हल्ली मी टाईम्स नाऊवरचा अर्णब गोस्वामीचा शो बघायचे सोडून दिले आहे. म्हणजे निदान मागल्या तीन आठवड्यात एकदाही बघितला नाही. कारण त्याचा आवेश बघितला मग मला १९८० च्या दशकातला जॉनी लिव्हर आठवू लागतो. कधी वाटते की ह्याला जॉनीनेच नकलाकार बनवता बनवता हा पत्रकार होऊन गेला की काय?
हल्ली कुठल्याही वाहिनीवर बघितले तर विनोदाचा पाऊस पडत असतो. बातम्यांच्या वाहिन्यांवर अन्य मनोरंजन वाहिन्यांच्या मालिकांचे तुकडे दाखवले जातात, आणि त्या मूळच्या वाहिन्यांवर आपापल्या नकलांचे खास कार्यक्रम चालूच असतात. वाहिन्यांचा जमाना येण्यापुर्वी वाद्यवृंद म्हणजे ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात मध्ये विरंगुळा म्हणून नकलाकार पेश केले जायचे. त्यातूनच जॉनी व्हिस्की व जॉनी लिव्हर असे कलाकार नावारुपाला आले, त्यांच्या नकला मोठ्या हॉलमध्ये असलेल्या कार्यक्रमात व्हायच्या. पुढे ऑडीओ कॅसेटचा जमाना आला, तेव्हा अशा नकलाकारांच्या खास कॅसेट निघाल्या. त्यापैकी लिव्हरची एक कॅसेट १९८० च्या जमान्यात खुप वेळा खुप ठिकाणी ऐकलेली आठवते. त्यातली एक नक्कल आम्हा मित्रांमध्ये खुप आवडती होती. रस्त्याने जाणारा दाक्षिणात्य म्हणजे त्या काळात ज्याला सरसकट मद्रासी म्हटले जायचे; असा एक व्यक्ती दुसर्या पादचार्याशी मुंबईच्या रस्त्यात भांडतो अशी ती नक्कल होती. तब्बल पंधरा मिनीटे एकटाच लिव्हर भडाभडा बोलत असतो आणि समोरच्याला अवाक्षर बोलू देत नाही, असा प्रकार. वादाचा मुद्दा असा, की धक्का लागला आणि भर वाहतुकीमध्ये आपल्याला काही झाले असते; अशी त्या मद्राशाची तक्रार आहे. आणि त्यात लिव्हर त्याच्या खास शैलीत ‘दक्का मारताय’ म्हणून कुरबुरत असतो.
आपल्याला छोटीछोटी दोन मुले आहेत, त्यांचे काय झाले असते? मागून बस आली असती आणि अंगावरून गेली असती, तर आपल्या बायोकोने काय केले असते? आपला पाय तुटला असता तर इस्पितळात उपचाराचा खर्च कोण करणार होता? खड्ड्यात पडलो असतो तर कोण भरून देणार होता, अशा वेगवेगळ्या तक्रारी लिव्हर करत असतो. दुसर्याने उत्तरही द्यायची संधी सवड लिव्हर देत नाही. आपण ऐकत असतो तेव्हा आपल्या मनात खरेच ज्याला धक्का लागला त्याच्यावर किती गंभीर प्रसंग ओढवला, अशी आपली समजूत होऊन जात असते. आणि तब्बल पंधरा मिनीटे अशी गेल्यावर तो दुसरा पादचारी संधी साधून चोख उलटा सवाल करतो. ‘भाईसाब आपका कहना सही है. लेकीन धक्का लगाही किधर?’ आहे ना गंमत? म्हणजे धक्का लागलेलाच नाही आणि लिव्हर इतका भडीमार करत असतो. दुसर्याचा हा सवाल ऐकल्यावर लिव्हरचे तोंड बंद व्हायला हवे ना? कारण इतका वेळ त्याचा चालला होता तो तर निव्वळ कांगावाच असतो. कारण त्याला कुणाचा धक्काच लागलेला नसतो. पण लिव्हरचा मद्रासी कसला बिलंदर. त्या पादचार्याला तो मद्रासी लिव्हर चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, तसा म्हणतो, ‘धक्का लग जाता तो?’
आता बोला. म्हणजे धक्काच लागलेला नाही, आणि हा कांगावखोर गडी काय काय कल्पनाविलास करीत जातो? आपल्या बायकोचे, मुलांचे काय झाले असते. आपल्याला भरपाई कोणी दिली असती. खड्डा वा बसखाली जाणे. किती म्हणून कल्पनाविलास. अतिशयोक्ती म्हणजे किती? तीन दशकांपुर्वी हा लिव्हरने केलेला विनोद वा नक्कल होती. आज वाटते, की ते मनोरंजन नव्हते, तो पुढल्या उपग्रहवाहिन्यांच्या कालखंडात बातमीदारी व पत्रकारिता करण्यासाठीचा जॉनी लिव्हरने योजलेला अभ्यासक्रमच असावा. कारण हल्ली कुठल्याही वृत्तवाहिनीच्या चर्चा ऐकल्या किंवा त्यात कुणा अधिकारी राजकारण्याची मुलाखत होत असेल, तर त्यातला पत्रकार नेमका त्या जॉनी लिव्हरच्या कांगावखोर मद्राशाच्या आवेशात व भाषेतच बोलताना आढळतो. जे घडलेले नाही आणि घडेल अशीही शक्यता नाही, त्याच्याबद्दल ही मंडळी कोणालाही जाब विचारत असतात. धक्का लग जाता तो? अमित शहाला अटक झाली तर? नरेंद्र मोदीवर आरोपपत्र दाखल केले तर? मोदी अयोध्येत गेले तर? नाहीच गेले तर? निवडणूकीत बहूमत नाहीच मिळाले तर? अमुकतमुक तुमच्या आघाडीतून सोडुन गेले तर? इशरत प्रकरणात आता कुठे नुसते आरोपपत्र सीबीआयने दाखल केले आहे, त्यावर कोर्टाने आरोप निश्चित करण्याचीही प्रक्रिया अजून व्हायची आहे. त्यानंतरच पुढली कारवाई सुरू होऊ शकते. आरोप निश्चित झाले, याचा अर्थ त्यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे कोर्टाला वाटते. पण तेही झालेले नाही. म्हणजे आरोपही निरर्थकच आहेत. पण त्यासाठी मोदीला गुन्हेगार ठरवून वाहिन्या कधीच मोकळ्या झालेल्या आहेत. एकतर त्यात मोदी-शहांची नावेसुद्धा नाहीत. ज्यांच्यावर आरोपपत्र ठेवले, त्यांच्यावरही आरोप कोर्टाने निश्चित केलेले नाहीत. पण इथे आमच्या वाहिन्या तर आरोप सिद्ध झाल्याप्रमाणे शिक्षाही फ़र्मावून मोकळ्या होत आहेत. आजकाल स्मृती इराणी, व्ही. के सिंग अशा काही मंत्र्यांच्या बाबतीत अशाच कंड्या पिकवणे चालू नाही काय?वास्तवात धक्का सुद्धा लागलेला नाही. मग याला जॉनी लिव्हर विद्यापिठात शिकलेल्या पत्रकारांचाच जमाना म्हणायचा ना?
भाऊ,लेख लिहिताना ची परिस्थिती अन आताची परिस्थिती यात तसूभरही फरक नाही.उलट परिस्थिती अजून केविलवाणी होतेय.
ReplyDeleteFantastic
ReplyDeleteमाझ्या भिंतीवर हिंदीत मूळ कल्पनेचा थोडा परिचय करून दिलाय, भाऊ. श्रेयनामासकट.
ReplyDelete