Monday, November 14, 2016

महाभारताची भाकडकथा

putin modi के लिए चित्र परिणाम

महाभारत ही बहुतेक भारतीयांना तोंडपाठ असलेली पुराणकथा आहे. त्यातली पात्रे आणि त्यांच्यातले परस्पर संबंध हे नेहमीच्या जीवनातले संदर्भ देणारे असेच आहेत. महाभारताचे युद्ध टाळण्याचे अनेक प्रयत्न झाले होते. शेवटचा प्रयास देवाचा अवतार असलेल्या खुद्द श्रीकृष्णानेच केलेला होता. त्याला कृष्णशिष्टाई संबोधले जाते. दोन भावांमध्ये अशी आत्मघातकी लढाई टाळण्यासाठी कृष्णाने दुर्योधनासमोर किमान पर्याय मांडला होता. पाच गावे पांडवांना द्यावीत आणि बाकीचे साम्राज्य त्याने आपल्यापाशी राखावे. अर्थात हे पांडवांना मान्य होणे अशक्य होते. तरीही कृष्णाने ती तडजोड आधी पांडवांच्या गळी उतरवली होती. पण दुर्योधन वा कौरवांना तोच पांडवांचा दुबळेपणा वाटला असणे स्वाभाविक आहे. पांडव युद्धाला घाबरतात, असे समजून दुर्योधनाने कृष्णाचा प्रस्ताव फ़ेटाळून लावला आणि महाभारताचे युद्ध अपरिहार्य होऊन गेले. पुढे त्यात कोण जिंकला किंवा हरला हा विषय भिन्न आहे. पण त्या किरकोळ तडजोडीवर विषय संपू शकला असता, हे निश्चीत! पण गंमत अशी असते, की आपली शक्ती वा डावपेच यांच्या आहारी गेलेल्या माणसाला वास्तव किंवा व्यवहार बघता येत नाहीत. कारण त्यातले वास्तव त्याला बघायचेच नसते. बघायचे आहे, तेच त्याची नजर शोधत असते आणि तसे आभासही त्याला सुखदायक वाटत असतात. म्हणून ते वास्तव नसते आणि कधीतरी आभास कोसळून पडण्याची वेळ येतेच. अर्थात हे फ़क्त भारतात होते असे नाही. जिथे कुठे मानव समाज वसलेला आहे, तिथल्या जीवनात त्याचा प्रत्यय येत असतो. पुढारलेला वा मागास समाज असे कोणाला वेगळे काढता येत नाही. इथूनतिथून कुठलाही माणुस सारखा़च विकारांनी पछाडलेला असतो. तसे नसते तर अमेरिकेत ट्रंप निवडून आला नसता आणि आज युरोपला त्या निकालांनी भयभीत केले नसते.

आधी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याविषयी ब्रिटनमध्ये सार्वमत घेतले गेले आणि त्याला सकारात्मक मत मिळाल्यावर अमेरिकेतले निकाल आलेले आहेत. दोन्ही निकाल वा कौल हे पाश्चात्य देशातील दिर्घकालीन डाव्या उदारमतवादाची कबर खणली जात असल्याची लक्षणे आहेत. मात्र त्यासाठी विरोध वा उजव्या राजकारणला जबाबदार धरता येणार नाही. कारण तितकी शक्ती उजव्यांमध्ये राहिलेली नाही, की उजव्यांपाशी इतके समर्थ नेतृत्वही आज आढळून येत नाही. त्यामुळेच उजवे बदलामागे फ़रफ़टत चालले आहेत. दोनतीन दशकात एकूणच जगाच्या राजकारणात उजवे-डावे यांची इतकी सरमिसळ होऊन गेली आहे, की कोण उजवा आणि कोण डावा, असा भेदभाव करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळेच दोन्ही बाजू एकप्रकारे प्रस्थापित वा प्रतिगामी म्हणाव्या इतक्या कालबाह्य होऊन गेल्या आहेत. त्यातल्या डाव्यांनी इतका अतिरेक केला आहे, की आपली धोरणे व विचारांच्या पलिकडे अन्य कुठलाही विचार असूच शकत नाही, अशी टोकाची भूमिका घेऊन असहिष्णुतेचा कळस गाठला आहे. भारतात सर्व घटनात्मक मर्यादा पाळून नरेंद्र मोदी कारभार हाकात असताना, त्यांना असहिष्णू ठरवण्यासाठी जे नाटक झाले तोच अतिरेक होता. तसाच प्रकार अमेरिकेत व युरोपात झालेला आहे. डाव्या उदारमतवादाची भूमिका असेल तोच विचार आणि त्याच्याबाहेर काही विचार समोर आला, तर तो प्रतिगामी, अविचारी असा कल्लोळ केला जाऊ लागला. भिन्न विचार हाणून पाडण्याने एकूणच राजकारण, समाजकारण एकसुरी होत गेले. त्यामुळेच उजवे-डावे असा भेदभाव करायला जागा उरली नाही. पाच गावेही पांडवांना नाकारणारा दुर्योधन जसाच्या तसा आपल्याला त्या अतिरेकामध्ये दिसू शकतो. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन दुर्योधन म्हणतो, सूईच्या अग्रावर राहिल, तितकीही जमिन पांडवांना देणार नाही. तिथे महायुद्ध अपरिहार्य होऊन जाते.

भारतात सत्तांतर झाल्यानंतर राजदीप सरदेसाईची पत्नी व महिला पत्रकार सागरिका घोष म्हणाली होती, उजव्यांनी आपले विचारवंत निर्माण केलेले नाहीत. यातली गंमत लक्षात घेण्यासारखी आहे. कुठल्याही व्यासपीठावर भिन्न मताला स्थान द्यायचे नाही. एकसुरी समविचारी पोपटपंची म्हणजेच बुद्धीवाद, असा आग्रह धरायचा. त्यामुळे सगळे विचारवंत आपोआप पुरोगामी व भिन्न विचार मांडणारा प्रतिगामी ठरवला गेला. मग प्रतिगामी विचारवंतच नसेल, तर उजवा विचारवंत सापडणारच कुठे? हीच नेमकी जगभरची स्थिती आहे. असहिष्णू पुरोगामी आक्रमकतेने भिन्न विचारांना जागाच शिल्लक ठेवली नाही. त्यामुळे बुद्धीवादाचा सगळा प्रांतच समविचारी व एकसुरी होऊन गेला. त्याचा प्रतिवाद वा विरोध करायचा, तर त्याच्या विरोधात युद्ध पुकारण्यालाच पर्याय उरला नाही. अशा युद्धात डाव्या पुरोगामीत्वाविषयी किंचीतही सहानुभूती असेल, अशा कुणाच्या हाती नेतृत्व असून भागत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. सहाजिकच या पुरोगामी उदारमतवादी असहिष्णूतेच्या विरोधात होऊ घातलेल्या युद्धात, प्रत्येक समाजात नवनवे नेतृत्वाचे चेहरे समोर आले. किंबहूना अतिरेकी हटवादी व आक्रमक विरोध करू शकणारे व्यक्तीमत्व पुढे येत गेले. इथे नरेंद्र मोदी तर अमेरिकेत धश्चोट डोनाल्ड ट्रंप नावारुपाला आले. कारण समोरच्या आक्रमक अतिरेकी पुरोगामीत्वाला खच्ची करणारा व तुच्छ लेखूनच संपवणारा पुढारी लोकांना हवा झाला. वादाने चर्चेने समजण्याच्या अवस्थेत पुरोगामी असते, तर ही पाळी आली नसती आणि पुर्वापार चालत आलेली उजवे-डावे विभागणी कायम राहिली असती. त्यातली विविधता व मतभेद कायम टिकले असते. त्यातला वैचारिक समतोलही कायम राहिला असता. पण सुईच्या टोकावर मावेल इतकीही जागा अन्य कुठल्या विचारांना पुरोगामी देणार नसतील, तर त्यांना संपवूनच जागा मिळवायला हवी ना?

धृतराष्ट्राच्या दरबारात टाहो फ़ोडून द्रौपदी विद्वानांना एक सवाल करते. कृपाचार्य, द्रोणाचार्य व भीष्मचार्य यांना द्रौपदी विचारते, जो आधीच गुलाम झाला आहे, पराभूत झाला आहे, तो युधिष्ठीर कुठल्या अधिकाराने पत्नीला पणास लावू शकतो? त्यावर अशा बुद्धीमंतांपाशी उत्तर नसते. कारण ते बुद्धीमंत कमी आणि दुर्योधनाचे आश्रीत अधिक असतात. म्हणूनच ते नियम कायदे व नितीशास्त्रावर बोट ठेवून पळवाटा काढतात. तेव्हा प्रक्षुब्ध द्रौपदी तळतळाट करीत शाप देते, की धृतराष्ट्राचे नि:संतान होईल. पुढे युद्धाला पर्याय उरत नाही. पण धोका ओळखलेला धृतराष्ट्र परिणाम जाणून असतो. दुर्योधन सर्वच बाजूंनी गुन्हेगार नव्हता आणि पांडव सर्वच कारणांसाठी पवित्र नव्हते. पण शेवटी कसोटीच्या प्रसंगी किमान सुसह्य तरी असेल त्याच्या आश्रयाला जावून द्रौपदीला निवड करावी लागते. म्हणूनच ती पांडवांसोबत वनवास आणि अज्ञातवास सहन करते आणि एकेदिवशी महाभारताचे युद्ध अपरिहार्य होऊन जाते. भाकडकथा असो की पुराणकथा असो; त्यातले शब्द दुय्यम आणि बोध वा आशय महत्वाचा असतो. त्याकडे दुर्लक्ष करणार्‍याला इतिहास माफ़ करत नाही. नियती सोडत नाही. मोदी वा ट्रंप प्रत्येक बाबतीत चुक व अपात्रच असतील, तर गांजलेल्या द्रौपदीरुपी सामान्य माणसाला त्याच पांडवांच्या आश्रयाला जावे लागते. ट्रंप वा मोदींच्या आश्रयाला जावे लागते. दरबारातले बुद्धीमंत तेव्हा आपल्या बुद्धीप्रामाण्याला जागले असते, तर महाभारत टळले असते आणि मोठा नरसंहार टाळला गेला असता. आज जगासमोर अशाच दिवाळखोर आश्रीत बुद्धीमंतांनी तशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे. त्यात पुतीन, मोदी, ट्रंप असे पांडव गोळा होताना दिसत आहेत. कोणाला आवडोनावडो किंवा हास्यास्पद वाटो, जगाची वाटचाल भयंकर महायुद्धाकडे होऊ लागली आहे. यादवीकडे होऊ लागली आहे आणि त्यालाही वैचारिक अतिरेक जबाबदार ठरताना दिसतो आहे.

4 comments:

  1. भाऊ,या युद्धात पुरोगामी व त्यांचे रसददाता left होतील लगता हैं फैसले का दिन नजदीक आ गया है।

    ReplyDelete
  2. भाऊ रंगवायचा ब्रश किंवा झोपणारा देवी काळात रामा पिल्ले नामक बायोडिझेल तयार करणारा शास्त्रज्ञ होता त्याचे काय झाले कळेल काय ??? कृपया कॅामेंट वाचून काढुन टाका

    ReplyDelete
  3. खरय भाऊसाहेब . पुरोगामित्व हे slow poisoning आहे . हे लोक फार हट्टी दुराग्रही असतात . खोट बोल पण रेटुन बोलणारे तसेच शब्द जंजाळात भल्या भल्या ना चित करतात. यांच्या हातात मिडीया असल्यामुळे हे कुणाला जुमानित नाहित . मुख्यतः हे कुणाकडुन काहीच शिकत नाहीत . ईत्यादी लक्षणे आढळल्यास तो भयंकर पुरोगामी समजावा. ऊदा. शेषेराव मोरे नी पुरोगामी दहशतवाद हा शब्द प्रयोग केल्यावर महाराष्ट्रातील तमाम समविचारी खवळले, मोरे याना समजुन न घेता.

    ReplyDelete
  4. भाऊ तुमच्या या लेखामधील "कृपाचार्य, द्रोणाचार्य व भीष्मचार्य यांना द्रौपदी विचारते, जो आधीच गुलाम झाला आहे, पराभूत झाला आहे, तो युधिष्ठीर कुठल्या अधिकाराने पत्नीला पणास लावू शकतो? त्यावर अशा बुद्धीमंतांपाशी उत्तर नसते. कारण ते बुद्धीमंत कमी आणि दुर्योधनाचे आश्रीत अधिक असतात. म्हणूनच ते नियम कायदे व नितीशास्त्रावर बोट ठेवून पळवाटा काढतात." या वाक्यावरून आणि एकंदर च भारतात मोदी सरकार वर चाललेले बेछूट आरोप बघून एक ओळ आठवली...इथे चपखल बसेल अशी

    अर्थस्य पुरुषो दास:|

    ReplyDelete