उरकून मालक वामकुक्षी घेत ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसले असताना अंगणात चाहुल लागली. म्हणून बघितले तर धापा टाकत सोमा त्यांच्याकडेच येताना दिसला. वैतागलेल्या मालकाचा दाबून ठेवलेला संताप उफ़ाळून आला. दोनतीन अस्सल मालवणी बोलीतल्या ‘गाळी’ हाणूनच त्यांनी विचारले, खंय गेल्लंस मरूक रे सोम्या? फ़ुललेला श्वास आवरत अवाक झालेला सोम्या मालकाकडे बघतच राहिला. त्याला शिव्यागाळी वा दमदाटीची अजिबात अपेक्षा नव्हती. उलट केलेल्या कौतुकास्पद कामाबद्दल पाठ थोपटली जाईल, अशी त्याला आशा होती. धापा टाकत सोमा उत्तरला, ‘पाटपरुळ्याक जावन इलंय’. हे उत्तर ऐकून मालकाचीच बोबडी वळली. कारण पाटपरूळे म्हणजे पलिकडले गाव वा गल्ली नव्हती. दहा मैलाचे अंतर होते. इतके अंतर हा गडी जाऊन परत आला? इतक्या अल्पावधीत? घोड्यावरून गेला की गाडीतून आला? मालकाचे डोकेच चालत नव्हते. आणि जाऊन आला तरी कशाला? मालकाने आपली शंका सोम्याला विचारली.

   ‘पाटपरूळ्याक जावन केलंस तरी काय?’ याचे मात्र उत्तर सोम्यापाशी नव्हते. रात्री मालक पाटपरूळ्याला जायचे म्हणाले, म्हणून तो इमानेइतबारे भल्या पहाटे उठून पायपीट करीत त्या दिशेने निघाला व उजाडण्याच्या दरम्यान तिथे पोहोचला होता. त्या गावाची वेस ओलांडल्यावर तसाच माघारी फ़िरला होता. दोन क्षण कुठे विश्रांतीसाठी सुद्धा न थांबता उलटा प्रवास करीत माघारा गावी आलेला होता. पाचसहा तासात इतका मोठा पल्ला गाठला त्यासाठी आपली पाठ थोपटली जावी, ही त्याची अपेक्षा चुकीची अजिबात म्हणता येणार नाही. पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि मालक मात्र तिकडे गेलासच कशाला, असा जाब विचारत होता. मालकाचे असले प्रश्नच सोमाला कधी उमजले नाहीत. त्यामुळे त्याचे मन अनेकदा खुप विषण्ण व्हायचे. कितीही मरा-खपा, पण मालकाकडून कौतुक त्याच्या वाट्याला येत नसे. उलट मालक असे काहीतरी प्रश्न विचारून सोम्याच्या कष्टाची हेटाळणीच करायचा. आताही पाटपरूळ्याचा पल्ला गाठून माघारी फ़िरल्याचे कौतुक राहिले आणि मालक विचारत होता, तिकडे गेलासच कशाला? कशाला म्हणजे? रात्री मालकच म्हणाले म्हणून गेला ना सोमा? पण तिथे कशाला जायचे व काय करायचे आहे, असे त्याने रात्री विचारले नव्हते, की मालकाने सांगितले नव्हते. सोमाला त्याची गरजही नव्हती. मालकाने बोट दाखवले आणि सोमा सूसाट सुटला होता. मग पाटपरूळ्याला जाऊन करायचे काम झाले नसले, म्हणून काय बिघडले? काम महत्वाचे नव्हते, तर पाटपरूळ्याला पोहोचणे आवश्यक होते. सहाजिकच तिथे काय करायचे होते, त्याचे सोम्याला आधी महत्व वाटले नाही किंवा आता मालक वैतागला असतानाही त्याचा कार्यकारणभाव सोम्याच्या लक्षात येत नव्हता. वाहिन्यांवरच्या ब्रेकिंग न्यूज वा चर्चा बघितल्या, तर त्याच सोम्याची आठवण येते ना? ही सगळी मंडळी सोम्याचेच पट्टशिष्य आहेत काय असेही वाटू लागते.

   कोणीही नेता वा व्यक्ती बोलण्याचा अवकाश, त्याला काय म्हणायचे आहे, ते समजून घेण्याआधीच त्यांच्या ब्रेकिंग न्युज व अफ़वाबाजी सुरू होत असते. त्यातून मग अर्थाचा अनर्थ करायचा गोंधळ इतका माजतो, की मूळचे बोलणार्‍याला आपलेच शब्दही आठवू नयेत. रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाजपा विजयाचे श्रेय एका व्यक्तीचे नाही, तर जनमानसाने घडवलेले परिवर्तन आहे, असे मतप्रदर्शन केले. विनाविलंब त्यांनी कसे मोदींना लक्ष्य केले किंवा भाजपाच्या नेतृत्वाला त्यांनी कानपिचक्या दिल्या; त्याचे विविध पैलू उलगडण्याचा उद्योग सुरू झाला, मोदी लाट, मोदींचा करिष्मा किवा आणखी तत्सम शब्दात लोकसभा निकालांचे जे कोडकौतुक गेले दोन महिने चालू आहे, त्यात यशाच्या मानकर्‍यांचे शब्द किती आहेत? नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग वा आणखी कोणी त्या पक्षाच्या नेत्यांनी यशाचे कितीसे श्रेय स्वत:कडे घेतले आहे? प्रत्येकाने पक्षाला, कार्यकर्त्याला वा संघटनेला श्रेय दिले आणि खुद्द भागवत यांनीही जनतेला हवे म्हणून परिवर्तन झाल्याची ग्वाही दिलेली आहे. त्यातून मग मोदी वा अन्य कुणा भाजपा नेत्याला कानपिचक्या दिल्याचा सवालच कुठे येतो? असली विश्लेषणे वा अनर्थ शोधून काढणारे पाहिले, मग म्हणूनच सोमग्याची आठवण येते. समोरचा माणूस काय म्हणतोय वा सांगू पहातोय, त्याचे ऐकायचे सोडुन आपल्या मनात असेल तसाच त्याचा अन्वय लावायचा हा प्रकार दिवसेदिवस खुपच बोकाळला आहे. त्यामुळे माध्यमांची व पत्रकारितेची विश्वासार्हता मात्र पुरती लयास जाऊ लागली आहे. भाजपा मोदीमय झाला, सरकारात एकाच व्यक्तीचा शब्द चालतो. सर्वच श्रेय एका व्यक्तीला जाते, असल्या गोष्टींनी संघात अस्वस्थता आलेली आहे, अशी एक सेक्युलर समजूत आहे आणि संघाच्या बाबतीत अनेक समजूतीच अशा गैरसमजाला कारणीभूत आहेत. त्यामुळेच माध्यमात सोमग्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे.

   भागवत यांना यशाचे श्रेय मोदींना द्यायचे नाही किंवा अमित शहांना डोईजड होऊ द्यायचे नाही, अशी एक थिअरी असल्या बातम्यांच्या मागे असते. पण निवडणूक निकाल लागल्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्लीत पोहोचलेल्या नरेंद्र मोदींनी दिलेली पहिली प्रतिक्रिया अशा किती सोमग्या पत्रकारांना आठवते? भागवत आज बोलले असतील व त्यांनी परिवर्तनाचे श्रेय आज जनतेला दिलेले असेल. पण मोदींनी निकालानंतर पहिल्याच प्रतिक्रियेत सगळे श्रेय जनता, कार्यकर्ता व संघटना यांच्या झोळीत टाकताना तब्बल चार पिढ्यांनी उपसलेल्या कष्टांना सगळे श्रेय देऊन टाकले होते. आज इथे जमलेले, खेडोपाडी राबलेले कार्यकर्ते व जिंकलेले उमेदवार नव्हेतर १९५२ सालापासून जनसंघ म्हणून काम करताना खपलेल्या चार पिढ्यांच्या कष्ट व त्यागाचे हे फ़लित असल्याचा निर्वाळा मोदी यांनी दिलेला होता. आठ लोकसभा निवडणूकीनंतर एका पक्षाला स्पष्ट बहूमत मिळवण्याच्या प्रदिर्घ प्रक्रियेत आठ महिने अहोरात्र कष्ट उपसलेल्या नेत्याने असे श्रेय चार पिढ्यांना देऊन टाकल्यावर त्याला कानपिचक्या देण्याची गरज उरते काय? भागवत यांनी त्याच्याही पुढे जाऊन पक्ष वा संघालाही दिले जाणारे परिवर्तनाचे श्रेय थेट जनतेलाच देऊन टाकले आहे. आधीच्या निवडणूकातही हेच पक्ष हेच नेते व ह्याच संघटना होत्या, पण परिवर्तन झाले नव्हते. कारण जनतेची तशी इच्छा नहती. आज जनताच राज्यकारभाराची दिशा निश्चित करते. त्यानुसार बदल होतात. असे भागवत म्हणतात, तेव्हा ते भाजपाला कानपिचक्या देत नसतात. तेव्हाही संघ व त्याची संघटना होती, तरीही असे परिवर्तन झाले नव्हते, याचीही कबुली देतात. लोकशाहीच्या युगात व समाजात कुठली संघटना वा व्यक्ती परिवर्तन घडवत नाही, तर जनताच बदल घडवून आणते हे लोकशाही मूल्य त्यांनी सांगण्याचा प्रयास केला. पण सोमग्यांना त्याचा अर्थ उलगड्यापर्यंत सवड कुठे असते?

4 comments:

  1. भाऊ किती सुरेख विश्लेषण करता तुम्ही... तुमचा प्रत्येक लेख वाचताना त्या घटनेकडे वा गोष्टीकडे बघण्याचा आम्हासारख्या सामान्यांचा दृष्टीकोनच बदलुन जातो.खूप सुंदर भाऊ...धन्यवाद.

    ReplyDelete
  2. इतक्या वर्षाच्या अनुभवाने मालकाला थोड़ी तरी कल्पना असावी आपला 'सोम्या' हा सोम्याच आहे. त्यामुळे कळेल अश्या भाषेत बोलेलं तर अशे प्रसंग येणार नाही.

    ReplyDelete
  3. राजेंद्र भंडारी यांच्याशी सहमत ! अजय घाटे, सोम्याला कोणत्याही भाषेत बोलले तरी तो असाच वागतो त्याला मालक काय करणार ?

    ReplyDelete
  4. Extraordinary!!!! Amazing!!! Superb Analysis!!!!

    ReplyDelete