हनुमंतप्पा कोप्पड,
तु्ला श्रद्धांजली कुठल्या तोंडाने शब्दांनी अर्पण करु? तितकी लायकी तरी आमच्यापाशी आहे काय? आता अनेकजण शब्दांच्या राशी ओतून आत्मियतेचे उमाळे काढतील. जागोजागी तुझ्यासाठी मेणबत्त्या पेटवल्या जातील आणि शहीद म्हणून गौरवाने तुझी छायाचित्रे झळकवली जातील. पण तुझ्याखेरीज त्या नऊ सहकार्याची नावेही आम्हाला ठाऊक नाहीत. त्यांचे चेहरेही आम्हाला ओळखता येणार नाहीत. त्यांनी शेवटचा श्वास घेऊन इहलोकीची यात्रा संपवली आणि तू एकटाच त्यांच्या हौतात्म्याची दखल घेतली जावी, म्हणून जीव मुठीत धरून त्या शत्रूवत निसर्गाशी झुंजत राहिलास, म्हणून तुझा चेहरा आमच्यापर्यंत पोहोचू शकला. आमचे लक्ष तुझ्या त्या नऊ सहकार्यांकडे गेले. अन्यथा आम्ही कधी तुझी दखल घेतली होती? तुझ्यासारखे कितीजण तिथे बर्फ़ातल्या यज्ञयागामध्ये आत्माहुती देऊन शहीद होऊन गेलेत. आम्हाला त्यांची ओळखही कधी होऊ शकली नाही. कसे कर्मदरिद्री रे आम्ही? ज्यांनी आमच्या सुरक्षित जगण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे, त्यांची साधी तोंडओळखही आम्हाला नाही. पण जे आमच्या जीवावर उठलेत आणि ज्यांनी आमच्या जगण्यातला प्रत्येक क्षण अशक्य व सुरक्षित करून ठेवलाय, त्यांची नावे चेहरे आम्हाला पक्के ठाऊक आहेत. आम्ही कसाब, अफ़जल गुरूला चेहर्याने ओळखतो. आम्हाला याकुब मेमनचा चेहरा विसरूनही आठवतो. पण तुझ्यासारख्यांची ओळखही नसते. देशावर आपला जीव ओवाळून टाकणार्या जवान सैनिकांची आमच्या नित्यजीवनात कुठे दाद आठवणही नसते. गवगवा होत असतो, जीवावर उठलेल्या शत्रूंचा! यापेक्षा करंटेपणा कुठला असू शकतो ना? मग सांग हनुमंतप्पा, कुठल्या तोंडाने तुला श्रद्धांजली अर्पण करू? असली ढोंगी श्रद्धांजली तुझ्या हौतात्म्याची विटंबना असेल, अशी भिती वाटते रे! कुठून इतके देशप्रेम आणि देशभक्ती तुमच्यात जन्म घेते तेच उमजत नाही. अशा ढोंगी समाजातही तुमच्यासारखे सुपुत्र भारतमातेच्या कुशीत जन्म घेतात, म्हणून हा देश टिकून राहिलाय. नाहीतर तो कधीच इतिहासजमा होऊन गेला असता.
हनुमंतप्पा, आठवडाभर आधीपर्यंत तुझे नावही ठाऊक नव्हते रे! त्या दिवशी तुझ्यासारख्याच काहीजणांनी त्या रक्त गोठवणार्या थंडीतून तुम्हा बेपत्ता सैनिकांचा शोध घेतला आणि त्यात तू अखेरचे श्वास घेत असताना सापडलास. म्हणून इतके कौतुक! नाहीतर दहा जवान बर्फ़ाच्या वादळात गाडले गेल्याच्या बातमीने तुमचा विषय संपला होता. आम्ही रोहितची आत्महत्या नाहीतर तशाच कुठल्या शिळ्या कढीला ऊत आणण्यात रमलो होतो. कोणी उत्तरप्रदेशात तालुका अध्यक्षाची निवडणूक जिंकला म्हणून हवेत गोळीबार करीत होता. तर कोणी चित्रपट पारितोषिकांच्या चमचमणार्या बातम्यात दिपून गेला होता. कुणाला मुंबईतल्या प्रदुषण माजवणार्या कचर्याच्या आगीने त्रस्त केलेले होते, तर दिल्लीकर नुसत्याच कुजलेल्या कचर्याच्या दुर्गंधीने व्याकुळ झालेले होते. पण एक एक श्वास घेतानाची लढाई अखंड लढणारे तुझ्यासारखे जवान आमच्या खिजगणतीतही नव्हते. आम्हाला फ़िकीर असते ती बलात्कार्यांना फ़ाशी दिले जाण्याची. माणसातल्या अमानुष प्रवृत्तीला रोखण्यासाठी आम्ही सतत चिंतीत असतो. नशीब हनुमंतप्पा तुझे, तू सियाचीनमध्ये त्या बर्फ़ाच्या कपारीमध्ये तैनात होतास. म्हणून तुझे कौतुक! त्याऐवजी तू पठाणकोटच्या हवाई तळावर तैनात असतास, तर तुझी खैर नव्हती. कारण पठाणकोटच्या घातपाती हल्ल्यात जे जवान तुझ्यासारखेच देशाचे रक्षण अहोरात्र करत होते, त्यांच्या हलगर्जीपणा व नालायकी नाकर्तेपणाचे विच्छेदन करण्यात आमची बुद्धी गर्क होती. त्यात तू कुठे असतास तर तुझीही नालस्ती करायला आम्हीच पुढे सरसावलो असतो. शेवटचा श्वास घेणे शक्य असेपर्यंत झुंज दिलीस, म्हणून तुझे कौतुक! अन्यथा जवान सैनिक मरण्यासाठीच असतो, इतक्या निबर कातडीचे आम्ही झालोय. तुझ्या आप्तस्वकीयांचा टाहो आम्हाला कधी ऐकू येत नाही, की त्यांचे अश्रूही आम्हाला दिसत नाहीत. उध्वस्त होऊन गेलेली तुझ्यासारख्यांची कुटुंबे आमच्या काळजाला कधी पाझर फ़ोडत नाहीत. आता सुद्धा जे काही श्रद्धांजलीचे तमाशे चाललेत, त्याला बघून भुलण्याचे कारण नाही.
हनुमंतप्पा, आजकाल देशप्रेम, देशभक्तीही फ़ेअर एन्ड लव्हली रसायनासारखी बाजारू झालेली आहे. चार दिवसात गोरेपण देणार्या अशा ट्युबा आता प्रत्येक भावना व अविष्कारासाठीही निघाल्या आहेत. निर्भयाचा सामुहिक बलात्कार होऊन खुन पाडला गेल्यावर आम्हाला न्यायाची चाड वाटू लागते आणि चार दिवसांचे गोरेपण ट्युब संपताच अदृष्य व्हावे, तसा न्यायाचा उमाळाही गायब होऊन जातो. आठ वर्षापुर्वी आम्हाला असाच तुकाराम ओंबळेच्या हौतात्म्याचा मोठा उमाळा आलेला होता. उन्नीकृष्णनच्या शौर्याने आम्ही भारावलो होतो. पण वर्षे उलटली आणि आम्हाला त्यापैकी कोणी आठवत नाही. उलट आमच्यातले काही लोक याकुबच्या फ़ाशीविरुद्ध हिरीरीने लढायला पुढे सरसावले. कोणाला संसदेवरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण उरलेले नाही. पण हल्ल्याचा सुत्रधार अफ़जल गुरू याच्या शौर्याचे गोडवे विद्यापिठात गायले जात आहेत. त्यासाठी एकाहुन एक कायदेपंडित, बुद्धीमंत युक्तीवाद करायला पुढे आले. पण त्या संसदीय हल्ल्यात बळी गेलेल्या जवानांच्या कुटुंबियांना भरपाई मिळण्यात दिरंगाई झाल्याचा मुद्दा घेऊन कोणी न्यायासाठी मदतीला आला नाही. जेव्हा असल्या घटना घडतात, तेव्हा भावना, श्रद्धा वा आपुलकीच्या रसायनांचे लेप लावून आम्ही समारंभ साजरे करायला पुढे येत असतो. तेवढा उत्सव साजरा केला मग गणपती बुडवावा, तसे आम्ही तुझ्यासारख्यांचे विसर्जन करतो. विसरून जातो. पण आरोळी ठोकतो, चैन पडेना आम्हाला. अशा लोकांसाठी, वा समाजासाठी तुम्ही आपले सर्वस्व पणाला लावायला कसे सिद्ध होता, ते कोडेच आहेरे! कुठल्या मातीचे बनलेले असता तुम्ही? कुठून असे बळ तुमच्या अंगात संचारते? कोण ती माता आहे, जी अर्धपोटी राहून कोंड्याचा मांडा करीत आपल्या कुशीत तुमच्यासारख्यांना जन्म देते आणि भारतमातेच्या पदरात टाकते? खरोखर हनुमंतप्पा लाखो तुझ्यासारखे जवान एक न उलगडणारे कोडे आहे. काहीतरी सरकारकडून फ़ुकटात पदरात पडावे म्हणून अहोरात्र आशाळभूत नजरेने जगणार्यांच्या देशात तुमची जात कुठून पैदा होते रे?
पोटापाण्याचा व्यवसाय किंवा नोकरी म्हणून सैन्यात भरती व्हायचे आणि आपले प्राण असे सहज उधळून टाकायचे धैर्य तुम्ही कुठून गोळा करता रे? तुझे कुटुंबिय, त्याच्यासारखे लक्षावधी कुटुंबिय आज कुठलीही किंमत भरपाई न मागता जगत असतात. त्यांच्याकडे नजर वर करून बघायची आमची लायकी नाही. मग कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली द्यायची? आमच्या परिसरात, मोहल्ल्यात काही हनुमंतप्पा असतील. आज कुठेतरी सीमेवर किंवा चौकीवर तैनात झालेले असतील. आमच्यापैकी कितीजणांना त्यांची साधी ओळख आहे? ती ओळख होण्यासाठी किंवा तुमची थोरवी कळण्यासाठी तुम्ही शहीदच व्हायची गरज आहे का? कृतघ्न स्वार्थी लोकसंख्या आसपास उजळमाथ्याने वावरत असताना आपल्या ध्येय निष्ठेशी प्राणपणाने कटीबद्ध रहाण्याची शक्ती तुम्हाला कुठून मिळते? धर्म, भाषा, प्रांत यांच्या पलिकडे जाऊन देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याची इच्छाशक्ती कुठून मिळवता? तू जगण्याची इच्छा संपली म्हणून निरोप घेतलास, की इथे आपली कदर नाही म्हणून निघून गेलास? आपल्या जीवाचे मोल लावून जे स्वातंत्र्य अबाधित राखतोय त्याचीच राजधानीत, विद्यापीठात विटंबना होताना बघणे अशक्य झाले, म्हणून निरोप घेतलास कारे? की मृत्यूशी तुझी झुंज चालली असताना प्रेमाचे दिखावू उमाळे आलेल्यांच्या नाटकाने तुला कंटाळा आला होता? कारण कुठलेही असो, ज्या ताठ मानेने तू निसर्गालाही झुकांडी दिलीस, त्यानंतर विकलांग अवस्थेत जगणे तुला शक्यच नव्हते. मृत्यूकडे जीवनाची भीक मागणे तुझ्यासारख्यांच्या रक्तात नसते, म्हणून हा देश अजून टिकून आहे. खोल बर्फ़ात गाडला गेल्यावरही जगण्याची तुझी इर्षा बघून वाटते तू केवळ एक अवतारकार्य घेऊनच जन्माला आला होतास. आम्हाला विसर पडलेल्या इतिहासाचे स्मरण करून देण्यासाठीच आलास कारे या भारतभूमीत जन्माला? की काही शतकांपुर्वीच्या त्या ऐतिहासिक सत्याचा पुनरुच्चार करायला पुनर्जन्म घेतलास तू?
अब्दालीच्या सेनेपुढे रक्तबंबाळ होऊन मरणासन्न अवस्थेत पडलेल्या दत्ताजीला, हा देश विसरून गेलाय, त्याची आठवण द्यायला तू परतलास या भूमीत? तो दत्ताजी शिंदे ज्याने मरणाच्या दारातही ‘बचेंगे तो औरभी लडेंगे’ इतकी हिंमत दाखवली, त्याला आम्ही विसरलोय. त्याच्या आठवणी खडबडून जाग्या करायला अवतरलास कारे हनुमंतप्पा? तीच तुझी आणि तुझ्यासारख्यांची जात, वंश आणि प्रेरणा! शतकांपुर्वी त्यानेही तितक्याच हिंमतीने म्हटले होते, बचेंगे तो औरभी लडेंगे! तू कृतीतून काय वेगळे सांगून गेलास? हा देश दत्ताजी शिंदेचा आहे, याचे स्मरण करून देण्यासाठीच तू सीयाचेनमधून अखेरची झुंज देत दिल्लीला परतलास कारे? आमची बुद्धी, शब्द, समजूती, भ्रम किती निरर्थक करून टाकलेस हनुमंतप्पा?
दत्ताजी शिंद्याची झुंज आठवली ........
ReplyDeleteकोण हनुमंतप्पा कोप्पड? खरे शहीद तर इशरत;गुरु;कसाब आहेत भाऊ मफ करा ही मजा नाही श्रद्धांजली कुठल्या तोंडाने देऊ हनुमंतप्पा कोप्पड यांना श्रद्धांजली म्हणजे एकच या देशद्रोही secular लोकांचा शेवट
ReplyDeleteसहमत
Deleteभाऊ खरोखरच छान लिहीलत.
ReplyDeleteभाऊ सध्य परिस्थितीला अत्यंत समर्पक लेख. आपणा भारतीयांना सहस्र वर्षे पासुन हा शाप आहे. भारतीय समाज हा परचंड जाती प्रांत धर्म पंथ पक्ष वाद यांच्यात विखुरला आहे. त्याच बरोबर आपतीय लोकच (कुरहाडीचा दाअंडा गोतास काळ) गेली सहस्र दी वर्षे सहज देशद्रोही होतात व विकले जातात त्याचाच फायदा घेवुन परकीय अत्यंत कमी संख्येत असुनही आपल्या देशावर शतकानुशतके राज्य करुन सर्व संपन्न देशाची माता बहीणी ची लुट करत आले आहेत. याचे सोयरसुतक राहिले नाही. एक राम एक कृष्ण एक शिवाजी 4-5 शतकात जन्म घेणार व परत देश मुळ पदावर येणार त्यानचा उदोउदो करून परत जन्माला यायची वाट बघणार. परंतु त्याच वेळी देशातील नेतृत्वाला साथ न देता परत जात धर्म पंथ पक्ष प्रांत यावरून विरोध करणार.देशाचि हि अवस्था आशिष चालु रहाणार. भाऊ आपल्या डोळ्यात अंजन करणार्या लेखा साठी आभारी आहोत. अमुक शेटे.
ReplyDeleteकाळे फेसबुक, काळे स्टेटस, काळे झेंडे, काळे कपडे
ReplyDeleteकाळा दिवस, काळी रात्र, काळही काळाच
सर्वत्र काळोख, काळोखावर काळ्याचेच आक्रमण
चर्चा अहोरात्र काळोखाच्या काळेपणाची….
सगळेच सरसावलेत काळोख मिटवायला
बाहेर काही काळ - "प्रकाश"
पण अंतर्मनातील ज्योत कधी पेटणार??
तोपर्यंत प्रकाशही आभासी…. काळाच…
दिनेश निसंग, पुणे, २२ ऑगस्ट २०१३
सुरेख लेख भाऊ दत्ताजी शिंदे आणि हनुमंतप्पा हे याच भुमीचे कर्तुत्वान पुत्र आहेत ज्या भुमीत स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे मतांच्या राजकारणासाठी देशातल्या गुप्तचर संस्थेला डावाला लावणारे आणि राजकीय प्रतिस्पर्धकांना संपविण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाणारे पुरोगामी हेच खरे दहशतवादी आहेत या देशाला जिहादी दहशतवाद्यांपेक्षा पुरोगामी दहशतवाद्यांची झळ जास्त पोहचत आहे.हैद्गाबाद येथील विद्यापीठात याकुब मेमनसाठी तसेच दिल्ली येथील जे.एन.यु विद्यापीठात अफजल गुरू ला श्रध्दांजली कार्यक्रमात देशविरोधी नारे हे सर्व पुरोगामी विचारांचे नापीक फळ आहेत. कम्युनिस्ट, कॉंग्रेसी तसेच सर्वच मतांचे राजकारण करणारे धर्मनिरपेक्ष पुरोगामी हेच सर्वसामान्य भारतीयांचे खरे शत्रु आहेत आणि या शत्रुंची ओळख करून देण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा आपला पण उल्लेखनिय व कौतुकास्पद आहे.
ReplyDelete