Saturday, January 2, 2016

मोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी



२ मे २०११ रोजी एका आकस्मिक हल्ल्यात अमेरिकन कमांडो पथकाने पाकिस्तानच्या लष्करी तळावर मर्यादित छापा मारून तिथे दडलेल्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा केलेला होता. त्यातला तपशील जगजाहिर आहे. तो सगळा प्रसंग इथे नमूद करण्याची गरज नाही. पण त्यामुळे पाकिस्तानचे जगभर नाक कापले गेले होते. पाकिस्तानी सेनेला तर तोंड दाखवायला जागा राहिलेली नव्हती. त्यानंतर तिथे शिव्याशापाचे नाट्यही रंगले आणि पाकिस्तानी सार्वभौमत्वाचे अमेरिकेने उल्लंघन केल्याचाही खुप गाजावाजा झालेला होता. पण अमेरिकेला ‘धडा’ शिकवण्य़ाची कुवत नसलेल्या पाकसेना किंवा हेरखात्याला अधिक काही करता आलेले नव्हते. पण ठुसठुसणारी वेदना त्यांना शांत बसू देत नव्हती. आपल्याच जनतेसमोर काही पराक्रम करून दाखवण्य़ाला पर्याय नव्हता. म्हणून मग पाकिस्तानने अमेरिकेचे आपण मांडलिक नसल्याचे नाटक रंगवणारी एक कृती केलेली होती. कराची बंदरातून अफ़गाणिस्तानला जाणार्‍या अमेरिकन साहित्य पुरवठ्याची रसद तोडलेली होती. त्यावर बंदी घातली होती. त्यामुळे फ़ारसे काही नुकसान झाले नाही, की अमेरिकेच्या अफ़गाण राजकारणाला धक्का बसला नाही. पण आपण अमेरिकेचे गुलाम नाही वा अमेरिकेलाही दाद देत नाही, असे भासवण्यात पाक सेना व गुप्तचर खात्याला यश मिळाले होते. ओसामाची हत्या हा पाकसेना व हेरखात्याची देशाच्या घडमोडींवर असलेली पकड ढिली पडल्याचा पुरावा होता. कारण लष्कराच्या मुख्यालयाच्या नजिक असलेल्या सुरक्षित घरात घुसून अमेरिकन कमांडोंनी ती धाडसी कारवाई केली होती. नुसती कारवाई केली नाही, तर ओसामाच्या मृतदेहासह हे कमांडो सुखरूप पाकिस्तानातून निसटले होते. कुठल्याही सुरक्षा दल वा हेरखात्यासाठी ही नामुष्कीची गोष्ट असते. साडेचार वर्षांनी काहीशी तशीच घटना आठवड्यापुर्वी घडली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाभेट उरकून माघारी मायदेशी येत असताना काबुल येथे काही कार्यक्रमासाठी थांबले होते. मग दिल्लीला येताना त्यांनी अकस्मात पाकिस्तानला जायचा निर्णय घेतला आणि अवघ्या दोन तासात ते लाहोरला पोहोचले सुद्धा! त्यांच्या स्वागताला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ही अगत्याने उपस्थित राहिले आणि मोदींना घेऊन आपल्या घरीही गेले. घरगुती कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली आणि त्यांच्यासोबत त्यांचे निवडक अंगरक्षकही होते. ही बाब वरकरणी अगदी साधी सोपी किंवा आगावू धाडसाची वाटणेही स्वाभाविक आहे. कारण भारतीय पंतप्रधानाच्या जीवाला पाकिस्तानात धोका आहे. विशेषत: मोदीद्वेष त्याचे आणखी एक कारण आहे. म्हणून मोदींनी हा आगावूपणा करायला नको होता, असेही मानले जाते. त्यात तथ्य जरूर आहे. पण खरेच धोका होता काय? कोणाकडून असा धोका मोदींना होता? ज्यांच्यापासून धोका संभवत होता, त्यांनाच गाफ़ील ठेवले तर धोका उरत नसतो. नेमकी तीच काळजी लाहोर भेटीच्या निमीत्ताने घेतली गेलेली होती. अवघा एक तास आधी काबुलहून बातमी आली, की भारताचा पंतप्रधान लाहोरला धावती भेट देणार आणि तिथेच नवाज शरीफ़ व मोदी भेट होणार आहे. प्रत्यक्षात मोदी लाहोरला पोहोचले, तेव्हा अखेरच्या क्षणी शरीफ़ त्यांना हेलिकॉप्टरने आपल्या खानदानी घरी घेऊन गेले. म्हणजे मोदी लाहोर विमानतळ सोडून बाहेर जाणार याविषयीही शेवटच्या क्षणापर्यंत पाक प्रशासनाला अंधारात ठेवले गेले. पर्यायाने हेरखाते व पाकसेनेलाही अंधारात ठेवले गेले. आपल्याशिवाय पाकच्या नागरी सरकारचे पानही हलत नाही अशी मस्ती असलेल्यांना त्यामुळे मिरच्या झोंबल्या तर नवल नाही. पाकचा पंतप्रधान असे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण मोदींच्या लाहोरभेटीने त्यालाच तडा गेलेला आहे. त्यामुळे पाकसेना व हेरखात्याला डिवचले गेले आहे.

यातली एक महत्वाची बाब भारतीय वा जागतिक माध्यमात कुठेच चर्चिली गेली नाही. मोदींनी वा भारतीय विमानाने पाकिस्तानी विमानतळावर उतरणे वा शरीफ़ यांनी तिथे येऊन मोदींची भेट घेण्यात काहीही आक्षेपार्ह नाही. कुठलेही गैरलागू कृत्य त्यातून झाले असेही म्हणायला जागा नाही. कारण आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेली शासकीय यंत्रणा कोणाला देशात प्रवेश द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेत असते. विमानतळाच्या बाहेर तुम्ही त्या देशाच व्हिसा असल्याशिवाय जाऊ शकत नाही. पण मोदी आपल्या मोजक्या अंगरक्षकांसह तिथून हेलिकॉप्टरने विमानतळाच्या कक्षेबाहेर गेलेले होते. निदान सव्वा तास मोदींचा ताफ़ा शरीफ़ यांच्यासोबत लाहोरपासून दूर असलेल्या खानदानी घरी गेलेला होता. यातल्या कितीजणांपाशी पाकिस्तानचा व्हिसा होता? मोदी पंतप्रधान असल्याने त्यांच्यापाशी विविध देशांचा व्हिसा असू शकेल. पण त्यांच्या सर्व सहकारी व अंगरक्षकांपाशी पाकिस्तानचा व्हिसा नक्कीच नव्हता. त्यात कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याविषयी पाक सरकारलाही संपुर्ण माहिती नव्हती. म्हणजेच मोदींनी शरीफ़ यांच्या घरगुती कार्यक्रमाला हजर रहाण्यातून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला तडा दिला गेला आहे. भले त्यांना शरीफ़ घेऊन गेले असतील. पण त्यात राजशिष्टाचारच नव्हेतर कायदाही मोडला गेलेला आहे. त्यातून एकप्रकारे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेला व कार्यशैलीला बगल दिली गेलेली आहे. दोन देशांचे प्रमुख कितीही व्यक्तीगत मित्र असले, तरी त्यांना देशाचे वा कुठलेही कायदे मोडण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. मुशर्रफ़ यांच्या कारकिर्दीत शरीफ़ सौदी अरेबियात परागंदा जीवन जगत होते आणि त्यांनी पाकिस्तानात येण्याचा आगावूपणा केला, तेव्हा त्यांना विमानतळावरून पिटाळून लावल्याचे राजकीय नाट्य रंगलेले होते. मग त्याच कृतीला मोदी अपवाद कसे असू शकतात?

पाकसेना व हेरखात्याला म्हणूनच मोदींची लाहोरभेट खुपलेली आहे. शरीफ़ यांनी मोदींशी संगनमत करून आपल्याला उल्लू बनवले, ही त्यांची वेदना असल्यास आश्चर्य नाही. शरीफ़ भारताशी कितीही दोस्तीला प्रयत्न करतील, पण शरीफ़ हा पाकिस्तानचा अखेरचा शब्द नाही आणि त्यांनी मान्य केलेल्या गोष्टी पाक सेना व हेरखाते मान्य करणार नाही, हे कुठून तरी दाखवून द्यायला हवे ना? ते दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भारतात कुठेतरी मोठा धमाकेबाज घातपाती हल्ला करणे होय. तीच गोष्ट शनिवारी पठाणकोटच्या हल्ल्यातून साधली गेली आहे. त्या हल्ल्याचे नियोजन बारकाईने केलेले होते. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण अशा हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन तिथे आधीपासून प्रतिकाराची सज्जता राखलेली होती. पण असा हल्ला इतक्या घाईगर्दीने करण्यामागे पाक सेना व हेरखात्याचे नैराश्य मात्र स्पष्ट होते. काहीतरी तातडीने करायचे म्हणून हा हल्ला झालेला आहे. आणि त्यावरच्या भारत सरकारच्या अधिकृत प्रतिक्रीयाही बोलक्या आहेत. प्रथमच भारत सरकार थेट पाकिस्तानला दोष देत नसून पाक सेना व हेरखात्यावर हल्ल्याचे खापर फ़ोडते आहे. सेना व हेरखाते यांच्यापासून पाक नागरी सत्ता व राजकारणी यांना वेगळे पाडण्याचा हा प्रयत्न लपून रहात नाही. दोन देशातली बोलणी हा देखावा असू शकतो, यापेक्षा पाकिस्तानवर असलेली लष्कर व हेरखात्याची पकड सैल करण्याचा डावपे़च यामागे असावा अशीच शंका येते. शरीफ़ व मोदी असे दोन राष्ट्रप्रमुख कुठले समान संयुक्त उद्दीष्ट गाठण्याचा प्रयास करीत आहेत, त्याचे विवेचन विश्लेषण म्हणूनच नुसता जुना इतिहास उगाळून होऊ शकणार नाही. त्यामागची कुटनिती व हेतू शोधून अभ्यासावे लागतील. आपल्याच सेना व हेरखात्याला शरीफ़ अंधारात ठेवून काय साधू इच्छितात? पाक सेनापती इतके हताश का झालेत? (अपुर्ण)

9 comments:

  1. मी हे हिंदी मधे भाषान्तर करतो आहे,
    तेजांशू

    ReplyDelete
  2. >>निदान सव्वा तास मोदींचा ताफ़ा शरीफ़ यांच्यासोबत लाहोरपासून दूर असलेल्या खानदानी घरी गेलेला होता. यातल्या कितीजणांपाशी पाकिस्तानचा व्हिसा होता? मोदी पंतप्रधान असल्याने त्यांच्यापाशी विविध देशांचा व्हिसा असू शकेल. पण त्यांच्या सर्व सहकारी व अंगरक्षकांपाशी पाकिस्तानचा व्हिसा नक्कीच नव्हता.>> Narendra Modinchya dhavatya Lahore bhetee sathi 11 janana 72 tasancha emergency visa denyat aalela hota. Asha prakare emergency visa atishay high profile vyakti aani tyanchya tafyateel vyaktina achanak pane deta yeu shakato. ---------Aparna Lalingkar

    ReplyDelete
  3. बुद्धिः कर्मानुसारिणी ।

    ReplyDelete
  4. छान भाऊ मस्त

    ReplyDelete
  5. भाऊराव,

    घडलेल्या घटनांचं अगदी अचूक विश्लेषण केलंय. धन्यवाद! :-)

    मोदींची चाल (स्ट्रॅटेजी) स्पष्ट आहे. शरीफ यांना पाठींबा देऊन पाकी सैन्याचा प्रभाव अस्तंगत करायचा. एकदा का शरीफांचं बूड स्थिर झालं की त्यांच्या स्टीलच्या व्यापारातून त्यांना भारतीय हितसंबंधींशी घट्ट बांधून ठेवायचं. अशा प्रकारे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करायचं. स्टील उद्योगात बक्कळ पैसा आहे. भारतीय स्टील उद्योग दहा बॉलीवूडं सहज विकत घेऊ शकेल. मोदींनी बरोब्बर व्यापारी चाल रचलेली दिसतेय. त्यांना (म्हणजेच आपल्या सर्वांना) शुभेच्छा.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  6. Hyat Narendra Modinchi kahihi mutsaddehiri nasun ha shuddha murkhapana hotaa! Chukila chook mhanayla shika .. jumlegirikarun phar lamb palla gathta yet nasto.
    Modi aani Sharif hyanchya bhetimage parkiya shakti (audyogik kinvha rajakiya) asavi. Tyashivay he shakya nahi. Business ke liye kuch bhi karega?

    ReplyDelete