Friday, December 25, 2015

मास्को टू दिल्ली: व्हाया काबूल, लाहोर



काही गोष्टी इतक्या चमत्कारीक असतात, की दिसते एक आणि असते भलतेच काही. आताही एक गोष्ट अनेकांना चक्रावून सोडणारी घडते आहे, ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मास्कोभेटीची! ठरल्याप्रमाणे मोदी रशिया भेटीसाठी मास्कोला रवाना झालेले होते. त्याची जाहिरात आधीच झालेली होती. पण मास्कोला मोदी रवाना झाले, त्यानंतर त्यात एका नव्या गोष्टीची भर पडली. मास्कोहून मायदेशी माघारी येताना पंतप्रधान अफ़गाणिस्तानची राजधानी काबुलला धावती भेट देतील. मुळातच न ठरलेल्या अशा भेटीचे कारण काय असावे? अशा भेटी व दौरे खुप आधीपासून ठरत असतात आणि त्यांची तयारी खुप आधीपासून झालेली असते. पण इथे काबुलसारख्या शंकास्पद राजधानीला मोदी अकस्मात भेट द्यायला गेले. आणि काबुलची भेट चालू असताना अचानक बातमी आली, की काबुलहून दिल्लीला येताना मोदी वाटेत लाहोर येथे विमानतळावरच थांबतील आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांची तिथेच धावती भेट घेतील. देशांचे राष्ट्रप्रमुख इतक्या सहज धावत्या भेटी घेत असल्याचे आपण सहसा ऐकलेले नाही. त्यामुळेच मोदींच्या काबुल व लाहोर भेटीला चमत्कारीक म्हणावे लागते. पण राष्ट्रप्रमुख असे ‘जाता जाता’ कोणालाही भेटत नसतात किंवा गंमत म्हणून भेटत नसतात. जाता जाता थांबत नसतात. त्यामागे काही राजकीय मुत्सद्दी हेतू नक्कीच असतो. मग या दोन थांब्यांच्या मागे असा कुठला राजनैतिक हेतू असावा? पाकिस्तान वा अफ़गाणिस्तानात अशी कुठली आकस्मिक परिस्थिती उदभवली आहे, की मोदींनी तिथे धावत्या भेटी देण्य़ाची घाई करावी लागली आहे? शिवाय रशियावरून माघारी येत असतानाच त्यांना या धावत्या भेटी घेण्य़ाची गरज कशाला भासली आहे? हे काही गंभीर प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे तितक्याच गांभिर्याने शोधण्याची गरज आहे.

रशियाची भेट खुप आधी ठरलेला विषय होता आणि वाटेत काबुल येथे संसद भवनाचे निर्माण भारतानेच केलेले असल्याने तिथे काही तास थांबण्यात मोठेसे महत्वही नसेल. पण शेवटच्या क्षणी लाहोरला गडबडीने शरीफ़ यांना भेटण्याचे कारण मात्र नक्कीच गंभीर आहे. की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा काही महत्वाचा संदेश मोदींनी अन्य दोन राष्ट्रप्रमुखांना देण्याची जबाबदारी उचलली आहे? जगाचे राजकारण सध्या इराक सिरीयाभोवती घोटाळलेले आहे. त्यातली अतिशय महत्वाची बाजू पुतीन हाताळत आहेत. त्यांच्या डावपेचांनी अमेरिकेलाही गोंधळात टाकलेले आहे. त्याचा संबंध अफ़गाण व पाक राज्यकर्त्यांशी आहे काय? त्याच राजकारणात मोदी काही डाव खेळत असावेत काय? त्याचा शोध घ्यायचा तर पुतीन यांच्या खेळातल्या दुसर्‍या बाजूचे निरिक्षण करावे लागेल. पुतीन यांनी इराक सिरीयातील इसिस विरोधातली लढाई छेडल्यापासून पश्चिम आशिया धगधगू लागला आहे. तिथली समिकरणे बदलू लागली आहेत. तुर्कस्तानने रशियन लढावू विमान पाडले आणि चिडलेले पुतीन यांनी अधिकच आक्रमकपणे इसिस विरोधातले हवाई हल्ले वाढवले आहेत. त्याची झळ बसू लागल्यावर इसिसचा आश्रयदाता सौदी अरेबियाने येमेनची लढाई अर्धवट सोडून इसिसकडे लक्ष दिले आहे. इसिसला संपवण्याच्या गर्जना करीत सौदीने सुन्नी मुस्लिम देशांची एक लढाऊ आघाडी बनवण्याचा पवित्रा घेतला. त्यामध्ये ३४ देशांची नावे आलेली होती व पाकिस्तानचाही त्यात समावेश आहे. मात्र आपल्या संमतीशिवायच सौदीने आपले नाव आघाडीत समाविष्ट केल्याचे पाकने लगेच स्पष्ट केले होते. अफ़गाणिस्तानचेही त्यात नाव आहे. याच संदर्भात मोदी लाहोर-काबुल येथे थांबले असतील काय? तसे असेल तर या आकस्मिक भेटींना महत्व प्राप्त होते. त्याची कारणमिमांसा करता येईल. शरीफ़-मोदी भेटीचा अर्थ शोधता येईल.

मोदींची लाहोर भेट शेवटच्या क्षणी घोषित झाली आहे. म्हणजेच अखेरच्या क्षणापर्यंत त्याविषयी गोपनीयता राखली गेलेली आहे. फ़क्त भारतानेच नाही, तर पाकिस्तान सुद्धा त्याविषयी गोपनीयता कशाला राखतो? ही भेट सहज ‘जाता जाता’ घडलेली दाखवायची आहे काय? की त्यापासून पाक सेनेला अंधारात ठेवून काही देवाणघेवाण करण्याचा हेतू असेल? पाकिस्तानचे राजकारण सेनेला बाजूला ठेवून होत नाही. म्हणूनच पुर्वनियोजित भेटी वा दौर्‍यात सेनेशी मसलत करून मुत्सद्देगिरी चालते. इथे काही मिनीटाच्या भेटीसाठी विमानतळावरच दोन नेते भेटतात, तेव्हा पुर्वतयारी नसते, इतकाच अर्थ होतो. म्हणजेच या भेटीविषयी पाक सेनेला गाफ़ील राखले गेले आहे असा निष्कर्ष काढता येतो. दुसरी बाजू आहे, सौदी सुन्नी आघाडीत पाकिस्तानने सहभागी होण्याची! पाकने त्यात पडू नये अशी पुतीन यांची इच्छा वा इशारा मोदींच्या मार्फ़त थेट शरीफ़ना कळवण्यासाठी ही धावती भेट असावी काय? तशी शक्यता अधिक दिसते. तशी पाकिस्तानची सौदी आघाडीत जाण्याची फ़ारशी इच्छा नाहीच. कारण सध्या तरी पाकला बलुची व जिहादी बंडखोरीने पुरते पछाडलेले आहे. त्यातून इराणसारख्या शेजार्‍याला उरावर घ्यायला पाक सेनाही उत्साही नाही. त्याचा उत्तम मार्ग म्हणजे सौदी आघाडीपासून अलिप्त रहाणेच असू शकतो. तसे करण्यातच पाकिस्तानचे भले असल्याचे पुतीन यांना पाकला सांगायचे असेल, तर ‘जाता जाता’ शरीफ़ना ‘मैत्रीपुर्ण सल्ला’ देण्याचे कष्ट पुतीन यांच्यावतीने मोदींनी घेतलेले असू शकतात. सौदीच्या आघाडीत पाकिस्तान सहभागी झाला, तर व्यावसायिक सेना त्यात सहभागी होऊन सौदीचे पारडे काहीसे जड होते. त्यांना जमिनीवर लढणारे सैनिक हवेत, जे पाकिस्तानपाशी आहेत. सौदीला मिळू शकणारी तीच रसद तोडल्यास सौदीचे पारडे हलके होऊन जाते. तेच मोदींच्या मार्फ़त पाकिस्तानला समजावण्याचा हा प्रयत्न असेल काय?

सोवियत युनियन संपुष्टात आल्यावर युरोप व पश्चिम आशियातील नाटो या अमेरिकाप्रणित सैनिकी आघाडीला मरगळ आलेली आहे. तिची उपयुक्तता संपल्याची धारणा झालेली होती. त्यामुळेच त्यातील एकवाक्यता संपलेली होती. पण रशियाला अजूनही तेच खरे सैनिकी आव्हान आहे. त्यात दुफ़ळी माजवण्यात पुतीन यशस्वी झाले आणि दुसरीकडे त्यांनी इराण लेबेनॉन व सिरीया अशी आघाडी अमेरिकेला शह देण्य़ासाठी उभी केली आहे. तिला पर्याय म्हणून अमेरिकेने मग सौदी तुर्कस्थान इजिप्त जॉर्डन अशा सुन्नी मुस्लिम राष्ट्रांची आघाडी बनवली. त्यातच अन्य सुन्नी देशांना आमंत्रित केले. अमेरिका प्रणित नाटो संघटनेचा हा नवा अवतारच रशियाला खुपतो आहे. तेव्हा त्याला दुर्बळ करायचा तर त्यात सहभागी होऊ शकणार्‍या व्यावसायिक सैन्यदलांना बाजूला काढणे अगत्याचे आहे. त्यात पाकिस्तान, बांगला देशचा समावेश होतो. यातला बांगला देश त्यापासून अलिप्त आहेच. पण पाकिस्तान दबावाखाली आहे. त्याला सौदीपासून तोडण्याची जबाबदारी मोदींनी घेतली आहे काय? तसे नसेल तर आकस्मिक काबुलहून लाहोरला थांबण्याचे दुसरे काही कारण दिसत नाही. पाकिस्तान सध्या भारताच्या दबावाखाली आहे. म्हणून पुतीन यांनी मोदींच्या मार्फ़त ही खेळी केलेली असू शकते. दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. तालिबान व अलकायदा यांनाही पाक प्रभावित करू शकतो. त्याच्या मार्फ़त इसिसच्या विरोधात अलकायदाने अलिप्त रहायचे ठरवले, तर रशियन हल्ल्यासाठी इसिस अधिकच दुबळी शिकार होऊन जाते. हे थेट व नेमके शरीफ़ना समजावण्याचे काम करायला मोदी लाहोरला ‘जाता जाता’ थांबलेले असू शकतात. कारण यापेक्षा त्यांच्या व्हाया लाहोर येण्याचा अन्य अर्थ लागू शकत नाही. अर्थात असे काही असले तरी भारत पाकचा कोणी नेता वा प्रवक्ता ते कबूल करणार नाही, ही बाब वेगळी!

12 comments:

  1. Bhau, the above analysis can be a possibility. I have my personal angle on this... Currently, the province of Helmand in Afghanistan is in danger of falling completely in the hands of 'Taliban' which could be dangerous for Pakistan on north western border. Now, it is an open secret that the Taliban enjoys a great support from Pakistani army and have great support among Pakistani public. Now we also have great financial and political and strategic interests in Afghanistan.... In light of all this, may be Modi ji decided (in advance) to visit Kabul and Islamabad to convey the concerns of India as a nation in this matter. We also know that since Modi ji has become Prime Minister, India has started playing active role in regional geo-politics and have started to stamp its authority.

    ReplyDelete
  2. आत्तापर्यंत जेंव्हा जेंव्हा पूर्व नियोजित भेटी ' हिंदुस्थान आणि पाकिस्तान ' मध्ये ठरविल्या गेलेल्या होत्या तेंव्हा तेंव्हा पाकिस्तानी लष्कराने त्यात विविध मार्गांनी खोडा घालायचा प्रयत्न केलेला होता. मग ते ' येथे येउन आधी ' हुरियत ' च्या लोकांनाच काय भेट किंवा त्यांना भेटायचा ' हट्ट ' काय करा किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्व नियोजित ' लाहोर ' भेटीनंतर मुशर्रफ यांना ' कारगिल ' घडविण्यासाठी मिळालेला भरपूर वेळ............परंतु मागील महिन्यात हिंदुस्थानचे सुरक्षा प्रमुख ' अजित डोवल ' आणि पाकिस्तान च्या सुरक्षा प्रमुखांची झालेली ' बेन्कोक ' येथील भेट हि भेट झाल्यानंतरच येथील ' मिडिया ' व पाकिस्तान ' मिडिया ' ला कळाली होती. त्यामुळे तीत खोडा घालण्याची संधीच ' मधल्या ' लोकांना ' मिळाली नाही. आताही पाकिस्तानच्या लष्कर व ' हाफिज सैद ' यांना खोडा घालण्याची ' संधी ' मिळाली नाही. याशिवायही काही गूढ ' राजनैतिक डावपेच ' आहेतच. येथील मिडिया ला अंधारात ' ठेवल्या ' मुळे त्यांचीहि पोटदुखी समोर आली आहे. बरखा दत्त हिने तर या भेटीवर ' विचित्र ' प्रतिक्रिया ट्वीटरवर दिली आहे. ' खान्ग्रेस ' ने तर आज मोदी यांचे पुतळे जाळून आपली ' दिवाळखोरी ' जाहीरपणे दाखविली आहे. आत्तापर्यंत या पद्धतीच्या ' डिप्लोमसी ' चा परिचय नसल्यामुळे सर्वांच्या चित्र-विचित्र ' प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सर्वात ' बिनडोक ' प्रतिक्रिया श्री. संजय राउत ( संपादक - सामना ' ) यांची टीवी वर पाहायला मिळाली. उद्या ' दाउद इब्राहीमचा ' वाढदिवसाचा ' उल्लेख या भेटी बरोबर करणे म्हणजे मुर्ख पणाचा ' कळस ' च होय.

    ReplyDelete
  3. आश्चर्यचकित करणारे सुंदर विवेचन. परंतु भाऊ, अश्या राष्टहिताच्या गोष्टी इथे उघड करणे देशहिताला मारक होणार नाही ना? कारण तुमच्या मर्मभेदी लेखनामुळे हे लिखाण फार लोकप्रिय आहे. ते देशहित विरोधी किंवा नुसते साधे बावळट लोकही नक्की वाचत असणार. शिवाय इतर कुटील राजनीतिज्ञाना हे इतके रेडीमेड मटेरियल कशाला देते असे वाटते बुवा. वाटले ते लिहून टाकत आहे, 'वाटले ते लिहून टाकू नका' असा सल्ला देत असतानाच. विरोधाभास आहे, परंतु इलाज नाही. ह्या लेखाचा दर्जा केवळ देशाच्या परराष्ट्र विभागातल्या निवडक सर्कल्समध्येच शेयर होणे योग्य वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी हरामखोरान्ना आयते मटेरिअल मीळु सकते तसेच देशहिताच्या द्रृष्टीने घातक असु सकते पण असे मर्मभेदी लिहणारे आपनच आहात पण फिल्टर असावे ।

      Delete
  4. हा हा , गम्मत अशी आहे कि भाजप विरोधात असते तेव्हा पाकिस्तान बरोबर संवाद करू देत नाही , आणि power मध्ये आले कि पाकिस्तान ला भेटायचे stunt करते . मग ते मोडी असो किंवा वाजपेई असो . आता भक्त आहेच गुणगान गायला !! मोडी नि stunt पेक्षा policy वर भर द्यावा, जी सध्या तरी कुठे दिसत नाही .

    ReplyDelete
  5. शिवाय ही मध्यस्थी करून मोदी भारतासाठी काय मिळवतात हे ही नंतरच कळेल

    ReplyDelete
  6. भाऊ, धन्यवाद.
    जागतिक दहशतवाद अखेर भारताच्या भरीव सहकार्यानेच संपुष्टात येणार हे निश्चित.

    मात्र आपल्यातीलच काही नतद्रष्टांना हे कधीच समजणार नाही, ही खेदाची बाब आहे.
    ॥जय श्रीराम॥

    ReplyDelete
  7. Good analysis. You think of and analyse the situation in a totally different way which we, the common people, can't think of.

    ReplyDelete
  8. भाऊ यातून मोदींना आणि पर्यायाने भारत सरकार ला पाकिस्तान ला एक गर्भित इशारा तर द्यायचा नसेल कि आम्ही कोणत्याही क्षणी पाकिस्तानी सैन्याला गाफील ठेवून पाकिस्तानात येऊ शकतो । कृपया आपली प्रतिक्रिया द्यावी ।

    ReplyDelete
  9. श्रीनिवास बेलासरेंच १००% पटले. भाऊंनी ह्यावर विचार करावा.

    ReplyDelete
  10. हे तिस-या महायुद्धाचे नेपथ्य तर नव्हे?

    ReplyDelete