Wednesday, May 6, 2015

फ़िरोज खान आणि सलमान खान


तेरा वर्षे रेंगाळलेल्या खटल्यात प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सलमान खान याला पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झालेली आहे. वास्तविक त्यावरून इतका गदारोळ व्हायचे काही कारण नाही. कारण या देशात लोकशाही असून कायदा सर्वांना समान असल्याचे घसा कोरडा करून नित्यनेमाने जगाला ऐकवले जात असते. मग त्याच भारताचा एक नागरीक असलेल्या कुणा प्रसिद्ध व्यक्तीला कायद्याला झुगारल्याबद्दल शिक्षा झाली, तर चर्चेचे कारणच काय? अर्थात प्रसिद्ध नामवंत व्यक्तीने कायदा मोडला व त्यासाठी त्याला गुन्हा सिद्ध करून शिक्षा झाल्यास चर्चा जरूर व्हायला हवी. पण ती चर्चा वा उहापोह, त्याला शिक्षा होणे योग्य की अयोग्य अशी असता कामा नये. तर इतका प्रसिद्ध व प्रतिष्ठीत व्यक्ती असुनही त्याने कायद्याने दिलेली शिक्षा स्विकारून कायद्याचा सन्मान केला, तरच व्हायला हवी. त्याने कायद्याशी सहकार्य करण्यात पुढाकार घेतला, याची चर्चा व्हायला हवी. पण दुर्दैवाने चर्चेचा एकूण सूर असा आहे, की सलमान खानचा गुन्हा वा चुक झालेली असली, तरी सामान्य व्यक्ती वा नागरिकाप्रमाणे त्याला शिक्षा व्हावी किंवा नाही? इथेच देशातील बुद्धीवादाचे कसे दिवाळे वाजले आहे त्याची कल्पना येऊ शकते. ज्यापकारे ही घटना घडली आणि त्यानंतर सतत सलमान कायद्याच्या प्रक्रियेला हुलकावण्या देत राहिला, त्यापासून त्याला शिक्षा होईल किंवा नाही, याबद्दलच घोळ चालू होता. पण त्यात सलमानचे मोठेपण कुठे आहे? दाऊद-गवळी वा अन्य कुणी कुप्रसिद्ध गुन्हेगारही अशाच प्रकारे कायद्याला व न्यायाला हुलकावण्या देतच असतात. त्याचा इतका बुद्धीवादी उहापोह कशाला होत नाही? नामचीन गुन्हेगार आणि सुप्रसिद्ध व्यक्ती असा फ़रक कायद्याने वा त्याच्या अंमलबजावणीने केला आहे काय? नसेल तर अशा चर्चा होतातच कशाला?

काही वर्षापुर्वी जुना अभिनेता निर्माता फ़िरोज खान याचा पुत्र फ़रदीन खान याला अंमली पदार्थाच्या प्रकरणात आटक झाली होती. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी फ़िरोज खान यांना गाठले होते. त्या गृहस्थाने आपला पुत्र फ़रदीन निर्दोष असल्याचाही दावा केलेला नव्हता. फ़रदीन आपला पुत्र आहे आणि म्हणूनच त्याच्या भवितव्याविषयी आपल्याला काळजी आहे. पण त्याने कायदा मोडलेला असेल, तर त्याला योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. म्हणूनच कोर्टात व तपासाचे निष्कर्ष बाहेर येईपर्यंत आपण याबद्दल अवाक्षर बोलणार नाही. पिता म्हणून मुलाला कायदेशीर मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. पण त्याचा अर्थ त्याचा अपराध असूनही त्यावर पांघरूण घालणे शक्य नाही, असा निर्वाळा फ़िरोज खान याने दिलेला होता. वास्तविक त्याच्याही आधी सुनील दत्त यांनी आपला पुत्र मुंबई बॉम्बस्फ़ोट प्रकरणात सापडला, तर संजयला सोडवण्यासाठी आटापिटा केलेला होता. आपली सर्व ताकद व प्रतिष्ठा मुलाला आरोपातून सोडवण्यासाठी पणाला लावली होती. गुन्हा दिसत असून व त्याचे पुरावे साक्षी समोर असताना, सुनील दत्त यांनी पुत्रप्रेमापायी कायद्याची महत्ता नाकारली होती. त्याच्या उलट उदाहरण फ़िरोज खान यांनी पेश केले. त्यांनी पुत्रप्रेम व कायद्याची महत्ता, अशा दोन्ही बाबींचा समतोल राखत दोन्हीचा आदरच केला होता. एकासाठी दुसर्‍याला झुगारण्याचा बेतालपणा दाखवला नव्हता. खरे तर त्याचा आदर्श नागरिक व आदर्श पिता म्हणून गाजावाजा व्हायला हवा होता. कायद्याच्या राज्यात प्रसिद्ध नामवंत व्यक्तींनी कसे समतोल वागावे, याचा फ़िरोज खान हा आदर्श वस्तुपाठ होता. दुर्दैवाने त्याबद्दल फ़ारशी चर्चाही झाली नाही. फ़रदीन वा त्याचा पिता सनसनाटी माजवत नाहीत म्हटल्यावर प्रसिद्धी माध्यमांनी जणू त्यांना दुर्लक्षितच ठेवले. लोकशाहीतील व कायद्याच्या राज्यातील ते खरे हिरो होते ना?

सलमान खान आज तीनशे कोटी कमावणार्‍या चित्रपटाचा हिरो म्हणून नावाजला जातो. त्यात अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा राहून गुन्हेगार व कायदे मोडणार्‍या लोकांना शासन करणारा धाडसी व्यक्ती म्हणून त्याची प्रतिमा अशा चित्रपटातून उभी केली जाते. मग त्यातून होणार्‍या कमाईतून सलमान अनेक गरीबांना सढळ हस्ते मदत करतो, असाही सूर लावला गेलेला आहे. त्याबद्दल दुमत व्हायचे कारण नाही. कुणीही गरीब गरजुंना मदत करणे स्वागतार्हच आहे. पण त्याच्या बदल्यात देशाचे कायदे व सार्वजनिक नियमांना धाब्यावर बसवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार अशा दात्याला मिळत असतो काय? नसेल तर औदार्य वा समाजसेवा केल्याने कुणाला कायद्यातून सुट मिळू शकत नाही. प्रामुख्याने समाजात ज्याचे अनुकरण होते आणि त्याच्याकडे लोक हिरो म्हणून बघत असतात, त्याने वैयक्तिक जीवनात आदर्श निर्माण करून दाखवणे, हीच त्याची खरी सामाजिक जबाबदारी असते. त्याने कायद्याचे पालन करणे आणि कायद्याच्या निकाल निर्णयाला शिरोधार्य मानून अन्य लोकांना तसे करायला सुचवणे; ही कुठल्याही मान्यवर व्यक्तीची खरी जबाबदारी असते. किंबहूना त्यासाठीच त्यांना समाजातले मान्यवर समजले जात असते. त्यांनी कायद्याला बगल देण्याचे मार्ग शोधणे व न्यायाला हुलकावण्या देणे, हा आणखी एक गंभीर गुन्हाच असतो. सलमान असो किंवा संजय दत्त असो, त्यांनी केलेला हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्याच्या बदल्यात त्यांनी कुठले सामाजिक कार्य केले वा गरीब गरजूंना किती मदत केली, ह्या बाबी दुय्यम असतात. सलमान खानचा खटला वा त्याला झालेली शिक्षा, याबद्दल चर्चा म्हणूनच त्याच दिशेने व्हायला हवी. त्याने शिक्षा भोगली वा दंड भरला, म्हणून त्या घटनेतील मृताला पुन्हा जीवनदान मिळणार नाही. यातून कायद्याचा धडा शिकायचा असतो आणि सलमानसह माध्यमेही तो शिकली नाहीत.

सलमान आजचा आघाडीचा अभिनेता आहे आणि त्याच्या चहात्यांना शिक्षेच्या घोषणेने धक्का बसणे स्वाभाविक आहे. संजय दत्त ऐन भरात असताना त्याला शिक्षा झाली, तेव्हाही अनेक चहात्यांना धक्का बसला होता. पण त्यातला भावनिक भाग बाजूला ठेवून चर्चा रंगवल्या गेल्या. त्यातून आपण कायद्याला नामोहरम करतोय आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करतोय, याचेही भान चर्चेकर्‍यांना राहिलेले नव्हते. आजही सलमान एक प्रसिद्ध नागरीक असून असा बेताल अमानुष वागला, याची चर्चा होत नाही. तर त्याच्या तुरूंगात जाण्याने किती कोटी वा अब्ज रुपयांचे चित्रपट भांडवल गुंतून राहिल, याचा बोभाटा जास्त आहे. नामवंताने आपल्या कृतीतून कायद्याचा सन्मान वाढवावा आणि लोकांमध्ये न्यायाची प्रतिष्ठा वाढवावी, हया जबाबदारीचे भान आणायचा प्रयत्नही अशा चर्चांमध्ये दिसत नाही. महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक अशा मान्यवरांनी कायदेभंगाचे आंदोलन केले. पण समाजाच्या उन्नती व स्वातंत्र्यासाठी केलेल्या कृतीला कायद्याने गुन्हा ठरवल्यावर त्यांनी त्यासाठी झालेल्या शिक्षा भोगण्याचे क्रांतीकारी पाऊल उचलले होते. आपण समाजाच्या भल्यासाठी गुन्हा केला, असा दावा त्यांनी कधीच केला नव्हता. म्हणूनच करोडो रुपयांचे चित्रपट अभिनय केले नसूनही अशी माणसे शतकभर देशाचे नायक म्हणजे हिरो होऊन राहिली आहेत. तुलनेने सलमान केवळ चित्रपटाच्या आभासी पडद्यावर दिसणारा भ्रामक नायक आहे. पण त्याला खरा नायक व्हायचे धाडस नाही, इतकाच या ताज्या अनुभवाचा अर्थ आहे. त्याने निकालानंतर तुरूंगात जाण्यापेक्षा कायदा शोधून जामीन मिळवला आहे. भ्रामक नायकाच्या आडचा खलनायक त्यामुळे समोर आला आहे. अर्थात पडद्याच्या भ्रामक जगात रममाण होणार्‍या लोकसंख्येला किंवा त्यांचेच प्रतिनिधीत्व करणार्‍या बुद्धीवादाच्या दिवाळखोरीला तो खलनायक ओळखताहि आला नाही.

2 comments:

  1. आपल्या देशात जन्म घेताना फार मोठं पब्लिक हे डोक्यातला मेंदू विधात्याकडेच ठेऊन आली आहेत...म्हणून ह्या भूतलावर त्यांना सलमान, संजय दत्त ह्यासारखी गुन्हेगारी माणस हि देव भासू लागतात....(प्रसंगी आपले आई वडील सुद्धा चुकतील पण हि माणसे कधी चुकूच शकत नाही) अशी त्यांची ठाम भावना असते.
    टिळक, सावरकर, भगत सिंग, महात्मा गांधी, आंबेडकर ह्या थोर नेत्यांच्या योगदानातून घडलेला देश तो हाच का असाच प्रश्न मनात येतो...
    सलमान पेक्षा ह्या बिनडोक जनतेला आधी शिक्षा करता आली तरच समाजात फार मोठं बदल घडू शकेल...

    ReplyDelete
  2. सलमान सुटला...चला एक गोष्ट सिद्ध झाली...मागे रोबेर्ट वद्रा(सोनिया गांधीचे) जावई म्हणाले होते कि भारत हा banana republic आहे... त्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण बघतोच आहे त्यावर विश्वास ठेवावा....
    धन्य ते जज, धन्य तो वकील, धन्य ती न्यायदेवता....!

    ReplyDelete