Monday, August 10, 2015

सैतानाला फ़रिश्ता म्हणून पेश करण्याचे पाप

‘लोकसत्ता’ अर्थात कुबेर टाईम्स (भाग चौथा)



मागल्या काही दिवसात दैनिक लोकसत्ता व त्याचे संपादक गिरीश कुबेर यांच्या अग्रलेखाचे पोस्टमार्टेम केल्याने त्यांचे अनेक चहाते विचलीत झाले असल्यास नवल नाही. त्यापैकीच एक डॉ. परिक्षित देशपांडे यांनी फ़ेसबुकद्वारे त्यांनाही कुबेरांचा याकुबवरील लेख आवडला नसल्याची कबुली दिली आहे. मात्र लोकसत्ताला झोडपल्याने त्याचा खप कमी होऊन सकाळ वा लोकमतचा विस्तार होईल, अशी त्यांना भिती वाटते. अधिक लोकसत्ता इतके लोकानुनय न करणारे व वैचारिक विश्वासू अन्य वृत्तपत्र उपलब्ध नाही असेही त्यांचे मत आहे. त्यांचे दुखणे चुकीचे नाही. किंबहूना आज जवळपास कुठलेच वृत्तपत्र विश्वासार्ह व तटस्थ उरलेले नाही, हे मुळचे दुखणे आहे. आणि त्याचीच साक्ष एकूण माध्यमांनी याकुब प्रकरणात दिली. त्यात संपादकीय चुका वा आगावूपणा बाजूला ठेवून अशा बातम्या व विवेचनाने एकूण समाज व देशाचे किती भयंकर नुकसान होते, याची देशपांडे यांना सुतराम कल्पना नसावी. त्यांना नावडती वृत्तपत्रे मोठी होऊ नयेत किंवा आवडत्याचा खप कमी होऊ नये, ही माया समजून घेण्यासारखी आहे. पण कुबेर यांच्या तशा एका लेखाने केलेले नुकसान कित्येक पुस्तके व लेखांनी भरून येणारे नाही, याचे भान कोणी ठेवायचे? त्या लेखाची घाई वा अनवधान मान्य करायचे, तर याकुबचाही तोच बचाव होऊ शकतो. कारण तो पुर्वाश्रमीचा गुन्हेगार म्हणून दाखलेबाज नाही. निदान कुबेर यांची तरी तशी समजुत आहे आणि एकूणच माध्यमांनी त्याचाच डंका पिटला आहे. कारण त्यापैकी कोणालाच फ़ाशी ठोठावली जाण्यापर्यंत याकुब मेमन ठाऊकच नव्हता. जितक्या बातम्या झिरपल्या वा सुत्रांकडून अफ़वा कानापर्यंत आल्या, त्यापेक्षा याकुबची खरी व वास्तविक माहिती मिळवण्याचे कष्टच कोणी घेतले नाहीत. उलट त्याला निरागस दाखवण्यासाठी दाऊद व टायगर मेमनचे चेहरे खतरनक रंगवण्यात माध्यमांनी धन्यता मानली. वास्तविक दाऊद व टायगरपेक्षा याकुब अधिक खतरनाक व पाताळयंत्री गुन्हेगार होता. देशपांडे वा तत्सम अनेक कुबेरभक्तांनी त्याचे गांभिर्य ओळखण्य़ाची गरज आहे आणि म्हणूनच त्या एका अग्रलेखाला मी कशासाठी झोडपून काढतोय, ते लक्षात घेतले पाहिजे. किंबहूना आपली घोडचुक मान्य करण्याचा प्रामाणिकपणा कुबेरांना दाखवता आला पाहिजे.

याकुब मेमन उच्चशिक्षित चार्टर्ड अकाऊंटंट होता. आणि बाबरी पाडली गेल्यानंतरच्या दंगलीने दुखावलेला होता. टायगर इतका तो बनेल गुन्हेगार नव्हता म्हणुनच तो अशक्त असल्याचे कुबेरांचे विवेचन किती मुर्खपणाचे आहे, त्याची ज्यांना कुणाला साक्ष हवी असेल, त्याने माहिम पोलिस ठाण्यात जाऊन दफ़्तर तपासावे. कारण दंगल चालू होती त्या काळात याकुब काय करत होता, त्याचा अंदाज येऊ शकेल. तो बाबरीच्या पतनाचे सुतक साजरे करीत घरात अश्रू ढाळत बसला नव्हता. तर मुंबईभर जी दंगल पसरली होती, त्याचा बंदोबस्त करणार्‍या पोलिसांना मदत करण्याचे नाटक रंगवत होता. दंगल आणि बॉम्बस्फ़ोट यात दोन महिन्याचा फ़रक आहे आणि त्याच दंगलकाळात याकुब मेमन माहिम पोलिस ठाण्यात सातत्याने येजा करीत होता. कारण तो पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतता वा अमन कमिटीचा सदस्य होता. सहाजिकच तिथल्या पोलिस कारवाया व पोलिसांच्या हालचालीविषयी याकुबला प्रत्येक बाब सहजगत्या कळत होती. टायगर पोलिसांशी संपर्कात नव्हता. पण याकुब मात्र पोलिस ठाण्यातल्या हालचालीवर टेहळणी केल्यासारखा वावरत होता. शांतता समितीचा सदस्य माहिममधली दंगल कमी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गृहीत होते आणि त्याच्याच घरात पुढल्या भयंकर स्फ़ोटमालिकेची सज्जता चालली होती. याचा काही उलगडा होतो का? याकुबसारखा शांतता समितीचा सदस्य जिथे वास्तव्य करतो, ते घरच मग संशयातून बाद होते. म्हणजेच स्फ़ोटके साठवायला किंवा कारस्थान शिजवायला सर्वात सुरक्षित जागा याकुबचे घर होते आणि याकुबमुळेच ते घर सर्वात सुरक्षित होते. म्हणजेच घातपाताची योजना आखायला याकुबने सर्व कारस्थान्यांना सुरक्षित कवच पुरवले होते. अर्थात तेवढेच नाही. पोलिस ठाण्यात जाऊन तिथे दंगलीनंतर कोणाबद्दल वा काय संशयास्पद आहे त्याचाही सुगावा याकुब आणत होता.

ही पार्श्वभूमी बघणारा सुरेश वेंगुर्लेकर हा माझा परिचित पत्रकारही आहे. दंगल काळात माहिम पोलिस ठाण्यात बसलेला असताना त्याने प्रथम याकुबला बघितला आणि त्यालाही याकुब खतरनाक वाटला होता. मग तसा संशय त्याने तिथल्या परिचित सब इन्स्पेक्टरकडे व्यक्त केला, तर त्या अधिकार्‍यानेही त्याची खिल्ली उडवली होती. पण नंतर स्फ़ोट झाले आणि त्याच अधिकार्‍याने चुक मान्य केली. वेंगुर्लेकरला याकुबची नजर शंकास्पद व धोकादायक वाटली होती. आजही त्याचे भेदक डोळे बघितले तर त्यातला गुन्हेगार लपत नाही. म्हणूनच तो टायगरपेक्षा घातक होता. आपल्याच घरात स्फ़ोटाचे कारस्थान शिजत असताना पोलिस ठाण्यात जाऊन शांतता समितीचा सदस्य म्हणून तो पोलिसांची दिशाभूल करत होता. उलट तिथल्या हालचालीची माहिती घातपात्यांना पुरवत होता. त्यांच्यासाठी पळून जाण्याच्या गाड्या सुविधा जमवण्याचा उद्योग करत होता. याकुब अमन समितीचा सदस्य असल्याचे कुठल्या माध्यमांनी लोकांना कळू दिले आहे काय? नसेल तर अशी माध्यमे ही याकुब इतकीच घातक व दगाबाज म्हणावी लागतील. कारण हल्लेखोर जितका घातक असतो, त्यापेक्षा त्याच्या तावडीत सावजला अलगद नेवून सोडणारा अधिक विश्वासघतकी असतो. याकुबने म्हणूनच माहिम पोलिस ठाण्याला अंधारात ठेवले आणि अवघ्या मुंबईला स्फ़ोटाच्या तोंडी अलगद आणुन सोडले. तशीच आज लोकांची वाचक-प्रेक्षकांची याकुब प्रकरणी दिशाभूल करणारे प्रत्यक्षात याकुब इतकेच दगाबाज नाहीत काय? त्याला निरागस व अशक्त आरोपी म्हणणार्‍यांना याकुब ठाऊक नसावा किंवा त्यांना लोकांनी निव्वळ दिशाभूल करायची असावी. कुबेर यांनी त्या अग्रलेखातून नेमके तेच पाप केलेले आहे. याकुबपेक्षा कमी घातक अशा टायगरला खतरनाक ठरवून कुबेर मुंबईकरांसह भारतीय समाजाची भयंकर फ़सवणूक करत आहेत. ती बाब (त्या सब इन्स्पेक्टरप्रमाणे) दुर्लक्ष करून चालत नाही.

कुंटणखान्यात एखाद्या मुलीला देहविक्रय करायला भाग पाडणारा गुन्हेगारच असतो. पण जो कुटुंबातल्या निरागस मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे कुंटणखान्यात आणून सोडतो, तो अधिक मोठा गुन्हेगार असतो, याकुबने तेच भयंकर पातक केले. त्याच्या तुलनेत टायगर नगण्य गुन्हेगार आहे आणि कुबेरसारखे संपादक त्याच याकुबला पाठीशी घालण्यासाठी इतक्या टोकाला जातात, त्यामागची त्यांची भूमिका जाणुन घेणे वाचकांचा व भारतीयांचा हक्क असतो. अजून तरी कुबेरांनी त्यांच्यावर अशी कोणी सक्ती केली, त्याचा खुलासा केलेला नाही. कुबेर अरबी खनीज तेलाच्या राजकारणाचे अभ्यासक आहेत, तेव्हा त्यांना इस्लामचे थोडेफ़ार ज्ञान असायला हरकत नाही. नसेल तर त्यात ‘सैतानाच्या ओव्या’ नावाचा प्रकार आहे. प्रेषित महंमदांच्या तोंडी सैतानाने वदवलेल्या त्या ओव्या म्हणून ओळखल्या जातात. फ़रिश्ता म्हणजे देवदूताचे रूप घेऊनच सैतान फ़सगत करतो, अशी मुस्लिमात एक आख्यायिका आहे. इथे याकुबने शांतता समितीचा सदस्य म्हणजे शांतीदूताचे रुप धारण करून माहिम पोलिसांची फ़सवणूक केली आणि पर्यायाने मुंबईला एका रक्तरंजित अनुभवात लोटून दिले. तोच याकुब शांततेचा फ़रिश्ता असल्याचा हा अग्रलेख कुबेर यांच्याकडून कोणा सैतानाने लिहून घेतला? अजून तरी कुबेरांनी त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. पण आपल्या त्या लिखाणातून कुबेर मोठे नुकसान करून गेले आहेत. सलमान रश्दी यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे नाव ‘सेटॅनिक व्हर्सेस’ असे आहे. त्याविषयी मुस्लिमांच्या मनात इतका राग कशासाठी आहे? त्याची तरी जाण कुबेरांना आहे काय? मुद्दा लोकसत्तेचा खप अन्य कुठल्या वृत्तपत्राकडे जातो वा नाही, असा मुळातच नाही. किती निरपराध लोकांच्या जीवाशी याकुब वा कुबेर खेळ करतात, त्याला अधिक महत्व आहे. कारण त्या अग्रलेखाने नको तितके नुकसान केले आहे. अशा बातम्या व लेखनातून सामान्य मुस्लिमांच्या मनात एका सैतानाला फ़रिश्ता म्हणून महात्म्य प्राप्त करून देण्याचे पाप झाले आहे. ती अंत्ययात्रेची गर्दी बघून बहुतांश बिगर मुस्लिमांच्या मनात शंका उभ्या राहिल्या आहेत. पण त्याला धर्मापेक्षाही अशा स्वरूपाचे लिखाण व बातम्या सामान्य मुस्लिमाची दिशाभूल करून गेल्या आहेत. कारण त्यांच्यापुढे सैतानच फ़रिश्ता वा देवदूत म्हणून पेश केला गेला आहे.

5 comments:

  1. विषयांतर.. भाऊ पुन्हा एकदा दाउद च्या शरणागतीचा मुद्दा पुढे आलेला आहे. मला आठवतंय तुमच्याच एका लेखामध्ये(दाउद चा डमी अस काहीस शीर्षक होत) तुम्ही याकुब मेमन हा पकडल्या गेलेला नव्हता तर तो शरण आलेला होता त्यामार्फत दाउद स्वतःच्या शरणागतीची चाचपणी करू पाहत होता अस विश्लेषण केलेलं होत. तुमच्या तेव्हाच्या पत्रक्रीतेच्या दिवसांमध्ये फ़क़्त तुम्हीच ती बातमी छापून आणली होती असा काहीसा तो लेख होता. आज दाउद ची टिमकी परत वाजल्याने तो लेख आठवला. या संदर्भात आणखी माहिती आपण द्यावी अशी इच्छा आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ,संजय वेंगुर्लेकर

    ReplyDelete
  3. सत्याची ही दुसरी बाजू माहितच नव्हति.
    हि बाजु दाखवन्याचा प्रयत्न कुणीच का करत नाहि ?
    ज्यांना ही जहरी विचारधारा माहित आहे ते पण हे सत्य लोकानपुढे का आणत नाहित ?
    सरकार ने पण ही कारने,हे सत्य समाजापुढे का मांडले नाहि ?

    ReplyDelete
  4. MAJYA GROUP CHYA LINK LA TUMHALA FB VAR TAG KELE AHE PLJ MALA ADMIN BANVA ....

    ReplyDelete
  5. Bhau tyanche naav Sanjay vengurlekar ahet ase vatatate suresh nahi

    ReplyDelete