Friday, December 18, 2015

कॉग्रेसचे पुनरुत्थान आणि पवार



आपल्या पंच्याहत्तरी निमीत्त दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी एक अजब तर्क मांडला आहे. ‘काँग्रेसमध्ये गांधी घराणे हा मोठा ‘सिमेंटिंग फोर्स’ आहे. पण त्या घराण्याशिवाय काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पर्याय उभा राहू शकतो. मात्र, तो प्रयोग गांधी घराण्याला विश्‍वासात घेऊनच करावा लागेल. पण तेवढे धारिष्ट्य आज तरी कोण्या नेत्यात दिसत नाही!’ शरद पवार जे सांगत आहेत त्यात तथ्य आहे. पण म्हणूनच कॉग्रेसचे पुनरुत्थान होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. १९६९ सालात इंदिराजींनी कॉग्रेस फ़ोडली आणि तिथेच मूळच्या कॉग्रेसचा वारसा हा विषय संपुष्टात आला होता. त्याच्या पुढे जी कॉग्रेस चालली आहे वा टिकलेली आहे असे म्हटले जाते, तो परिस्थितीचा मामला आहे. त्यात अन्य पर्याय नसल्याने कॉग्रेस टिकून राहिली आणि तसा पर्याय समोर आल्यावर नामशेष व्हायच्या कडेलोटावर येऊन उभी आहे. कारण नालायक वारस असला तरी राहुल गांधी यांनाच पक्षाचे नेतृत्व करणे भाग आहे आणि त्यापेक्षा उजवा पर्याय असला तरी त्याला कोणी पुढे येऊ देणार नाही. नरसिंहराव यांना निवृत्तीमधून बाहेर पडून तेव्हा नेतृत्व करावे लागले. कारण योग्य असूनही शरद पवार यांना ती संधी सोनियांनी मिळू दिली नाही, याचीही कबुली पवारांनी दिली आहे. मग आज स्थिती वा सोनियांची मानसिकता बदलली आहे काय? पवार ज्या कारणास्तव नको होते आणि नरसिंहराव यांना ज्या कारणास्तव श्रेय नाकारले गेले, त्यात कुठला बदल होऊ शकला आहे? कुणात गुणवत्ता, बुद्धी वा पात्रता असली तरी तसा विचार करणेही कॉग्रेस पक्षात पाप मानले जाते. असे पर्यायी नेतृत्व उभे करण्यापेक्षा पक्ष बुडाला तरी चालेल, अशीच सोनियांची ठाम भूमिका राहिलेली आहे. मग त्यांना विश्वासात घेऊन अन्य गुणी नेतृत्व कॉग्रेसला आजच्या दुर्दशेतून बाहेर कसे काढू शकणार आहे? हे पवारही पुरते जाणून आहेत. पण बोलायचे धाडस त्यांच्यात तरी कुठे उरले आहे?

खुद्द पवार वा नरसिंहराव यांच्या बाबतीतला इतिहास जगजाहिर आहे. मागल्या दहा वर्षात समर्थ पर्याय अन्य कोणी उभा करू शकला नाही, म्हणून मुळच्या कॉग्रेसी पुण्याईवर सोनियांच्या तोतया कॉग्रेसला सत्ता उपभोगता आली. त्याहीपेक्षा भाजपाद्वेष हे त्यातले खरे भांडवल होते. अन्यथा लोकांना आता कॉग्रेस नकोच आहे. कारण कॉग्रेस म्हणजे गांधी-नेहरू घराण्याची राजवट, हे लोकांच्याही ध्यानात आले आहे. म्हणूनच आजची कॉग्रेसची दुर्दशा हे त्याच एका घराण्याचे वा वारश्याचे पाप आहे. म्हणूनच त्या पक्षाचे पुनरुत्थान व्हायचे असेल, तर पक्षालाच मुळात या एका खानदानाच्या तावडीतून मुक्त व्हावे लागेल. ते करायचे तर मुळात सोनिया-राहुल यांना झुगारून नव्याने पक्ष उभा करण्याची चिकाटी अशा नव्या नेत्यामध्ये असली पाहिजे. त्याने खानदानाची पुण्याई सोडून पक्षाच्या विचारांचा व कर्तबगारीचा वारसा सांगत आरंभ करावा लागेल. तसे काही करायची मुभा सोनिया देण्याची बिलकुल शक्यता नाही. एम. रामचंद्रन यांच्या पत्नीला हाताशी धरून अण्णाद्रमुक पक्ष घराणेशाहीला जुंपण्याचा खेळ दरबारी लोकांनी केला होता. जयललितांनी त्याच्या विरोधात दंड थोपटले आणि त्याला विरोध केला. पुढल्या काळात सत्ता गमावल्यावर रामचंद्रन यांची पत्नी जानकी यांनी तो हट्ट सोडून जयललितांना पक्ष सोपवला आणि त्याचे पुनरुत्थान होऊ शकले. सत्ताही मिळू शकली. कॉग्रेसचे तसे अजिबात होऊ शकत नाही. पक्षाची वैचारिक भूमिका व संघटना कधीच लयाला गेलेली आहे. अधिक अन्य पक्षांना पुरोगामीत्वाचे गाजर दाखवूनही दिशाभूल होऊन गेली आहे. आता कुठल्या बळावर कॉग्रेस उभी राहू शकेल? जिथे थोडीफ़ार शक्ती आहे तिथे प्रादेशिक पक्ष म्हणून पाय रोवणे व स्थानिक नेत्यांना मोकळीक देणे, कामी येऊ शकेल. पण तिथेही शरणागत नेते हवे आहेत. तसे नसेल तर तिथलाही पक्ष बुडवायला सोनिया मागेपुढे बघत नाहीत. मग पुनरुत्थान कसे व्हायचे?

२००४ मध्ये देशातील सर्वात बलवान मुख्यमंत्री म्हणून आंध्रच्या चंद्राबाबु नायडू यांच्याकडे बघितले जात होते. तिथे कॉग्रेसचा कोणी समर्थ नेताच शिल्लक उरला नव्हता. पण राजशेखर रेड्डी यांनी कंबर कसून पक्ष तिथे नव्याने संघटित केला आणि नायडूंना पराभूत करण्यासाठी अनेक पक्षांची मदत घेतली. मिळालेल्या सत्तेच्या आधारे पाय भक्कम रोवले आणि २००९ सालात एकट्य़ाच्या बळावर दुसर्‍यांदा बहुमताचा पल्ला गाठून दाखवला होता. वेगळे राज्य मागणार्‍या तेलंगणा समितीला झुगारून सुद्धा रेड्डी यशस्वी होऊ शकले होते आणि त्यांनीच सर्वाधिक खासदार पाठवल्याने मनमोहन सिंग दुसर्‍यांना पंतप्रधान होऊ शकले. युपीए व सोनियांना पुन्हा सत्ता भोगता आलेली होती. पण त्यानंतर लगेच रेड्डी यांचे अपघाती निधन झाले आणि पित्याचा वारसा सांगत जगनमोहन याने मुख्यमंत्री पदावर दावा केला. त्याला सोनियांनी काय प्रतिसाद दिला होता? जगनने दिल्लीची सत्ता मागितली नव्हती, हैद्राबादवर हक्क सांगितला होता. त्याला व त्याच्यातल्या स्वयंभूतेला संपवण्यासाठी सोनिया काय आत्मघातकी डाव खेळल्या? वेगळ्या तेलंगणाचे राज्य मान्य केले आणि त्याच्या आधी त्यांनी जगनला आर्थिक खटल्यात गोवून नामशेष करण्याच्याच खेळी केल्या ना? काय लाभ झाला कॉग्रेसला अशा खेळीचा? राज्याचे विभाजन करताना दोन्हीकडे कॉग्रेस पुरती नामशेष होऊन गेली. २००४ पासून पक्षाला दिल्लीत सत्ता मिळायला उपयुक्त ठरलेले कर्तृत्व नष्ट करताना सोनियांनी त्या राज्यातलीच कॉग्रेस संपवून टाकली. जगनला पक्षातून बाहेर पडायची वेळ आणली आणि तरीही त्याचा प्रादेशिक पक्ष लोकप्रिय होताना बघून विभाजनातून कॉग्रेसलाच सोनियांनी नामशेष केले होते. अशा गांधी घराण्याच्या वारसांकडून कोणाला विश्वासाची वागणूक मिळू शकते का? त्याला स्वयंभूपणे काम करायची संधी मिळू शकते का?

इथे महाराष्ट्रातील स्थिती बघू. आज ज्या अवस्थेत कॉग्रेस उध्वस्त झालेली आहे, ती नव्याने उभी करण्यासाठी खुमखुमी असलेला नेता आवश्यक आहे. नारायण राणे वगळता असा कोणीही नेता त्या पक्षात नाही. अशोक चव्हाण ‘आदर्श’ राजकारणामुळे बाजूला पडल्यावर राणे यांना मुख्यमंत्री केल्यास कदाचित पक्षाला इतक्या दारूण पराभवाला सामोरे जावे लागले नसते. जे व्हायचे ते होऊन गेले. आता नवा प्रदेशाध्यक्ष नेमतानाही राणे यांचा विचार होऊ शकला नाही. कारण त्यांच्यात स्वयंभूपणे उभे रहाण्याची शक्ती व पात्रता आहे. पर्यायाने पक्षालाही नवी संजिवनी मिळू शकेल. पण तसे होऊ शकले, तर राणे यांना मुठीत ठेवता येणार नाही. ही नेहरूंच्या वारसांची खरी समस्या आहे. त्यांना स्वतंत्र बुद्धीचे, गुणवान व स्वयंभू राजकारण करू शकणारे नेतेच नको आहेत. आपण चुका केल्या तर त्यालाही माना डोलावणारे आणि वारसांच्या मुर्खपणाचे पाप आपल्या डोक्यावर घेणारे निष्ठावान सोनियांना हवे असतात. दिग्विजयसिंग त्यांच्यासाठी पात्र आहेत. विजय मिळाला तर त्याचे श्रेय राहुलचे आणि पराभव झाला तर आमची नालायकी, इतकी लाचारी अभिमानाने मिरवणार्‍यांनी आजची कॉग्रेस भरलेली आहे. वारसांना तसेच लोक हवे असतील, तर मग पक्षाचे पुनरुत्थान कसे होणार आणि कोण करणार? त्याची किंचीत शक्यता जरी असती, तर पवारांना पक्ष सोडून वेगळी चुल मांडावी लागली नसती आणि सोनियांनी पवारांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार समजून पंधरा वर्षापुर्वी प्रोत्साहन दिले असते. पवारांनी आपल्या वारसनिष्ठा व्यक्त करायची एकही संधी सोडली नव्हती. पण एक ‘दुर्गुण’ पवारांमध्ये होता, तो म्हणजे त्यांची स्वयंभू कुवत व नेतृत्व मिळाल्यावर आपले अनुयायी पक्षात निर्माण करण्याची क्षमता! त्यासाठीच सोनियांनी त्यांना संधी नाकारली. म्हणूनच अन्य कोणी तसा असेल तर त्यालाही तशी संधी मिळू शकणार नाही. त्यापेक्षा कॉग्रेस नामशेष झाली तरी बेहत्तर, ही वारसांचीच भूमिका आहे. तेव्हा कॉग्रेसच्या पुनरुत्थानाविषयी पवारांनी बोलण्यात अर्थ नाही. कारण आता भारतीय जनता लाचार राहिलेली नाही. तिने कॉग्रेसला पर्याय शोधला असेल, तर भाजपालाही पर्याय तीच भारतीय जनता उभा करू शकेल.

5 comments:

  1. भाऊ .........वाः !! लेखासाठी फोटो पण भारी निवडला आहे. फोटो बघितल्यावर एकच शब्द आठवतो ...तो म्हणजे ' लवासा '................. शरद पवार , अजित गुलाबचंद आणि शिफारस लवासासाठी !!

    ReplyDelete
  2. फोटोत , ते एक बोट दाखवून म्हणतायेत कि मी एकाच घोटाळ्यात आहे, तर त्या म्हणतायेत कि , मी तर ४ घोटाळे केले आहेत.

    ReplyDelete
  3. भाऊ परंतु पोट निवडणुकांचे निकाल बघितले तर लोक कॉंग्रेस कढे परत जाताना दिसत आहेत . मोदींचा करिष्मा ओसरल्या सारखा वाटतोय .

    ReplyDelete