५६ इंच छातीच्या गप्पा प्रचारात मारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पाकला काय धडा शिकवणार आहेत? अनेकजण अशी भाषा बोलत आहेत. किंबहूना मोदीसमर्थक सुद्धा काहीतरी करायला हवे म्हणून अस्वस्थ झालेले आहेत. ही आपल्या समाजाची दुबळी मानसिकताच दहशतवादाला प्रोत्साहन देणारी ठरत असते. कारण दुसर्याने आपल्यासाठी काही करावे म्हणून प्रतिक्षा करण्यातच आपण धन्यता मानत असतो. पण जी काही समस्या असेल वा प्रसंग असेल, त्याला सामोरे जाण्यासाठी आपण काय करणार आहोत, याचे उत्तर आपल्यापाशी अजिबात नसते. किंबहूना आपण अशा प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाही विचार करत नाही. आपल्या हाती काहीच नाही, अशी पराभूत मानसिकता कुठल्याही समाजाला दुबळे करून सोडत असते आणि मग अशा समाजातून प्रबळ शक्तिमान राष्ट्र उभे राहू शकत नाही. त्याला किरकोळ अशा पाकिस्तानकडूनही वाकुल्या दाखवल्या जाऊ शकतात. सवाल सरकारने त्याच्या अधिकारात काय करावे, किंवा भारतीय सेनेने कसे उत्तर द्यावे; असा अजिबात नाही. तुम्हीआम्ही सामान्य भारतीय नागरिक काय करू शकतो, असा प्रश्न आहे. आपण एकदा तरी समंजसपणे त्याचा विचार करून उत्तर शोधले आहे काय? पाकिस्तानी जिहादी अतिरेकावर फ़क्त लष्कराने उत्तर देण्याने भागत नाही. अनेकदा तर सामान्य भारतीयांनी दिलेले उत्तर सेनेपेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकते. नाक दाबले की तोंड उघडते अशी उक्ती उगाच निर्माण झालेली नाही. पाकचे नाक दाबण्याचे अधिकार भारत सरकारपेक्षा तुम्हाआम्हा भारतीयांच्या हाती अधिक आहेत. आपण त्याचा कधी वापर करणार आहोत? जर कोणी करणार असेल, तर त्याच्या समर्थनाला उभे तरी रहाणार आहोत काय? सव्वाशे कोटी भारतीय नुसते एकदिलाने उभे राहिले तरी कुणा शत्रूची समोर येण्याची हिंमत होणार नाही. पण आपण तशी तयारी दर्शवली पाहिजे.
सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाक कलाकारांना भारतातून निघून जाण्याची ताकिद दिली आहे. पाक क्रिकेटपटू कलाकार इथे येऊन लाखो करोडो रुपये कमावतात आणि मायदेशी घेऊन जातात. तिथे त्यांनी भारतातून मिळवलेल्या पैशातून पाक सरकारच्या तिजोरीत कररुपाने भरणाही करतात. त्याच पैशातून भारतीय जवानांवर तळांवर हल्ले करण्यासाठी पैसे पुरवले जातात. मग अशा हल्ल्यांसाठी मुळातच पैसे कोण मोजतो? त्या क्रिकेट वा गायन अभिनयाची किंमत मोजणारे भारतीय पेक्षक चहातेच, आपल्या सैनिकांवर होणार्या हल्ल्यासाठी सुपारी दिल्यासारखे पैसे मोजत नाहीत काय? इथले कोणी क्रिकेट संघाचे मालक संस्था किंवा चित्रपट दिग्दर्शक वा निर्माते, अशा पाक कलावंतांना कुठून पैसे मोजत असतात? त्यांना चित्रपट वा सामन्यांच्या तिकीटविक्री वा अन्य मार्गाने होणार्या कमाईतूनच मेहनताना म्हणून पाक कलाकारांना पैसे दिले जातात ना? मग असे सामने चित्रपट वा गाण्याच्या मैफ़लींवर खर्च करणारे देशप्रेमी कसे होऊ शकतात? एकाच वेळी तुम्ही कलाप्रेमासाठी जिहादी हल्लेखोरांना पैसा पुरवणार्या व्यवस्थेचे वर्गणीदार देणगीदार आणि त्यातून मारल्या जाणार्या भारतीय सैनिकांचे कैवारी कसे होऊ शकता? एक तर तुम्ही हुतात्मा भारतिय सैनिकांचे कैवारी असू शकता, किंवा त्यांच्या मारेकर्यांचे आश्रयदाते असू शकता. अर्थात अशा गोष्टींवर तुम्ही खर्च करत नाही, असे म्हणूनही पळ काढता येणार नाही. जे कोणी आश्रयदाते किंवा गुंतवणूकदार असतील, त्यांच्याही तिजोरीत भर घालणेही तितकेच पाप आहे. मग अशा कार्यक्रमांचे आयोजन करणारा जो कोणी करण जोहर, ममता बानर्जी वा शाहरुख खान असेल. त्याच्यावरही बहिष्कार घालण्याची तयारी असायला हवी. कितीजणांची त्यासाठी तयारी आहे? असेल तर पाकला धडा शिकवण्याच्या गप्पा माराव्यात. नाहीतर गप्प बसावे.
शाहरुख वा करण जोहर असोत. त्यांना पाक नागरिक कलाकारांना पैसे देण्याची हौस नाही. त्यांच्या अशा चित्रपट वा गाण्याच्या मैफ़लीवर बहिष्कार घालण्याची हिंमत तुम्ही दाखवलीत, तर अशा बुडत्या धंद्यात पैसे घालण्याची त्या शहाण्यांची हिंमत होणार नाही. त्यांना पैसा कमवायचा आहे आणि तो मिळवताना भारतिय प्रेक्षक वा चहात्यांच्याच मर्जीवर अवलंबून रहाणे भाग आहे. ती मर्जी खप्पा झाल्याचे चित्रपट बुडीत जाण्यातून जाणवू शकते. आपोआप पाक कलावंत क्रिकेटपटूंच्या पोटाला चिमटा येऊ शकतो. त्यांना कमाई चालू ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावण्याचीही कोणी अट घातलेली नाही. भारतावर किंवा भारतीय सेनेवर जिहादी हल्ले करणार्या पाक सरकारला गुन्हेगार ठरवणारे विधान व निषेध करण्याची अट घालावी. त्यांनी पाक सरकारने जिहादी कृत्ये थांबवावीत असे आवाहन करावे. इतके जर पाक कलाकार करू शकले, तर त्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष मिळते आणि त्यांना कोणी बहिष्कृत करायची गरज उरणार नाही. त्यांनी आपले प्राधान्य कलेला आहे आणि जिहादला नाही, हे सिद्ध करण्याची अट जीवघेणी तर होऊ शकत नाही ना? पण हे शाहरुख वा करण जोहर करणार नाही. ते तशा अटी कोणाला घालणार नाहीत. म्हणूनच त्यांच्या चित्रपट व कार्यक्रमावर बहिष्कार घालणे, हे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हाती आहे. आपल्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणार्या सैनिकांसाठी आपण इतके छोटे काम करू शकतो काय? आपण अशा कार्यक्रम चित्रपटावर बहिष्कार घालायचाच. पण त्यात सहभागी होणारे आपले परिचित आप्तेष्ट, यांनाही अशा गोष्टीपासून परावृत्त करणे आपल्या हाती आहे. नुसते पाकप्रेमी, शाहरुख, करण जोहर नव्हेत; तर त्यांचे समर्थन करणार्यांनाही बहिष्कृत करण्याचा निर्धार आपण सामान्य नागरिक दाखवून शकलो, तर भारतीय सेना वा सरकारचे हात मजबूत होऊ शकतात.
पाक कलाकार व क्रिकेटपटू पाकिस्तानी जनमानसावर प्रभाव पाडू शकणारे साधन आहे. ते वापरण्याची शक्ती भारत सरकार वा सेनेमध्ये नाही. ती शक्ती कोट्यवधी भारतीय नागरिकांच्या आव्डीनिवडीत सामावलेली आहे. ते साधन आपण हत्याराप्रमाणे पाकच्या विरोधात किती निर्धाराने वापरू शकतो, इतकाच सवाल आहे. यातली शक्ती बड्याबड्या प्रगत श्रीमंत राष्ट्रांना शरणागत करू शकते. युरोपियन मालावर अरब मुस्लिम राष्ट्रांनी प्रतिबंध लावला आणि धंदा बुडतो म्हटल्यावर त्यांनी व्यापार जपण्यासाठी प्रेषित महंमदाच्या व्यंगचित्रांवर बंदी घातली होती. भारतातल्या पाक कलाकारांच्या बाबतीत बहिष्काराच्या हत्याराने आपण करू शकलो तर पाकला नाकी दम आणु शकतो. अशा कामात मनसे वा शिवसेना यांना आपण एकाकी पडू देतो, तेव्हा आपण तोयबांचे हात मजबुत करीत असतो. आपण इतके बेफ़िकीर असू तर पाकविरोधी कठोर कारवाईची हिंमत आपले सरकार तरी कसे करू शकणार आहे? आपल्या समाजात पाकप्रेमी लोक उजळमाथ्याने वावरू शकत असतील, तर सरकार व सेनेचे हात दुबळे होतात. कारण इथली जनताच पाकधार्जिण्यांना सन्मानाने वागवत असते. इथली जनताच कलाप्रेमाच्या नावाखाली जिहादींना आर्थिक पुरवठा करीत असते. मग भारतीय सैनिकांनी कुठल्या हिंमतीवर शत्रूचा पाडाव करावा? सैनिकाच्या हातातील शस्त्र दुय्यम असते आणि त्याच्यासाठी जनतेच्या मनातली आपुलकी आस्था अधिक भेदक असते. त्यासाठी आपण कुठले योगदान देत असतो? आपण शाहरुख वा करण जोहरच्या चित्रपटात पाक कलाकार असतील, तर बहिष्कार घालणार आहोत काय? कुणा पाक नागरिकाला इथे सन्मानित होताना रोखणार आहोत काय? प्रत्येक भारतीयांने स्वत:च्या मना्ला हा प्रश्न विचारावा. तिथेच पाकला धडा शिकवण्यासाठी काय करायचे, त्याचे उत्तर मिळू शकेल. तुम्ही नाक दाबण्याशी शक्ति वापरा, बघा पाकचे तोंड उघडायला वेळ लागणार नाही.
बरोबर भाऊ मस्तच,हा नालायक चित्रपटात भारतीय माजी सैनिकाला पाकड्यांच्या दोस्ती साठी देशद्रोही ठरवताना दाखवल्या पासुन त्याचे चित्रपट पहायचे सोडुन दिले आहे,परंतु याला काही फरक पडत नाही महामुर्ख लोक कितीही बोंबलल तरी चित्रपट बघतात डिसेंबर २०१५ मध्ये असाच एका चित्रपटावर बहिष्काराची भाषा झाली होती पण हा चित्रपट १०० कोटींचा धंदा करून बसला.राहीले पाकडे कलाकार आपलेच देशद्रोही आहेत तेव्हा यांना दोष देऊन काय उपयोग????
ReplyDeleteएकदम मान्य. याचा नमुना आपण "असहिष्णू" वातावरणात पाहिलाच आहे (snapdeal)
ReplyDeleteभाऊ ५६इंच छाती बद्दल बोलायचे झाले तर दादा कोंडकेंचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरें बाबत केलेला भाषणातील भाग आठवला,मोदीजींची छाती कशाला मोजताय मोजायचीच आहे तर ......
ReplyDelete