Sunday, October 2, 2016

अब्राहम लिन्कन म्हणतो

अब्राहम लिंकन के लिए चित्र परिणाम

"Shall we expect some transatlantic military giant to step the ocean and crush us at a blow? Never! All the armies of Europe, Asia, and Africa combined, with all the treasure of the earth (our own excepted) in their military chest, with a Bonaparte for a commander, could not by force take a drink from the Ohio or make a track on the Blue Ridge in a trial of a thousand years. At what point then is the approach of danger to be expected? I answer. If it ever reach us it must spring up amongst us; it cannot come from abroad. If destruction be our lot we must ourselves be its author and finisher. As a nation of freemen we must live through all time or die by suicide."  - Abraham Lincoln

‘स्वातंत्र्यप्रेमी समाज वा देशाचा शत्रू कुठून, परदेशातून येत नसतो. अवघ्या जगाची सेना एकवटली आणि जगातला महान योद्धा जरी त्या सेनेचा सेनापती असला, तरी त्याला सार्वभौम राष्ट्र पादाक्रांत करता येत नसते. स्वयंभू समाजाचे राष्ट्र कधी परकीय शत्रूकडून संपवले जात नाही. त्याला संपवण्यासाठी त्याच समाजात विध्वंसक दगाबाज पैदा व्हावा लागतो’, अशी ग्वाही अब्राहम लिन्कन यांनी दिलेली आहे. तो इशारा शतकापेक्षा अधिक काळ आधी या महापुरूषाने दिलेला आहे आणि तो इशारा केवळ अमेरिकेलाच लागू होत नाही. जगातल्या कुठल्याही देशाला, समाजाला व कुठल्याही कालखंडाला लागू पडतो. कालपरवा भारतात काही देशद्रोही हेर वा पाक हस्तक पकडले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याविषयी मनात राग धरू शकतो. पण त्यांच्यामुळे देशाचे फ़ारसे नुकसान होत नाही, इतके छुपे हस्तक उजळमाथ्याने आपल्यातच वावरतात, ते नुकसान करीत असतात. मग कठोर कारवाई कोणावर आधी केली पाहिजे? पाकिस्तानविरुद्ध की इथे बोकाळलेल्या पाकप्रेमींच्या विरोधात?

उरी येथील हल्ल्यानंतर व २० जवानांच्या हौतात्म्यानंतर पाकला धडा शिकवण्याची भाषा जोरात चालू आहे. पण धडा म्हणजे तरी काय असते? पाकशी थेट युद्ध करावे की अन्य मार्गाने पाकची कोंडी करावी? सामान्य माणसाला काही झालेले बघायचे असते. त्याला युद्धात पाकला पराभूत व्हायला बघणे आवडणार हे उघड आहे. पण युद्ध हा सोपा निर्णय नसतो. त्याच्या परिणामांचा विचार करावा लागतो. शिवाय युद्ध हे देशाने एकजुट होऊन एकदिलाने लढायचे असते. ज्याला इथल्या तथाकथित बुद्धीमंत पुरोगामी शहाण्यांचा कायम विरोध आहे. युद्धाची गोष्ट सोडून द्या. काश्मिर वा भारतात कुठेही हलकल्लोळ माजवणार्‍या अतिरेकी जिहादी घातपात्यांवर किती कठोर कारवाई आपण आजवर करू शकलो आहोत का? इशरत जहान ही तोयबाची हस्तक मारली गेली तर रडणारे लोक भारतातलेच पुरोगामी होते. त्यासाठी कोणी किंमत मोजली? भारतातल्या वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीच ना? पाकिस्तानला कुठलीही झळ सोसावी लागली नाही. याकुब वा अफ़जल गुरूसाठी कोण गळा काढत होते? सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण केल्यावरही त्यांना जिवंत ठेवायला धावणारे कोणी पाकिस्तानी नव्हते की हाफ़ीज सईद नव्हता. कालपरवा बुर्‍हान वाणीला कंठस्नान घातले गेल्यावर मातम करणारे इथले पुरोगामीच होते. पाकिस्तानी क्रिकेटपटू वा गायक कलाकारांसाठी जीव तिळतिळ तुटणारे कोणी पाकिस्तानी शरीफ़ वा बदमाश नाहीत. इथलेच तथाकथित बुद्धीमंत, पुरोगामी आहेत. जर इथेच आपल्या भूमीत व कायद्यानुसार घातपात्यांची पाठराखण करणारे उजळमाथ्याने वावरत असतील, तर बंदोबस्त कोणाचा करायचा? अशा इथल्याच गद्दारांना आणि दगाबाजांना दहशतवादी म्हणून घोषित केले जाऊ शकत नसेल, तर पाकिस्तान वा तिथल्या संघटनांना दहशतवादी ठरवण्याचा कुठला मार्ग शिल्लक उरतो? कसली अपेक्षा आपण करणार आहोत?

गळ्यात पट्टा बांधलेल्या शिकारी कुत्राकडून शिकार होऊ शकत नाही. त्याला फ़ारतर भुंकता येते आणि समोरून माकडेही त्याला टिवल्याबावल्या करीत असतात. मग ती कधी मानवीहक्काचा मुखवटा लावून येतात, तर कधी हत्यारे घेऊन लष्करी छावण्यांवर हल्ला करीत थेट अंगावर येतात. पण बांधलेला शिकारी कुत्रा त्यांचा बालही बाका करू शकत नसतो. भारतीय कायदे, पोलिस वा लष्कराची तीच कहाणी आहे. पाकिस्तानात तशी कोणतीही अडचण नाही. विराट कोहली या भारतीय क्रिकेटपटूच्या विक्रमाचे कौतुक केल्याने एका पाक नागरिकाला तुरूंगात खितपत पडावे लागले. इथे पाक खेळाडूंच्या वकिलीसाठी उभे रहाणार्‍यांना बुद्धीमंत प्रतिष्ठीत म्हणून सन्मान मिळत असतो. पाकिस्तानात भारताचे वा भारतीयांचे कौतुक करण्याला गद्दारी गुन्हा मानले जाते आणि त्याच्यावर कठोर कारवाई होते. इथे भारताचे तुकडे करण्याची घोषणा करणार्‍यांना देशातील सर्वात बुद्धीमान प्रतिभाशाली विद्यार्थी म्हणून अनुदान मिळते. त्यांच्या बाजूने वकीली करायला मोठमोठे वकील न्यायालयात हजर होतात. अशा देशावर संकट आले असताना कुणावर कुणाविरुद्ध कुठली कारवाई करणे शक्य आहे? करायचीच असेल तर अशा कारवाईला घरापासून सुरूवात करावी लागेल. चॅरीटी बिगिन्स एट होम, अशी इंग्रजी उक्ती आहे. बाहेरच्या शत्रूशी लढायला सीमेवर सैनिक उभे आहेत. पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणारा समाज या देशात आहे काय? जगातल्या ४३ देशातील फ़सलेल्या नागरिकांना येमेनच्या युद्धक्षेत्रातून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल जगभर भारतीय सैनिकांचे कौतुक चालले होते. पण भारतात मात्र त्याच पथकाचे नेतृत्व करणार्‍या जनरल व्ही. के. सिंग यांची हेटाळणी चालली होती. जोवर त्याला आपल्या आतल्याच शत्रूंचा बंदोबस्त करता येत नाही, तोवर अशा देशाला कुणा शत्रूदेशाला धडा शिकवणे शक्य नाही,

किंबहूना आपल्याला आपल्यातच मिसळून असलेले आपले व देशाचे शत्रू ओळखता आले पाहिजेत. त्यांच्या मुखवट्याला भुलून आपली सावधानता गमावता कामा नये. सवाल पाकिस्तानला धडा शिकवण्याचा नाही, ते काम भारतीय सेना व गुप्तचर विभाग पार पाडायला सज्ज आहे. त्यांनाच अशा देशप्रेमासठी व कर्तव्यपुर्तीसाठी शिक्षा होणार नाही, यासाठी आपण सामान्य नागरिक काय करणार आहोत, हा खरा सवाल आहे. आपल्यापैकी कितीजण इशरतला चकमकीत ठार मारणार्‍यांच्या समर्थनासाठी मैदानात आलो होतो? इशरतसाठी गळा का्ढला जात होता, तेव्हा त्या गद्दार रडगाण्याच्या विरोधात किती आवाज उठला होता? याकुबच्या फ़ाशीला विरोध झाला, तेव्हा आपल्यातले किती लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी त्या याबुब समर्थकांवर बहिष्कार घालण्याचे कर्तव्य बजावले आहे? देशासाठी प्राणाची आहुती सैनिक आणि पोलिसांनी द्यावी, ही आपली अपेक्षा आहे. पण आपल्या अवतीभवती उजळमाथ्याने वावराणार्‍या गद्दारांना बहिष्कृत करण्याची साधी कारवाई नागरिकांच्या हाती असून आपण ते करायला आळस करतो. म्हणून आपली सेना दुबळी होत असते. शत्रू समोरून येत नसतो आणि आला तरी त्याचा धोका कमी असतो. आपल्यातच प्रतिष्ठीतपणे वावरणारा गद्दार मोठा धोका असतो. पाक कलाकार, क्रिकेटपटू किंवा घातपात्यांचे मानवाधिकार यासाठी गद्दारी करणार्‍या घरभेद्य़ांना निकालात काढण्याचे कर्तव्य सैनिकांचे वा सरकारचे नसून, आपले म्हणजे सामान्य नागरिकाचे आहे. आपण त्यात किती योगदान देणार आहोत, देत असतो? नसू तर मग सरकारने कुठली कारवाई करावी किंवा कुणाला चोख उत्तर द्यावे; असल्या शिळोप्याच्या गप्पा मारण्याचा अधिकार आपल्यालाही उरत नाही. बलात्कार वा खुन करणारा जितका गुन्हेगार असतो, त्यापेक्षा याकडे बघूनही पाठ फ़िरवणारा गुन्हेगार असतो. अब्राहम लिन्कन तेच म्हणतोय ना?

7 comments:

  1. बरोबर भाऊ,शरीफ पाकडा आहे त्याचे समजुन घेता येइल पण हे कांगी सापीये आपिये केचू हेतर आपलेच असुन भारत मातेचा व पंतप्रधानांचा अपमान करतायत यांची रवानगी एकतर पाकमध्ये करावी किंवा यांना ढगात पाठवायला हवे

    ReplyDelete
  2. Kay lekh lihila ahe bhau.... Mast ch...
    Hya var kahi upaya sambhandi pan margdarshan karave....

    Aniket Devde
    Hyderabad

    ReplyDelete
    Replies
    1. Right aahe Aniket. Bhau hya tatha kathit buddhivadyan pasun desh vachavanya sathi ekhada changala dabaw gat asayala hawa jo sarva samanya chya bhawana na waat deil.
      - Omkar Dumne
      Parbhani.

      Delete
    2. Ho dabav gat tayar kela pahije pan, hya dabav gata chya joravar aalele aaple sarkar suddha hyana jasti kahi karu shakat nahi...
      Aapan ch hyanchya nadya todayala havya, hyanchi chanels, papers, magzine band kara vaparane.
      Jasa Aamri Khan la hatavala hota Snapdeal ashya bahishkara mule tasa.....

      Delete
  3. हे सगळ खरय भाऊ, पण आपण मागासलेले , बुरसटलेले , हिंदू त्व वादि ठरविले जाऊ असे लोकांना वाटते . हिंदू मधे आज प्रंचड न्युनगंड आहे. वर्षानुवर्षे त्यांचा पध्दत शीर तेजोभंग करण्यात आला याचा हा परिणाम आहे.

    ReplyDelete
  4. hume to apno ne loota gairon me kahan dum tha......

    ReplyDelete
  5. आजच्या (५ अॉक्टोबर १६) सकाL मधले मुक्तपीठ 'सैनिकाशी वागणे ते कैसे' वाचावे. अशा नालायक नागरिकांसाठी हे सैनिक सीमेवर उभे असतात तेच मूर्ख ठरावेत इतके आपण वाईट आहोत. ओम पुरींनी आज तारे तोडले आहेतच. हा लेख म्हणूनच अगदी 'hits the nail on the head'.

    ReplyDelete