Friday, April 15, 2016

पुश करा खुश रहा



  “If you don't read the newspaper, you're uninformed. If you read the newspaper, you're mis-informed.” ― Mark Twain

जयमहाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीवर शुक्रवारी चर्चेचा विषय होता, ‘कन्हैय्या सारखं नेतृत्व संघ-भाजप परिवारात का निर्माण झालं नाही वा होत नाही?’ अर्थात माझ्याकडे कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीची सुविधा उपलब्ध नाही. एक इंग्रजी व दोन हिंदी वृत्तवाहिन्यांची सुविधा आहे. सहाजिकच त्यातून मिळतील तितक्या बातम्या आणिबाणीच्या प्रसंगी मला पुरेशा असतात. कधी खुपच गरज वाटली, तर इंटरनेटच्या माध्यमातून युट्युबमध्ये काही कार्यक्रम बघून भुक भागवता येते. त्यामुळे बातम्याची भूकही कायम रहाते. म्हणूनच शुक्रवारचा कार्यक्रम मला बघण्याचा प्रसंग आला नाही. फ़ेसबुकवर सुनील तांबेने त्याला चर्चेत आमंत्रण असल्याचे सांगितले म्हणून मला हा विषय असल्याचे समजले. परिणामी आपल्या घरी मराठी वृत्तवाहिनी नसल्याचा आनंद द्विगुणित झाला. कारण ज्याच्या कोणाच्या डोक्यात असे विषय येतात, त्यांचे आयोजन किंवा त्यात सहभागी होणार्‍यांची अगतिकता बघण्याचा प्रसंग टाळला जातो. विषय ठरवताना तरी त्याचा थोडा गंभीरपणे विचार करायची गरज कशी वाटत नाही, याचे मला कधीकधी नवल वाटते. उपरोक्त विषयात एक प्रश्न सामावलेला आहे. त्याचे उत्तर शोधण्याची गरज तरी आहे काय? संघ-भाजपात कन्हैयासारखे नेतृत्व असते, तर कुठल्या तरी वाहिनीने संघावर चर्चा केली असती काय? उदाहरण म्हणून आपण खुद्द पोस्ट टाकणार्‍या सुनील तांबेकडे बघू शकतो. सुनील कधी संघात गेला नाही आणि त्याच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आहेत. पुरोगामी मुशीतून सुनील वाढला आहे. बहुधा त्या चर्चेचा संयोजक प्रसन्ना जोशी असणार. तोही पुरोगामी साच्यातून तयार झालेला. त्यामुळे अशी चर्चा संघाविषयी आपण करतोय, पण सेवा दलाविषयी कशाला करत नाही, हा प्रश्न निदान सुनील प्रसन्नाला पडायला हरकत नव्हती. कारण कन्हैयासारखे डझनावारी नेते सेवा दलाने निर्माण केलेले आहेत.

कन्हैयासारखे नेते वा नेतृत्व म्हणजे काय? ज्याच्यापाशी कसलेही संघटनकौशल्य नाही वा ज्याची जनसंघटन उभे करण्याची किंचितही कुवत नाही. ज्याला प्रसिद्धी माध्यमांच्या कुबड्या घेऊन उभे रहावे लागते आणि पाठीशी कुठलेही संघटन नसते. त्याला नेतृत्व म्हणतात काय? मेधा पाटकर वा तीस्ता सेटलवाड असे अनेक नेते गेल्या पाव शतकात पुरोगामी मूशीतून तयार झाले. त्यांनी काय पराक्रम गाजवला? उलट त्याच कालावधीत त्यांच्या लायकीचा गुणवत्तेचा एकही नेता संघाने भाजपाने निर्माण केलेला नाही. ज्याला प्रसिद्दी माध्यमांच्या कुबड्या घेऊनच चालावे लागते आणि सामान्य जनतेचा पाठींबा मिळत नाही, असा कुठला एक नेता संघाच्या मुशीत निर्माण झालेला आपण समोर आणू शकत नाही. उलट कन्हैयाकडे बघा. त्याला विद्यापीठात देशद्रोही घोषणा दिल्या गेल्यामुळे पोलिसांनी पकडले आणि खटला भरला. तेव्हा असा कोणी नेता असल्याचे माध्यमांच्या लक्षात आले. काही दिवस कन्हैया तुरूंगात पडला होता आणि त्याचे कुटुंबिय आपल्या पोरावर अन्याय झाला म्हणून माध्यमांच्या कॅमेरापुढे आक्रोश करत होते. त्याच्या सुटकेसाठी देशातले एकाहून एक मोठे नामवंत वकील सर्व कामे बाजूला ठेवून जामिन मिळवण्यासाठी सुप्रिम ते हायकोर्ट खेटे घालत होते. असा प्रकार कुठल्या एका संघ नेत्यासाठी वा भाजपाच्या जवान पोरासाठी झाल्याचे आपण बघितले आहे काय? आपल्यावर घोर अन्याय होत असल्याचा टाहो फ़ोडून रडगाणे गाणारा कोणी संघाचा स्वयंसेवक आपल्याला माध्यमांनी दाखवला आहे काय? कुठल्या आरोपाखाली भाजपाचा नेता पकडला गेल्यास त्याच्या सु्टका वा जामिनासाठी मोठमोठे वकील कोर्टाच्या पायर्‍या झिजवताना आपल्याला दिसले काय? हा फ़रक आहे. संघाचे नेते जनतेत असतात आणि कन्हैया माध्यमात असतो. माध्यमे त्याला उभे करतात आणि माध्यमांनाही निरूपयोगी ठरला, मग कन्हैयाचा अस्त होत असतो. त्याला कुठले संघटन करावे लागत नाही की मेहनत घेऊन लोकांमध्ये काम करावे लागत नाही.

उदाहरणार्थ नरेंद्र मोदी हा माणूसा घ्या! तो कुठल्या मुशीत घडला आहे? त्याच्यावर कुणाचे संस्कार आहेत? कोणी त्याला घडवले किंवा उभारले आहे? कुठल्या फ़ोर्ड फ़ौंडेशन वा परकीय पैशातून उभ्या राहिलेल्या संस्था संघटनेने मोदी घडवला आहे काय? तीस्तापासून मेधाताईपर्यंत अनेक ज्वलंत नेते पुरोगामी मुशीतून उभे राहिले. ज्यांच्यासाठी भांडवलदार अमेरिकनांनी पैसा ओतला आहे. पण त्यांनी आजवर लोकांचा उत्स्फ़ुर्त पाठींबा मिळावा असे काही केले आहे काय? उलट त्यांना निदर्शकही भांड्याने पगारी आणून खाऊपिवू घालून आंदोलनाचे देखावे उभे करावे लागतात. इंदिरा जयसिंग यांनी तर सरकारला सादर केलेल्या आपल्या संस्थेच्या हिशोबातूनच अशा भाडोत्री पगारी आंदोलकाची जंत्री दिलेली आहे. तसा भाडोत्री जमाव संघाने कुठे स्वयंसेवेसाठी गोळा केल्याचे माध्यमांना दाखवता आलेले नाही. कारण संघामध्ये मेहनत व कष्टाने काम करावे लागते. त्यासाठी मोलमजुरी वा मोबदला मिळत नाही. मग तिथे कन्हैयासारखे नेतृत्व तयार तरी कसे होणार ना? संघातून कोणी तीस्ता, मेधाताई वा कन्हैया कसे उपजतील? तिथे मोदीच निर्माण होऊ शकतो. पण पुरोगामी व्याख्या किंवा निकषावर मोदी हे नेतृत्व नसते. मोदी त्या व्याख्येत अपात्र कशामुळे ठरतात? तर मोदी शेकड्यांनी सभा घेऊन पक्षाला कोट्यवधी मते मिळवून देऊ शकतात. मरगळ आलेल्या पक्षात संजीवनी आणू शकतात. पुरोगामी भाषेमध्ये लोकांचा पाठींबा मिळवणे वा लोकमत संघटित करून बदल घडवण्याला नेतृत्व म्हणत नाहीत. म्हणून कन्हैया हे नेतृत्व असते आणि मोदी म्हणजे फ़ॅसिस्टवाद असतो. ज्याच्यामध्ये पक्ष वा संघटना रसातळाला नेण्याची अमोघ कुवत असते, त्याला पुरोगामी परिभाषेमध्ये ने‘तृत्व म्हणतात. ज्याचा लवलेश मोदीमध्ये आढळून येत नाही. संघामध्ये तर त्याचे नामोनिशाण नाही. कन्हैयातला ‘क’ संघात सापडणार नाही.

गेल्या चारपाच दशकात संघ अतिशय वेगाने विस्तारत गेला. शहरापुरता असलेल्या संघाचा पसारा खेड्यापाड्यात व जंगल दुर्गम प्रदेशापर्यंत पोहोचला. त्याच काळामध्ये तिथे जाऊन ठाण मांडून बसणारे शेकड्यांनी कार्यकर्ते व स्वयंसेवक संघाचा डोलारा संभाळायला तयार झाले. त्यातले काही भाजपात जाऊन राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्वही करू लागले. उलट त्याच काळात राष्ट्र सेवा दल, युथ फ़ेडरेशन वा तत्सम पुरोगामी संघटना नामशेष होत गेल्या. कन्हैया ज्या बिहारमधून येतो, तिथे कधीकाळी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. आज त्याचे नामोनिशाण उरलेले नाही. अशा रितीने पक्षाच्या पुर्वजांचे नामोनिशाण पुसून टाकण्याला पुरोगामी माध्यमात नेतृत्वगुण म्हणतात. तसे नेते जन्माला घातले वा जोपासले, तर आपलेही नामोनिशाण संपुष्टात येईल, याच भितीपोटी संघाने वा भाजपाने कधी अशा ‘कन्हैयांना’ डोके वर काढू दिले नाही. मग त्यांच्यात कोणी कन्हैया निर्माण होण्याची शक्यता चाचपण्याची गरजच काय? मुळात असा विषय तयार करणे आणि त्यावर गुर्‍हाळ घालणे किती शहाणपणाचे असू शकते? पण त्यालाच आजकाल पुरोगामी बुद्धीवाद म्हणतात आणि मग चर्‍हाट लावण्यातून आपला विजय साजरा करून घेतात. त्याला चव यावी म्हणून मग एखादा कोणी संघवाला भाजपावाला त्यात सहभागी करून घेतला जातो. तेही मुलांना खेळवावे तसे त्यात सहभागी होतात. त्या मच्छर संपवणार्‍या जाहिरातीसारखा प्रकार! पुश करा खुश रहा! आपल्यात एखादा मोदी का निर्माण झाला नाही याची फ़िकीर ज्यांना नाही, त्यांचे भवितव्य काय असेल? जे कन्हैया सापडला म्हणून इतके सुखावलेत, त्यांच्याविषयी काय बोलावे? असल्या चर्चांनी संघ व भाजपावाले चिडल्याचे नाटक जरूर करतील. पण वास्तवात त्यांच्यासारखे खुश कोणी नसतील. पुरोगामी आपापला मोदी निर्माण करायचा विचारही करत नाहीत, यापेक्षा संघासाठी आनंदाची काय गोष्ट असू शकते?

6 comments:

  1. याचा बापही जन्माला यायच्या आधी संघ अस्तित्वात आलेला आहे...त्यांचं कार्य उत्तुंग आहे...आणि हा मूर्ख माणूस संघाला "नुसता गणवेश बदलून काही होत नाही..." वगैरे वगैरे म्हणत आहे...काय फालतुगिरी आहे ही??.. इतकी मस्ती आली कोठून आणि एवढा माज कोणाच्या जीवावर??...

    भाऊ तुम्ही सांगाल कि या मागे नक्की कोण आणि का आहे ते??

    ReplyDelete
  2. यामुळेच संघ टिकुन आहे

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    अहाहा, मन कसं प्रसन्न झालं विषयाचं नाव ऐकून. गाठलेली उत्तुंग वैचारिक पातळी अधिकच उंचावण्यासाठी जयमहाराष्ट्र वाहिनीने एक परिसंवाद आयोजित करावा. विषय ठेवावा : बॉलीवूडमध्ये डाव्या विचारांची गळचेपी.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. भाऊ आणखी एक परखड व सध्य परिस्थितीची वास्तविक जाणीव समाजाला करुन देणारा लेख... आणि विकलेल्या मिडीयाला व त्यांच्या तालावर नाचणाऱ्या पुरोगामी व आपण अनेकांन पैकी काही नामनिर्देश केलेले तथाकथित विद्वान यांना एक्सपोज करणारा लेख.
    भाऊ आपण अनेक वेळा अशा मिडिया चा पोलखोल केला आहे.
    मिमिडिया च्या या भुमिके मागे निश्चितच एक षडयंत्र आहे. गेली कित्येक दशके जो कोणी (अगदी काँग्रेसच्या पण लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी इ. व बिगर काँग्रेसी वाजपेयीं आणि आता मोदी) अशा प्रभावी व देशाची प्रगती करण्याचा प्रयत्न करणार्‍या नेत्यांनी ज्या ज्या वेळी ठोस पावले उचलली अशा सर्वाना मिडियाने (बिबिसी/न्युज पेपर टिव्ही ) टारगेट केले आहे. व सत्तेतून पायउतार तरी केले किंवा जिवनातुन उठवले/ बळी घेतले. परंतु आपला समाज गाफिल व शासन दावणीला बांधलेले /विकले गेलेले, न्यायव्यस्था पण रुतलेली (करोडो प्रलंबीत खटले असताना हि मे व दिवाळी मध्ये महीना भर सुट्टी वर असतात).
    यातील शासन व न्यायालये काहिप्रमाणात अकाउंटेबल तरी आहेत परंतु माध्यमावर अविष्कार स्वातंत्र्याचे नावाने कोणतेही बंधन नाहि की दंड नाही. हे काही देश विरोधी शक्तींनी पुर्ण हेरले आहे व षडयंत्र रचले आहे. एवढेच सामान्य माणसाच्या लक्षात येते. म्हणूनच काही वेळा सत्तांतर होते व परत देश विकणारेच नाहीतर विघातक (इशरत जहान आठवा) शक्तींनी परत सत्ता काबीज केली आहे. व उलट प्रश्न विचारला की तुम्ही सत्तेत असताना काय केलेत? याच चक्रात देश अडकला आहे. लोकसभेत पुण॔ बहुमत असताना पण मोदी सारखा कणखर, द्रष्टा
    व करतव्य दक्ष नेता महत्वाची निर्णय बिले पास करु शकत नाही. लोकसभेचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधी पक्षाला दोन वर्षे पुरवी कठधरयात खड्या करणारी हिच माध्यमे आताच्या विरोधी पक्षाची पाठराखण करत आहेत. व 5 वष्रे नी परत प्रश्न विचारणार काय केले पुण॔ बहुमत असुन. परत खिचडी सत्ता परत त्या नावाखाली भ्रष्टाचार व पैशाची वाटणी परत अतीरेकि हल्ले-लंगुचालन.
    यावरुन लोकशाही एक देखावा आहे अशी ध्रुड भावना सुशिक्षित समाजात लुजवली जाते व हा वग॔ देखील हात झटकून मोकळा होतो. मतदान करत नाही आणि ठरावीक पक्ष अशिक्षित मतदारांना पैसे दारू यात्रा अशी प्रलोभने दाखवुन परत परत सत्ता उपभोगतो.
    अशा पुव॔निरदेशीत मिडिया बरोबर वैचारिक लढाई निरुपयोगी आहे हे आपण अनेकदा माडंले आहे. न्यायालयीन लढाई पुरावे व प्रलंबीत प्रकरीये मुळे अशक्य आहे. बरं मुंबईची ठोकशाही ही हयात नाही. त्यामुळे नियती वरच सर्व सोडण्या खेरीज सध्या तरी काही पर्याय दिसत नाही.
    आपल्या लेखातून जनजागृती काही प्रमाणात दिलासा देते. याची लाट ज्या प्रमाणे सत्तांतर करु शकली तशी अपेक्षेवरच राहाणे भाग आहे.
    अमुल शेटे पनवेल

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ, अमूल शेटेंची प्रतिक्रिया विचार करावयास लावणारी आहे. आम्ही एव्हडे का षंढ झालो कि चांगले काय आणि वाईट काय हे ठरविण्यास आम्हाला मीडिया लागतो. कन्हया काय वा देसाई काय यांचे विचार ऐकतो वर प्रतिक्रिया देतो. हा मुलगा ज्याला आजून मिसरुड सुद्धा फुटली नाही, ज्याला आजून त्याचे भवितव्य ठरवायचे आहे, ज्याला आजून भारत देश म्हणजे काय हे समजायचे आहे तो या देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देतो आणि आम्ही ते सर्व वाचत बसतो. विचारशक्ती लुप्त झाल्या सारखे वाटते. हीच लोकशाही अपेक्षित आहे काय ?

      Delete
  5. भाऊराव,

    अमुल शेटे यांनी वर व्यक्त केलेल्या विचारांचे थोडं मनन केलं. त्यावरून जाणवलं की भारतातल्या लोकशाहीचा प्रसारमाध्यमांकडून जो गौरव केला जातो, तो जनतेच्या हितासाठी नाहीये. तो माध्यमांना स्वैरपणे आचरण करायला मिळावे म्हणून केला जातोय. त्यामुळे लोकशाही की प्रजासत्ताक अशा वैचारिक कात्रीत जनता सापडली आहे.

    आज भारतात लोकशाही असली तरी प्रजेचे दु:ख समजून घेणारी माध्यमे नाहीत. त्यामुळे प्रजासत्ताकाचं मूळ उद्दिष्ट सफल होत नाहीये. माध्यमांना लोकशाहीच्या नावाखाली स्वैराचार हवा असल्याने त्यांच्याविरुद्ध वैचारिक लढाई उपयोगाची नाही. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की, उद्या लोकशाही विरुद्ध प्रजासत्ताक असा संघर्ष उभा राहिल्यास जनतेचा कल प्रजासत्ताकाकडे झुकायला हवा.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete