देशात दोन दशकापुर्वी खाजगी वाहिन्यांचे पेव फ़ुटले आणि आता तर इंग्रजी व हिंदी वगळून अनेक प्रादेशिक भाषांच्याही कित्येक वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यातून काय बघायचे व काय बघू नये, असाच प्रश्न प्रेक्षकाला सतावत असतो. शिवाय त्यातल्या प्रत्येक वाहिन्यांचा आपणच सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती असल्याचाही दावा असतो. जसजसे वाहिन्यांचे पसारे वाढत गेले तसतसे त्यात विविधताही येत गेली. कौटुंबिक मालिका व वृत्तवाहिन्यांच्या पलिकडे विशिष्ट विषयाला वाहिलेल्या वाहिन्याही आल्या आहेत. त्यात इन्व्हेस्टिगशन डिस्कव्हरी ही पहिलीच गुन्हेतपास दाखवणारी एकमेव वाहिनी असल्याचा दावा केला जातो. त्यात बहुतांश अमेरिकेतील गुन्ह्यांचा तपास व पाठपुरावा असलेल्या सत्यकथा दाखवल्या जातात. काही प्रत्यक्ष चित्रण तर काही नाट्यरुपांतर असे त्याचे स्वरूप असते. पण त्यातून गुन्हेतपास, त्यामागची प्रक्रिया समजायला खुप मदत होते. त्यातही अमेरिकन गुन्हे तपासात कायद्याची काटेकोर बंधने असल्याने भक्कम पुरावे-साक्षी हाताशी नसताना कुणाला हात लावता येत नसल्याने किती सुक्ष्म तपास चालतो, त्याचीही जाण येऊ शकते. आपल्या देशात जशा वाहिन्या व वृत्तपत्रे बोंबा ठोकतात, तसाच तिथेही गदारोळ चालतो. पण म्हणून कुणालाही उगाच उचलून आत टाकले असे होत नाही. कित्येक प्रकरणे तर दोनतीन दशके अनुत्तरीत राहिलेली असतात आणि त्याचाही शोध अधूनमधून नवी माहिती आल्यावर नव्याने सुरू केला जात असतो. त्याच्याही गोष्टी या वाहिनीवर बघता येतात. ते बघितले, मग आपल्याकडे अशा अनेक प्रकरणात पोलिसांना आरोपी असल्यासारखे पेश करणार्या माध्यमे व पत्रकारांची खरेच कींव येते. कारण अशा चर्चा करणारे पत्रकार व शहाणे शुद्ध मुर्खपणा करत असतात. त्यांना गुन्हेतपास म्हणजे काय, त्याचा थांग लागलेला नाही याची स्पष्ट जाणिव होते.
अशाच एका सत्यकथेत कुठल्याशा अमेरिकन शहरामध्ये लागोपाठ महिलांच्या हत्या होत असल्याचे एक प्रकरण महिन्याभरापुर्वी दाखवले गेले. त्यातला प्रमुख डिटेक्टिव्ह जंग जंग पछाडतो, पण त्या सिरीयल किलरचे प्रकरण त्याच्या कारकिर्दीत अनुत्तरीतच रहाते. मात्र पोलिस सेवेतून निवृत्त झाल्यावरही त्या महिलांचे चेहरे त्याला सतावत असतात आणि त्या गुन्हेगाराला शोधून काढायची त्याच्या मनातली इच्छा मरत नाही. अकस्मात एके दिवशी आपल्या दिवंगत पित्याच्या जुन्या वस्तू व कागदपत्रांचा पसारा आवरत असताना त्या माजी डिटेक्टीव्हच्या हाती काही अशा गोष्टी लागतात, की त्याचे कुतूहल जागे होते. तो पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन नव्या तपास अधिकार्याला त्या दोन दशके जुन्या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करायचा आग्रह धरतो. हळुहळु ते प्रकरण प्रगती करू जाते आणि त्या जुन्या हत्याकांडाचे रहस्य उलगडू लागते. मात्र त्याचा उलगडा सर्वांनाच धक्कादायक असतो. कारण ह्या निवृत्त डिटेक्टीव्हचा मृत पिताच त्यातला हल्लेखोर असतो. आता त्याच्यावर खटला भरणे अशक्य असते. पण निदान सत्याचा शोध लागला याचे समाधान असते. आपलाच पिता इतका भयंकर मारेकरी असल्याची वेदना बोचरी असली तरी गुन्ह्याचा तपास पुर्ण केल्याचे समाधान मोठे असते. इथे हे सांगायचा मुद्दा इतकाच, की घटनाक्रम घडताना ज्या घरात डिटेक्टीव्ह रहात असतो, तिथेच मारेकरीही वास्तव्य करीत असतो. पण तरीही तपास करणार्याला त्याचा सुगावाही लागू शकलेला नसतो. गुन्ह्याचा तपास हा इतका गुंतागुंतीचा मामला असतो. पुस्तकातले किंवा परिक्षेतले गणित सोडवावे तसे गुन्ह्याचे रहस्य उलगडत नसते. त्यात अनेक रहस्ये व कोडी सोडवत जुळवाजुळव करावी लागत असते. त्याचे भान ज्यांना असेल, त्यांना दाभोळकर वा पानसरे यांच्या मारेकर्यांना पकडण्यात कोणती अडचण आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल.
अर्थात अमेरिकन व भारतीय गुन्हे तपासाची पद्धत भिन्न आहे. तसेच कायदेही भिन्न आहेत. आपल्याकडे पोलिस इतके उत्साहाने कुठल्या गुन्ह्याचा तपास करीत नाहीत आणि कुठल्याही पुराव्याशिवाय कोणालाही नुसत्या आरोपाखाली अटक करायची कायदेशीर तरतुद असल्याने शेकडो गुन्ह्याचा कधीच उलगडा होत नाही. ठराविक मुदतीपर्यंत संशयिताला गजाआड ठेवण्याची मुभा पोलिसांना असल्याने गदारोळ झाला, मग माध्यमांना शांत करण्यासाठी पोलिस तडकाफ़डकी कोणालाही अटक करून त्याच्यावर आरोप ठेवतात. पुढे तपासात त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याने व मुदत संपल्याने त्याला जामिनावर मुक्त करावे लागते. सहाजिकच पोलिसांना तपासापेक्षा माध्यमातील पोपटपंची व राजकीय गदारोळ थांबवण्याला प्राधान्य द्यावे लागते. परिणामी कोणालाही गजाआड टाकून विषय गुंडाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. दाभोळकर पानसरे अशा दोन्ही गंभीर प्रकरणात नेमके तेच झालेले आहे. पोलिसांनी कोणतेही दावे करोत. ह्या गुन्ह्यांच्या तपासाचा आता पुरता बोर्या वाजला आहे. मात्र त्याचे खापर एकट्या पोलिसांवर किंवा सरकारवर फ़ोडता येणार नाही. ज्यांनी या दोन्ही हत्यांचे राजकारण करण्यात धन्यता मानली, तेच या अपयशाचे खरेखुरे धनी आहेत. कारण त्यांनी पोलिसी पद्धतीने व प्रक्रियेने गुन्ह्याचा तपास होऊ नये, याची पुरेपुर काळजी घेतली आहे. काही तासातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नथूराम प्रवृत्ती यामागे असल्याचे विधान केले आणि मग तथाकथित पुरोगाम्यांनी हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात राजकीय काहुर उठवले. मग पोलिसांवर यासाठीच दबाव आणला गेला, की दोन्ही प्रकरणातूल खरे मारेकरी वा खुनी शोधायचे नसून, त्यात हिंदूत्ववाद्यांना आरोपी बनवायचे आहे असे संकेतच पोलिसांना दिले गेले. तिथून हा विचका सुरू झाला. आणि त्याचा सगळा दोष त्याचे राजकारण करणार्यांना द्यावा लागेल.
दाभोळकर वा पानसरे यांची हत्या बघितली तरी एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की त्यांना गोळ्या घालणारे कोणी हौशी लोक नाहीत. ते अत्यंत कुशल नेमबाज व व्यवसायी हल्लेखोर आहेत. ज्यांना गुन्हेगारी भाषेत शार्पशूटर म्हटले जाते. नेमक्या व मोजक्या गोळ्या झाडून झटपट निसटण्याची कला अवगत केलेले खुनी यात गुंतलेले होते व त्यांना पकडले असते तर त्यांना हे काम सोपवणार्या सुत्रधारापर्यंत पोहोचणे शक्य होते. त्यासाठी पोलिस नेहमी नाकाबंदी व अन्य ठराविक प्रारंभिक उपाय योजत असतात. इथे पहिल्या क्षणापासून सनातन वा अन्य कुणाला कधी पकडणार; असा ससेमिरा पोलिसांच्या मागे लावला गेला. त्यामुळेच नेहमीच्या पद्धतीने खुनाचा तपास होऊच शकला नाही. खुनी पकडण्यापेक्षा राजकीय आरोपबाजीला लगाम लावण्यात पोलिसांचा वेळ वाया घालवण्यात आला आणि ते काम स्वत:ला दाभोळकर वा पानसरे यांचे पाठीराखे म्हणवणार्यांनीच केले. पण त्यांच्या उत्साहाने वा मुर्खपणाने खर्या मारेकर्यांना निसटून जाण्यात यश मिळू शकले. की जाणिवपुर्वक तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली? गुन्हे वा हत्या प्रकरणात दोन मुद्दे कळीचे असतात. हत्येचा हेतू व लाभार्थी. त्याचा मागोवाच पोलिसांना घेऊ दिला गेला नाही. मोक्याची वेळ निघून गेल्यावर असे तपशील हाती लागत नसतात. म्हणून शंका येते, की दाभोळकर-पानसरे यांच्याविषयी आस्था दाखवणार्यांना खरेच खुनी हवे होते, की खुन्यांना निसटून जाण्यात या लोकांना रस होता? असेल तर पोलिस बाजूला ठेवून त्या दोघांच्या पुरस्कर्त्यांनी हल्लेखोर शोधण्याचा किती व कोणता प्रयत्न केला? इच्छा असेल तर सामान्य माणूसही खतरनाक गुन्हेगार शोधू शकतो व पकडून देऊ शकतो. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे मिरवणार्यांनी त्या दिशेने एकही पाऊल का टाकले नाही? फ़क्त इव्हेन्ट व सोहळा करण्यापलिकडे यातल्या कोंणीच काहीही हालचाल कशाला केलेली नाही? दाभोळकर पानसरे यांच्याविषयी खरी आस्था असलेले लोक काय करू शकले असते आणि पोलिसांपेक्षा हेच लोक खरा मारेकरी कसा शोधू शकले असते? पुढल्या भागात त्याचा आढावा घेऊ. (अपुर्ण)
bhau khup mahatvacha mudda mandalat!! tapas ha ektarfi ani amhi sangto tyach padhhatine vhava hich apeksha tathakathit
ReplyDeletepurogyanchi ahe!! vastusthithi kahi veglihi asu shakte yacha vicharch koni karat nahi he durdaiv ahe!!
bhau the great
ReplyDeleteBhau lekh chhanvaahe pan akangi vatla
ReplyDelete