उद्यापासून राज्य विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरायला आरंभ होत आहे आणि अजून कुठल्याच बाबतीत युती वा आघाडीत जागावाटपाला मुहूर्त लागलेला नाही त्यामुळे बहुधा कुठल्याच पक्षातर्फ़े उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात रिपब्लिकन, शेकाप वा कम्युनिस्ट पक्षातर्फ़े अर्ज भरले जाऊ शकतात. पण त्यापैकी कोणी सत्तेच्या शर्यतीमध्ये नसल्याने, त्यांना राजकीय महत्व दिले जात नाही. जे चार प्रमुख पक्ष महाराष्ट्रात आहेत, त्यांच्यात अजून जागावाटप झालेले नाही, म्हणूनच पक्षांतर्गत तिकीट वाटप खोळंबले आहे. त्यात ज्या जागा वाटपाशिवाय पक्क्या आहेत, तिथे मात्र अर्ज भरायची सज्जता झालेलीच असेल. म्हणजे विद्यमान मंत्री वा भावी मंत्री आहेत, त्यांनी आपापली कागदपत्रे सज्ज ठेवलेली असतील. थोडक्यात ज्यांनी जागावाटप व तिकीटाच्या वाटपाचा घोळ चालविला आहे, त्यांची स्वत:ची सज्जता आधीच झालेली आहे. ज्यांच्या हाती उमेदवारी वाटपाचे काहीच अधिकार नाहीत, त्यांचा मात्र जीव टांगलेला आहे. एका बाजूला आघाडीत बिघाडी होऊ घातली आहे. पण ती विनाअट नाही. युती फ़िसकटत असेल, तर राष्ट्रवादी व कॉग्रेसलाही आघाडी मोडायची आहे. पण युती असेल, तर त्यांनाही आघाडी हवी आहे. आत्मविश्वास गमावलेल्यांच्या हाती पक्षाची सुत्रे असली, मग यापेक्षा वेगळी अपेक्षा बाळगता येत नाही. त्यामुळेच कसले ना कसले खुसपट काढून चारही पक्षाने नेते लपंडाव खेळत आहेत. राष्ट्रवादीने कॉग्रेसच्या लोकसभेतील अपयशाचे भांडवल केले आहे, तर भाजपाने पाच निवडणुकात शिवसेनेच्या हरलेल्या जागांचे भांडवल केले आहे. त्यामागचे युक्तीवादही मोठे विनोदी आहेत. मजेची गोष्ट म्हणजे राजकीय विश्लेषण करायला बसणार्यांनाही साधेसाधे प्रश्न पडत नाहीत. पक्षाचे नेते वा प्रवक्ते बडबडतील, तेच प्रमाण मानून विवेचनाचे गुर्हाळ चालविले जात असते.
उदाहरणार्थ शिवसेनेने मागल्या पाच निवडणूकात आपल्या वाट्याला आलेल्या ५९ जागा कधीच जिंकून दाखवलेल्या नाहीत आणि म्हणून त्याविषयी फ़ेरविचार व्हावा, असा भाजपाचा दावा आहे. अर्थात तो एकतर्फ़ी दिसणारा दावा नाही. आपल्याही १९ जागा भाजपा कधीच जिंकू शकलेला नाही, म्हणून तिथलाही फ़ेरविचार व्हावा, असा त्यांचा दावा आहे. सहाजिकच त्यांचा दावा तर्कशुद्ध व न्याय्य वाटतो. पण म्हणून तो खरेच तर्कशुद्ध आहे काय? युती होण्यापुर्वी दोन्ही पक्षांनी कधीच सगळ्या जागा स्वबळावर लढवल्या नव्हत्या आणि युती झाल्यावरही त्यांनी सगळ्या जागा युती म्हणूनच लढवल्या आहेत. त्यामुळे गमावलेल्या जागा किंवा कधीच न जिंकलेल्या जागा, युतीमुळे जिंकता आल्या वा नाहीत, असाच अर्थ होतो ना? समजा शिवसेनेचा उमेदवार होता म्हणून जागा गमावल्या असतील, तर तिथल्या उमेदवाराचा पक्ष बदलून विजय कसा मिळू शकतो? त्यामागचे तर्कशास्त्र काय आहे? सेनेचा उमेदवार असताना भाजपाने तो जिंकण्यासाठी काम केले नव्हते आणि आपल्याला ती जागा मिळाल्यावर आता पुर्ण ताकद लावून जिंकणार काय? किंवा उलटे भाजपाच्या पडलेल्या जागी सेनेने मुद्दाम काम केले नाही आणि भाजपाचे त्या जागचे उमेदवार पडू दिले होते काय? नसतील तर मग युती म्हणून पडलेल्या उमेदवाराची चिंता आताच कशाला? युती म्हणून आजवर काम झाले असेल, तर युती म्हणूनच उमेदवार पराभूत झाला असणार. आज विजयाची शक्यता असेल, तर युती म्हणूनच जिंकण्याची शक्यता होते. एकत्र लढताना पक्षाचा उमेदवार नसतो, याचा विसर कसा पडतो? थोडक्यात जागा जिंकण्याची शक्यता वाढलेली आहे, म्हणून प्रत्येक पक्षाला अधिक जागा हव्या आहेत आणि आजवर पडायच्या जागा घेऊन लढवल्या, तर जिंकायच्या वेळी शिवसेनेला त्या जागा सोडायच्या नाहीत. हेच त्या गुर्हाळातले सत्य आहे.
लोकसभेतील यश हे मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक आणि भाजपाला मिळालेला प्रतिसाद कमी होता. म्हणूनच उत्तर प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणूकात भाजपाला तिथे कमी प्रतिसाद मिळाला आणि तोच निकष महाराष्ट्र विधानसभेला लागू होतो. म्हणून इथे तेव्हा मनसेला टांग मारणारा मतदार पुन्हा मनसेकडे येईल, तसाच इथे कोणाचे राज्य हवे, त्यानुसार मतदार आपला कौल देणार आहे. अर्थात ज्याचे आमदार जास्त त्यालाच मुख्यमंत्रीपद हे आधीच ठरलेले समिकरण आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांना आपला मुख्यमंत्री करायचा असेल, तर अधिक जागा लढवण्याचा हट्ट करण्याचे कारण नाही, तसाच सर्वच २८८ जागा जिंकण्याचा अट्टाहास करायची गरज नाही. आजही भाजपाच्या खात्यात ११९ जागा आहेत आणि त्या सर्वच जिंकल्या तरी भाजपाला मुख्यमंत्री पदावर दावा करता येईल. कारण सेनेकडे असलेल्या अधिक पडणार्या जागा सेनेचा उमेदवार असताना जिंकून येण्य़ाची शक्यता भाजपाला वाटत नाही. तसे झाले तर १५० जागा लढवूनही सेना शंभरी गाठू शकत नाही. उलट भाजपा अवघ्या ११९ जागा लढवून ११० पेक्षा नक्कीच अधिक जागा जिंकू शकते. त्या पक्षाने सेनेच्या पडणार्या जागांची फ़िकीर करायची काही गरज उरत नाही ना? कमी जागा असूनही जिंकायच्या अधिक असल्याने आतापासूनच भाजपाला मुख्यमंत्री पदाची हमी मिळालेलीच आहे. दोन्ही पक्षाच्या मिळून ज्या कधीच न जिंकलेल्या ७८ जागा आहेत असे भाजपा म्हणतो, त्याच्यावर पाणी सोडून उरलेल्या २१० जागा जिंकायला कंबर कसली, तरी सत्ता युतीचीच येणार ना? मग इतके सोपे समिकरण असताना ७८ जागा हरण्याची चिंता कशाला? २८८ जागा जिंकायची अपेक्षा कोणीच करू शकत नाही आणि कधीही सत्तेसाठी लढताना जिंकायच्या जागांवर लक्ष केंद्रीत करायचे असते. मग जिंकायच्या २१० जागा युतीकडे असताना भाजपा पडायच्या ७८ जागांसाठी जीव इतका कशाला पाखडतो आहे?
भाजपामध्ये सध्या कार्यकर्त्यांपेक्षा रणनितीकार अधिक झालेत. त्यामुळे रणांगणात उडी घेऊन लढायला कोणी नाही. पटावर युद्ध करणार्यांच्या गर्दीत देवेंद्र एकटाच फ़डणवीस असून तावड्यांच्या विनोदापासून अनेकजण नाना (प्रकारचे) फ़ोडणवीस बोकाळले आहेत. त्यातून मग लढायचे सोडून वाटाघाटीतच युद्ध जिंकण्याच्या रणनितीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यातून असले तर्कशास्त्र जन्माला येत असते. शिवसेनेकडे असलेल्या जागा गमावण्य़ाची चिंता अधिक आहे. मग भाजपाकडे असलेल्या सर्वच जागा जिंकण्याची रणनिती कशाला योजली जात नाही? आपली सगळी बुद्धी त्यावर खर्च कशाला होत नाही? इतकी शक्ती व बुद्धी त्यासाठी खर्ची घातली, तर आधीपासून हाताशी असलेल्या ११९ जागांपैकी ११५ जिंकता येतील आणि विक्रम होऊन जाईल. १९९० नंतर कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रामध्ये चार निवडणूकात शंभरी पार करता आलेली नाही. तेव्हाही शरद पवार यांना आठवले रिपब्लिकन गटाला सोबत घेऊन १४१ इतकाच पल्ला गाठता आलेला होता. बहूमतासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागली होती. म्हणजेच सेनेकडल्या सतत गमावलेल्या जागांची फ़िकीर करण्यापेक्षा भाजपाने आपल्याकडे असलेल्या सर्व ११९ जिंकायचा विडा उचलला, तर मोठाच पराक्रम होऊन जाईल. कॉग्रेसही १९९५ नंतर सर्वात मोठा पक्ष होताना ९० आमदारांचा पल्ला गाठू शकलेली नाही. म्हणूनच ११९ जागा सर्वस्व पणाला लावून भाजपा लढला, तरी त्यांना कोणी मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवू शकणार नाही. पण खरेच आघाडी विरोधातली लाट असेल, तर सेनेकडल्या हमखास पडू शकणार्या जागाही जिंकल्या गेल्या, तर सेनेचे आमदार शंभरीच्याही पलिकडे जाऊन सर्वात मोठा पक्ष होण्याचे भय भाजपाला सतावते आहे काय? भाजपातल्या ‘नाना’ फ़ोडणवीसांना त्याचीच अधिक चिंता असावी. अन्यथा अकस्मात सतत पडलेल्या जागांचा इतका गाजावाजा कशाला झाला असता
भाजपाने पोटनिवडणुकीनंतर शहाणे व्हावे.
ReplyDelete