Monday, September 28, 2015

पुरोगामी मित्र सैरभैर कशाला झालेत?

कोण कुठला भाऊ तोरसेकर? (उत्तरार्ध)



ब्लॉग, फ़ेसबुक हा सोशल मीडियाचा अनुभव खरेच आनंददायी आहे. आजवर कुठल्याही वृत्तपत्रात लिहीले असले तरी आपल्यासाठी कोणी वृत्तपत्र घेतो किंवा वाचतो, असा आत्मविश्वास नव्हता. ब्लॉगला मिळत चाललेला वाचक केवळ आपल्यासाठी आहे, ही जाणिव खुश करणारी होती. त्यानंतर तेरा चौदा महिने ‘उलटतपासणी’ सदर चालू होते आणि त्यामध्ये बहुतेक सेक्युलर पुरोगामी पत्रकार व माध्यमांची धुलाई अधूनमधून चालू होती. त्याच्या वाचकाला एक प्रश्न सतावत होता, की ह्या पत्रकाराला कुठल्या बाहिनीवर का बोलावत नाहीत? कारण वाहिन्यांवरील चर्चा बघून त्यातला मुर्खपणा व खोटेपणाही मी तपशील व पुरावे देवून मांडत होतो. मात्र इतके करूनही कोणा संपादक पत्रकाराने माझ्या आरोप वा टिकेला उत्तर देण्य़ाची तसदी घेतली नाही. किंबहूना दुर्लक्षित करणे, हाच त्यांचा बचाव राहिला. बौद्धिक भाषेत त्याला अनुल्लेखाने मारणे असे म्हणतात. प्रत्यक्षात त्यात काडीमात्र बुद्धीवादाचा संबंध नाही. तो निव्वळ पळपुटेपणा होता. कारण जे खुलासे मी करत होतो, किंवा खोटेपणा समोर आणत होतो, त्याचा प्रतिवाद करायला जागाच नव्हती. म्हणूनच ‘पुण्यनगरी’त मी कितीही हजामत केली, तरी ती पुरोगामी पत्रकारांकडून दुर्लक्षितच राहिली. मलाही त्याचे कौतुक नव्हते. कारण या राज्यव्यापी वृत्तपत्राने मला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेलेले होते आणि मक्तेदार माध्यमातील पुरोगामी शहाण्यांचे पितळ मी पुरते उघडे पाडलेले होते. मात्र त्यातून जो चोखंदळ वाचक माझ्याकडे आकर्षित झाला होता, त्याची भूक भागत होती. मी त्यावरच समाधानी होतो. पुढे काही कारणाने ‘पुण्यनगरी’तले माझे उलटतपासणी सदर बंद झाले. त्याची कारणेही स्पष्ट आहेत. कुठल्याही व्यवसायात आर्थिक तोल संभाळावा लागतो. आज वृत्तपत्र व माध्यमात तोटा अफ़ाट झाला आहे. वृत्रपत्राच्या खपावर किंवा वाहिनीच्या लोकप्रियतेवर त्याचे अर्थकारण चालत नाही. त्यासाठी अतिरिक्त पैसा लागतो. म्हणून काळापैसावाले व चिटफ़ंडवाले यांच्या हाती माध्यमांची सुत्रे गेलेली आहेत. संपादक वा बुद्धीमान पत्रकाराची कुणाला गरज उरलेली नाही. उलट सत्ताधारी वा राजकारणी यांच्या दारी जाऊन मालकाची कामे निस्तरू शकणारा कारभारी संपादक पत्रकार मोलाचा झाला आहे. अशा जीवघेण्या स्पर्धेत कुठलाही अतिरिक्त पैसा वा काळापैसा हाती नसलेल्या शिंगोटे याच्यासारख्या वृत्तपत्र मालकाने माझ्या प्रतिकुल लेखन स्वातंत्र्यासाठी आपला धंदा पणाला लावावा, असे मी म्हणणार नाही. माझे लिखाण त्यांना अडचणीचे झाले आणि छापील स्वरूपातील ‘उलटतपासणी’ २०१३ च्या पुर्वार्धात थांबली. पण मला फ़रक पडत नव्हता. आर्थिक उत्पन्न थांबले, तरी लिहीण्यासाठी नवे माध्यम ब्लॉगच्या रुपाने उपलब्ध झाले होते.

सहाजिकच संगणक आणि मोकळा वेळ मी ब्लॉग लिहीण्यावर खर्ची घालायला आरंभ केला. अधिक मधल्या वर्षभरात फ़ेसबुकमुळे मित्रांचा गोतावळा वाढला होता आणि त्यांनीही आपापल्या मित्रांपर्यंत मला नेऊन पोहोचवले होते. दिवसागणिक ब्लॉगची लोकप्रियता वाढत होती. खरे तर मला अशा वाचकांचे आजही कौतुक वाटते. हातात पुस्तक वा वर्तमानपत्र घेऊन वाचणे जितके सोपे आहे, त्यापेक्षा टॅब, संगणक वा अन्य मार्गाने इंटरनेटवर असलेला मजकूर वाचणे कटकटीचे आहे. आजही मी स्वत: फ़ारसे अशा माध्यमातून वाचू शकत नाही. जे वाचतात, त्यांना म्हणूनच मी साक्षात दंडावत घालतो. शिवाय माझ्या लेखासाठी इतके लोक असे कष्ट घेतात, त्याचेही मला नवल वाटते. आरंभी मला त्याची गंमत लक्षात आलेली नव्हती. पण मध्यंतरी एका मित्राने वाचल्या जाणार्‍या किंवा ब्लॉगला भेट देणार्‍यांच्या मोजणीची सोय ब्लॉगला जोडली आणि माझ्यावर थक्क व्हायची वेळ आली. २०१३ च्या एप्रिलपासून मी पुर्णवेळ ब्लॉगवर लक्ष केंद्रित केल्यापासून दोनही ब्लॉगला पंधरा लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली किंवा माझे लेख वाचले, हे अजून खरे वाटत नाही. पण ते सत्य आहे, कारण तंत्रज्ञान खोटे बोलत नाही. ‘जागता पहारा’ आणि ‘उलटतपासणी’ अशा दोन्ही ब्लॉगची वाचकसंख्या एव्हाना पंधरा लाखाला पार करून गेली आहे. सगळी गडबड तिथेच असावी, हे म्हणूनच लक्षात आले. पुण्यनगरीत लिहीत होतो, तेव्हा माझे लेख काही लाख लोकांपर्यंत प्रतिदिन जात होते. त्याच्या तुलनेत ब्लॉगची वाचक संख्या नगण्य आहे. पण हा केवळ माझा वाचक आहे. पण मला वाटलेले कुतूहल असे, की जेव्हा माझे लिखाण लाखो लोकांपर्यंत रोज जात होते, तेव्हा खरे तर पुरोगामी सेक्युलर संपादक पत्रकारांनी माझ्याविरोधात आघाडी उघडली पाहिजे होती. कारण ती संख्या अधिक होती. तिच्या तुलनेत ब्लॉगची ताकद वा संख्या अजिबात नगण्य आहे. मग तेव्हा गप्प बसलेल्यांनी अलिकडे माझ्या नगण्य ब्लॉगची इतकी दखल कशाला घ्यावी? ज्यांच्या हाती वाहिन्या व लक्षावधी खपाची प्रमुख वृत्तपत्रे आहेत, त्यांनी एका नगण्य ब्लॉगचा इतला धसका कशाला घ्यावा? मागल्या चारपाच महिन्यात अनेकांनी माझ्या ब्लॉगच्या लेखावर शिवराळ टिका केली, आक्षेप घेतले. ह्यामागे काय रहस्य आहे?

कल्पना करा. मोठी तीनचार वृत्तपत्रे व वाहिन्यांवरचे हे पुरोगामी पत्रकार आहेत, ज्यांनी माझ्यावर असे शिवराळ हल्ले केलेत. त्यांच्या वाहिन्यांचे प्रतिदिन प्रत्येकी प्रेक्षकच दहाबारा लाख तरी असतील. म्हणजे एकत्रित त्यांचा प्रेक्षकच पन्नास लाखाच्या घरात दैनंदिन आहे. दुसरीकडे मोठी वृत्तपत्रे घ्या. त्यांच्या खपाचे आकडे नेहमीच मोठे असतात. एकत्रित २०-३० लाख दैनंदिन प्रती छापल्या जातात. म्हणजे गेला बाजार रोज एक कोटी मराठी लोकांपर्यंत पोहोचू शकणारे हे पुरोगामी संपादक पत्रकार वर्षभरात साडेतीनशे कोटी लोकांपर्यंत जात असतील. त्यांच्या साडेतीनशे कोटींच्या तुलनेत माझा ब्लॉग अवघा दोनचार लाख लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कुठे म्हणून तुलना होऊ शकते काय? किस झाडकी पत्ती, म्हणून दुर्लक्ष करावा असाच माझा हा ब्लॉग किंवा त्यावरील लिखाण नव्हे काय? मग त्यांनी त्याची दखल कशाला घ्यावी? त्यांना अशा एका क्षुल्लक ब्लॉगवर काय लिहीले जाते वा कुठले मुद्दे येतात, त्याची दखल घेण्य़ाचे कारणच काय? इतकी भक्कम व निर्विवाद साधने ज्यांच्या पुरोगामी लढाईसाठी सज्ज आहेत, त्यांनी एका क्षुल्लक ब्लॉगवर इतका कल्लोळ व गदारोळ उठवण्याचे कारणच काय? मला मागले काही महिने हा प्रश्न सतावत होता. आधी मी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले. पण लागोपाठ मोठ्या पदावर बसलेले संपादक व सहसंपादक माझ्यावर शिवराळ हल्ले करू लागले, तेव्हा त्यांच्याकडे पाठ फ़िरवणे शक्य नव्हते. त्यांचा समाचार घेणे भाग होते. त्याप्रमाणे ती चोख समाचार घेतलाच. पण तरीही यांनी इतके कशाला विचलीत व्हावे, त्याचे उत्तर मला सापडत नव्हते. मनात आत कुठे तरी त्याची कारणे शोधत होतो. कारण अकस्मात सुरू झालेले हे हल्ले निर्हेतूक नक्कीच नसणार. त्यामागे काहीतरी कारण असणारच, याचीही खात्री होती. मात्र कारण सापडत नव्हते.

उद्या अमेरिकेचा अध्यक्ष बराक ओबामा याने मालदिव वा मॉरीशससारख्या एका बेटवजा देशावर हल्ला करायला मोठ्या युद्धनौका सज्ज केल्या, तर कोणालाही गंमत वाटेल ना? अशा तमाम मोठ्या माध्यमातील बड्यांनी माझ्या विरुद्ध आघाडी उघडण्याचे म्हणूनच मला कुतूहल वाटले. यांचे मोठे गच्च जाडजुड पगार, सगळी साधने त्यांच्यापाशी, करोडोचा वाचक त्यांच्या पुरोगामी प्रवचनासाठी मालकाने काळा पैसा ओतून सज्ज ठेवलेला. मग त्यांनी एका फ़डतूस ब्लॉगवरच्या लेखांनी असे विचलित कशाला होऊन जावे? जसजसा मी त्याची कारणे शोधत गेलो आणि त्याचे संदर्भ-संबंध जोडत गेलो, तेव्हा अशा पुरोगामी सेक्युलर माध्यमांचा पोकळपणा अधिकच स्पष्ट होत गेला. त्यांच्यातली निरर्थकता समोर येत गेली. त्यांच्यातला खोटेपणा त्यांनाच भयभीत करत असल्याचे लक्षात येत गेले. त्यातला नुसताच पोकळपणा नव्हे, तर अगतिक पोरकेपणाही नजरेस येत गेला. आज अशा मोठ्या माध्यमातले बहुतांश संपादक-पत्रकार आपली ओळख विसरून गेलेत आणि त्यांच्यातला आत्मविश्वास पुरता लयास गेला आहे. आपण खोटे आहोत, हे त्यांना आधीच माहिती होते. पण आता त्यांचा खोटेपणा लोकांनाही उमगल्याने वाचकही पाठ फ़िरवू लागल्याने पुरोगामी खेळ धोक्यात आलेला आहे. त्यामुळे हे भयभीत झाले आहेत. माझ्या लेखन, मुद्दे व भूमिकांनी नव्हे; इतकी त्यांच्याच खोटेपणाने त्यांना धडकी भरली आहे. त्यातूनच मग प्रतिहल्ल्याची प्रतिक्रिया उमटलेली आहे. वैफ़ल्यातून आलेली ती आक्रमकता आहे. पत्रकार, वृत्तपत्र व माध्यम म्हणून आपण विश्वासार्हता गमावून बसल्याची जाणिव, त्यांना भयभीत करून राहिलेली आहे. म्हणून त्यांच्याविषयी कुठलाही व्यक्तीगत आरोप वा आक्षेप मी घेतला नसताना, अशा पत्रकारांनी माझ्यावर व्यक्तीगत शिव्यागाळी व गरळ ओकण्याचा उद्योग केला. माझे सडेतोड ब्लॉग त्यांना त्यांच्यावरचाच हल्ला वाटून उमटलेली ती प्रतिक्रिया आहे. म्हणतात ना चोराच्या मनात चांदणे? (संपुर्ण)

19 comments:

  1. भाऊ!
    आपल्या ब्लाॅगचे वाचक वाढण्याची अनेक कारणे आहेत.
    १) कोणतीही लपवाछपवी न करता सडेतोड विश्लेषण.
    २) कोणत्याही पक्षाशी राजकीय बांधिलकी नसणे.
    ३) प्रत्येक लेखातून एक तिसरी बाजू आपण दाखवता जी कोणत्याही माध्यमात पहायला मिळत नाही.
    मी तर सुरूवातीला फेसबुक फक्त आपले लेख वाचण्यासाठी सुरू ठेवले होते.

    ReplyDelete
  2. अगदी नेमके निदान ! पण भाऊ तुमची पोहोच सुद्धा कमी लेखू नका. आमच्यासारखे कितीतरी ओक तुमचे लिखाण पुन्हा फेसबुक वर शेअर करतात. काही वोट्सअपवर पण जाते. ते वेगाने फिरत राहते. (गुणवत्तेच्या आधारावर) म्हणून ही भुक्कड गुलाम पिलावळ हादरली आहे. त्यांना आपले बिंग आता घरघरत फुटते आहे हे लक्षात आल्याने ते हैराण झालेत.

    ReplyDelete
  3. तुम्ही लक्ष देऊच नका भाऊ. कारण या पत्रकारांनी आणि न्यूज चॅनल्सनी आपली विश्वासार्हता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच गमावली आहे.

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख...

    ReplyDelete
  5. भाऊ, ह्या टीकाकारांची नावं जाहीर कराच एकदा! मजा येईल.

    ReplyDelete
  6. Bhau... Baware of secular terrorism...

    ReplyDelete
  7. बडी म्हणून ओळखली जाणारी वृत्तपत्रे व त्यांचे संपादक बोगस आहेतच. मुळात हे स्वत:च मालकांचे गुलाम आहेत. ते कसली स्वतंत्र पत्रकारीता करणार? यांच्याकडे केवळ दिखावु आव आहे.नैतिकता ही त्यांनी सोयीसाठी पांघरलेली झुल आहे.

    ReplyDelete
  8. भाऊ आपले विचार एवढे सडेतोड आणि मुद्देसूद असतात कि समोरच्याला बोलयला जागाच राहत नाही.
    म्हणून मग ते सरळ विरोध करता येत नाही म्हणून शिवराळ भाषेत गरळ ओकत राहतात.
    भाऊ पण तुम्ही असेच लेखन करत राहा अवघे सोशल नेटवर्क तुमच्या मागे आहे कधीही काहीही असो आंम्ही आहोत बरोबर.

    एक गोष्ट आठवली १०० कोंबड्यांना १ कोंबडा पुरून उरतो तसेच कितीही सेकुलर येवो आमचे भाऊ त्यांना पुरून उरतील.

    ReplyDelete
  9. ....त्यांच्याविषयी कुठलाही व्यक्तीगत आरोप वा आक्षेप मी घेतला नसताना, अशा पत्रकारांनी माझ्यावर व्यक्तीगत शिव्यागाळी व गरळ ओकण्याचा उद्योग केला. ..... ह्यातील काही नमुने इथे पुन्हा "लिंकीत " केलेत तर त्यांची "ओळख " आम्हालाही नीट होईल, शिवाय त्यामुळे तुम्हाला यत्कींचीतही कमी पणा न येता त्यांच्या सुटलेल्या चड्ड्यांचेच दर्शन होईल !

    ReplyDelete
  10. Hya tar CHORAMCHYA ULTYA BOMBA...hyanchya manaat ajkaal chandanehi firkat nahi BHAU tuzymule. Dhanyavad.

    ReplyDelete
  11. भाऊराव,

    खरंय तुम्ही म्हणता ते. त्यांना त्यांचीच प्रतिबिंबे भुतं होऊन सतावताहेत. काय करणार आता ! आपलेच दात आणि आपलेच ओठ, आणि कुणाचेतरी आईबाप ! कुणाचे काढायचे ? तर काढा भावड्याचेच. असा सगळा कारभार आहे.

    तुमच्या स्वयंभूत्वास विनम्र अभिवादन. तुम्ही कुणाचेही मिंधे नाही. यातंच सगळं आलं.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  12. Bhau, Tumhalaa Shubhechchaa.....!!!!

    Tumachaa Kayam Vachak.

    ReplyDelete
  13. भाऊ ती म्हण आहे ना
    भित्या पाठी ब्रम्ह राक्षस
    तशी यांची गत आहे

    तुम्ही त्यांना लक्ष देऊन मोठे नका करू
    ते तुमच्या समोर खुप खुजे आहेत

    तुम्ही असेच नेहमी लिहित रहा
    आम्ही ते फेसबूक आणि व्हाट्सएप्प वर तुमच्याच् नावाने जास्तीत जास्त समविचारी आणि विरोधक अशा सर्वांपर्यन्त ते पोहचवु

    ReplyDelete
  14. भाऊ, तरी वर्तमानपत्रे ३ कोटी लोकांच्या हातात पडत असली तरी त्यातला एक विशिष्ठ लेख वाचणारे लोक फ़ार कमी असतात..अग्रलेख तर फ़ारच कमी लोक वाचतात त्यामुळे ३ कोतीतले जेमतेम ३ लाख लोक लेख वाचतात व पेपर रद्दीत जातो...ब्लॉगचे तसे नाही...तो रद्दीत टाकता येत नाही...वर्तमान पत्र फ़ारफ़ारतर शेजा-याला वाचायला देता येते पण ब्लॉग मधले विचार वणव्यासारखे फ़िरविता येतात! आणि लिहून देतो जारे आपले वाचक केवळ १५ लाख असले तरी आपले मी माझ्या पेजवर शेअर केलेले लेख किमान लाखभर लोक वाचतात! (एक लेख) असे मी अनेक लेख शेअर करत असतो...आणि असे अनेक लोक आहेत...त्यामुळे आपले लेख सहज कोटींच्या घरात वाचले जातात! म्हणून तर माध्यमसम्राटांना जाग आलेली आहे!

    ReplyDelete
  15. Bhau, I am regular visitor from Dubai and I know atleast 20 friends who are your fan from Dubai. Really Salute you.

    ReplyDelete
  16. भाऊ चालुदेत यांची बिन पाण्याने .

    ReplyDelete
  17. खुप मस्त ब्लॉग आहे सर आपला.....

    ReplyDelete
  18. Bhau UR blog is populer and seculer are disterbed due to public response about ur blog.....
    But they all forget its ur 40 years hard work...TAPASYA...
    Keep going....we all R with U

    ReplyDelete