कुठलाही पक्ष वा संघटना यांच्या स्थापनेमागे काही हेतू व उद्दीष्टे असतात. त्यांचे काही कार्यक्रम धोरणे असतात. साधारणपणे त्याला अजेंडा असे संबोधले जाते. त्यानुसारच ते पक्ष चालत असतात. उदाहरणार्थ रिपब्लिकन पक्ष असेल, तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व कल्पनांनुसार चालतो. बौद्ध धर्माचा पाठपुरावा त्याचे अनुयायी व नेते करतात. दुसरीकडे कॉग्रेस असेल तर त्याची विचारसरणी व कार्यक्रम नेहरू-इंदिराजी वा पक्षाच्या आरंभीपासूनच्या नेत्यांनी घालून दिलेल्या विचार व कल्पनांनुसार असतात. त्यात काही गैर नाही. मग त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या हाती सत्ता आल्यावर सरकारी धोरणात पडत असते. राजशिष्टाचार मानल्या जाणार्या काही औपचारिकता सोडल्या, तर अन्य कुठल्या गोष्टी अशा सत्ताधार्यांच्या कृती उक्तीमधून बघायला मिळत नाहीत. मार्क्सवादी पक्ष दिर्घकाळ बंगालमध्ये सत्तेत राहिला, पण त्याच्या नेत्यांच्या बोलण्यात कधी हिंदूत्वाला चुचकारणार्या शब्दांचा समावेश नसायचा. कारण तो शिष्टाचार नव्हता आणि तसा त्या पक्षाचा अजेंडाही नाही. म्हणूनच कोणी कधी ज्योती बसू हिंदूंना शुभेच्छा देत नाहीत, अशी तक्रार केली नाही. उलट जेव्हा अशा शुभेच्छा भाजपाच्या नेत्यांनी हिंदूंना दिलेल्या असतील तर त्याबद्दलही सहसा तक्रारी झाल्या नाहीत. मात्र त्याच भाजपा नेत्यांनी वा सत्ताधार्यांनी मुस्लिम टोपी घातली नाही, किंवा मुस्लिमांच्या सणाविषयी मुद्दाम शुभेच्छा दिल्या नाहीत, मग आग्रहाने त्यावर बोट ठेवण्याची आपल्याकडे एक सेक्युलर फ़ॅशन आहे. तिचा उपयोग मते मिळवण्यासाठी अन्य पक्षांना झाला नाही, उलट मोदींना त्याचा पुरता लाभ होऊ शकला. त्यांनी कधीही मुस्लिम टोपी डोक्यावर घातली नाही आणि तशी वेळ आली, तेव्हा सन्मानपुर्वक त्या मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारली होती. त्याचे इतके भांडवल करण्यात आले, की मोदींना त्याचाच लाभ होऊन गेला.
किंबहूना मोदींना अशा गोष्टीचा लोकसभा निवडणूकीत लाभ मिळाल्यानंतर तरी त्यांचे विरोधक शहाणे होतील, ही अपेक्षा होती. पण तसे काही होण्याची चिन्हे नाहीत. म्हणून की काय, रविवारी रेडीओवरून मोदींनी देशाला उद्देशून जे भाषण केले, त्यात रमझानबद्दल शुभेच्छा नसल्याची तक्रार कॉग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांनी केलेली आहे. रक्षाबंधनाचा उल्लेख मोदींनी केला, पण रमझानचा उल्लेखही नव्हता, असे म्हणण्यात किती तथ्य आहे? रमझान हा महिनाभर चालणारा मुस्लिम सण आहे आणि त्याची सांगता व्हायला अजून खुप वेळ आहे. रमझान ईदला त्याची सांगता होते आणि तेव्हा़च एकमेकांना शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. पण आपल्याकडे सेक्युलर राजकारणात कुठल्याही धर्माच्या सणाला कधीही निरर्थक शुभेच्छा देण्याचा पायंडा पाडला गेला आहे. त्यामुळेच आझाद यांनी अशी हास्यास्पद तक्रार केलेली आहे. ते स्वत:च मुस्लिम आहेत, तेव्हा रमझानच्या शुभेच्छा केव्हा देतात, त्याचा दिवस त्यांना आम्ही समजावण्य़ाची गरज नाही. तो ईदचा दिवस ज्या आठवड्यात येतो, तेव्हा पंतप्रधान मुस्लिमांनाही शुभेच्छा देतीलच. पण कधीही मुस्लिमाना शुभेच्छा देण्याचे लांगुलचालन करणे, हा भाजपाचा तरी अजेंडा नाही. किंबहूना भाजपा वा मोदींचे हे सरकार मुस्लिम विरोधी असल्याचा फ़तवा कालपरवाच मौलवींच्या म्होरक्याने काढलेला आहे. तेवढ्यावर न थांबता योगा दिवस साजरा करण्यातून इस्लाम खतर्यात आल्याचीही आवई त्यातून उठवली गेली आहे आणि तोच इस्लाम मोदींपासून वाचवण्यासाठी प्रत्येक मशिदीतून सज्जता करण्याचाही आदेश त्याच फ़तव्यातून दिला गेलेला आहे. इतका जो पंतप्रधान इस्लामला धोका बनलेला आहे, त्याच्या शुभेच्छा म्हणजे तरी काय असते? गुलाम नबी आझाद यांनी त्याचा खुलासा करायला हवा होता. पण त्याबद्दल हा गुलाम मुग गिळून गप्प बसला आहे.
ज्याला भारत सरकार योगा दिवस साजरा करते, त्यात धर्मांधता दिसते आणि इस्लाम धोक्यात आल्याचेही भासते, त्याने रमझानच्या शुभेच्छांचा सरकारकडे आग्रह का धरावा? योगा दिवस ज्याला हिंदूत्व वाटते, त्याने अन्य कुठल्या धर्मासाठी पंतप्रधानाकडे आग्रह धरणे कितपत योग्य आहे? आझाद हेच मुस्लिम असल्याने त्यांना आपल्या धर्मबांधवांविषयी आस्था असली तर चुकीचे म्हणता येत नाही. पण योगातून धर्म धोक्यात आल्याचे जे मुस्लिम मानतात व त्यात सूर्यनमस्कार इस्लामबाह्य असल्याचा आग्रह धरतात, त्यांचा इस्लाम किती शुद्ध व काटेकोर आहे, तेच लक्षात येते. अशा मुस्लिमांना नरेंद्र मोदी नावाच्या हिंदू पंतप्रधानाने शुभेच्छा देण्यात धोका नसतो काय? जो मुस्लिम नाही तो काफ़ीर व म्हणूनच त्याच्याशी व्यवहार करायला तो शुद्ध धर्म मान्यता देतो काय? योगा वा सूर्यनमस्कार यांच्यासाठी धर्माचे पालन कडेकोट असायला हवे, तर अन्य बाबतीत ते सैल करून चालेल काय? कुठल्याही बिगर मुस्लिम वा काफ़ीराकडून काहीही स्विकारणे शुद्ध इस्लामला मान्य आहे काय? नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा मागून आझाद कुठला धर्म पाळत आहेत? त्यांचा आग्रह शुभेच्छांसाठी असेल, तर तितक्याच हिरीरीने योगाचेही त्यांना समर्थन करता यायला हवे होते. पण गैरसोयीचे असेल, तिथे इस्लाम सोपा व सैल केला जातो आणि जिथे सोयीचे असेल, तिथे इस्लामची शिकवण गुंडाळून ठेवली जाते. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या रेडीओ भाषणात रमझानचा उल्लेख नसल्याची आझाद यांची तक्रार म्हणूनच शहाजोगपणाचा नमूना आहे. अर्थात कुठली तरी चुक काढून मोदींना चुकीचे ठरवणे, याखेरीज त्यांच्या विरोधकांना काही उद्योगच उरलेला नसेल, तर आझाद तरी बिचारे काय करतील? त्यांनाही काहीतरी खुसपट काढायलाच हवे ना?
गेल्या वर्षभरात मोदी यांनी रेडीओ या कालबाह्य मानल्या गेलेल्या माध्यमाला नव्याने उर्जितावस्था आणायचा प्रयास आपल्या या कार्यक्रमातून केला आहे. त्यात मोदी भारतीय जनतेशी आपल्या मनातल्या गोष्टी बोलतात. एकप्रकारचा संवाद साधतात. आधी त्याची टवाळी करण्यात धन्यता मानली गेली. आता त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो असे दिसल्यावर, अनेकांनी त्यातही दोष शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यात आझाद यांना रमझानचा अनुल्लेख हा दोष आढळला, तर इतरांना ललित मोदीच्या विषयाला पंतप्रधानांनी हातही लावला नाही, ह्यात गफ़लत आढळली. ह्या सगळ्या तक्रारी ऐकून गंमत वाटते. पंतप्रधानाच्या भाषणात कोणाचे मनोगत प्रक्षेपित व्हायचे असते? माध्यमातील मुखंडांचे की विरोधी पक्षांचे? पंतप्रधानाने इतरांचे मनोगत बोलावे ही अपेक्षा कशी बाळगली जाऊ शकते? लोकसभेची निवडणूक मोदींनी खुप मेहनत घेऊन लढवली, त्यात त्यांना अपयश मिळण्याची भाकिते करण्यात ज्यांनी धन्यता मानली, तेच आता मोदींचा अजेंडा ठरवू बघतात, याचे म्हणूनच नवल वाटते. यांचा अजेंडा राबवण्यासाठी आणि यांचा झेंडा फ़डकवण्यासाठी मोदींना लोकसभेत बहुमत हवे होते काय? की आपला काही अजेंडा घेऊन मोदी लोकसभेच्या रिंगणात उतरले होते? तसे असेल, तर अजेंडा मोदीचा वा त्यांच्या पक्षाचा असणार. कारण लोकांनी त्यांना म्हणजेच त्यांच्या अजेंडाला कौल दिलेला आहे. तो कौल जर त्या अजेंडासाठी असेल, तर बाकीच्या कोणाचा अजेंडा घेऊन बोलणे वा वागणे; ही पंतप्रधानांनी मतदाराशी केलेली गद्दारी ठरू शकेल. मग विषय रमाझानच्या शुभेच्छा देण्याचा असो की ललित मोदी प्रकरणाचा असो. मन की बात ही मोदी नावाच्या व्यक्ती व नेत्याच्या मनातली असणार व असायला हवी. ती गुलाम नबी वा अन्य कोणाच्या मनातली असून कसे चालेल? ज्याचा झेंडा त्याचाच अजेंडा असणार ना?
अति सुन्दर अवलोकन.
ReplyDeleteBhau tumhi English madhye pan liha...sarv secular chi tonde band hotil
ReplyDelete