जेव्हा अनेकांना आपलेच आईबाप आठवत नाहीत, तेव्हा अशा स्मृतीभ्रंश झालेल्यांना जुन्या आठवणी सांगणे भाग असते. तेवढाच एक आशेचा किरण असतो. वास्तविक मराठी सिनेमांना मोक्याच्या वेळी मल्टीप्लेक्स मिळायलाच हवेत, ही सक्ती भाजपाचे मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. पण त्याच्या समर्थनासाठी सवयीप्रमाणे शिवसैनिक रस्त्यावर आले. ज्यांनी कोणी त्याला विरोध केला, त्यांच्यावर तुटून पडले ते शिवसैनिकच. मग त्यांच्यावर संकुचितपणाचा आरोप करायलाही अनेक घरभेदी प्रतिष्ठीत पुढे झाले. यात नवल काहीच नाही. हेच गेल्या सहा दशकापासून महाराष्ट्रात चालू आहे. खरे तर त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ करणार्यांचे सेक्युलर पक्ष नामशेष झाले आणि त्यांची जागा शिवसेना व्यापत गेली. अर्थात तेवढ्यासाठी मग शिवसेनेला प्रादेशिक अस्मितेचा संकुचित पक्ष ठरवण्याची स्पर्धा जोरात सुरू होते. पण अशा दिवट्यांना असाच आक्रमकपणा शिवसेनेने हिंदी चित्रपटासाठी दाखवला होता, हा इतिहास ठाऊक नसतो. मजेची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला झुकते माप देण्याचा विषय निघाल्यावर शोभा डे हिच्याप्रमाणेच जे अनेक हिंदी ‘स्टार’ नाके मुरडत होते, त्यांच्याही पुर्वजांची हिंदी चित्रपटाच्या संरक्षणार्थ पुढे व्हायची हिंमत झाली नव्हती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदीसाठी लढायचा पवित्रा घेतला होता. किंबहुना त्यातूनच ठाकरे या नावाविषयी बॉलिवुडमध्ये दबदबा निर्माण झाला. हे अर्थात तेव्हा कंबरेची पाटलोणही संभाळता येत नव्हती, त्या अमिरखानला आठवणार नाही. पण त्याचे नसिर हुसेनसारखे निर्माते काका नक्कीच सांगू शकतील. आजचा हिरो रणवीर कपूरची मातोश्री असलेली तेव्हाची बाल कलाकार नितू सिंगही सांगू शकेल कदाचित. बॉलिवुड म्हणून नाचणार्यांनी जरा आपलाच जुना इतिहास तपासून घेतला तर वास्तवाचे भान येऊ शकेल.
१९६८ साली देशात विरोधी राजकारणाची लाट उसळलेली होती आणि दक्षिणेत तामिळनाडू राज्यात कॉग्रेसला पराभूत करून द्रविड मुन्नेत्र कझागम नावाच्या पक्षाची सत्ता आलेली होती. तेव्हा तिथे हिंदी विरोधी मोहिम जोरात चालू होती. त्या राज्यात हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला पटगॄह देण्यालाच विरोध चालू होता आणि कुठला हिंदी निर्माता त्याच्या विरोधात अवाक्षर बोलू शकला नव्हता. प्रदर्शनाची वेळ सोडा, मुळात तिथे हिंदी चित्रपटाच्य प्रदर्शनाचाच नकार दिला गेला होता. त्या द्रमुकच्या सरकारकडे दाद मागायचीही हिंमत कोणात नव्हती. अशावेळी बाळासाहेब ठाकरे नावाचा माणुस त्यात पुढाकार घेऊन उभा राहिला. त्याने द्रविडी दादागिरीचे असे नाक दाबले, की झक मारत त्यांना तिथे हिंदी चित्रपट प्रदर्शनाला असलेला विरोध गुंडाळावा लागला होता. त्याच काळात माला सिन्हा व विश्वजित यांच्या भूमिका असलेला ‘दो कलिया’ नावाचा चित्रपट एव्हीएम स्टुडिओने काढला होता. निर्माता दिग्दर्शक तामिळ आणि कलावंतासह चित्रपट हिंदी होता. दोन वर्षापुर्वी आयपीएल स्पर्धेतल्या फ़िक्सिंग घोटाळ्यातला प्रमुख आरोपी व श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मैयप्पन याच्या आजोबाने काढलेला तो चित्रपट. त्याचे मुंबईत प्रदर्शन व्हायचे होते आणि त्यालाच बाळासाहेबांनी रोखून धरले. तामिळनाडूत हिंदी चित्रपट दाखवू देणार नसाल, तर तिथे निर्माण झालेला कुठलाही चित्रपट मुंबईत दाखवू दिला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्या काळात मुंबई हा हिंदी चित्रपटाचा मोठा गल्ला होता. सहाजिकच तिथेच ‘दो कलिया’ प्रदर्शित होऊ शकला नाही, तर दिवाळे वाजणार होते. मग मैयप्पन आजोबाने मुंबईत धाव घेतली आणि मातोश्रीच्या पायरीवर हजर झाला. त्यानेच तामिळनाडूत हिंदी सिनेमाच्या प्रदर्शनाची हमी घेतली आणि तशी तिथल्या सत्ताधार्यांशी बोलणी करून समस्या निकालात काढली होती.
आज मराठी सिनेमासाठी शिवसेना उभी राहिली तर संकुचित होते. मग तेव्हा हिंदी सिनेमावरच्या अन्यायाला दणका देणारी शिवसेना राष्ट्रीय होती काय? मराठी विरुद्ध आज पोपटपंची करणारे वा त्यांचे पुर्वज तेव्हा कुठल्या बिळात दडी मारून बसलेले होते? तेव्हा त्यापैकी कोणी तामिळनाडूत जाऊन करूणानिधी या द्रमुक मुख्यमंत्र्याशी दोन हात कशाला केलेले नव्हते? आज देवेंद्र फ़डणविस यांना डिक्टेटर म्हणणारी शोभा डे तेव्हा सागरगोटे खेळत होती, की फ़ुगड्या खेळत रमली होती? मराठी सिनेमाचा आग्रह धरणारे वा आपल्याच प्रांतात मराठीला प्राधान्य मिळावे इतकी मर्यादित मागणी करणार्या शिवसेनेने अन्य भाषांचा विरोध कधीच केलेला नाही. अन्य भाषांना प्रतिबंध घातलेला नाही. पण अन्य भाषांनी वा भाषिकांनी महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी करू नये, ही अपेक्षाही अन्याय असतो काय? मग जेव्हा खराखुरा अन्याय हिंदीवर झाला, तेव्हा शिवसेनेने कशा उभे रहायला हवे होते? याच मुंबईत हिंदीसाठी शिवसेना लढायला उभी राहिली आणि इथल्याच हिंदी चित्रपटसृष्टी मानल्या जाणार्या बॉलिवुडला शिवसेनेने आधार दिलेला होता. कोणाला ते कसे आठवत नाही? ह्याला बेशरमपणा नाही, तर दुसरे काय म्हणता येईल? त्या काळात दिवाळखोर हिंदी चित्रपटांना कलावंतांचे पैसे मोजता येत नव्हते म्हणून बहुतांश हिंदी कलावंत दक्षिणी निर्मात्यांकडे जोडे झिजवून पैसा कमावत होते. त्यांच्या अंगावर हे भिकारी कशाला जाऊ शकले असते? दिलीप कुमार, राजेश खन्ना, जीतेंद्र वा विश्वजित अशा तमाम हिंदी हिरोंना तामिळनाडूत रोजगार शोधावा लागत होता. त्यामुळे द्रमुकच्या विरोधात उभे रहायची बॉलिवुडची हिंमत नव्हती. तेव्हा शिवसेना हवी होती. मात्र त्याच शिवसेनेने आज मराठी चित्रपटासाठी आपल्याच घरात, महाराष्ट्रात थोडी हमी मागितली, की पोटशूळ उठला यांना.
वडापाव आणि मिसळपाव खाण्याची जिला लाज वाटते, त्या शोभा डे वा तिच्या समर्थकांनी लक्षात ठेवावे, चिकन तंदुरी वा पिझ्झा खावून लढाईच्या मैदानात उतरता येत नाही. शरीरामध्ये जी अनावश्यक चरबी जमा होते, त्यामुळे आपलेच हातपाय हलवायलाही गडी ठेवावे लागतात. तोंडाची वाफ़ दवडणे सोपे असते. इतकीच हिंमत आहे तर अजमल कसाब मुंबईत अवतरला होता, तेव्हा ही शूरवीर मंडळी कशाला त्याच्याशी लढायला पुढे सरसावली नव्हती? उलट तेव्हाही ‘मुंबई स्पिरीट’ असली पोपटपंची करीत राजदीप सरदेसाई सारखे भडभुंजे कॅमेरा घेऊन समोर आले, तर हीच शोभा भेदरली होती. ‘आय एम स्कॅअर्ड’ असे म्हणतानाही तिची बोबडी वळलेली होती. आणि मुंबईचा किल्ला त्याच वडापाव खाणार्या पोरांनी-पोलिसानी लढवला होता. ओबेराय ताजमध्ये उंची मद्याचे घुटके घेत सुसंस्कृपणाची प्रवचने झोडणार्यांच्या पाटलोणी ओल्या झाल्या होत्या. त्यांना तिथून बाहेर काढताना ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, तेही वडापाव खाणारेच होते. त्यातला कोणीही पंचतारांकित पोपकॉर्न खाऊन कसाबला सामोरा गेलेला नव्हता. आताही चिडलेल्या शिवसैनिकांना दूर रोखल्याबद्दल ज्या पोलिसांचे आभार शोभा डे मानते, तेही पोपकॉर्न खाऊन गस्त घालत नाहीत वा पहारे देत नाहीत. रस्त्यावर नाक्यावर मिळणारा वडापाव खाऊनच त्यांना तुमच्या मस्तवाल अविष्कार स्वातंत्र्याचा बचाव करावा लागतो. त्यांनी त्याला नकार दिला, तर कसाब वा सईद हाफ़ीज तुमचेच कबाब वा बोटी बनवायला वेळ लावणार नाही. मिसळपाव वडापावची हेटाळणी करणार्यांनी एक कायम लक्षात ठेवावे, तोच वडापाव खाऊन कर्तव्य पार पाडणार्यांमुळे तुम्हाला अविष्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चैन करता येत असते. त्यांनी त्या जबाबदार्या पार पाडायचे नाकारले, तर कुत्रा तुमचे हाल खाणार नाही. स्वातंत्र्याच्या गमजा तर सोडूनच द्या.
अस्सल शिवसैनिक
ReplyDeleteभाउ
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDeleteएकच नंबर...
ReplyDeleteMast....khup chan
ReplyDeleteडे ला आणि खान ला मराठी माणसाने दिलेले अचुक उत्तर..
ReplyDeleteत्याकाळी आपण बॉलीवूडला 'आपला' चित्रपट समजलो आणि दाक्षिणात्यांना परकं समजलो हि आपली सर्वात मोठी चूक आहे.
ReplyDelete