Saturday, July 4, 2015

आमदार राम कदमांना ‘आठवले’ले खर्च




गेल्या गुरूवारची गोष्ट. पॉईंट ब्लॅन्क नावाच्या कार्यक्रमात विविध पक्षांचे नेते आणि पत्रकार मिळून खासदारांच्या दुप्पट पगार भत्त्याचा किस पाडत होते. त्यात कॉग्रेसचे प्रतिनिधीत्व हुसेन दलवाई करीत होते आणि ते स्वत:च खासदार आहेत. तर शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊतही सहभागी होते. दोघांनी पगारवाढीचे समर्थन केले. भाजपाचा मात्र कुठला खासदार त्यात नव्हता. त्याऐवजी राज्यातले आमदार राम कदम पक्षाची बाजू मांडायला हजर होते. पुर्वाश्रमीचे मनसे आमदार असलेले राम कदम अतिशय संयत भाषेत आग्रही बोलतात, हे प्रेक्षकांना ठाऊक आहे. याहीवेळी त्यांनी आपली बाजू समर्थपणे मांडली. मात्र एन्कर निखील वागळे असल्याने राम कदम यांनी उपस्थित केलेल्या महत्वाच्या पॉईंटला त्यांनी हातही लावला नाही. सहाजिकच त्यांच्या चर्चेचे शिर्षक नव्याने तपासण्याची गरज मला वाटली. पॉईंट ब्लॅन्क म्हणजे अगदी जवळून गोळी झाडतात असे ऐकुन माहित होते. पण गेल्या गुरूवारी त्याचा अर्थ नव्याने उमगला. ज्यात पॉईंट नाही, असा मु्द्देशून्य विषय म्हणजे ‘पॉईंट ब्लॅन्क’ हे प्रथमच लक्षात आले. कारण निखीलचे चर्चेत लक्ष असते तर आमदार खासदारांच्या पगाराची गरज कशातुन वाढत गेली आहे, त्याचे नेमके कारण राम कदम यांनी तिथेच स्पष्ट केले होते आणि तोच पॉईंट अतिशय मोलाचा होता. पण ज्यांची बुद्धी ब्लॅन्क असते, त्यांना पॉईंट कुठून कळायचा? तर तो पॉईंट होता, आमदार खासदारांच्या वाढलेल्या खर्चाचा. पण तिकडे निखीलने साफ़ काणाडोळा केल्याने राम कदम यांना त्याचा तपशील दुसर्‍या दिवशी दुसर्‍या चॅनेलवर द्यावा लागला. दुसर्‍या एका एन्करला त्यात ‘खर्ची’ घालावे लागले. पण संधी मिळाल्यावर राम कदम यांना काय काय ‘आठवले’ त्याचा तपशील खुप धमाल होता. कदाचित आपला तसाच सर्व तपशील निघू नये, म्हणून निखीलने आदल्या दिवशी त्या पॉईंटकडे काणाडोळा केला असेल का?

आजकाल आमदार खासदारांना इतके वाढवून पगार व भत्ते हवे असतात, कारण त्यांचे खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत, असे सांगताना हुसेन दलवाई वा भारतकुमार राऊत यांच्यापेक्षा एकदम वेगळाच ‘खर्च’ राम कदम यांनी कथन केला होता. तो असा, की कुठल्याही मतदाराला आपल्या घरात कोणी गंभीर आजारी असेल, तर त्याचा उपचार खर्च आमदाराने द्यावा असे वाटते. भेटायला येणार्‍यांना चहा वगैरे द्यावा लागतो. इथपर्यंत ठिक होते. पण पुढे जाऊन कदम म्हणाले विविध पत्रकार मित्रांना जाहिराती द्याव्या लागतात. दिवाळी अंकांना जाहिराती द्याव्या लागतात. ही आमदार खासदार वा अगदी नगरसेवक यांच्या खर्चातली ‘नवी बाब’ सहसा कोणी बोलत नाही. बहुतेक वर्तमानपत्रात नेत्यांचे वाढदिवस किंवा तत्सम निमीत्ताने मोठमोठ्या पुरवण्या प्रसिद्ध केल्या जातात. काही सभ्य लोक त्याला पेडन्युज म्हणतात. बिचारे अशोक चव्हाण त्याच ‘खर्चामुळे’ आपल्या मागे शुक्लकाष्ट लावून बसले आहेत. पण तो खर्च गाव-गल्लीतल्या प्रत्येक नेत्याला आजकाल करावा लागतोच. मग तो निवडून आलेला खासदार असो किंवा पुढल्या निवडणूकीतला इच्छुक असो. त्याला जाहिराती द्याव्याच लागतात. तालुक्यापासून केंद्रातल्या मंत्र्यापर्यंतच्या प्रत्येक नेत्याला आपले वाढदिवस वा आनंदोत्सव वर्तमानपत्राला जाहिराती देऊनच साजरा करावे लागतात. तो खर्च त्या लोकांनी कुठून भरून काढायचा? खरेच तसा खर्च आवश्यक आहे काय? पण त्याबद्दल निखील वागळे बोलायलाच राजी नव्हते. कारण अधिक संधी वा प्रोत्साहन दिल्यास, कदम जुन्या जुन्या तपशीलात घुसत गेले असते आणि नको तिथल्या दुखण्याला हात घातला गेला असता.

पण राम कदम यांची निराशा झाली नाही. नियतीने त्यांना दुसर्‍या दिवशी तशी संधी मिळवून दिली. त्यांच्या मतदारसंघात कुठेतरी एका वृद्ध चहा विक्रेत्याला कदमांच्या अंगरक्षकाने मारहाण केली. मग काय ‘जय महाराष्ट्र’ चॅनेलवर त्याची मस्त बातमी झळकली. अर्थात पत्रकारी बाणा असा असतो, की एकतर्फ़ी बातमी देऊ नये. म्हणून मग त्या बातमीसाठी एन्कर बनलेल्या विलास आठवले यांनी खुद्द राम कदम यांनाच फ़ोन लावून त्यांची ‘बाईट’ घेतली. बाईट म्हणजे टिव्ही पत्रकारितेत चित्रित वक्तव्य असते. पण नेहमीच्या भाषेत त्याला चावा घेणेही म्हणतात. राम कदम यांना कुठली बाईट ते सांगितलेले नसावे. म्हणून त्यांनी थेट आठवले आणि पत्रकारांनाच चावे घ्यायला सुरूवात केली. आदल्या रात्री जो मुद्दा वा खर्चाचा तपशील निखीलने चलाखीने काणाडोळा करून झाकला होता, तोच कदम यांनी ‘जय महाराष्ट्र’ चॅनेलवर खुला केला. फ़टाफ़ट त्यांनी आठवले यांच्या खर्चाच्या फ़ायली ओपन केल्या. आपली बदनामी मुद्दाम करून आठवले सूड घेत असल्याचा आरोप थेट प्रक्षेपणातून करताना कदम जमाखर्च मांडू लागले. पंकजा मुंडे यांच्या चिक्कीची भिंगातून तपासणी करणार्‍या कुठल्याही वाहिनीला वा पत्रकार-वृत्तपत्राला राम कदम यांनी केलेल्या गौप्यस्फ़ोटाचा तपास कशाला करावा वाटू नये? विलास आठवले यांच्या सदनिकेच्या खरेदीसाठी लागणारे पैसे राम कदम यांनी दिले नाहीत, म्हणून आठवले वाहिनीवर आमदाराची बदनामी करतात, हा गंभीर आरोप नाही? आठवले यांच्या मोबाईलची बिले आपण भरली, असेही कदम सांगत होते. अजून कितीतरी तपशील त्यांच्यापाशी सज्ज होते आणि ती फ़ाईल ओपन करायला भाग पाडू नका, अशी धमकीच कदम देत होते. पत्रकाराला इतकी थेट धमकी दिल्यानंतर कुठल्याच पत्रकार संघटनेने त्याची दखल घेऊ नये? कुठल्याच माध्यमात राम कदम यांच्या विरोधात आवाज उठवला जाऊ नये?

पत्रकारी स्वातंत्र्याचे झाले आहे काय? एक आमदार खुलेआम वाहिनीवर धमक्या देतो आणि अवघी पत्रकारीता चिडीचुप? याला म्हणतात, ‘पॉईंट ब्लॅन्क’ फ़ायरींग. राम कदमांनी त्याच्या पुढे जाऊन बदनामीचा खटला भरण्याची धमकी दिली, त्याचेही आठवले यांनी स्वागत केले. पण त्यांनी धमकीबद्दल पत्रकार संघटनेकडे तक्रार कशाला केलेली नाही? टिव्ही पत्रकार संघटनेचे आठवले स्वत:च पदाधिकारी आहेत. मग त्याच्या वतीने तरी किमान राम कदमांचा निषेध व्हायला नको काय? कुठे म्हणून आवाज नाही की तक्रार नाही. पत्रकारीता झोपा काढते आहे की पत्रकारच ओशाळे आहेत आणि कोणत्या नेत्यांच्या पदरी ओलिस आहेत? त्याच्या याद्या खाजगीत सांगितल्या जात असतात. मात्र जाहिरपणे त्यावर बोलले जात नाही. अधिक तपशील ‘ओपन’ करण्याच्या भयाने बाकीच्या पत्रकारांना पछाडले आहे काय? अर्थात पत्रकारितेत वावरतात, त्यांना हे सर्व ठाऊक आहे. किती पत्रकार कोणाचे ओशाळे आहेत वगैरे. बहुतांश राजकीय नेते पत्रकारांपेक्षा सभ्य आहेत. म्हणून अशा देवाणघेवाणीचा कुठे जाहिर उल्लेख होत नाही. कितीही आरोप झाले व दगाबाजी झाली, तरी नेतेमंडळी पत्रकारांची बेअब्रु होईल असा गौप्यस्फ़ोट करायचे टाळतात. म्हणूनच राम कदम यांनी ‘मी मराठी’ चॅनेलवर बोलताना दिवाळी अंक वा पुरवण्यांच्या जाहिरातीचा ओझरता उल्लेख केला होता आणि निखीलने त्याकडे काणाडोळा केला होता. पण विलास आठवले यांनी कदम यांना बोलायलाच भाग पाडले. मजेची गोष्ट म्हणजे आठवले यांनी कदमांच्या एकाही आरोपाचा जिथल्या तिथे इन्कार केला नाही. यातच कबुली मिळते. याचा अर्थ सोपा सरळ आहे. राजकारणी वा अन्य कोणी भ्रष्टाचार करतात, त्यातला हिस्सा मागण्यासाठी सगळी दादागिरी चालू असते. नसेल तर कुठल्याच वृत्तपत्राने वा वाहिनीने आठवलेंना खुले ‘ऑनलाईन’ धमकावल्यानंतर बोलायची हिंमत कशाला केलेली नाही?

2 comments:

  1. हे खरे ‘पॉईंट ब्लॅन्क’ फ़ायरींग.

    ReplyDelete
  2. पॉइंट ब्ल्यंक म्हणजे पॉईंटच ब्ल्यंक ना भाऊ ! मला वाटते, मराठीत मुद्दा संपला किंवा मुस्कटदाबी किंवा आवाजबंद . त्यांनी पॉइंट मांडला ह्यांनी ब्ल्यंक केला ह्यालाच पॉइंट ब्ल्यंक म्हणत असतील ना भाऊ ?

    ReplyDelete