Wednesday, November 23, 2016

अग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र

(तुघलकाची चलनी नाणी)

तुघलक के लिए चित्र परिणाम

सलाम आलेकुम निळूभाऊ,

बर्‍याच वर्षांनी तुमचा अग्रलेख वाचायला मिळाला आणि खुप आनंद झाला. खरे सांगू, इथे जन्नतमध्ये असतानाही तुम्ही मला जहन्नूममध्ये टाकल्याचे दु:ख झाले नाही. असो, कुठल्याही कारणाने का असेना, तुम्ही माझे इतक्या शतकांनी स्मरण केलेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देणे भाग आहे. एक गोष्ट तुम्हालाही मान्य करावे लागेल, की गेल्या वीस वर्षात ‘नवाकाळ’ निर्माण करताना तुम्हीही त्याचा ‘संध्याकाळ’ करून टाकलात. माझ्या आठवणी दगा देत नसतील, तर पंधरावीस वर्षापुर्वी तुम्ही अग्रलेखांची बादशाही करीत असताना पृथ्वीतलावरील मानवासाठी ‘नवाकाळ’ उभारण्याच्या प्रयत्नात होतात. तिथे ‘नवाकाळ’ आला तरी त्यात तुमचे काही नामोनिशाण दिसत नसल्याचे ऐकतो. खरेखोटे अल्लाजाने! पण तेव्हा तेल अंगाला चोपडलेला कुणी पैलवानच ‘नवाकाळ’ आणणार असे तुम्ही जगाला ओरडून सांगत असल्याचे नक्की आठवते. त्या पैलवानाचे पुढे काय झाले हो? कारण त्यानेही नोटाबंदीच्या खुळेपणासाठी नव्या तुघलकाची पाठ थोपटल्याचे ऐकतो. आजकाल तुमच्या त्या तेलवाल्या पैलवान आणि तुमची काही बोलाचाल नाही काय? असती तर नक्कीच तुम्हाला माझे स्मरणही झाले नसते. आठवते, तेव्हा या पैलवानाने महाराष्ट्रातील वीजटंचाई संपवण्याचा चंग बांधला होता आणि तिकडे तळकोकणात एन्रॉन नावाची विजेची खाण खोदण्याचे जंगी काम हाती घेतलेले होते. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच झगमगाट व्हायचा नव्हता, तर आसपासच्या राज्यांनाही वीजपुरवठा करण्याची छातीठोक हमी दिली जात होती. त्या पैलवानाने हमी द्यावी आणि तुम्ही टाळ्या पिटून ती हमी वाचकापर्यंत घेऊन जायची; अशीच व्यवस्था झालेली होती. मॅराथॉन मुलाखती घेऊन तुम्ही घरोघरी पैलवानाची वीज पुरवलीत आणि पुढली दोन दशके अवघा महाराष्ट्र वीजटंचाईच्या अंधारात बुडवल्याचे तात्कालीन वर्तमानपत्रेच लिहीत होती.

असलेली वीजनिर्मिती ठप्प करून एन्रॉन वीज निर्माणाचे ते स्वप्न, खरे तर सातशे वर्षे आधी मीच म्हणजे महंमद तुघलकाने बघितलेले होते. पण माझे दुर्दैव असे, की तोपर्यंत अमेरिकेतला एडीसन जन्माला आलेला नव्हता. वीजेचा शोधही लागला नव्हता. नाहीतर तुमच्या पैलवानाच्या आधी मीच म्हणजे तुघलकाने कोकणात वीजेचा प्रकल्प उभा केला असता. पण राहुन गेले. त्या एन्रॉनच्या महान उलथापालथीच्या वेळी निळूभाऊ, तुम्हाला माझी कशी आठवण आली नाही? ती नेमकी माझीच कल्पना होती आणि तुम्ही तर ती बारामतीच्या तुमच्या लाडक्या पैलवानाची म्हणून खपवून टाकली होती. पण मला गप्प बसावे लागले. काय करू? मी दिल्लीचा मरहूम दिवंगत बादशहा होतो आणि तुम्ही ‘नवाकाळ’चे अग्रलेखक बादशहा होता. मॅराथॉन सोडा, आम्हाला मारथाप मुलाखतही देता आलेली नाही कधी. पण इथे जन्नतमध्ये सर्वकाही नोंदवून ठेवले जात असल्याने आठवण सोपी होते. महाराष्ट्र वीजमंडळाला दिवाळखोरीत घेऊन गेलेल्या त्या पैलवानाची माझ्याशी तुलना तुम्ही कराल, असे राहुन राहुन वाटायचे तेव्हा. पण तुम्ही एका शब्दाने कधी माझा उल्लेख केला नाहीत, निळूभाऊ!. अंगाला तेल चोपडलेल्या पैलवानाचे इतके कौतुक होते तुम्हाला, की तुघलक गेला तेल लावीत! म्हणून तुम्ही माझ्याकडे साफ़ दुर्लक्ष केलेत, हरकत नाही. नियती कोणाला सोडत नाही निळूभाऊ! पैलवानाच्या पराक्रमाच्या वेळी तुम्हाला तुघलकाचे स्मरण झाले नाही, म्हणून तुघलक संपत नसतो. पैलवानाचे बोट पकडून नवा सुलतान दिल्लीत येऊन बसला आणि त्याने तुमच्या स्मरणशक्तीला हादरा दिलाच ना? तुम्हाला तुघलकाचे स्मरण करावेच लागले ना, निळूभाऊ? बारामतीच्या पैलवानाचे बोट धरून नरेंद्र मोदी राजकारण शिकले नसते, तर तुमच्यासारख्या अग्रलेखाच्या बादशहाने, कधी या तुघलकाचे स्मरण वा उल्लेख तरी आपल्या अग्रलेखात केला असता काय?

असो, खरेतर हल्ली तुमचे वाचायला मिळत नाही, म्हणून वेळ जात नाही. पण सुदैवाने राहुलनेच कायाप्पा म्हणजे व्हाटसपवर तुमचा ऐतिहासिक लेख टाकला आणि किती दिवसांची भुक भागली. घाबरू नका, राहुल पांडेने नाही, राहुल गांधींनी टाकलाय! आजही तुमच्यासारखे महनीय लोक माझी आठवण सोयीनुसार काढतात, त्यामुळे बरे वाटले. मी आजही दिल्लीत सत्तेवर असतो, तर काय काय केले असते, त्याचा कल्पनाविलासही खुप मनोरंजक आहे. मलाही गंमत वाटली. तुम्ही इतके मनकवडे असल्याचे बघून! खरेच आज मी सत्तेत असतो, तर अहमदाबादला देशाची राजधानी हलवली असती. काळाची ती गरज असते ना निळूभाऊ? तुम्ही नाही का, शेणवीवाडी सोडून बादशाहत कांदिवलीला हलवली? कालाय तम्सै नम:! काळापुढे कोणाचे चालते? मग तो नवा-काळ असो की संध्या-काळ असो! जेव्हा ज्याची सत्ता असते तेव्हा त्याचेच नाणे चलनी असते. पण आम्ही असे ऐकतो की आजकाल जगात व भारतातही नाणी निकालात निघाली आहेत. सर्वत्र कागदी नोटा व क्रेडीट कार्डाचा जमाना आला आहे म्हणून! तेव्हा माझ्यासारखी चांदीची सोन्याची नाणी कोण छापणार? कागदच छापणार ना? तुम्ही ज्याला आज तुघलक म्हणत आहात, त्याने तसे कागदच छापलेत म्हणे! आता कागदच असेल, तर तो किती मूल्याचा वा कुठल्या रंगाचा असला, म्हणून काय फ़रक पडणार आहे? मानला तर रुपया पैसा नाही, तर नुसता कागदच ना? माझ्यासारखी त्याची तुलना होऊ शकत नाही. माझ्या काळात पैशाला नाण्याला नव्हेतर, ज्या धातूमध्ये नाणी असायची, त्यांना किंमत होती. आज कागदावर छापलेल्या रंगाला, आकड्याला व आकाराला किंमत असते म्हणतात. म्हणून ना दोन हजाराची नोट एटीएममधून निघेनाशी झाली ना? तेवढेही तुमच्या लक्षात आलेले नसेल, तर तुम्ही सातशे वर्षे जुन्या काळात जगताहात, की मी इतक्या वर्षानंतरही आधुनिक जगात वावरतो आहे? सांगा ना निळूभाऊ?

तुम्ही म्हणालात ती ब्रॉन्झची नाणी परत घेऊन काय करायचे, तेही मला ठाऊक नव्हते. म्हणून त्याचा किल्ल्याबाहेर ढिग करावा लागला होता. आज म्हणे जुन्या नोटा बदलून बॅन्केत जमा केल्या जात आहेत. सगळ्या नोटा रद्द झालेल्या नाहीत. अन्य काही नोटा तशाच चालू आहेत. माझ्या जमान्यात ब्रॉन्झची नाणी काढणेच चुकीचे होते. म्हणून मी पुन्हा ती बदलली. कोणीही ब्रॉन्झची नाणी छापू शकत होता, ही माझी अडचण झाली होती. आजच्या नोटा कोणीही सहजगत्या छापू शकत नाही, असेही ऐकतो. त्यामुळेच इतर कोणी तशा खोट्या नोटा छापलेल्या असतील, तर बदलून मिळत नाहीत आणि आणणार्‍याला पकडले जाते, असेही ऐकून आहे. माझ्यापाशी तशी काही युक्ती वा सोय नव्हती. म्हणून कोणीही ब्रॉन्झची नाणी आणून खजिन्यात भरू शकला. आज कोणाची तशी हिंमत होत नाही. त्यालाही तुम्ही तुघलकी कारभार म्हणत असाल, तर निळूभाऊ हा तुघलक तुमचा आभारी आहे. कारण मला इतका मोठा सन्मान कुणा अभ्यासकाने लेखकाने कधी दिला नाही. तुमच्यासारख्या वरीष्ठ जाणत्याने माझा इतका गौरव केला, तर तुमचा ऋणी रहाणे भाग आहे. आणखी एक गोष्ट निळूभाऊ! माझ्या जमान्यात हिंदूस्तानची लोकसंख्या इतकी अफ़ाट नव्हती आणि नाणी वापरणार्‍या रयतेची संख्या तर नगण्य होती. तरीही माझ्या सत्तेची तारांबळ उडाली. पण कोणाची बिशाद नव्हती, मला चुकीचा म्हणायची. हा तुमचा जो कोणी बारामतीच्या पैलवानाचे बोट धरून दिल्लीत सुलतान झालेला नरेंद्र मोदी आहे ना? त्याच्या हुकूमतीविषयी मला शंका आहे. कोणीही उठतो आणि नित्यनेमाने त्याची राजरोस टिंगलटवाळी करतोय. पण हा सुलतान ती अवहेलना सहन करीत असेल, तर त्याची माझ्याशी तुलना करण्याला धाडस म्हणायला हवे. माझी टवाळी इतिहासाच्या अभ्यासकांनी केली. समकलीन बुद्धीमंतांची कुवत नव्हती. इतके चहूकडून टिकेचे घाव सोसत मोदी नावाचा कोणी सुलतान दिल्लीत कारभार करीत असेल, तर देशात सत्ताभ्रष्ट तुघलकांची संख्या वाढलेली असावी.

असो, लिहीत रहा. शक्य झाल्यास पुन्हा पैलवानाच्या अंगाला तेल वगैरे माखत जा!

आपला वाचक
तुघलक

5 comments:

  1. 😁😁😁😁 भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. अग्रलेखान्चा बादशहा ही पदवी या नवाकाळवाल्याना दिली कोणी ? कि ' स्वघोषित ' बादशहा ? आम्हाला फक्त प्र.के. अत्रे व काळवाले परान्जपेच माहिति आहेत. तसेच ग.वा. बेहरे

    ReplyDelete
  3. खाडीलकराचा नवाकाळ आणखी चालु आहे का ? कधी तो मला स्टालवर अथवा कुणाच्या हातात दिसला नाही.

    ReplyDelete
  4. भाऊ,खूप छान लेख. असेच एक पत्र मा. उद्धव ठाकरे ना लिहा.

    ReplyDelete