Thursday, February 18, 2016

देशद्रोही घोषणा आणि राजकीय सापळा

जित्याची खोड म्हणतात तशी हल्ली डाव्यांची मती चालेनाशी झाली आहे. अन्यथा पुरोगाम्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या भानगडीत आत्महत्येचा पवित्रा कशाला घेतला असता? ९ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी अफ़जल गुरूला दहशतवादी म्हणून फ़ाशीची शिक्षा देण्यात आली. म्हणजे त्या दिवशी त्याची अंमलबजावणी झाली. त्याचे निमीत्त धरून काही डाव्यांनी नेहरू विद्यापीठात ‘पुण्यतिथी’ साजरी करण्याचा घाट घातला. त्यात अफ़जलचा जयजयकार झाला, हे स्वाभाविक आहे. पण तिथे भारतविरोधी घोषणा देण्यात आल्यावर त्याला राष्ट्रद्रोहाचे लेबल लागले आणि अन्यथा भाजपापासून फ़टकून रहाणार्‍या काही माध्यमांना डाव्या भूमिकेवर देशद्रोहाचा आरोप करावा लागला. खरे तर त्यापासून सावधपणे पुरोगाम्यांनी आपले अंग काढून घ्यायला हवे होते. पण संघद्वेष आणि मुस्लिमांचे लांगुलचालन करण्य़ाची सवय इतकी अंगवळणी पडली आहे, की रचलेल्या सापळ्यात पुरोगामी अर्धवटराव आयतेच उड्या मारत गेले. बारकाईने हा घटनाक्रम बघितला, तर त्यातला सापळा स्पष्ट होतो. त्या घटनेनंतर प्रथम तिथे भारतविरोधी घोषणा दिल्याचा गवगवा सोशल माध्यमातून झाला. तो व्हिडीओ इतका सार्वत्रिक झाला, की मुख्यप्रवाहातील माध्यमांना त्याची दखल घ्यावीच लागली. तेव्हा हे चित्रण अस्पष्ट वा धुरकट होते आणि त्यातून फ़ारसे काही स्पाष्ट कळत नव्हते. सहाजिकच त्याविषयी शंका घ्यायला जागा होती. त्याचाच फ़ायदा पुरोगामी उचलणार, हे काही लोकांना नेमके ठाऊक असावे. किंबहूना पुरावे फ़ारसे भक्कम सज्जड नाहीत, अशा भ्रमात डाव्यांना फ़सवण्याचा त्यामागे डाव असू शकतो. झालेही तसेच! कारण त्या किरकोळ चित्रणाचा आधार घेऊन काहुर माजले आणि राजकारण रंगू लागल्यावर, त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावाच लागला. ते घडल्यावर आपल्या ‘पोरांसाठी’ तमाम पुरोगामी रस्त्यावर येणार याची ‘चित्रण प्रदर्शित’ करणार्‍याला खात्री असावी. म्हणूनच संपुर्ण चित्रण वा पुरावे सादर करायचे टाळून लावलेला, हा एक सापळा असावा अशी शंका घ्यायला जागा आहे. ज्या सापळ्यात डावे फ़सले, मगच जाळे ओढायचा खरा डाव असावा.
विद्यार्थी संघटनेच्या म्होरक्याला अटक झाल्यावर अपेक्षेप्रमाणे तमाम पुरोगाम्यांनी त्यावर आधाश्यासारखी झडप घातली. मोदी सरकार विरोधात असंहिष्णुतेचा खजीनाच हाती लागला, म्हणून उतावळेपणाने त्या किरकोळ चित्रणावर शंका घेतल्या गेल्या आणि देशद्रोही घोषणांचेही समर्थन करण्यापर्यंत मजल मारली गेली. त्यातून पुरोगामी देशद्रोही व भारतविरोधी भूमिकेलाही पाठबळ देऊ शकतील, असेच चित्र रंगवायचे असावे. सगळेच चित्रण व पुरावे ठामपणे देशविरोधी असल्याचे आधीच स्पष्ट झाले असते, तर पुरोगामी नेत्यांनी व पक्षांनी त्याचा पाठपुरावा नक्कीच केला नसता. पण शंकास्पद पुरावे असल्यानेच त्यांनी पाठींब्याचा जुगार खेळायचा धोका पत्करला. तो पत्करला आणि त्यासाठी थेट राहुल गांधींपासून अनेक पुरोगामी नेत्यांनी विद्यापीठात हजेरी लावल्यानंतर त्यांना माघार घेण्यास जागा राहिलेली नव्हती. म्हणून रविवारपर्यंत खरे व भक्कम पुरावे झाकून ठेवण्यात आलेले होते काय? ठामपणे पुरोगामी नेत्यांनी अटकेतील विद्यार्थ्यांचे समर्थन केल्यावर सोमवारी धडाधड अनेक चित्रणे समोर आणली गेली. ज्यामध्ये शेकड्यांचा जमाव स्पष्ट आवाजात भारतविरोधी देशद्रोही घोषणा देत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. मुद्दा इतकाच, की हे बाकीचे विस्तृत चित्रण पहिल्यापासून समोर का आणले गेले नाही? ते आले असते, तर पुरोगामी नेत्यांनी या भानगडीपासून स्वत:ला सावधपणे चार हात दूर ठेवले असते. भले अटक झालेल्यांविषयी सहानुभूती दाखवली असती. पण मैदानात उतरून समर्थन नक्कीच केले नसते. घडले त्या पापाचे तात्विक समर्थन करायचा मुर्खपणा तरी केला नसला. पण त्यांची दिशाभूल होईल आणि ते देशद्रोही घोषणांच्या समर्थनाला येतील, यासाठी अर्धवट चित्रणाचा सापळा कोणीतरी लावलेला होता. मात्र गृह मंत्रालयाकडे हे संपुर्ण चित्रण प्रथमपासून नक्की असावे. म्हणूनच त्याच्या आधारे धरपकड झाली. अधिक राजनाथ सिंग यांनी भक्कम पुरावे असल्याची भाषा केलेली होती. म्हणूनच त्या अटकेला कोर्टाकडून प्रतिसाद मिळू शकला. मुद्दा असा, की यातून कोणता राजकीय डाव साधला गेला किंवा योजला गेला आहे?
आपली स्मरणशक्ती दुबळी नसेल, तर काही आठवणी जागवणे योग्य ठरेल. गेल्या आठ दिवसात हजारो वेळा त्या चित्रणाचे बहुतांश वाहिन्यांवरून प्रक्षेपण झाले आहे आणि अजूनही होतेच आहे. त्या चित्रातून व त्यासोबतच्या शब्दातून जनमानसावर एक गडद ठसा उमटत असतो. अशा घोषणा देण्याने देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध होतो किंवा नाही, हा विषय राजकारणात दुय्यम असतो. त्यापेक्षा त्यातून जनतेच्या मनावर कोणता प्रभाव पडत असतो, त्याला मोठे महत्व असते. चार वर्षापुर्वी असेच एक चित्रण वाहिन्यांवरील बातम्यांचे आकर्षण झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी सदभावना यात्रा केलेली होती, त्यानिमीत्त हजारो लोकांनी त्यांची व्यक्तीश: भेट घेतली. त्यात मुस्लिमही होते. अशाच एका समारंभात एक मुस्लिम मौलवी मोदींना टोपी देतानाचा प्रसंग आला. त्याला तिथेच रोखून नुसत्या हावभावातून आपल्याला ती मुस्लिम टोपी नको असल्याचे मोदींनी सुचित केलेले होते. त्यात कुठला आवाज नव्हता, की शब्द नव्हते. पण मुस्लिमाने दिलेली टोपी नाकारून मोदींनी इस्लामचा अवमान केल्याचा कल्लोळ काही दिवस चालू राहिला. त्यानंतरही अनेकदा तेच चित्रण वारंवार दाखवले जात होते. त्यातून मोदींची मुस्लिमविरोधी प्रतिमा रंगवण्यासाठी माध्यमांनी, वाहिन्यांनी व राजकारण्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अर्थात त्यामागे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून मोदी बाद व्हावेत, हाच हेतू होता. मात्र परिणाम उलटाच होत गेला. त्याच सततच्या प्रक्षेपणातून हिंदूत्वाचा कट्टर अभिमानी, मुस्लिमांचे धार्मिक लाड न करणारा नेता अशी प्रतिमा जनमानसात उभी करण्याचे महान कार्य त्यातून पार पडले. म्हणजे जे काम मोदी विरोधासाठी झाले, त्यातूनच त्यांची भारतभर एक कणखर हिंदू नेता अशी प्रतिमा उभी राहिली. त्याचा राजकीय लाभ २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदी व भाजपाला झाला. आताही भारतविरोधी घोषणांचा जो रतिब गेले आठवडाभर घातला जात आहे आणि आणखी काही दिवस घातला जाईल, त्यातून कोणता प्रभाव जनमतावर पडणार आहे? पुरोगामी म्हणजे भारतविरोधी देशद्रोही, अशी मोदी विरोधकांची प्रतिमा यातून उभी रहाण्याच हातभार लागला आहे की नाही? आपल्याच मनाशी हा प्रश्न विचारून बघा. उत्तर सोपे आहे. म्हणूनच हा एक सुनियोजित डाव वाटतो.
हा विषय पुढले काही दिवस चर्चेत रहाणार आहे. त्यात सतत नेहरू विद्यापीठातल्या त्या देशद्रोही घोषणा दाखवल्या जातील. त्याचा बचाव करण्याखेरीज डाव्या पुरोगामी राजकारण्यांना पर्याय नाही. कारण माघार घेतली तर आधी मुर्खपणा केलेला दिसेल. म्हणून आधीच्या उतावळेपणाचा पाठपुरावा करावाच लागेल. तो करताना देशद्रोही हे मत अधिक घट्ट होत जाईल. कारण सहा दिवस नंतर समोर आलेले चित्रण अधिक स्पष्ट आहे आणि त्यातून त्या समारंभातील भारताच्या विरोधातली घातपाती भूमिका लपून रहात नाही. त्यामुळे संबंधितांना शिक्षापात्र ठरवणे शक्य असो किंवा नसो, त्याचा मतांवर परिणाम होत नाही. उद्या भले अटकेतील विद्यार्थी कायदेशीर पुराव्याअभावी निर्दोष मुक्त होतील. पण जनतेच्या कोर्टामध्ये पुरोगामी म्हणजे देशद्रोही, अशी प्रतिमा उभी करण्याचा डाव यशस्वी झाला आहे. म्हणूनच आरंभी किरकोळ अस्पष्ट चित्रण आणले जाणे आणि काही दिवसांनी अधिकाधिक विस्तृत चित्रण समोर आणले जाणे, हा पुरोगाम्यांना सापळ्यात ओढण्याचा डाव वाटतो. पण पुण्याच्या फ़िल्म संस्थेतील संपापासून, हैद्राबादच्या रोहित आत्महत्येपर्यंत आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कार वापसीपासून विविध असंहिष्णुतेच्या आरोपापर्यंत पुरोगाम्यांनी उठवलेले रान इतके प्रभावी प्रचाराचे ठरले होते, की त्यात ही मंडळी कमालीची शेफ़ारून गेलेली होती. तशा अवस्थेत विवेकाचा तोल सुटतो आणि तारतम्याचे भान उरत नाही, लागोपाठ चौकार षटकार मारताना फ़लंदाजाने बेभान व्हावे, तशी स्थिती येते. नेहरू विद्यापीठातल्या घटनेने त्याचीच प्रचिती आलेली आहे. पुरोगाम्यांसाठी लावलेल्या राजकीय सापळ्यात ते आयते अडकले आहेत आणि म्हणून नंतर पुढे आणले गेलेले चित्रण हे योगायोग नसून, त्यामागे एक राजकीय योजना असल्याचा संशय येतो. पुरोगामी म्हणजे हिंदूत्वविरोधीच नव्हेत, तर भारतविरोधी होत, असे जनमानस घडवण्याचा तो डाव असू शकतो. कोळ्याच्या जाळ्यात फ़सलेला किटक जसा सुटण्याची धडपड करताना त्यात अधिकच फ़सत गुरफ़टत जातो, तसे या जाळ्यात पुरोगामी फ़सले आहेत आणि गुरफ़टत गेले आहेत. सुटायला धडपडतील तितके अधिक गुंतत जात आहेत.

16 comments:

  1. तुम्ही म्हणता तसे खरच असेल तर मान गये...
    त्याला तुम्ही नियोजन म्हणा किंवा काहीही, पण मुळात पुरोगामी हे देशविरोधी आहेतच हेच तर सिद्ध झालय. बहुरूपीच्या चेहऱ्यावरचा मुखवटा निघाला किंवा काढला. जसे xray machine मध्ये सगळे कळते, आत काय बाहेर काय. असेच समजा हि xray test होती. ज्यामध्ये पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडले.

    ReplyDelete
  2. भाऊ हे जर खरे असेल तर सापळा रचणारा हुशार आहे उसे धन्यवाद देना चाहिए भाऊ मस्त निरीक्षण या महान रचनाकाराचे अभिनंदन या चोरांना अशिच शिक्षा मिळायला हवी

    ReplyDelete
  3. भाऊ एकदम मस्त लेख !!..........हा सापळाच असावा ........!! सापळ्यात हे उंदीर असे अलगद फसले याचे आश्चर्य वाटते आणि सापाला लावणार्याचे कौतुक वाटते.

    ReplyDelete
  4. भाऊ माफ़ करा पण आज कही तरी गफलत जाली आहे तुमच्या निरीक्षणात्। ..कारण क्लियर वीडियो माज़्या कड़े १० पासूनच आला होता। ....कदाचित मी अपवाद असेन

    ReplyDelete
    Replies
    1. अहो अनुप सातम, तुमच्याकडे स्पष्ट चलच्चित्र आधीपासूनच होतं म्हणजेच भाजपवाल्यांनी हा सापळा रचला होता. मात्र स्पष्ट चलच्चित्रे त्यांना पूर्णपणे दाबून ठेवता आली नाहीत. भाजपतल्या कोणीतरी उच्चपदस्थाने गद्दारी करून गुप्त चालच्चित्र अगोदरच फोडलं.

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
  5. Hats off to you Bhau., Your statement of leftist hand in gloves with anti nationals is seen today when they oppose hoisting of tricolour flag in universities. Where will these rogues go to malign our country?

    ReplyDelete
  6. Not kanhai bu umar Khalid shouting anti India slogans was available on video from day 1. So not sure about this theory.

    ReplyDelete
  7. They are trying to use the students for their purpose. But now 'somebody' led their plan to absolute failure.

    ReplyDelete
  8. JNU Anti-India event conspirator Umar Khalid's father SQR Ilyasi is former Chief of banned outfit SIMI.

    ReplyDelete
  9. https://pbs.twimg.com/media/Cbg_YluW8AEgdOb.jpg:large

    ReplyDelete
  10. हा सापळा लावला गेलाय की हेडली प्रकरण जास्त चघळले जाऊ नये यासाठी हेतूपुरस्सर केेलेली घडामोड आहे कोण जाणे. एका बातमीला counter attack म्हणून दुसरी बातमी असा काहीसा सामना खेळला जातोय असे भासतेय.

    ReplyDelete
  11. Khup chaan vishleshan ahe

    ReplyDelete
  12. निदान हा सापळा लावल्यामुळे हे बिळात लपलेले देशद्रोही साप बाहेर तरी आले आणि देशाला माहित तरी पडले आता मतदान करताना जास्त विचार करावा लागणार नाही कारण एकवेळ भ्रष्टाचारी पण चालेल पण देशद्रोह्याला माफी नाही म्हणजे नाही

    ReplyDelete
  13. भाऊ, मलातरी असे वाटते कीं ही सेकुलर माध्यमे मोदींच्या पुढच्या निवडणुकीसाठी आत्ताच प्रचाराला लागली आहेत.या गोष्टी मोदींना फारच मदत करणार आहेत.

    ReplyDelete
  14. Shri Bhau
    Tumhi mhanta te khare asave hi prarthana.
    Shevti ya aslya lokana expose karave lagnarach hote nahitar he kay kartil bharosa nahi.
    Parat dav fukt yanich khelave asa kahi niyam nahi.
    Sau sunar ki aur ek lohar ki.

    Basa bomblat aata desh drohyano.

    Jayhind.

    ReplyDelete
  15. मेघना आपटेMay 23, 2017 at 10:46 PM

    सापळा लावायची वेळ केव्हा येते भाऊ? विनाशकारी उंदरांना पकडायला ना?
    मग या लेखात पुरोगामी देशासाठी विनाशकारी आहेत, हेच सिध्द होतंय!

    ReplyDelete