१९६१ सालात मी सायनच्या धर्मप्रकाश श्रीनिवासय्या विद्यालयात आठवीला प्रवेश घेतला. त्या शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या वर्गात बसले, मग खिडकीतून समोरची सिंधी कॉलनी दिसायची. जुन्या बरॅक्सची बैठी घरे फ़ाळणीनंतर पळून आलेल्या सिंधी लोकांना वास्तव्यासाठी दिलेली होती. त्याच्या पश्चिमेला एका भिंतीने बंदिस्ती केलेली होती. त्या भिंतींच्या पलिकडे मध्यरेल्वेचे रूळ होते आणि त्यावरून दौडणार्या लोकल व दुरपल्ल्याच्या आगगाड्या वर्गातून दिसायच्या. त्याच्याही पलिकडे नुसती खाडी होती आणि जिथे खाडी संपायची तिथे पश्चिम रेल्वेचा लोहमार्ग होता. त्यावरून दौडणार्या लोकल व दूरपल्ल्याच्या गाड्याही वर्गातून दिसायच्या. दोन रेल्वेमधली ही खाडी ऐसपैस पसरलेली होती. आजच्या सायन स्थानकाजवळ राजबर टॉवर म्हणून इमारत दिसते, ती तेव्हा बैठी लक्ष्मीबाग नावाची चाळवस्ती होती. त्यापासून माटुंग्याच्या टाटा पॉवर स्टेशनपर्यंत नुसती खाडी होती, थेट लेबर कॅम्पपर्यंत. सायन स्टेशनपासून धारावी कोळीवाडा, काळाकिल्ला व त्याच्या लगतची पारशी चाळ इतकीच विरळ वस्ती तिथे होती. बाकी सगळा भाग खाडी होती आणि तीच पुढे कुर्ल्यापर्यंत आणि बांद्रा पुर्व म्हणतात तिथपर्यंत पोहोचलेली होती. धारावी व बीकेसी असे जे दोन शब्द आजकाल मुंबईत सर्रास वापरले जातात, ती तेव्हा निव्वळ खाडी होती. शाळेतून कधी आम्हाला शिवाजी पार्कच्या कार्यक्रमाला शिक्षक घेऊन गेलेच, तर दादर टिळक ब्रीज मार्गे जावे लागे आणि पुन्हा सायनला येण्यासाठी शिवाजीपार्क ते माहिम बसडेपो अशी मुलांची वरात काढली जात असे. अगदी बांद्रा वा पुर्व बांद्रा इथे जायचे तरी दादर टिळक ब्रीज, माहिम असाच वळसा सायनकरांना घ्यावा लागत असे. कारण मधला प्रचंड परिसर निव्वळ खाडी होती. मुंबईत अशी हीच एकमेव खाडी नव्हती. मागल्या शतकात एक एक करून मुंबईच्या खाड्या बुजवल्या गेल्या. त्यावर आजची मुंबई उभी आहे.
निसर्गाने मुंबई नावाच्या बेटसमुहाला या खाड्यांची सुविधा कशाला ठेवलेली होती? कोणी याचा विचार तरी केला आहे काय? आज ज्याला आपण मुंबई म्हणून ओळखतो, तिचा अर्ध्याहून अधिक भूभाग खाड्या बुजवून केलेले अतिक्रमण आहे. निसर्गाने ज्याला खाडी म्हणून मोकळे सोडले होते, तो प्रदेश पुढे मुंबईकरांनी अथवा अन्य कोणी भराव टाकून बांधकामाचे भुखंड बनवावेत, म्हणून आरक्षित ठेवला होता काय? नसेल, तर समुद्राने पोसलेली ही खाडी नावाची खारी जमिन निसर्गाने कशासाठी राखून ठेवली होती? भरतीच्या वेळी येणारे पाणी पसरायला राखीव जागा, असेच खाडीचे काम असते. ती खाडी कोणी बुजवली असेल तर त्या भरतीच्या पाण्याने जायचे कुठे? ज्यांनी मागल्या शंभर वर्षात क्रमाक्रमाने खाड्या बुजवून मुंबईला अधिक भुखंड मिळवून दिले, किंवा तसे नियोजन वा तथाकथित विकास केला, त्यांनी कधीतरी या भरतीच्या पाण्याचा निचरा होण्याची तरतुद केली होती काय? नसेल तर त्या पाण्याने कुठे जायचे? पाणी वा निसर्ग मानवनिर्मित कायदे पाळत नसतो. माणसाला निसर्गाचे नियम पाळावे लागतात. किंवा त्याच्याशी तडजोड व समझोता करावा लागत असतो. निसर्ग कधी लाच खाऊन माफ़ करत नाही, किंवा गैरलागू वर्तनाला नियमित करून मान्यता देत नाही. त्याच्या तावडीत सापडलात मग शिक्षाही होणारच. कधी ती सौम्य असते आणि कधी ती कठोर असते. २६ जुलै २००५ रोजी कठोर शिक्षा मुंबईला निसर्गाने दिली होती आणि शुक्रवार १९ जुन २०१५ रोजी त्याच निसर्गाने सौम्य शिक्षा मुंबईला दिलेली आहे. त्याचे खापर महापालिकेतील सत्ताधार्यांवर किंवा सरकारवर फ़ोडले म्हणजे त्यापासून सुटका होऊ शकत नाही. शिवसेनेला शिव्याशाप देऊन पुढल्या पावसात किंवा पुढल्या काळात अतिवृष्टीच्या वेळी तुंबाडचे खोत व्हायची वेळ चुकणार नाही. कारण जे काही शुक्रवारी मुंबईत झाले, त्यावर पालिका कुठलाही उपाय करू शकणार नव्हती.
गेल्या दोन दिवस मुंबईत होणार्या मुसळधार पावसाच्या निमीत्ताने शहाण्यांकडून मुक्ताफ़ळे वृत्तवाहिन्यांवर उधळली जात होती,. त्यातून एक लक्षात आले, की त्यापैक्ली कुणालाही मुंबई उमजलेली नाही किंवा मुंबई ठाऊकच नाही. पन्नाशी वा साठीच्या पलिकडे वय गेलेला कोणीही मुळचा मुंबईकर सांगू शकेल, की अतिवृष्टी व भरतीचा मुहुर्त एकच असला, मग मुंबईच्या सखल भागात पाणी साचून कारभार ठप्प होणे, हा प्रत्येक पावसाळ्यातला एक ठरलेला नियम व कार्यक्रम आहे. अगदी ‘नियोजित’ म्हणावा इतका प्रतिवर्षीचा अनुभव आहे. मग सेनेने वा पालिकेने कितीही नालेसफ़ाई केलेली असो किंवा गटारे उपसलेली असोत. त्यामुळे मुंबईत अतिवृष्टीमुळे पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत व्हायला पर्यायच नाही. कारण नाले वा गटार सफ़ाईचा व त्या पाणी साचण्याचा काडीमात्र संबंध नाही. त्या नाल्यातून पावसाचे पाणी जायचे तर ते समुद्रातच जाणार ना? आणि तेव्हा समुद्राची पातळी जमिनीपेक्षा खाली असली तरच ते पावसाचे पाणी समुद्रात समाविष्ट होऊ शकेल ना? पण भरतीमुळे समुद्राचीच पातळी उंचावलेली असेल, तर शहरातील जमिनीवरचे पाणी तिकडे जाणार कसे? उलट समुद्राचेच पाणी व लाटा जमिनीकडे, वस्तीकडे येणार ना? त्यात नाले व गटारे काय करू शकणार? जे पाणी भरतीच्या वेळी मुंबईच्या विविध खाड्यांमध्ये पसरू शकत होते, त्याची जागा तुम्ही व्यापली आहे आणि त्याचवेळी पावसाने धार धरली, तर समुद्राच्या जोडीला आभाळातून येणार्या पाण्याची भर पडणार. त्या पाण्याने जायचे कुठे? नाले-गटारे सफ़ाई केल्याने पाणी प्रवाहित होऊ शकते. ते इतरवेळी वा ओहोटीच्या वेळी पाऊस पडला तर समुद्राकडे धावते. तसेच मग नाले गटारे यातून भरतीच्या वेळी उलटे वस्त्यांमध्ये येणार ना? ही समस्या खाड्या बुजवून व सागरी प्रदेशावर केलेल्या आक्रमणातून आलेली आहे. खाड्या चोरण्याने उभी केलेली समस्या आहे.
माझ्या सदुसष्ट वर्षाच्या आयुष्यात मुंबईत प्रत्येक पावसात अतिवृष्टी झाली मग मुंबई ठप्प होण्याचा अनुभव मी घेतला आहे. जिथे म्हणून सखल भाग आहेत तिथे नेहमीच पावसाचे पाणी भरणे हा नियमच होता व आहे. काळाचौकीचा नाका, हिंदमाता, माटुंग्याचे गांधी मार्केट, महालक्ष्मी रेसकोर्सचा भाग, ताडदेव, सेंच्युरी बाजार असे सखल भाग प्रत्येक वर्षी व प्रत्येक अतिवृष्टीनंतर पाण्याखाली जातातच. ज्याचे आयुष्य मुंबईत गेले आहे, त्याला हा नियम पक्का ठाऊक आहे. त्यामुळे शुक्रवारच्या मुंबई ठप्प होण्याचे खापर नालेसफ़ाई वा गटार सफ़ाईच्या माथी मारणे हा निव्वळ मुर्खपणा व अडाणीपणा होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल. १९६० वा १९७० पर्यंत जिथे पाणी साचत होते, असे भाग आजच्यापेक्षा कमी होते. पण जसजशा खाड्या बुजवून मुंबईचा विस्तार होत गेला, तसतसे मुंबईतले बुडणारे भाग वाढत गेले. पावसाचे पाणी तुंबण्याचे भाग वाढत गेले. त्याचा संबंध अपेक्षेपेक्षा अधिक वा निचर्याच्या सोयीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याशी आहे. आणि ही गोष्ट मुंबईतच आहे असेही मानायचे कारण नाही. अतिशय आधुनिक सुविधा असलेल्या अमेरिकेत न्य़ु ओर्लिन्स नावाच्या महानगरात तसेच होत असेल, तर त्यासाठी शिवसेनेला जबाबदार धरणार काय? २००५ साली तिथे कटरिना नावाच्या चक्रीवादळामुळे प्रचंड पाऊस पडला आणि अतिवृष्टीने अवघे शहर बुडून गेले. कित्येक दिवस ते पाणी निघू शकले नव्हते आणि लष्कराला पाचारण करून बहुतांश वस्ती स्थलांतर करून हलवावी लागली होती. त्याचे कारण तिथे नाले वा गटारे सफ़ाई होत नाही, असे कोणाला म्हणायचे आहे काय? जे मुंबईत झाले व होते, तेच न्यु ओर्लिन्सचे दुखणे आहे. पण समस्या समजून घेण्यापेक्षा कुणाच्या तरी डोक्यावर खापर फ़ोडणे हा पलायनवाद आपल्या देशातील बुद्धीवादाचा निकष झाला असेल, तर अक्कल गंदी नालीका किडाच होऊन जाणार ना? (अपुर्ण)
भाऊ, विश्लेषण खूप छान पण राज्यकर्ते ही गोष्ट लक्षात घेतील याची सुतराम शक्यता नाही. कारण सगळ्यांचेच पाय मातीचे झालेत.
ReplyDeleteभाऊ, तुमच्या लेखात नाविन्य नक्कीच असते आणि ते याही लेखात आहे. थोडं अमेरिकेचे उदाहरण देताना लोकांना आणखी एक समज द्यायला हवी होती ती म्हणजे, कचरा विल्हेवाटीची!
ReplyDeleteहा ही एक घटक आहेच कि पाणी तुंबविणारा!
काय आहे, भ्रष्टाचारावर सारेच तोंडसुख घेतात, पण उपाययोजनांचा (Solution) पिच्छा किती पुरविल्या जातो? याबद्दल नेहमी Problem (प्रश्न चिन्ह) असतो!
पुढच्या लेखाची वाट पहातो आहे.
काल म्हणजेच 19 जुलै रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन होता. अन् बरोबर त्याच दिवशी मुंबईमध्ये मुसळदार पाऊस पडत होता. जोडीला समुद्राला भरतीपण होती. त्यामुळे मुंबई दीन झाली. रातभर पडत असलेल्या सततच्या पावसाने मुंबईच्या बहुतांश भागामध्ये पाणी जमा झालं होतं. त्यामुळं मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. तर नव्यानेच सुरू करण्यात आलेली मेट्रो सेवाही खंडीत झाली. मग एकच हाहाकार माजला. सगळ्या वाहिन्यांवरुन शिवसेनेला टारगेट केले जात होतं. नाला सफाई झाली नाही, भ्रष्टाचार झाला, शिवसेना कुचकामी ठरली, शिवसेने मुंबईची वाट लावली वगैरे वगैरे आरोप केले जात होते. या सगळ्या घडामोडीकडं पाहील्यावर लक्ष्यात येत होत शिवसेना रडारवर आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आसल्यामुळे साहजिकच शिवसेनेवर टीका होणारच ! पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काल समुद्राला भरती होती. त्यामुळं समुद्रातले पाणीच उलट नाल्यवाटे शहरात तुंबणार होतं. हे अगदी सहज घडणार होत. त्याला समुद्र किनार पट्टीवरच कोणतेही शहर अपवाद नसते. मग ओहटी बरोबरच पाणीही ओसरले. तर मग प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे शिवसेना टारगेट का ?
ReplyDeleteकाही दिवसांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मोदी पॅटर्न प्रमाणे अगोदर विरोधकांना बदनाम करा, जेवढे शक्य होईल तेवढे आरोप करा ( लोकसभा निवडणुका आठवा ) जनमत तुमच्याच बाजुने तयार होईल. अगदी तसाच प्रकार इथही होतोय....कुणी केला ? कसा केला ? हा भाग संशोधनाचा होवू शकतो परंतु वर्धापनालाच शिवसेना बदनाम झाली हे मात्र नक्की !
भाऊ,
ReplyDeleteमान्य की मुंबई भरती आणि पाऊस एकत्र आल्याने तुंबली. महापालिका यात फार काही करू शकत नाही. मग दर वर्षी मे महिन्यात सामनाने 'नलेसफई जोरात, पाणी तुंबणार नाही. उद्धव ठाकरेंनी केली नलेसफाईची पहाणी' अशा बातम्या देऊ नयेत.
उदा: http://www.saamana.com/2015/May/15/Link/Main2.htm