मागल्या दहा वर्षात देशाचाच जावई असल्यासारखी शाही वागणूक मिळालेले ‘उद्योग’पती रॉबर्ट वाड्रा यांना मोदी व भाजपाची सरकारे सतावत असल्याचे त्यांनीच एका मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच आहे. कारण या देशातले कायदे सामान्य माणसाला लागू होत असले, तरी नेहरू-गांधी खानदानाशी कुठलाही संबंध असेल, तर त्या व्यक्तीला कायदे नियमातून सूट मिळत असते. देशाच्या राज्यघटनेत नसलेली ही अलिखीत तरतुद आहे. पण मोदी घटनाच मानत नसतील, तर त्यातल्या अलिखीत गोष्टींचे पालन त्यांच्याकडून कसे होईल? सहाजिकच देशात सत्तांतर झाल्यापासून वाड्रा यांच्यामागे कायद्याचा ससेमिरा लागला आहे. त्यांनी ‘उद्योग’पती म्हणून जी विकासाची कामे हाती घेतली होती, त्यात खंड पाडला जात आहे. उदाहरणार्थ हरयाणामध्ये वाड्रा यांनी हजारो एकर जमिन खरेदी केली होती. ज्यांच्याकडून ही जमिन खरेदी केली, त्याच कंपनीने वाड्रा यांना जमिन खरेदीसाठी कोट्यवधी रुपये उसने व बिनव्याजी दिले होते. मग पुन्हा तीच जमिन काही काळानंतर त्याच कंपनीने वाड्रा यांच्याकडून पुन्हा खरेदी केली आणि अनेकपटीने त्याची किंमत मोजली. कुठलीही खरेदी करायला खिशात पैसे असावे लागतात, हा सामान्य व्यवहाराचा नियम आहे. खिशात दमडा नसताना तुम्ही कुठली खरेदी करू शकत नाही. पण हा नियम नेहरू खानदानाचे जावई असल्याने वाड्रांना लागू होत नाही, विकणाराच त्यांना खरेदीसाठी पैसे उसने देतो आणि पुन्हा तीच वस्तू अनेकपटीने किंमत देवून विकत घेऊ शकतो. हे अर्थशास्त्र मोदी सरकार वा भाजपाला अजून उमगलेले नाही. म्हणून त्यांनी वाड्रा यांना छळायला सुरूवात केली आहे. सामान्य माणसाला लागणारे नियम वाड्रांना लावणे, हा अन्यायच नाही काय? मग त्यांनी तक्रार केल्यास चुक ते काय? इथपर्यंत वाड्रा यांचा आक्षेप समजू शकतो. पण दुसरा भाग थोडा चमत्कारीक वाटला.
आपल्यावर होणार्या अन्यायाला वाड्रा यांनी एका माध्यमाला मुलाखत देवून वाचा फ़ोडली. त्यात वाड्रा म्हणतात, ‘आपण सोनिया वा गांधी खानदानाशी संबंधित आहोत म्हणूनच आपल्याला लक्ष्य केले जात आहे. राजकीय हत्याराप्रमाणे आपला वापर होत आहे. एका सामान्य नागरिकाप्रमाणे आपल्याला व्यवसाय करू दिला जात नाही.’ गडबड इथे आहे. वाड्रांची अपेक्षा अशी आहे, की त्यांना सामान्य भारतीयाप्रमाणे कारभार व उद्योग करू दिला पाहिजे. त्यात काही चुक नाही. पण वाड्रा हे देशाचे तितके सामान्य नागरिक कुठे आहेत? ते कायदे व नियम ज्यांना लागू होत नाहीत, अशा घराण्याशी निगडीत आहेत. म्हणूनच त्यांना विशेष वागणूक मिळत असते. सामान्य नागरिकाला विमानतळावर कसून तपासले जाते. त्याच्या सामानाची झडती घेतली जाते. वाड्रा यांना तसे सामान्य पद्धतीने कधी कोणी वागवले नाही. कितीही सुरक्षेचा मामला असो, कुठल्याही तपासणीशिवाय त्यांना विमानतळावर येजा करता आली, तेव्हा त्यांनी कधी सामान्य नागरिकाप्रमाणे आपल्याला वागणूक मिळत नाही, अशी तक्रार केल्याचे कोणी ऐकले आहे काय? कुठल्याही सरकारी खात्यात वा मंत्रालयात सामान्य माणसाचे साधे अर्ज धुळ खात पडलेले असतात. त्यावर वर्षानुवर्षे निर्णय होत नाहीत. पण वाड्रांनी कुठल्याही जमिनी घेतल्या, तर विनाविलंब त्यांच्या नावावर त्याचे दस्तावेज तयार करून द्यायला सरकारी यंत्रणा राबत होती. तेव्हा आपल्याला सामान्य माणसाप्रमाणे ताटकळत ठेवले जात नाही आणि तत्परतेने आपल्या विषयात सरकारी निर्णय होतात, अशी तक्रार वाड्रा यांनी केल्याचे कोणाच्या ऐकीवात आहे काय? सतत ‘समर्था घरीचे’ म्हणून त्यांना विशेष वागणुक मिळत राहिली, म्हणून त्यांनी एकदाही तक्रार केलेली नाही. मग आताच त्यांना असे सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याचे, वागण्याचे डोहाळे कशाला लागले आहेत?
ज्या कंपनीकडे कित्येक वर्षे एक जमिन होती आणि त्याविषयी सरकार कुठलाही निर्णय घेत नव्हते, त्याला सामान्य नागरिकाला मिळणारी वागणूक म्हणतात. परंतु त्याच कंपनीने मग तीच जमिन वाड्रांना विकली आणि पैसे नव्हते तर पैसेही दिले. मग तीच जमिन वाड्रांची होताच सरकारी तत्परता कार्यरत झाली आणि रातोरात तीच जमिन विकासाला योग्य व वेगळ्या कामासाठी वापरण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले. एकदा त्या जमिनीवरील आरक्षण उठले आणि वाड्रांनी तीच जमिन पुन्हा त्याच मूळ मालक असलेल्या कंपनीचा परत विकून टाकली. केवळ वाड्रा त्यात सहभागी झाले आणि जमिनीलाही खास वागणुक मिळाली. ह्याची तक्रार वाड्रांनी केलेली नव्हती की जमिनीने केलेली नव्हती. ह्याला वाड्रा ‘उद्योग’ म्हणतात. त्यांनी कुठले उत्पादन वा कारखाने उभे केले म्हणून त्यांना उद्योगपती म्हटले जाते, त्याचाही कधी कोणी खुलासा केलेला नाही. पण पुन्हा अमूक एक गोष्ट म्हणजे उद्योग आणि तो करणार्याला उद्योगपती म्हणावे, ही बाब सामान्य माणसाला लागू होत असते. वाड्रा सामान्य नागरिक कधी होते? सोनियांची कन्या वा इंदिराजींची नात असलेल्या प्रियंका गांधींचे पती झाल्यावर वाड्रा यांना कसलाही ‘पती’ म्हणवून घेण्याचा विशेष अधिकार आपोआपाच प्राप्त होतो ना? तसे वाड्रा अकस्मात उद्योगपती होऊन गेले. सामान्य माणूस ज्याला उद्योग म्हणतो, त्यापेक्षा वाड्रांचे ‘उद्योग’ वेगळे असतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. केवळ सोनियांचे जावई वा राहुलचे जीजाजी म्हणून त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तो निव्वळ पक्षपात आहे. तेव्हा आपल्याला अकारण राजकारणातले हत्यार बनवले जात असल्याची वाड्रा यांची तक्रार योग्यच आहे. एक सामान्य भारतीयाप्रमाणे त्यांच्या विरोधात काही आक्षेप असतील, तर त्याची चौकशी सामान्यपणे व्हायला हवी. त्यासाठी खास चौकशी आयोग कशाला नेमायचा?
मोदी सरकार वा हरयाणाच्या भाजपा सरकारने खास चौकशी नेमून पुन्हा वाड्रा यांना सामान्य नागरिक म्हणून जगण्यापासून वंचित केले आहे. त्याबद्दल त्यानी एक मुलाखत देवून नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर त्यासाठी आतापर्यंत आणखी काही साहित्यिक वा कलावंतांनी आपापले पुरस्कार परत देण्याची मोहिमच हाती घ्यायला हवी होती. कारण हा लोकशाहीचा संकोच आहे, नेहरू खानदानाच्या कुणा व्यक्तीला वा संबंधिताला अशाप्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचे प्रयत्न, हा असंहिष्णूतेचा कळसच नव्हे काय? या देशात नियम कायदे व व्यवस्था म्हणून नेताजींच्या आप्तस्वकीयांवर पाळत ठेवली जाऊ शकते. कागदोपत्री घोळ घातला जाऊ शकतो. पण नेहरू घराण्याला कुठलेही नियम लावणे, म्हणजे चक्क लोकशाहीचा व सभ्यतेचा गळा घोटणेच नाही काय? मग मोठ्या माध्यमांनी गरीब बिचार्या वाड्रा यांच्या दु:खाला वाचा फ़ोडायला प्रदिर्घ मुलाखत घेणे आवश्यकच नव्हते का? पण त्यात एक प्रश्न राहुन गेला. तो असा की नेहरू-गांधी खानदानाशी संबंध आहे, म्हणून छळ होतो, अशी तक्रार आहे, तर त्याच खानदानाशी संबंध असल्याचे लाभ वाड्रांनी आजवर कशाला घेतले? सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी आपली कंपनी चालवली नाही की खिशात दमडा नसताना कुठला पोटापाण्याचा उद्योग केला नाही. म्हणजेच नेहरू खानदानाशी संबंध जोडून त्याचे सर्व लाभ वाड्रा मस्तपैकी उकळत राहिले. त्याचे फ़ायदे घेताना त्यांना कुठला त्रास वा मनस्ताप झाला नाही. मग जेव्हा त्याच नातेसंबंधांचा जाच सोसायची वेळ आली, तेव्हा वाड्रा सामान्य नागरिक व्हायला निघाले आहेत. असे इतिहास वा पुराणात एकच उदाहरण मिळते. वाल्या कोळ्याच्या कुटुंबियांनी त्याच्या पापाचे लाभ उठवायला संमती दिली होती. पण त्याच पापाची भागिदारी व परिणाम भोगायला नकार दिला होता. वाड्रा यांचा पवित्रा त्यापेक्षा वेगळा आहे काय? मग त्यांना काय म्हणायचे? इटाली‘वाल्या’ कोळणीचा जावई?
Superb Bhau, as usual. Am keen to have secular opinions on the issue.
ReplyDelete"समर्था घरीचे.. " व्वा व्वा .. क्या बात है.
ReplyDeleteभाऊ खूप खूप छान अगदी माझा मनातल
ReplyDeleteExcellent as usual. Bhau, you regularly hit the nail on the head....but unfortunately, these people are absolutely SHAMELESS. And your writing comes as a daily doese of some solace that expresses our opinions so eloquently. Thanks again and yet again. K R Vaishampayan [alias-KRV]
ReplyDeleteईटाली "वाल्या" कोळीणीचा जावई ...
ReplyDeletebhau, no body is at par to u for this type of sarcasism.