Saturday, August 29, 2015

‘सत्यमेव जयते’खाली गाडलेली शिना बोरा



कोण ही इंद्राणी मुखर्जी आणि कोण तिचा कितवा तो नवरा पीटर मुखर्जी? दोघेही मुंबईसह देशाच्या बड्याबड्या पार्ट्यांमध्ये मिरवणारी उच्चभ्रू प्रतिष्ठीत माणसेच आहेत ना? ज्यांना पेज-३ मान्यवर म्हणून ओळखले जाते. ज्यांच्या सोबत संध्याकाळ रंगवायला मिळावी म्हणून उतावळे संपादक, अधिकारी वा कलावंत धडपडत असतात. देशात वा कुठेही महत्वाची घटना घडली, मग त्यावर ज्यांची मते अगत्याने कॅमेरासमोर विचारली जातात, त्यातलेच हे दोघेजण होते ना? जे लोक डोळे दिपवणार्‍या मेजवान्या समारंभ साजरे करतात आणि त्याची झगमगित छायाचित्रे विविध वृत्तपत्रात झळकत असतात. त्याच समारंभात मागली कित्येक वर्षे इंद्राणी व पीटर मुखर्जी मिरवत होते. कदाचित त्यांनीच किती भव्य पार्ट्या दिल्या असतील? ज्यामध्ये समाजाचे नामवंत प्रतिष्ठीत अगत्याने हजर राहिलेले असतील आणि आपली जवळीक दाखवायला धडपडलेले सुद्धा असतील. अशा कोणाची मुलाखत २५ ऑगस्टनंतर कुठल्या वाहिनीने दाखवलेली आहे काय? आजवर त्यांच्या सहवासात राहिल्याने आपण कसे सोवळे वा शुचिर्भूत झालो, त्याची ग्वाही द्ययला कोणीच कसे पुढे आलेले नाही? कसाबने मुंबईवर हल्ला केला तेव्हा किंवा मल्टीप्लेक्स पटगृहात मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजेत, असे सरकारने निश्चीत केल्यावर शोभा डे नावाची डुप्लीकेट इंद्राणी कशी मैदानात उतरली होती आठवते? तिच्या प्रतिष्ठीत मतांना प्रसिद्धी देण्यासाठी तमाम वाहिन्या कशा धडपडत होत्या आठवते? तिने वडापाव किंवा तत्सम गोष्टींची टवाळी करून किती प्रसिद्धी मिळवली होती? आज तिला कोणी या इंद्राणीच्या मैत्री वा प्रेमाच्या गोष्टीसाठी कशाला विचारपूस केलेली नाही? अर्थात त्यात एकटीच शोभा डे नाही. तुम्हीआम्ही नित्यनेमाने इंग्रजी वाहिन्यांवर ज्यांना समाजातील प्रतिष्ठीत म्हणुन बघत असतो, ती सर्व मंडळी कुठल्या बिळात दडी मारून बसली आहेत?

जिला आज पोलिस वा तपास अधिकारी एक भयंकर खलनायिका म्हणून पेश करीत आहेत, त्याच इंद्राणीच्या भोवताली मिरवलेली डझनावारी मंडळी आहेत. त्यातला कोणी राजदीप सरदेसाई असेल, कोणी बरखा दत्त असेल. कोणी वीर संघवी असेल तर कोणी प्रभू चावला असेल. महेश भट्ट वा अन्य कोणी निर्माते दिग्दर्शक असतील. यातल्या कोणीच आपल्या या प्रतिष्ठेचा भर चौकात लिलाव चालू असताना पुढे कशाला आलेले नाहीत? दिल्लीत वा मुंबईत गल्ली बोळातल्या घटनेनंतर राज्यात काय चालू आहे? देशात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. असे काही बोलून ज्यांना आपल्या समाजात वावरण्याची लाज वाटते, असे अभिमानाने बोलावेसे वाटत असते अशी ही मंडळी. सामान्य माणसाने काही वावगे केल्यावर त्यांची मान वारंवार खाली जात असते, इतके हे अब्रुदार लोक. निदान माध्यमांनी सतत आपल्यापुढे त्यांना तशाच भूमिकेत पुढे केलेले आहे ना? मग आज त्यांना इतक्या ‘महत्वाच्या विषयात’ मत मांडण्याची इच्छा कशाला झालेली नाही? आपण ज्या माणसात मोकळेपणाने वावरलो आणि त्यातच प्रतिष्ठा मानली, ते सराईत कारस्थानी खुनी आहेत, याची अशा प्रतिष्ठीतांना क्षणभरही लाज कशाला वाटलेली नाही? ज्याच्याशी त्यांचा कुठला संबंध येत नाही अशा सामान्य गुन्हेगारांच्या एखाद्या कृत्याविषयी त्यांना सतत शरम वाटत असते आणि ती शरम दाखवण्याचीही मोठी हौस असते. त्यांना आजकाल इंद्राणी मुखर्जीचे जे धिंडवडे निघत आहेत, त्यात प्रतिष्ठा वाढल्यासारखे वाटते काय? नसेल तर त्यातल्या कुणीतरी जाहिरपणे अशा लोकांच्या सहवासात कधीतरी होत याची माफ़ी मागण्याचे धाडस तरी नक्की दाखवले असते. पण चारपाच दिवसात तसे काहीही घडलेले नाही. कारण हे तथाकथित बेशरम लोक असतात, जे समाजाच्या शरमेची आपल्याला चिंता असल्याचे सराईत नाटक नित्यनेमाने रंगवत असतात.

तीन वर्षापुर्वी दिल्लीत एक मोठी घटना घडलेली आपल्याला आठवत असेल. निर्भया प्रकरण! एका तरूण मुलीवर धावत्या बसमध्ये तिच्या मित्रासमोर चौघांनी बलात्कार केला होता. अवघी दिल्ली त्यातून हादरून गेली होती. आधी जंतरमंतर येथे जमलेल्या लोकांमध्ये त्याचा प्रक्षोभ उमटला आणि मग देशभर त्याची संतप्त प्रतिक्रीया उमटली होती. त्यातले चौघेही आरोपी लगेच पकडलेले होते आणि त्यातल्या एका मुलाने ‘गलत काम’ किया असे अशी तात्काळ कबुली दिलेली होती. मुद्दा त्याच्याही पुढला आहे. जेव्हा त्या आरोपींना तिहार तुरूंगात ठेवण्यात आलेले होते, तेव्हा तिथल्या काही गुन्हेगार कैद्यांनी या बलात्कार्‍यांवर प्राणघातक हल्ला केला होता. आपण कैदी म्हणून इथे तुरूंगात खितपत पडलोय, याचे भान त्या अन्य कैद्यांना नव्हते काय? ते अन्य कैदी कोणी शुचिर्भूत पवित्र आत्मे नव्हते, तर कुठला तरी गुन्हा करूनच तिथे पोहोचलेले होते. पण त्यांच्यात किमान काही माणुसकी व सभ्यता शिल्लक असावी, की त्यांना आपल्या सोबत तुरूंगातही असे राक्षसी सैतानी कृत्य करणारे असू नयेत असे वाटले. त्यांनी ह्या बलात्कार्‍यांना इतके सतावले व मारले की त्यातल्या एका बलात्कार्‍याने कोठडीतच गळफ़ास लावून आत्महत्या केलेली होती. गुन्हेगार म्हणून ज्यांच्याकडे सभ्य समाज वा उर्वरीत जग घाणेरड्या तुच्छ नजरेने बघते, त्यांच्यातला हा सभ्यतेचा अंश आज पेज-३ म्हणून मिरवणार्‍या व वाहिन्यांवर सतत झळकणार्‍या अब्रुदारांमध्ये शिल्लक आहे काय? कधीतरी त्या इंद्राणीने शोभा डेच्या खांद्यावर हात ठेवला असेल, कधी कुठल्या समारंभात एखाद्या संपादक पत्रकाराशी तिने हस्तांदोलन केले असेल. त्यांना तो स्पर्श आठवून किळस येऊ नये काय? त्या स्पर्शाची यातना त्यातल्या कुणाला जरी असती तर त्यांनी कॅमेरापुढे येऊन इंद्राणी मुखर्जीशी आपला परिचय होता याची खंत व्यक्त केला असती.

आठवडा होत आला, पण कुणा प्रतिष्ठीताने आपल्या सभ्यतेची साक्ष दिलेली नाही. ही बया दोन नेटवर्कमध्ये मोठी अधिकारी म्हणून काम करत होती आणि एक पाशवी हत्या केल्यानंतर सव्वा तीन वर्षे उजळमाथ्याने प्रतिष्ठीत समाज घटकात वावरत होती. तिचे आपल्याच पोटच्या लेकीच्या रक्ताने माखलेले हात तिने ज्यांच्याशी मिळवलेले असतील, असे डझनावारी प्रतिष्ठीत आहेत. त्यांच्या मनाला किंचीत तरी लाज वाटली आहे काय? असेल तर त्याची प्रचिती बातम्यातून यायला हवी होती. पण कुठेही त्याचा लवलेश आढळून येत नाही. कुठल्या तरी नगण्य अनोळखी घरातील मातेने लेकीची हत्या केली असल्यासारख्या बातम्या झळकत आहेत आणि इंद्राणीशी आपला कुठला कधी संबंध आलाच नाही, अशा थाटात मुंबईतले शेकडो प्रतिष्ठीत आपापल्या कोषात मशगुल आहेत. जणू काही घडलेले नाही. कुठल्यातरी मालिकेत कथेला अनपेक्षित वळण आल्याच्या थाटात अलिप्तपणा साजरा होतो आहे. तिहार तुरूंगातल्या कैद्यांपेक्षा यांची नितीमत्ता किती ठिसूळ व दिखावू असते त्याचा हा पुरावा आहे. जे आपल्याला नेहमी माध्यमातून नैतिकतेचे व नितीमूल्यांचे पाठ देत असतात, त्यांचा हा खरा चेहरा आहे. हे रंगलेल्या मुखवट्यातले लोक प्रत्यक्ष जीवनात किती हिडीस चेहर्‍याचे विद्रुप व विकृत असतात आणि पाशवी जीवन जगत असतात, त्याची ही कहाणी आहे. गुन्हेगार कैद्यापेक्षा त्यांची नैतिक मूल्ये हीन दर्जाची असतात. मात्र उठसूट आपल्याला व सामान्य माणसाला तेच बेशरम उच्च नितीमूल्ये शिकवण्याचा आव आणला जात असतात. इंदाणी मुखर्जीने आपल्या पोटच्या मुलीची इतकी निर्घॄण हत्या केली, ते या जगातले वास्तव असते, तिथल्या दिखावू प्रतिष्ठेचा तोच खरा चेहरा असतो. जे खाप वा जातपंचायतीची खिल्ली उडवण्यात धन्यता मानतात. आठवते ‘सत्यमेव जयते’? त्यात आमिर खानने प्रेमी युगूलांना प्रतिबंध घालणार्‍या, मारणार्‍या पंचायतीवर प्रश्नचिन्ह लावले होते. त्याच कार्यक्रमाचा संयोजक, प्रक्षेपक असलेल्या वाहिनीचा मुख्याधिकारी हाच पीटर मुखर्जी होता आणि इंद्राणी त्याच नेटवर्कची म्होरकी होती ना? आठवतो आमिर एक गीताचे बोल ऐकताना डोळे पुसत होता? ते गीत आठवते? किती लोकांनी डोळे पुसत ते गीत आपल्या मोबाईलवर रिंगटोन म्हणून डाऊनलोड केले होते? काही आठवते? तेच तर शिना बोराचे गाणे होते ना मित्रांनो?

ओरी चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगनामे फ़िर आजा रे..

हे गाणे ऐकलेले आठवते? कोणाचे गाणे? डोळे पुसून तुमच्या आमच्या भावनांचा बाजार करणारेच तिला मारत होते, ज्या मुलीचे नाव होते शिना बोरा. आठवा ‘सत्यमेव जयते’ आणि डोळे पुसणारा आमिर खान. मग विविध चॅनेलवर नित्यनेमाने होणारा तमाशा ‘आमिर का असर’. कधीची गोष्ट आहे मित्रांनो? वर्ष महिना काही स्मरते? मे महिन्यात आमिर खानची वाहिन्यांवरची पहिली एन्ट्री होती त्या मालिकेतून. त्यात दोनतीन भाग मुलींची गर्भातच हत्या, मुलींना खाप पंचायतींनी घातलेली बंधने. त्यांच्या प्रेमविवाहानंतर होणार्‍या हत्या, असेच विषय आमिरने रंगवले होते ना? कधीची गोष्ट? मे-जुन २०१२ दरम्यानचीच ना? आता थोडे आजच्या जमान्यात येऊन शिना बोरा व इंद्राणी मुखर्जीची कथा तपासा. शिना या आपल्या कन्येची हत्या इंद्राणीने केली कधी? २४ एप्रिल २०१२. त्यानंतर दिडदोन महिन्याभराने आमिर आपल्या डोळ्यात अश्रू आणुन मुलींना मारू नका असे नितीमूल्य आपल्याला शिकवत होता. कुठल्या वाहिनीवरून स्टार प्लस. ज्या नेटवर्कचा व वाहिनीचा माजी मुख्याधिकारी होता पीटर मुखर्जी. त्याची पत्नी इंद्राणी तेव्हा काय करून बसली होती? आपल्याच पोटच्या पोरीला प्रेमविवाहापासून परावृत्त करण्यासाठी शिनाचा मुडदा पाडून मोकळी झाली होती. अधिक कन्येच्याच रक्ताने माखलेले हात घेऊन तिच इंद्राणी तेव्हा ‘सत्यमेव जयते’च्या यशानिमीत्त योजलेल्या सोहळ्यात कोणाकोणाशी हस्तांदोलन करून मोकळी झाली असेल? आमिर खानही त्यातून सुटला असेल काय? शिनाच्या मुडद्यावर रंगलेल्या त्या मालिका व सोहळ्याची मजा कोणी कोणी घेतली असेल? आज त्यापैकी कोणाला आपले रक्ताने माखलेले हात धुवायचे प्रायश्चीत्त तरी घ्यावे असे कशाला वाटलेले नाही? जी नितीमूल्ये आमिर व पीटर मुखर्जी यांच्यासारखे प्रतिष्ठीत लोक आपल्याला शिकवतात ती त्यांना कधी समजली? शिनाचा मुडदा पडल्यावर? पण ‘सत्यमेव जयते’ हे सांगायला शिनाच्या मृतदेहाचेच अवशेष समोर आले ना?

21 comments:

  1. भाऊ,एकदम सही!मधुर भांडार करच्या पेज 3चित्रपटात हेच दाखविले आहे.

    ReplyDelete
  2. Need to translate this into English and post on Amir's Fb account

    ReplyDelete
    Replies
    1. Yashodhan Joshi, लिहा हो बिनधास्त मराठीत. काय बिघडतंय !
      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
  3. मराठमोळी App हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रयत्न मराठी लेखांच्या
    प्रसाराचा…. मराठी कवितांना मंच देण्याचा … मराठी लेखकांना ,कवींना
    प्रोत्साहित करण्याचा … या अप्प मध्ये तुम्ही आपले लिखाण post करू शकता मग ते
    कोणते हि असो, गद्य पद्य लघु लेख वा चारोळी. इतर मंडळी आपले लेख वाचतील तसेच
    इतरांनी post केलेले मजकूर तुम्हीही इथे वाचू शकता. चलI तर मग ! मराठी
    लेखांच्या विश्वात play.google.com/store/apps/details?id=skr.dropme
    मराठमोळी

    ReplyDelete
  4. भाऊ, अफलातून लिहिला आहे लेख. तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा कोणाच्याच लक्षात आला नसणार.

    ReplyDelete
  5. भाऊ अत्यंत मुद्देसूद तुम्ही लिहिले आहे.खंत एवढीच आहे कि हे सर्व तथाकथित उच्चभ्रू ह्यातील काही मराठी भाषा जाणतात ही त्यांच्यापर्यंत हे पोचेल कसे ?

    ReplyDelete
    Replies
    1. sudhirparanjape, उच्चभ्रूंनी हवं असल्यास मराठी शिकावं.
      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
  6. मुलीला मारल्याचे दुख झाले म्हणून असा शो केला हे म्हणायला कमी करणार नाही

    ReplyDelete
  7. पत्रकारिता म्हणजे काय हे भाऊ तोरसेकरांकडून शिकावे !
    बाकी आमीर आणि कंपनीचे जे काही चालले होते ते म्हणजे
    "लटकीच तळमळ,लटकेच अश्रू " अशाच प्रकारचे होते. मात्र गरीप बापड्या जनतेला त्यावेळी आमीर म्हणजे मसीहा वाटत होता... पीके चित्रपटाच्या बाबतीतसुद्धा अशीच स्थिती होती , तेव्हाही अनेकांना आमीर ने प्रबोधन केल्याचा साक्षात्कार झाला होता ! आमीर अभिनेता उत्तम आहेच , पण जनतेच्या भावनांशी खेळून भागले नव्हते , म्हणून मग 'ज्वलंत प्रश्नांचा'सुद्धा बाजार मांडला गेला आणि आपापल्या पोळ्या (किंवा बर्गर) भाजले गेले ....

    ReplyDelete
  8. Wah.. Agadi satetod aani yogya bhashet lihile aahe sir tumhi.. Itar kuthlyaahi patrakarachya matanpeksha mala tumachi mate hi nehmich yogya vatatat.. Salute

    ReplyDelete
  9. अत्यंत मार्मिक जबरदस्त लेख. गेल्या काही दिवसांपासून मीही हाच विचार करत होतो की रक्ताने माखलेल्या अश्याच लोकांच्या हाती जर मिडियाची सूत्र असतील तर आपण पाहतोय त्यात वास्तव किती आहे.

    ReplyDelete
  10. जब्बरदस्त भाऊराव ! च्यायला उलटतपासणी घ्यायची तर ती तुम्हीच !!
    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  11. Bhau why you taking side of Mumbai police ?

    ReplyDelete
  12. Bhau why Mumbai police did not ask any visa paper?

    ReplyDelete
  13. Bhau why Mumbai police did not ask to USA ambassy ? or going to USA is as easy like going to solapur ?

    ReplyDelete
  14. How can mikhile believe on Rahul ? Mikhile naver stay in Mumbai and there is no question of rahuls stay in Assam so they dont have friendly relation.

    ReplyDelete
  15. taking care of own life is not wrong so mikhile think that his mom is very powerful and keep mum. Or may be his mom rheratning him to kill .

    ReplyDelete
  16. जळजळीत वास्तव मांडले
    सलाम

    ReplyDelete