या आठवड्यातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्युज कोणती असेल, तर पुढल्या राष्ट्रपती निवडणूकीत शरद पवार उमेदवार असतील आणि मोदीप्रणित भाजपा त्यांचे समर्थन करील. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष व सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्याविषयी त्यांच्याच कन्येने म्हणजे सुप्रिया सुळे यांनी, पुर्वी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेले मत बघता, ही बातमी नाकारता येत नाही. आपले पिताजी ‘मोस्ट अनप्रेडीक्टेबल’ असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. आपल्या प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांनी त्याची सातत्याने प्रचिती आणून दिलेली आहे. कालपरवाच म्हणजे मागल्या वर्षभरात त्यांनी सतत निवडणूक प्रचारात अर्ध्या चड्डीच्या ताब्यात राज्याची सत्तासुत्रे देणार काय, असा सवाल मतदाराला विचारला होता. पण विधानसभेच्या मतदानाचे निकाल पुर्ण समोर आलेले नव्हते, इतक्यात त्याच अर्ध्या चड्डीच्या म्हणजे भाजपाच्या हाती सत्तासुत्रे जावीत व त्यात कुठला अडथळा येऊ नये, म्हणून विनाविलंब धावत सुटले होते तेही शरद पवारच होते. सहा महिने ज्यांनी पवारांची भाषणे व पत्रकार परिषदा ऐकलेल्या असतील, त्यांना क्षणभर कानावरही विश्वास बसला नव्हता. पण तीच वस्तुस्थिती होती आणि दोनच दिवसात समोर येऊन पवारांनी आपल्या अनप्रेडिक्टेबल भूमिकेचे तर्कशुद्ध विवेचनही केलेले होते. राज्याला पुन्हा पुन्हा निवडणूका परवडणार्या नाहीत, म्हणून जो निकाल आला आहे, त्यातून स्थीर सरकार राज्याला मिळावे यासाठी आपण भाजपाला बाहेरून पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र तशी वेळ आली नाही. कारण तशी वेळ येण्य़ाची शक्यताही नव्हती. कारण कितीही धुसफ़ुस युतीअंतर्गत असली, तरी पवारांच्या पाठींब्यावर सरकार स्थापणे वा चालवणे भाजपासाठी आत्महत्याच ठरली असती. तसा ओझरता प्रयोग आवाजी मतदानाने करून बघितला गेला. काय झाले?
त्या आवाजी मतदानानंतर अवघ्या तीन दिवसात आयुष्यभर खाल्ल्या नसतील इतक्या शिव्या खायव्या लागल्या; अशी कबुली मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फ़डणविस यांनी स्वेच्छेनेच ट्वीटरवर दिली. मग आपल्या पाठींब्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही वा अस्थीर राहिल, असे पवारांना का वाटले? ह्या शंकेला उत्तर नाही. शरद पवार यांना केव्हा काय वाटेल, ते त्यांनाही ठाऊक नसते. कारण स्वत:साठीही पवारसाहेब कमालीचे अनप्रेडीक्टेबल आहेत. अन्यथा त्यांनी अर्ध्या चड्डीचा धोका सहा महिने कशाला बोलून दाखवला असता? आपणच पुढे त्याच लोकांच्या हाती सत्ता सोपवायला उतावळे होऊ, याची पवारांना तरी तेव्हा कुठे कल्पना होती? पवार दूरगामी विचार करणारे महाराष्ट्राचे जुनेजाणते नेता आहेत. त्यामुळे ते भविष्यात काय करतील, त्याचा त्यांनाच थांगपत्ता नसतो. किंबहूना आपण काय करून बसू, याचे भय पवारांना सतावू लागते आणि आपण अमूक करणार नाही, अशी ते घोषणा करू लागतात. तेव्हा हमखास समजावे, की भविष्यात पवार नेमकी तीच गोष्ट नक्की करतील. १९९९ सालात परकीय व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता जाता कामा नये म्हणून स्थापन केलेल्या वेगळ्या पक्षाच्या मदतीने त्यांनीच तब्बल दहा वर्षे सोनियांच्या हाती सत्तासुत्रे केंद्रित व्हायची व्यवस्था केली ना? असे शेकडो लहानमोठे प्रसंग सांगता येतील. पण त्याची गरज नाही. सध्या मुद्दा आहे ,तो दोन वर्षांनी व्हायच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा. त्याला शरद पवार उभे रहाणार आणि भाजपातर्फ़े पंतप्रधान मोदी त्यांचे समर्थन करणार अशी बात्तमी आहे. अर्थात ती खुद्द पवारांनी दिलेली नाही किंवा त्यांच्या पक्षाने दिलेली नाही. सुत्रांनी ‘पिकवलेली’ बातमी आहे. माध्यमांना अशा खुसखुशीत कंड्या हव्याच असतात. त्यामुळे माध्यमांनी त्यात कोण कोण पक्ष पवारांना मते देतील त्याचीही बेगमी केलेली आहे.
शिवसेनेला मराठी माणुस मोठ्या पदांवर हवा म्हणून सेना आपोआपच पवारांना मते देणार आणि बाकी लागतील ती मते पवार आपल्या सर्वपक्षीय दोस्तीतून सहज मिळवणार, असे समिकरण तयार आहे. सगळी सज्जता झालेली आहे आणि फ़क्त निवडणूक आयोगाने मतदानाची घोषणा करून पवारांना उमेदवारी अर्ज भरायची संधी देण्याची खोटी आहे. किंबहूना ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून ही बातमी निपजली, त्यालाही आपल्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी संमती घ्यावीसे वाटलेले नाही. किंबहूना त्याचाही शरद पवार यांच्यावर किंचितही विश्वास नसावा. अन्यथा त्यांनी अशी बातमी कशाला पिकवली असती? मागल्या लोकसभेपुर्वीच शरद पवारांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघात पुन्हा उभे रहात नसल्याचा निर्वाळा राज्यसभेत जाऊन, कृतीतून दिलेला होता. त्यानंतर पुढे लोकसभेचे वेध लागले, तेव्हा त्यांनी आपण यानंतर कुठलीच निवडणूक लढवणार नसल्याचेही ‘ठामपणे’ सांगितले होते. आगामी म्हणजे २०१५ मध्ये आपण पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करत आहोत. त्यानंतर निवडणूकीच्या राजकारणातून संन्यास घेऊ. कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही पत्रकारांना सांगितले होते. असे असेल तर राष्ट्रपती पदाची निवडणूक पवार कशाला लढवतील? आणि पवारच लढणार नसतील, तर मोदीप्रणित भाजपा त्यांचे समर्थन कशाला करील? मग उपरोक्त बातमीत तथ्य ते किती उरले? पण म्हणूनच तर तथ्य आहे. कारण पवार हे मोस्ट अनप्रेडीक्टेबल राजकारणी आहेत आणि जेव्हा एखादी गोष्ट करणार नाही म्हणतात, तेव्हा तीच गोष्ट हमखास करत असतात. मात्र राष्ट्रपती होण्यासाठी जितकी मते हवीत तितकी कुठून मिळायची, ही त्यांची समस्या आहे. त्याचे उत्तर कॉग्रेस अधिक बिगरभाजपा पक्षात सामावलेले आहे. त्यांनी पवारांचे नाव पुढे आणले, तर ही गोष्ट शक्य आहे. पण ती कल्पना सोनियांच्या डोक्यात गेली पाहिजे ना?
थोडक्यात भाजपा वा मोदींकडे राष्ट्रपतीपदी उमेदवार लढवायला पुरेशी हुकूमी मते असताना त्यांनी पवारांचे समर्थन करण्याची काहीही गरज नाही. पण ज्याला भाजपा उमेदवार करील, त्याच्या विरोधात कुठला उमेदवार येऊ शकेल? तो सर्वपक्षीय असायला हवा आणि तशी एकवाक्यता व्हायची कुठली शक्यता नाही. ती शक्यता पवार यांच्या नावावर होऊ शकते. पण ते नाव कोणीतरी पुढे तर करायला हवे? सोनियांचा पवारांवर अजिबात विश्वास नाही. म्हणूनच कॉग्रेसकडून त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाही. पण उमेदवार पडण्यासाठी असेल आणि भाजपालाही आव्हान कायम ठेवता येत असेल, तर सोनियांचा पवारांना पाठींबा मिळू शकतो. अशा गडबडीत चतुराईने काही मते फ़ोडून मात्र पवार अनप्रेडीक्टेबल निकाल घडवून आणू शकतील. अडचण फ़क्त सोनियांनी पवारांच्या नावाला मान्यता देऊन सर्वपक्षीय उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्याची आहे. शिवाय मोदींनी काही करण्याआधीच त्यांना हवा असलेला पवार हा उमेदवार पळवण्याच्या मोहात सोनिया फ़सू शकतील. यापेक्षा उपरोक्त बातमीमध्ये फ़ारसे तथ्य वाटत नाही. पण मुद्दा त्याहीपेक्षा अजिबात वेगळा आहे. तो शरद पवार यांच्या विश्वासार्हतेचा आहे. त्यांनी ‘ठामपणे’ पुन्हा कुठलीच निवडणूक लढवणार नाही असे सांगितले असतानाही, त्यांना कुणी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवण्याच्या बातम्या देतो कसा? याचा अर्थ राजकारणात शरद पवार बोलतात, त्यावर कोणी काडीमात्र विश्वास ठेवू नये असाच होतो ना? बाकी काही नसेल, तरी पवारांना आता निवडणूकच लढवायची नाही, ह्या त्यांच्या विधानावर थोडाही विश्वास कशाला ठेवला जात नाही? अर्धशतकाच्या प्रदिर्घ राजकीय वाटचालीत शरद पवार यांनी लोकांचा किती विश्वास संपादन केलाय, त्याचे हे उदाहरण आहे. कोणीही काहीही कंडी पिकवावी आणि त्यावर शरद पवार हे लेबल लावावे काय?
सौ. सुप्रियाताई सुळे बारामती मतदार संघातून निवडणूक लढवतात. त्यांचा मूळ व्यवसाय शेती दाखवलेला आहे. त्यांचेकडे फक्त १० एकर शेती असूनही त्यांनी यामध्ये तब्बल ११३ कोटी रुपये कमावले. याच शेतीमधील उत्पादन २००९ च्या निवडणुकीमध्ये दाखवले होते ५२ कोटी रुपये, मात्र २०१४ ला ते झालेत तब्बल ११३ कोटी म्हणजे ६१ कोटी केवळ ५ वर्षात १० एकरात कमावले म्हणजे त्या नक्कीच शेतीत काहीतरी जादू करत असणार. महाराष्ट्रात मात्र २० एकर वाले शेतकरीसुद्धा कर्जबाजारी होवून आत्महत्या करत आहेत. त्या सर्वांना सुप्रीयाताईकडून कमीत कमी जागेत भरघोस नफ्याची शेती कशी करावी हे तंत्र शिकण्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यावेळी ताईना हात जोडून एकच विनंती कि तुमच्याकडील शेती एवढी नफ्यात असेल तर महाराष्ट्रातील च नवे तर तमाम भारतातील शेतकर्यांना या जादूच्या शेतीचे रहस्य, तंत्र किंवा माहिती सांगावी. म्हणजे या देशातील दरिद्री शेतकरी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतील.”
ReplyDeleteदरम्यान, याबाबत दोन वर्षांपूर्वी माझा कट्टावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यावेळीही सुळे यांनी ते उत्तर टाळलं होतं. माझं 2009 आणि 2014 चं प्रतिज्ञापत्र पाहिलं तर तुम्हाला दिसेल की, माझ्या मालमत्तेत एका रुपयाचीही वाढ झालेली नाही. ती जमिनी रेडी रेकनरप्रमाणे जाहीर करतो. त्यामुळे रेडी रेकनरमुळे 2009 आणि 2014 च्या प्रतिज्ञापज्ञातील उत्पन्नात तफावत आहे, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं.
dpoahmedenagar साहेब,
ReplyDeleteमला वाटते सरकारी इमेल address वरुन असले मेसेजेस टाकू नका..
अडचणीत याल. त्यापेक्षा https://accounts.google.com/signup इथे sign up करा.