Wednesday, October 14, 2015

पुरोगामी लवचिकता जाणून घ्या!



कुठलीही हिंसा, दहशतवाद किंवा कुठलेही गैरकृत्य हे केवळ तसे आहे म्हणून निषेधार्ह नसते, ते कृत्य कोण व कोणाच्या विरोधात करतो, त्यानुसार त्यातले पुण्य वा पाप निश्चीत होत असते. निदान पुरोगामी विचारात तसे मानले जाते. कृत्य करणारा कुठल्या बाजूचा आहे व बळी पडणारा कुठल्या बाजूला आहे, त्यावर हे निकष बदलत असतात. म्हणजे असे, की समजा उद्या कोणी भाजपाचा, संघाचा वा शिवसेनेचा नेता कार्यकर्ता खुन केल्याने मारला गेला. तर त्याची हत्या हा गुन्हाच मानण्याची गरज नसते. त्याला मारणारा कोण असतो, त्यानुसार वर्गवारी होत असते. ही अर्थात भारतीय संदर्भातली बाब आहे. जागतिक संदर्भात निकष आणखी बदलत असतात. उदाहरणार्थ कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली, म्हणजे त्याला अंधश्रद्धा ठरवण्याची पुरोगामी स्पर्धा सुरू होत असते. पण मक्केत हजारभर लोक तशाच कारणास्तव बळी पडले, तर त्याबद्दल बोलायचे नसते. कारण घटना मुस्लिम धर्मश्रद्धेच्या तीर्थक्षेत्री झालेली असल्याने भारतीय पुरोगामीत्वात तो अपघात असतो. पण असेच काही कुंभमेळा वा तत्सम हिंदूसण समारंभाच्या निमीत्ताने झाले, म्हणजे आभाळच कोसळून पडत असते. हातात पिस्तुल असते तर मोदींना गोळी घातली असती, असे रत्नागिरीच्या शालेय विद्यार्थ्यांनी विजय तेंडूलकर यांनी ज्ञानामृत पाजले होते. तेव्हा कोणाला ती हिंसक भाषा वाटली होती काय? उलट त्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये, हे सांगताना पुरोगामी जाणत्यांनी दाताच्या कण्या केलेल्या होत्या. म्हणून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कुठलाही न्यायनिवाडा करताना निकष महत्वाचे असतात. मारणारा कोण आणि बळी कोणत्या गोटातला आहे, त्यानुसार एखादी कृती, अन्याय वा न्याय ठरत असते. म्हणून तर मानवाधिकार झिडकारून लावलेल्या सौदी अरेबियालाच राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीचे अध्यक्षपद मिळू शकते आणि कोणी पुरोगामी अवाक्षर बोलत नाही.

पुरोगामीत्व समजून घेण्यासाठी त्यातल्या निकषांची लवचिकता समजून घेतली पाहिजे. मगच त्यानुसार व्यक्त होणार्‍या प्रतिक्रीया वा मतप्रदर्शनाचे आकलन होऊ शकते. मग इतरांसाठी हास्यास्पद आलेली अंधश्रद्धा सत्यनारायण निखील वागळेच्या नव्या वाहिनीच्या कचेरीत पुरोगामी होते आणि तमाम सेक्युलर अंनिसवाले मूग गिळून गप्प बसतात. करणार काय? निखील पुरोगामीत्वाचा पुतळा असतो ना? त्याच्या कार्यालयात सत्यनारायण घातला असेल, तर तो वास्तववादी वा विज्ञानवादी सत्यनारायणच असणार ना? मुद्दा सत्यनारायणाचा वा यातल्या अंधश्रद्धेचा नसतोच. सत्यनारायण कोणी घातला त्यानुसार यातले विज्ञान वा अंधश्रद्धा ठरवल्या जात असतात. आणखी एक गोष्ट इथे प्रकर्षाने मांडायला हवी. मध्यंतरी मांसाहार वा गोमांस विषयक बरेच वादविवाद रंगलेले होते. तेव्हा त्यात तामिळनाडूचे मान्यवर दैनिक ‘द हिंदू’चे अनेक संपादक पत्रकार तावातावाने मांसाहारावरील प्रतिबंधाला लोकशाहीची गळचेपी ठरवणारे युक्तीवाद करीत होते. शाकाहारी लोकांनी उभारलेल्या कुठल्या सोसायटीत नंतर आलेल्या कोणी रहिवाश्याने मांसाहाराचा आग्रह धरला, तर तिथे सोसायटी बनवणार्‍या व उभारणार्‍यांना निर्णय घेण्याचा अधिकार अजिबात नसतो. पण तोच निकष वा नियम ‘द हिंदू’ चालवणार्‍या संस्था वा संपादकांनाही लागू होतो काय? अजिबात नाही! कारण ते अस्सल सेक्युलर पुरोगामी असतात. त्यांच्या बाबतीत कुठलाही नियम कायदा कितीही लवचिक होतो. अन्यथा ‘द हिंदू’च्या कॅन्टीनमध्ये मांसाहाराला अधिकृत प्रतिबंध कशाला घातला गेला असता? जैनाच्या सोसायटीत वा आणखी कुठल्या सोसायटीत गोमांस खाण्याला मुभा असली पाहिजे. पण तेच धोरण सेक्युलर ‘द हिंदू’मध्ये चालणार नाही. त्याबद्दल कुठे वाच्यताही होणार नाही. उलट तेच मांसाहाराला प्रतिबंध घालणारे वाहिन्यांवर येऊन मांसाहाराचे सेक्युलर समर्थन करणार.

बहुधा कर्मठ आणि पुरोगामी यातला हाच प्रमुख व एकमेव फ़रक असावा. जिथे केव्हाही कशाच्याही व्याख्या सोयीनुसार बदलता येण्याची लवचिकता असते, त्यालाच पुरोगामीत्व संबोधले जात असावे. मात्र कायम ठरलेल्या शब्द व व्याख्या तशाच्या तशा मानण्यात कर्मठपणा असावा. म्हणजे असे, की एखादी हत्या प्रतिगाम्याची झाली असेल, तर तिचे गांभीर्य मानायचे कारण नाही. किंबहूना ती पुरोगाम्याकडून झाली असेल तर त्याला सामाजिक शस्त्रक्रिया समजून स्वागत करायला हवे. मात्र उलट काही असेल तर ही अमानुष हत्या मानली जावी. डावे विचारवंत व जाणते सुरेश सावंत यांनी गेल्या फ़ेब्रुवारीत माझ्या एका ब्लॉगविषयी विवेचन करताना यासंबंधी बारकाईने स्पष्टीकरण दिलेले आहे. ते म्हणतात, ‘आंतरराष्ट्रीय राजकारणात कम्युनिस्टांच्या व्यवहारात विरोधकांशी व आपल्यातल्या भिन्न मतवाल्यांशी हिंसक व्यवहार झाला आहे. कामगार-कष्टकऱ्यांच्या समाजवादी राज्याच्या ध्येयासाठी वर्गशत्रूशी लढताना जी कमालीची सावधानता बाळगायला हवी, जी पोलादी शिस्त व संघटना हवी, त्या गरजेपोटी हा हिंसक व्यवहार झाला, असे समर्थन मी ऐकलेले होते. त्या परिस्थितीतले ताणे-बाणे तपशीलात मला ठाऊक नाहीत. पण असा व्यवहार व्हायला नको होता, असेच मला वाटते. तथापि, वंशप्रभुत्वाने झपाटलेल्या हिटलरची हिंसा आणि जग आपल्या साम्राज्यवादी पंखाखाली घेण्यासाठी चाल करत असलेल्या या हिटलरला रोखणाऱ्या स्टॅलिनची हिंसा मी ‘एकाच प्रतीची’ मानत नाही. ..... डॉक्टर जेव्हा धनुर्वात झालेला पाय कापतात, तेव्हा त्यांच्या मनात रोग्याविषयी राग नसतो, उलट तो त्याचे उर्वरित अंग सुरक्षित राहावे, अशीच इच्छा असते. आपली सामाजिक लढाई या ऑपरेशनसारखी असायला हवी.’ हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. हत्या व्हायला, करायला हरकत नाही. ती शस्त्रक्रियेसारखी असायला हवी.

याला पुरोगामी लवचिकता म्हणतात! जी सोय व गरजेनुसार बदलत जाते. याचे तर्कशास्त्र अधिक सोपे करून हवे असेल, तर १९७०-८० च्या जमान्यातले अमिताभचे वा शत्रुघ्न सिन्हाचे काही चित्रपट बघायला हवेत. त्यातली भाषा अशीच पुरोगामी असायची. एका चित्रपटात जुगार खेळणार्‍या शत्रूघ्नला तीन राजे दाखवायचे असतात. तो केवळ दोनच राजे दाखवतो आणि तिसरा राजा दाखवायला सांगितल्यावर ठोसा हाणून ‘हम है तिसरे बादशहा’ असे उत्तर देतो. तोपर्यंत समोरचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. दुसर्‍या एका चित्रपटात कुठली रांग असते आणि अमिताभ सरळ खिडकीपाशी जाऊन उभा रहातो. त्याला कोणीतरी समजावतो. रांग तिथे मागे सुरू होते. तर अमिताभ कॉलर पकडून त्याला बजावतो, ‘हम जहा खडे होते है, वहीसे लाईन शुरू होती है’. पुरोगामी प्रतिगामीची व्याख्या त्यापेक्षा कितीशी भिन्न आहे? कुठली कृती वा वक्तव्य जसे आहे, त्यामुळे पुरोगामी वा प्रतिगामी नसते. त्यात गुंतलेल्या व्यक्ती कुठल्या गोटातल्या वा बाजूच्या आहेत, त्यानुसार निकष लागत असतात. म्हणून मग पहिले काम असते लेबल लावणे. कुठलीही व्यक्ती, संस्था संघटना वा त्यांचे आंदोलन-भूमिका यावर घाईगर्दीने पुरोगामी प्रतिगामी अशी लेबले लावली जात असतात. त्यात मग धर्म म्हणून ओवायसीला मतदान झाले, तरी ते सेक्युलर मतदान असते आणि धर्माला बाजूला ठेवून मुस्लिमाने भाजपाला मत दिले, तरी ते जातियवादी मत असते. ही लवचिकता समजून घेतली तर एकूण सामाजिक राजकीय क्षेत्रात झालेली वैचारीक विभागणी ओळखता येऊ शकते. तिचा विचारंशी तत्वज्ञानाशी वा भूमिकांशी काडीमात्र संबंध नसतो. त्याचा संबंध कुणावर कसले लेबल डकवलेले आहे आणि डकवणारा कोण आहे, त्यानुसार भूमिका निश्चीत होतात. लेबलनुसार भूमिका बदलता आली तर ती पुरोगामी असते आणि तशी तयारी नसेल तर तुम्ही कर्मठ प्रतिगामी ठरता.

7 comments:

  1. भाऊ, आपला हा लेख अतिशय उत्तम किंवा अतिसुंदर असा आहे. ढोंगी पुरोगामी लोकांचे इतके स्पष्टपणे वाभाडे काढले आहेत. आपल्या लेखामधून आपण पुन्हा एकदा दाखवून दिले की सभ्य आणि संयत भाषा वापरून सुद्धा आपला मुद्दा स्पष्ट पाने पुराव्यानिशी मांडता येतो. आपल्या आगामी लिखाणासाठी शूभेच्छा.

    ReplyDelete
  2. खूप छान विश्लेषण भाऊ.. कोपरापासून दंडवत.. अर्थात याला प्रतिवाद करणारे पण भरपूर येतील.. (विशम्भर चौधारीन्सारखे).. असल्या लवचीकतेला आपण पुरोगामी, प्रतिगामी वगैरे नव्हे तर 'ओरिगामी' म्हणूया..

    ReplyDelete
  3. भाऊ अस असेल तर मला कर्मठ प्रतिगामी म्हणून मिरवायला आनंदाने आवडेन...

    ReplyDelete
  4. The only reason for this is hindu society is too much tolerant and divided by cast and other differences.So any one can do anything against us and boasts about it in a hindu majority country

    ReplyDelete
  5. भाऊसाहेब...... संयतपूर्ण तरीपण तेवढेच प्रभावी लिखाण

    ReplyDelete
  6. सडेतोड लेख आणि उत्तम विश्लेषण

    ReplyDelete