सलमान खान याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला दिलासा देण्यासाठी चित्रपटसृष्टी वा बॉलिवुडच्या अनेकांनी त्याच्या घरी धाव घेतली. अशा संकटाच्या प्रसंगी आपण तुझ्यासोबत असल्याचा बंधूभाव दाखवण्याची संधी प्रत्येकाने साधली. तेव्हा माध्यमातून उमटलेली प्रतिक्रिया मोठी शहाजोग व भंपक अशीच होती. अर्थात कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रात त्यापेक्षा वेगळे चित्र बघायला मिळत नाही. एका रिक्षावाल्याने गोंधळ घातला व गुन्हा केला आणि त्याला कायद्याचा बडगा बसला, तर तमाम रिक्षावाले व त्याचे व्यवसायबंधू विनाविलंब संपावर जाऊन त्याच्या पापावर पांघरूण घालायला सज्ज होतात. मध्यंतरी परिवहन खात्याने बेकायदा वाहतुक वा तत्सम गोष्टीसाठी कठोर उपाय योजले, तर वाहतुक ठप्प करण्यापर्यंत मजल गेलेली होती. औषध विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई केल्यावर त्याचीच प्रचिती आलेली होती. अशा वागण्यात आपल्या चुकांचे समर्थन करण्याची जी मानसिकता असते, त्यावर टिका करण्याचा अधिकार माध्यमांना वा पत्रकारांना असू शकतो काय? जेव्हा कुणी पत्रकार वा एखादे वृत्तपत्र गुन्हेगारी करते वा खोटारडेपणा करते, तेव्हा त्याच्या समर्थनाला उभे रहाण्याची मानसिकता वेगळी असते काय? अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला म्हणून जो कांगावा चालतो, तो सलमानच्या घरी गर्दी करणार्यांपेक्षा कितीसा वेगळा असतो? धडधडीत खोटी बातमी देऊन एखाद्या व्यक्ती व्यावसायिक किंवा पुढार्याची बदनामी करणार्याला चोपले, तर कांगावा करणारे काय वेगळे करीत असतात? सलमानला पाठीशी घातल्यासारखे पत्रकारही आपला भ्रातृभावच गुन्हेगाराच्या समर्थनासाठी उभा करतात ना? तेव्हा अशा भंपकगिरीची चर्चा होणे सोडाच, त्याची बातमीही कुठे झळकत नाही. इतका निगरगट्टपणा करणार्यांनी बॉलिवुडच्या बंधूत्वाविरुद्ध उपदेशाचे डोस पाजावेत काय?
तीस्ता सेटलवाड ह्या समाजसेवा नावाचा उद्योग सुरू करण्यापुर्वी पत्रकार होत्या आणि तिथूनच त्यांना अधिक कमाईचा समाजसेवेचा उद्योग सुचला. त्यांच्या बाबतीत माध्यमांनी प्रत्येकवेळी घेतलेली भूमिका सलमानच्या समर्थकांपेक्षा कितीशी वेगळी होती? सलमानच्या अपघाती घटनेची बातमी तरी पहिल्याच दिवशी प्रसिद्ध झालेली होती. पण तीस्ता सेटलवाड यांच्या अफ़रातफ़रीची बातमी तीन वर्षे जुनी आहे. त्याबद्दल किती माध्यमांनी वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत? २०१३ साली अहमदाबादच्या गुलमर्ग सोसायटीतल्या मुस्लिम रहिवाश्यांनी गुजरात दंगलीचा स्मृतीदिन साजरा करण्यासाठी तिथे आलेल्या तीस्ता सेटलवाड यांना तिथून पिटाळून लावले होते. त्याचे कारण हीच अफ़रातफ़र होती. आधी आमच्या नावाने जमा केलेल्या निधी व देणग्यांचा हिशोब द्या; मगच अश्रू ढाळायला इथे या, असे सांगून त्या रहिवाश्यांनी तीस्ताला तिथून पिटाळले होते. इतक्या वर्षापुर्वीच्या या बातमीच्या चार ओळीतरी माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या काय? नसतील तर तीस्ताच्या गुन्ह्याला पाठीशी घालण्याचाच तो प्रकार नव्हता काय? गुजरातच्या दंगलीविषयी कुठेही खुट्ट वाजले, तरी तात्काळ तीस्ताला कॅमेरासमोर आणून मोदीविरोधी गरळ ओकून घेणार्या माध्यमांनी कधी त्या गुलमर्ग सोसायटीच्या पिडीत रहिवाश्यांचा तीस्ताविषयक संताप जाणुन घेण्याचा प्रयत्न केला होता काय? अखेरीस त्याच रहिवाश्यांनी तीस्ताच्या बॅन्क खात्याची माहिती मिळवून रीतसर पोलिस तक्रार नोंदवली. त्याला आता अडीच वर्षे होऊन गेली. कुठल्या वृत्तपत्राने त्याविषयी बातमी दिली आहे? तिथे गुजरातच्या वृत्तपत्रात त्याबद्दल बातम्या झळकल्या. पण राष्ट्रीय वा इतर माध्यमे मोदींवर दुगाण्या झाडण्यात जितका उत्साह दाखवत होती, तितका त्यांचा तीस्ताच्या बाबतीतला उदासिनपणा नजरेत भरणारा होता व आहे.
गेल्या फ़ेब्रुवारी महिन्यात तीस्ताही सलमानप्रमाणेच जामिनासाठी सैरावैरा पळत होती. त्याविषयी बातम्या आल्या. जामिन नाकारला वा अटकेची शक्यता, अशा बातम्या आल्या. पण तीस्ताला अटक कशासाठी होणार किंवा तिने असा कुठला गुन्हा केला, की अटकेच्या भयाने तिची पळापळ चालू आहे, त्याचा उहापोह कुठल्या माध्यमाने केला होता? नसेल तर कशासाठी केला नाही? सलमान वा संजय दत्त यांच्या गुन्हे वा उचापतीविषयी कुठलाही बॉलिवुडचा कलावंत-व्यावसायिक प्रतिकुल बोलत नाही. पण अगदी त्याचप्रमाणे माध्यमातील मुखंडांनी कधी तीस्ताच्या उपरोक्त अफ़रातफ़रीविषयी तोंड उघडले आहे काय? गुजरात दंगलीतील पिडीतांविषयी ज्यांना ज्यांना तीस्ताने समोर आणले, त्यांना माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. पण ज्यांनी कोणी तीस्ताकडे बोट दाखवले, त्यांना मात्र माध्यमांनी कधीच न्याय दिला नाही, जाहिरा शेख जेव्हा तीस्ताच्या पापाचा पाढा वासू लागली, तेव्हा तिला उलटलेली साक्षीदार ठरवण्यासाठी माध्यमांची शक्ती पणाला लागली होती. शेवटी जिला कुटुंबाला जळताना बघावे लागले, त्याच जाहिराला खोटारडी ठरवून तीस्ताने गजाआड धाडले होते. प्रत्येकवेळी तीस्ताच्या समर्थनाला माध्यमे उभी राहिली, त्याची कारणमिमांसा कोणी करायची? त्यामागची कारणे कोणी शोधायची? आताही दंगलपिडीतांच्या पुनर्वसनाचे दिड कोटी रुपये होते, त्यातून चैन चंगळ केल्याचा गंभीर आरोप आहे, त्याची चर्चा किती झाली? माध्यमे अशी तीस्ताला पाठीशी कशाला घालतात? कधीतरी तीस्ता पत्रकार होती म्हणून, की आजही तिचे लागेबांधे माध्यमात आहेत म्हणून? मग अशा रितीने आपल्या कुणाला पाठीशी घालणार्यांनी बॉलिवुडला उपदेशाचे डोस पाजावेत काय? अशाप्रकारचा बंधूभाव माफ़ियांमध्ये आढळुन येतो. कितीही शत्रूता असली, तरी माफ़िया टोळ्या एकमेकांच्या विरोधात पोलिसांना साक्ष देत नाहीत.
पत्रकार व माध्यमे त्यापेक्षा वेगळी उरलीत काय? असती तर सलमान प्रकरण गाजण्यापुर्वी दोन महिने तीस्ता सेटलवाडच्या जामिनाचे प्रकरण असेच गाजायला हवे होते. ज्यावेळी फ़ुटपाथवर चढून अपघात झाला, तेव्हा सलमान निरपराध असेल, तर त्याने पळून जायचे काय कारण होते? त्याने तिथेच थांबून जखमींना इस्पितळात उपचारार्थ हलवण्यात पुढाकार कशाला घेतला नाही? असले प्रश्न मागल्या चारपाच दिवसात माध्यमातल्या शहाण्यांनी सतत विचारले आहेत. नेमका तोच प्रश्न तीस्ताला सुद्धा विचारता आला असता. अडीच वर्षे अफ़रातफ़रीच्या तक्रारीला होऊन गेली आहेत आणि त्याची तरी गरज काय होती? गुलमर्गच्या रहिवाश्यांना तीस्ताने खुलासा व हिशोब दिला असता, तर ही तक्रारच होऊ शकली असती. पण सत्यापासून तीस्ताने पळ काढला, म्हणून रहिवाश्यांना पोलिस ठाण्याचे दार ठोठावण्याची पाळी आली. तर पोलिसांना आवश्यक माहिती द्यायचेही टाळून तीस्ता पळ काढते आहे. तर तिने सत्य सांगण्यापासून पळायचे कशाला, असा सवाल कुणा माध्यमाने तिला कशाला विचारलेला नाही? तक्रार दाखल झाल्यापासून सलमानने पोलिस व कोर्टाशी सहकार्य केले होते आणि तीस्ता दोन्ही बाबतीत तोंड लपवून पळते आहे. आधी मुंबई हायकोर्ट, मग गुजरात हायकोर्ट विरोधात गेल्यावर सुप्रिम कोर्टापर्यंत धावते आहे. दंगल प्रकरणी माध्यमांना सतत पुरावे देणारी तीस्ता, आता आपल्यावरचे आरोप खोटे पाडायला माध्यमात पुरावे कशाला मांडत नाही? कुठला संपादक पत्रकार तीस्ताकडे पुरावा कशाला मागत नाही? बॉलिवुडचे कलावंत समव्यावसायिक जसे सलमानच्या पाठीशी उभे राहिले, तसेच पत्रकार व माध्यमे तीस्ताच्या पापावर पांघरूण घालायला एकवटलेले नाहीत काय? असायलाही हरकत नाही. पण मग मोदी, दंगल वा अन्य विषयात जाब विचारण्याचा नैतिक अधिकार अशा पत्रकार माध्यमांना उरतो काय?
This comment has been removed by the author.
ReplyDeleteभाऊराव,
Deleteतिस्ता न्यायालयास स्वत:च्या बापाची जहागीर मानते. चिमणलाल सेटलवाड यांचे पुत्र मोतीलाल सेटलवाड. त्यांचे पुत्र अतुल सेटलवाड आणि अतुलांची मुलगी तिस्ता. ती वगळता बाकीचे हे सगळे लोकं न्यायक्षेत्राशी संबंधित होते. एव्हढी दीर्घ परंपरा असल्याने फुटक्या कवडीइतकंही कर्तृत्व अंगी नसलेली तिस्ता स्वत:स कायद्यापेक्षा वरचढ समजते. तिचा हा भ्रम दूर होणं भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान