Thursday, January 8, 2015

मोगॅम्बो खुश होणारच ना?

याकुब कुरेशी



एक वृत्तपत्राचा संपादकीय स्तंभ लिहीताना आज कुठल्याही पत्रकाराचे मन हळवे तितकेच प्रक्षुब्ध झालेले असेल. आम्हीही त्याला अपवाद नाही. पण पत्रकाराला अश्रू ढाळत बसायची मुभा त्याच्या पेशाने व कर्तव्याने दिलेली नसते. अवघा एक दिवस आधी अनेकांनी मराठी पत्रकारांच्या मर्दुमकीचे गोडवे गात त्यांच्या कर्तबगारीला शुभेच्छा दिलेल्या होत्या. कारण बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन ६ जानेवारी मराठी पत्रकार पत्रकारदिन म्हणून साजरा करतात. नेमक्या त्या शुभेच्छा कानावर पडून चोविस तास उलटले नसताना, पॅरिसमध्ये एका साप्ताहिकाचे डझनभर पत्रकार एका हिंसक हल्ल्याला बळी पडले असतील, तर आमच्या भावना काय असतील, याची नुसती कल्पना करता येईल. कशासाठी त्यांचा असा बळी घेतला गेला? नेहमी आपण ज्या अर्थाने बळी या शब्दाचा वापर करतो, तितका हा प्रतिकात्मक शब्द नाही. खर्‍याखुर्‍या अर्थाने या पत्रकारांचा बळी घेतला गेलेला आहे आणि ते पहिलेच बळी नाहीत. काही महिन्यापुर्वी इराकच्या होरपळलेल्या भूमीत अशा ओलिस ठेवलेल्या काही पत्रकारांच्या ‘बळी’ देण्याच्या चित्रफ़िती युट्युबवर प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. ते बळी घेण्य़ापासून अभिमानाने त्याचे प्रदर्शन मांडणार्‍या मानसिकतेने असे बळी घेतले आहेत आणि याच्याही पुढे तसेच बळी घेण्य़ाची हमी दिलेली आहे. भारतातल्या एका तथाकथित सेक्युलर पक्षाच्या नेत्याने अशा धर्मानुयायांचे जाहिरपणे कौतुक केले आहे. मायावतींच्या बसपाचे नेते व पुर्वाश्रमीचे समाजवादी सरकारमधील मंत्री, याकुब कुरेशी यांनी तशी जाहिर प्रतिक्रिया दिलेली आहे. जो कोणी आमच्या धर्म प्रेषितावर नावडते मत व्यक्त करील त्याची हत्या कायदेशीर असते असे कुरेशी यांचे ठाम मत आहे आणि ते आजचे नाही. अशा ‘पराक्रमी’ धर्मनिष्ठांना त्यांनी तेव्हाही करोडो रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.

२००६ सालात कुरेशी उत्तर प्रदेशात समाजवादी मुलायम सरकारमध्ये मंत्री होते आणि तेव्हाच डॅनिश वृत्तपत्राने प्रेषिताची व्यंगचित्रे प्रकाशित केल्याचा वाद उफ़ाळला होता. त्यावरून मुस्लिम जगात काहूर माजले असताना या मंत्री महोदयांनी जो कोणी त्या डॅनिश व्यंगचित्रकारांना ठार मारील, त्याला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते. पण इतक्या धाडसी मंत्र्याला भारतीय सेक्युलर संविधानाच्या अपेक्षा पायदळी तुडवल्यानंतरही मुलायम मंत्रीपदावरून दुर करू शकले नव्हते. इतका आपल्या देशातला सेक्युलर विचार व मानसिकता प्रभावशाली आहे. पुढे सत्तांतर होऊन कुरेशी दुसर्‍या सेक्युलर पक्षात दाखल झाले. म्हणून आज ते मायावतींच्या बहूजन समाज पक्षाचे नेते म्हटले जातात. पण वास्तवात कुरेशी स्वत:च स्वयंभू नेते आहेत. तर अशा नेत्यांची गणती आपल्याकडे सेक्युलर गटात होत असते. म्हणूनच मग त्यांनी कुठलीही मुक्ताफ़ळे उधळली, तर त्याबद्दल मौन धारण करण्याला सेक्युलर बुद्धीमत्ता म्हणून मान्यता मिळते. पर्यायाने तुम्हाला पत्रकार माध्यमकर्मी म्हणून काम करायचे असेल व मान्यता प्राप्त करायची असेल, तर कुरेशी असे काही बोलतात, तेव्हा बहिरे होण्याची वा छापून आल्यास तेवढ्या बातमीपुरते आंधळे होण्याची कला अवगत करावी लागते. किंबहूना त्याकडे काणाडोळा करीत त्यावरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी साक्षी महाराज काही बोलले, त्या राईचा पर्वत करण्याची असाध्य कला तुम्हाला आत्मसात करावी लागते. ती कला आमसात केली, मग पॅरिसचा हल्ला जिव्हारी लागलेला असला तरी आणि कुरेशी यांनी त्यावर मीठ चोळले, तरी अजिबात वेदना होत नाहीत. उलट त्यावर फ़ुंकर घालून खोट्या फ़ुशारक्या मारण्याचे बळ अंगात संचारते आणि तुम्ही मान्यताप्राप्त सेक्युलर पत्रकार म्हणून ताठ मानेने मिरवू शकता. कोण जाणे उद्या अशा निर्ढावलेल्या पत्रकारितेसाठी कुरेशी साहेब करोडो रुपयांचे ‘जीवन गौरव’ पुरस्कारही जाहिर करतील.

दुर्दैव इतकेच आहे, की पॅरिसमधील हत्याकांड झालेले पत्रकार व त्यांचे साप्ताहिक डाव्या सेक्युलर विचारसरणीचे म्हणून प्रसिद्ध होते आणि यापुर्वी त्यांनी ज्यु, ख्रिश्चन अशा अन्य धर्मियांच्या श्रद्धांची यथेच्छ खिल्ली उडवलेली आहे. सहाजिकच अशा धर्मश्रद्ध लोकांचा ‘हेब्दो’ नामक त्या साप्ताहिकावर आणि तिथल्या पत्रकारांवर राग असेल तर नवल नाही. त्यासाठी हेब्दोला शिव्याशाप ऐकायला लागले असल्यास नवल नाही. पण अशा कुठल्याही शिव्याशाप देणार्‍या अन्य धर्मियांनी साप्ताहिक वा पत्रकारावर प्रत्यक्ष हल्ले केले नव्हते वा तशा धमक्याही दिलेल्या नव्हत्या. हेब्दो व तिथल्या संपादकांना एका गोष्टीचे विस्मरण झाले, की ज्या सेक्युलर विचारसरणीच्या आधारे त्यांनी अशी धार्मिक हेटाळणी चालविली होती, त्या आधुनिक सेक्युलर विचारांना इस्लामने मान्यता दिलेली नाही. किंबहुना आजकाल सेक्युलर असण्याचे प्रमाणपत्रच इस्लामी धर्मगुरूंकडून मिळवावे लागते. भारतात त्यासाठीच प्रत्येक सेक्युलर पक्ष व नेते आपल्या सेक्युलर असण्याची खुण म्हणून इस्लामिक टोप्या घालून मिरवत असतात. नरेंद्र मोदी यांनी तशी टोपी घालण्यास नकार दिल्यावर, त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या पात्रतेवर म्हणूनच तमाम सेक्युलर विचारवंत पत्रकार प्रश्नचिन्ह लावत नव्हते का? अर्थात मोदींना सेक्युलर असण्याच्या प्रमाणपत्राची गरज भासली नाही आणि त्यांनी त्याविषयीच्या टिकेकडे काणाडोळा केला. पण यातून आजच्या सेक्युलर मान्यतेचे स्पष्टीकरण व्हावे. तर हेब्दो या फ़्रेन्च साप्ताहिकाच्या संपादकांना त्याचे स्मरण राहिले नाही आणि अन्य धर्मियांप्रमाणे मुस्लिमांना वागवण्याच्या त्यांच्या अपराधाची शिक्षा द्यायला इस्लामचे बंदे येऊन हजर झाले. त्यातही काही नवे नाही. कित्येक वर्षे त्याच भितीच्या छायेत तस्लिमा नसरीन वा सलमान रश्दी असे काही नामवंत लेखक जगत आहेत.

आज टाहो फ़ोडून फ़्रेन्च पत्रकारांच्या हत्याकांडाबद्दल गळा काढणार्‍या कितीजणांनी रश्दी वा तस्लिमा यांच्यावर मायदेशी असलेल्या बंदीबद्दल तोंड उघडले होते? जितके खुल्या वातावरणात हेब्दोचे संपादक व व्यंगचित्रकार सापडले, तितके सहज तस्लिमा व रश्दी सापडले असते, तर भारतातही असा प्रकार घडला नसता काय? हैद्राबाद येथे तस्लिमा नसरीन यांच्या पुस्तकाच्या तेलगू आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी पत्रकार संघातच हल्ला झाला होता. तो अंगावर झेलून काही पत्रकारांनी त्यांचा जीव वाचवला होता. त्याच हल्ल्याचे समर्थन करणारे व प्रेरणास्थान असलेले ओवायसी दहा वर्षे कॉग्रेसच्या सेक्युलर युपीए सरकारचे पाठीराखे नव्हते का? रश्दी यांच्या ‘सेटॅनिक व्हर्सेस’ पुस्तकावर बंदी घालण्यासाठी कुठले आंदोलनही करावे लागले नव्हते. ‘सेक्युलर इंडिया’ नावाचे वृत्तपत्र काढणार्‍या एका मुस्लिम नेत्याने राजीव गांधींना पत्र पाठवले आणि पुस्तकाला भारतात बंदी झाली होती. इतके आपण सेक्युलर असतो. भारतातल्या सेक्युलर विचारांना मौलवींची मान्यता असावी लागते. मग त्याचेच प्रतिबिंब पत्रकारितेत पडल्यास नवल ते काय? त्यामुळे अशा घटना घडतात, तेव्हा मग आमचे पत्रकार बावचळून जातात. एकमेव सेक्युलर धर्माचे अनुयायीच सेक्युलर पत्रकारितेवर हल्ला कसा करतात, त्याचा अर्थच पत्रकारांना लागत नाही. मग आपला गोंधळ लपवण्यासाठी अशा हल्ल्याची तुलना कुठल्या किरकोळ तोडफ़ोड करणार्‍या नगण्य घटनेशी करून पॅरिसच्या हल्ल्याची तीव्रता इथले बुद्धीमंत व पत्रकार कमी करू बघतात. अशा हल्ल्यामागची खरी प्रवृत्ती, मानसिकता जगासमोर येऊ नये म्हणून शाब्दिक कसरती करू लागतात. बुधवारी पॅरिसची घटना घडल्यापासूनच्या बातम्या त्याचीच प्रचिती आणुन देत होत्या. त्यातील खर्‍या संकटाला सामोरे जाऊन त्याबद्दल भाष्य करण्याची हिंमतच आज भारतीय पत्रकार व सेक्युलर गमावून बसले असतील, तर ‘मिस्टर इंडीया’ची तारांबळ बघून मोगॅम्बो खुश होणारच ना?

3 comments:

  1. आपण उघडपणे लिहिलंत तरी...! बाकी सगळे झगझगीत नावांचे सेक्युलर पत्रकार मूग गिळून गप्प बसलेत.... चकार शब्द नाही..!!

    ReplyDelete
  2. याला म्हणतात खरी पत्रकारीता

    ReplyDelete
  3. भाऊ. . . वेदना अगदी नेमक्या शब्दात मांडल्यात __/\_

    ReplyDelete