Thursday, October 2, 2014

कोण उमेदवार कुठल्या पक्षाचा?



विधानसभेच्या उमेदवारीचा आता निर्वाळा आलेला आहे. माघारीची मुदत संपली असुन मैदानात जितके उमेदवार शिल्लक आहेत, त्यांना लढावेच लागणार आहे. त्यात ज्यांना आपल्या पक्षाच्या निशाणीचे अधिकृत पत्र मिळालेले आहे, त्यांना १९ आक्टोबरपर्यंत त्याच पक्षाचे उमेदवार मानणे भाग आहे. मात्र निकाल लागल्यावर त्यातला कोण कुठल्या पक्षात असेल, त्याची हमी त्यालाही देता येणार नाही. अर्ज दाखल करण्याला शेवटचे दोन दिवस बाकी असताना राजकीय चित्र स्पष्ट झाले आणि राज्यात चौरंगी लढती होणे निश्चीत झाले. त्यानंतर हजारो उमेदवारांना आपापल्या परिसरातील कार्यालयात जाऊन विधीवत अर्ज दाखल करणे सोपे काम नव्हते. कारण आता उमेदवाराला शेकडो कागदपत्रे वा पुरावे सादर करावे लागतात. बारीकसारीक कागदाच्या अभावी उमेदवारी अर्ज फ़ेटाळला जाऊ शकतो. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासारख्या जाणत्या उमेदवाराचा अर्ज एका प्रतिज्ञापत्राच्या अभावी शेवटच्या क्षणी फ़ेटाळला गेला. ही स्थिती बघितली, तर शेवटच्या दोन दिवसातल्या घाईने इच्छुकांची किती तारांबळ उडाली असेल, याची नुसती कल्पना केलेली बरी. कारण आपल्या पक्षाच्या वतीने कोण अर्ज दाखल करतोय आणि पक्षाने खरोखरच कोणाला उमेदवारी दिलीय, त्याचा स्थानिक कार्यकर्त्यांनाही अखेरच्या दिवशीही थांगपत्ता नव्हता. नारायण राणे यांचे समर्थक राजन तेली आधीच राष्ट्रवादी पक्षात गेलेले होते. पण तिथून उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांनी शेवटच्या दिवशी भाजपात प्रवेश करून सावंतवाडीतून उमेदवारी मिळवली. म्हणजे तिथल्या वा जिल्ह्यातल्या भाजपा नेते कार्यकर्त्यांनाही राजन तेली आपल्या पक्षात असल्याचे व आपला आगामी विधानसभेचा उमेदवार असल्याचे बातम्यातून समजले. कमीअधिक प्रमाणात हीच सर्व पक्षाची अवस्था आहे. पुढल्या बारा तेरा दिवसात त्यात कितीशी सुधारणा होऊ शकेल?

प्रत्येक मोठ्या पक्षाने आपापले बळ तपासून बघायचा निर्णय घेतला आहे आणि तसे डावपेच आधीपासूनच शिजत होते, असा गौप्यस्फ़ोट होऊ लागला आहे. सोमवारीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला पक्ष स्वबळावर लढायची तयारी आधीपासून करीत होता, याची एका मुलाखतीतूनच कबुली दिली. बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भात एका प्रचारसभेत थेट शरद पवार यांच्याच इशार्‍यावर शिवसेना भाजपा युती मोडली गेल्याचा गौप्यस्फ़ोट केला. युती मोडा, मग आम्ही तासाभरात आघाडी मोडतो असे पवारांनी भाजपाच्या नेत्याला फ़ोनवर सांगितले आणि तसेच घडले. मुद्दा इतकाच, की पवार म्हणतात एवढ्यावर भाजपा नेत्यांनी असला जुगार खेळला असेल काय? कुठल्याही प्रयत्नांनी पुन्हा कॉग्रेस सत्तेवर येण्याची अपेक्षा नाही, की आघाडीला सत्ता मिळण्याची संधी नाही, हे ओळखण्याइतके पवार चलाख आहेत. मग त्यांनी पराभवात आपल्या खर्‍या बळाची परिक्षा घ्यायचा डाव खेळून घेतला असावा. मात्र युती अबाधित ठेवून ही परिक्षा संपू शकली नसती. म्हणुनच त्यांनी आपल्याप्रमाणेच भाजपाच्या मित्रांना तशी गळ घातली असावी. मोदींच्या लोकप्रियतेवर भाजपा सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो, कारण आज बाळासाहेब हयात नाहीत. म्हणूनच भाजपाने सेनेचे जोखड झुगारून स्वबळाची चव चाखावी, भाजपाचे काम सोपे करण्यासाठी राष्ट्रवादीही आघाडी मोडीत काढील, असे आश्वासन पवार देऊ शकतात. ते तर्कशुद्ध असल्याने भाजपाने त्यावर विश्वास ठेवला, तर चुकीचे मानता येणार नाही. शिवाय निकालानंतर गणित फ़सले, तरी सेना भाजपा सत्तेसाठी एकत्र येण्याचा मार्ग खुला रहातो. असे गणित मांडले तरी सोपे असले म्हणून मैदानात उमेदवार लागतात. ते सगळ्यांकडे होतेच असे नाही. ऐनवेळी इतके उमेदवार कॉग्रेस वगळता कुठलाच पक्ष लढवू शकत नाही. त्यामुळेच मग पळवापळवीचे पेव फ़ुटले.

कॉग्रेस आणि शिवसेना यांची फ़ारशी पळापळ होताना दिसली नाही. याचे पहिले कारण त्या दोघांकडे खेड्यापाड्यापर्यंत मोजक्या कार्यकर्त्यांचे का होईना, जाळे पसरलेले आहे. त्यामुळेच नावाला उभा करण्यासारखा उमेदवार त्यांना मिळू शकतो. पण राष्ट्रवादी व भाजपा यांची तारांबळ उडाली. सहाजिकच अखेरच्या क्षणी मिळेल त्या अन्य पक्षातले कोणीही घेऊन त्यांना उमेदवारीच्या घोड्यावर या पक्षांनी बसवले आहे. म्हणूनच याच दोन पक्षांनी युती वा आघाडी मोडण्यात पुढाकार कशाला घेतला, त्याचे रहस्य निकालानंतरच उलगडू शकेल. प्रामुख्याने भाजपाची निती कमालीचे रहस्य आहे. युतीची सत्ता हातातोंडाशी आलेली असताना त्यांनी असले उद्योग कशाला करावेत? त्यासाठी चुकीचे गैरलागू तर्क कशाला द्यावेत, हे खरेच एक कोडे आहे. लोकसभेच्या विधानसभानुसार निकालावर नुसती नजर टाकली, तरी युतीला सहजगत्या सत्ता मिळू शकेल असे दिसते. ६० हजाराचे मताधिक्य असलेल्या ३९ जागा त्यात आहेत, तर ५० हजारापेक्षा जास्त मताधिक्य असलेल्या २१ जागा. याचा सरळ अर्थ इतकाच होतो, की युतीला त्या ६० जागा कुठलेही कष्ट घेतल्याशिवाय मिळू शकणार होत्या. मग उमेदवार सेनेचा असो किंवा भाजपाचा असो. त्यानंतर ४० हजारावर मताधिक्य असलेल्या ३९ जागा जिंकायला सोप्या होत्या. त्याही जोडल्या तर ९९ जागी युती निश्चींत राहू शकत होती. फ़ारशी मेहनत केल्याशिवाय अशा ९९ जागा युतीपक्षांच्या खिशात होत्या. म्हणजेच बहूमतासाठी त्यांना केवळ आणखी पन्नास साठ जागांची लढाई करायची होती. त्यातल्या ४२ जागा अशा आहेत, की जिथे लोकसभेला युतीला ३० हजाराहून अधिक मते मिळालेली होती. तर २० हजारापेक्षा जास्त मताधिक्याच्या आणखी ४७ जागा आहेत. त्यांची बेरीज ८९ होते. या जागा सर्व शक्ती पणाला लावून लढवल्या असत्या, तरी बहूमताचा किल्ला युती सहज पादाक्रांत करू शकत होती.

गेल्या आठ लोकसभा व पाच विधानसभा एकत्र एकदिलाने झुंजणार्‍या युतीला आताच्या विधानसभा निवडणूकी इतकी सोपी लढत कधीच द्यायची नव्हती. मग युतीला तोडून ती निवडणूक अवघड करण्यामागे भाजपाचा कुठला हेतू असू शकतो? हे म्हणूनच रहस्य बनून जाते. मुख्यमंत्री पदाचा हव्यास आणि आपल्या पक्षाचे बळ वाढवण्याचा हट्ट; असेही काहीजण उत्तर देतात. त्यालाही हरकत नाही. पण युतीमध्ये राहुनही आपले संख्याबळ वाढले असते आणि उमेदवारांची उसनवारी करायला लागली नसती. आपले बळ वाढवणे म्हणजे संघटनात्मक शक्ती वाढवणे असते, की नुसतेच निवडून येणारे सदस्य जमवणे असते? भाजपाने उमेदवारांची केलेली उसनवारी म्हणूनच चकित करणारी आहे. श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते विरोधात असताना लोकसभेला तिथे ५८ हजार मताधिक्य मिळाले. मग त्यांनाच पक्षात आणून उमेदवारी देऊन पक्षाचे बळ कसे वाढते? तिथे आधीपासून लढून पडलेल्या स्वपक्षीय उमेदवार वा जुन्या कार्यकर्त्याला यावेळी सहज निवडून येणे शक्य असताना असल्या उसनवारीचा अर्थच लागू शकत नाही. मोठ्या प्रमाणात अन्य पक्षीय प्रस्थापित नेते आयात करून पक्षाचे बळ वाढते, हा सिद्धांत शरद पवार यांचा आहे. आजवर पवारांनी तेच केले आणि आज भाजपा त्यांचेच अनुकरण करतो आहे. मात्र त्यातून पक्षाचे बळ किती वाढेल? पाचपुतेंना पक्षात आणून स्थानिक कार्यकर्ते नाराज करून पक्ष वाढतो का? ज्यांनी पाचपुतेंवरची नाराजी व्यक्त करण्यासाठी लोकसभेला ५८ हजार मते विरोधात टाकली, त्यांच्या माथी पाचपुते मारून भाजपाचा विस्तार होऊ शकेल, हे तर्कशास्त्राला धक्का देणारे कृत्य आहे. आणि कमीअधिक सर्वच पक्षात तसे झालेले असल्याने निवडून आल्यावर आमदार कुठल्या पक्षात कितीकाळ थांबतो, यावरच आता लढवलेल्या उमेदवारांचा पक्ष ठरू शकेल. पण भाजपाने आत्मघातकी पाऊल उचलले, एवढे मात्र आज नक्की म्हणता येईल.

1 comment:

  1. भाऊ, भाजपने ५० उमेदवार आयात केले आहेत. ही एक मतदारांची प्रतारणा आहे. त्याचे फळ त्यांना भोगावे लागणार आहे. पण टिव्ही वाल्यांचे सर्व्हे भाजपला ९६ जागा मिळनार आहेत असे सांगत आहेत. काय खरे आणि काय खोटे काही कळत नाही.

    ReplyDelete