मुंबई बॉम्बस्फ़ोटातला आरोपी आणि एक महत्वाचा सुत्रधार याकुब रझ्झाक मेमन याच्या फ़ाशीवरून उठलेले वादळ त्याला फ़ासापासून वाचवण्यासाठी होते अशी अनेकांची समजूत आहे. म्हणूनच त्याचे कुटुंबिय वा वकीलांनी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल शंका घ्यायचे काही कारण नाही. त्यांचे ते कर्तव्यच असते. पण त्यांच्या व्यतिरीक्त अखेरच्या क्षणी ज्यांनी याकुबला वाचवण्याचा तमाशा मांडला होता, त्यांना याच्याशी काय कर्तव्य होते? तर हे लोक स्वत:ला फ़ाशीच्या शिक्षेचे विरोधक मानतात. फ़ाशी ही आधुनिक युगात व जगात रानटी शिक्षा असल्याच्या समजुतीने भारावलेला एक वर्ग जगभर असून इथले तमासगीर त्याच पंथाचे होते. त्यात आणखी याकुब मुस्लिम असण्याने व विद्यमान सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या पुर्वग्रहाची भर होती. पण हा सगळा तमाशा तिथेच संपणारा आहे काय? त्यात अन्य काही हेतू वा उद्दीष्ट नाही, असे ठामपणे म्हणता येईल काय? हेतू असेल तर तो शोधण्याची गरज आहे. कारण याकुबने दोन दशकापुर्वी घडवलेल्या बॉम्बस्फ़ोटापेक्षा असा हेतू अधिक घातक असू शकतो. म्हणूनच अशा लोकांच्या नावे शिव्याशाप देत बसण्यापेक्षा त्यांचे कुटील हेतू ओळखायला हवेत आणि त्यांच्या मागे फ़रफ़टत गेलेल्या अन्य वेंधळ्या मुर्खांना त्यापासून वेगळे काढणे भाग आहे. म्हणूनच नुसता अशा तमासगीरांच्या नावाने शंख करण्यापेक्षा त्यांचे चेहरे व मुखवटे ओळखण्याची गरज आहे. यात एका बाजूला असाउद्दीन ओवायसीसारखे थेट कट्टरपंथी मुस्लिम नेते आहेत तर दुसर्या बाजूला नक्षलवादी हिंसेला न्यायाची लढाई असा मुखवटा लावणारेही आहेत. तिसर्या बाजूला नुसत्याच हिंदूत्ववादाने बिथरलेल्यांचा एक गट आहे, तर चौथ्या बाजूला अशा सेक्युलर गोतावळ्यात आपणही आहोत असे दाखवायला उथळपणा करणार्यांचा गट आहे.
शत्रुघ्न सिन्हा भाजपाचा खासदार असून त्याने अशा गोतावळ्यात कायम येजा राखलेली आहे. मंत्रीपदाला वंचित राहिल्यापासून त्याची कायम चलबिचल होत असते. तर कॉग्रेस वा अन्य पक्षातले काही नेते कट्टर संघद्वेषाने अशा सह्याजीरावांच्य गोतावळ्यात वावरत असतात. ह्यांना आपण काय करीत आहोत त्याचा थांगपत्ता नसतो. पण तसे नक्षलवाद्यांचे समर्थक वा ओवायसीचे पाठीराखे यांच्याविषयी म्हणता येणार नाही. ही मंडळी जाणिवपुर्वक काही कुटील हेतूने अशा संधी शोधत असतात आणि त्यात मग बाकीच्या बावळटांना ओढून आणत असतात. जयचंद राठोड हे नाव वाचल्यावर अनेकांना तो इतिहास आठवला. पण त्यामागची मनस्थिती किती उमगली? पृथ्वीराजच्या द्वेषाने जयचंद पेटलेला होता, त्याचे हेतू भिन्न तर महंमद घोरीचे उद्दीष्ट वेगळे होते. पण घोरीने आपले हेतू साध्य करण्यासाठी जयचंदाचा कुटीलपणे वापर करून घेतला. आज त्याचप्रमाणे नक्षलवादी व जिहादी प्रवृत्ती सेक्युलर मुर्खांचा आपल्या हेतूसाठी वापर करून घेत आहेत. त्यातून मग सेक्युलर व जिहादी अशा दोन्हीतला मुखवटा कुठला व चेहरा कुठला याचा अंदाजच येत नाही. तिथे मग आपण त्या सर्वांना शिव्याशाप देत बसतो. पण त्यामागचे हेतू शोधत नाही. त्यातली लबाडी वा बनवेगिरी तपासून बघत नाही. नक्षलवाद्यांना भारतीय लोकशाही व घटनात्मक शासनव्यवस्था खिळखिळी करून टाकायची आहे. मग नुसत्या शस्त्राच्या धाकाने भारतीय लोकसंख्येवर राज्य करता येईल, असे त्यांचे स्वप्न आहे. तर जिहादी मानसिकतेचे ओवायसी व त्यांचे पाठीराखे हिंदू असलेल्यांच्या मनात कायम अपराधगंड निर्माण करून दुसरीकडे मुस्लिमांना चिथावण्या देण्याचे धोरण राबवत असतात. त्या दोन्ही गटांना भारतीय शासन व कायदा व्यवस्था आडवी येते आहे. अकबरुद्दीन ओवायसी काय म्हणाला होता आठवते?
‘फ़क्त चोविस तास पोलिस बाजूला काढा, मग बघा हिंदूंचा कसा फ़डशा पाडतो’, हीच त्याची धमकी होती ना? ती खोटी समजण्याचे कारण नाही. हिंदू आपल्या धर्मासाठी रक्त सांडायला उभे रहाणार नाहीत, पण मुस्लिम प्राण पणाला लावून हिंदूंना ठार मारतील, असेच त्याला म्हणायचे होते. किंबहूना त्यांनी तशी शिकवणच जिहादी संकल्पनेतून दिलेली आहे. सगळेच मुस्लिम तसे नाहीत. पण जे राजकीय व सार्वजनिक जीवनात पुढे असतात, ते अशाच हिंसक मानसिकतेने भारवलेले आहेत. त्यांच्या वतीने अकबरुद्दीन बोलत होता. मात्र पोलिस, कायदा व न्यायव्यवस्था कार्यरत असेपर्यंत तशी थेट लढाई शक्य नाही, ही त्याची अडचण आहे. नेमकी तीच अडचण नक्षलवाद्यांची आहे. जोवर घटनात्मक कायदेशीर राज्य भक्कम आहे, तोवर नुसत्या शस्त्रबळाने सत्ता गाजवता येणार नाही,. ही नक्षलवाद्यांची समस्या आहे. जोवर तथाकथित सेक्युलर मानले जाणारे सरकार देशात होते, तोवर अशा दोन्ही मनोवृत्तींना हातपाय पसरायला कुठला अडथळा नव्हता. त्याचेच लाभ उठवून त्यांनी आपला प्रभाव वाढवला आहे. जेव्हा कृती केली आणि कायदा आडवा आला, तेव्हा त्यांचे छुपे सुत्रधार ‘प्रतिष्ठीत’ मुखवटे लावून असेच बचावाला सरसावले आहेत. असे मान्यवर पत्रके काढणार, बैठका घेणार, निदर्शने करणार आणि जनमानसात नेहमी कायदा व न्यायव्यवस्थेच्या विषयी शंका निर्माण करणार, हाच त्यांचा जिहाद बनून गेला आहे. एका बाजूला हेच लोक गुजरातच्या दंगलीत कायदाव्यवस्था नव्हती म्हणणार आणि तेच दुसरीकडे कायद्याने दिलेला न्यायही शंकास्पद आहे असे म्हणणार. यातला दुटप्पीपणा ओळखण्याची गरज आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नसतो, तर लोकांच्या मनातला कायदा व न्यायावरील विश्वास ठार मारायचा असतो. एकप्रकारे हा नजरेत न भरणारा जिहाद आहे.
जिहाद किंवा दहशतवाद म्हणजे हिंसाचार अशी आपण एक चुकीची समजूत करून घेतली आहे. याकुबपासून अफ़जल गुरूपर्यंत कोणालाही निरपराधांना ठार मारण्यात रस नसतो आणि नव्हता. त्यांना मुठभर लोकांना ठार मारून करोडो लोकांच्या मनात दहशत निर्माण करायची होती किंवा असते. दोन दशकांपुर्वी मुंबईत पहिले बॉम्बस्फ़ोट झाल्यापासून आपल्या नित्यजीवनात किती आमुलग्र बदल झालाय, त्याकडे आपण कधी गंभीरपणे बघितले आहे काय? विमानतळ व मंत्रालय अशा महत्वाच्या स्थळी सुद्धा त्यापुर्वी तपासणी यंत्रे नव्हती. आता तर रेल्वे बसस्थानकातही स्फ़ोटके शोधणारी यंत्रे तैनात केलेली दिसतात. त्याला दहशत म्हणतात. जनतेचा अथवा कायदा सुव्यवस्था राबवणार्यांना कुठेही केव्हाही स्फ़ोट होऊ शकतात, अशी कायम भिती वाटत असेल, तर याकुबने दहशतीची योजना यशस्वी केली ना? लोकांना त्या स्फ़ोटाची वा जीवानिशी मरण्याची भिती केव्हा वाटते? जेव्हा कायदा व्यवस्थेने सुरक्षा देण्याविषयीची लोकांना खात्री वाटत नाही. तो विश्वास मारणे म्हणजेच जिहादी युद्ध जिंकणे असते. याकुब वीस वर्षापुर्वी बिनधास्त शेकडो निरपराध लोकांना ठार मारायची योजना आखतो व अंमलात आणतो. पण त्याला कायद्यानुसार दोषी ठरवल्यानंतर बंदिस्त तुरूंगात फ़ाशी देतानाही सरकारला बाहेर गडबडी होऊ नयेत, याची खास दक्षता घ्यावी लागते. ह्याला आत्मविश्वास म्हणायचा की दहशत? ही दहशत याकुब वा त्याच्या माथेफ़िरू मुस्लिम अनुयायांनी निर्माण केलेली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत त्याला वाचवायला उजळमाथ्याने फ़िरणार्यांनी आपल्या मनात तशी दहशत निर्माण केली आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नव्हताच. तुमचा-आमचा व सामान्य माणसाचा न्याय व कायद्यावरील विश्वास खच्ची करायचा होता. शिव्यशाप देण्यापेक्षा आपण हे कुटील हेतू ओळखणे व त्याच्याशी दोन हात करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाकिस्तानी सेनाधिकारी ब्रिगेडीयर एस, के. मलिक यांनी समजावून दिलेला जिहाद जाणून घ्यावा लागेल.
भाऊ सर...
ReplyDeleteखुपच मस्त लेख...
Bull's Eye !
ReplyDeleteवास्तव
ReplyDeleteExactly....
ReplyDeletebhau the great!!!
ReplyDeleteयोग्य विश्लेषण.
ReplyDeleteपडद्याआडचा जीहाद
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteएक वर्षापुर्वीचं हे लेखन या चारदोन महिन्यात किती सार्थ ठरतंय.
ReplyDeleteथोडीफार जाणीव झालीय हाच काय तो फरक.