‘आम्ही सारे पानसरे’ अशा घोषणा देणे वा तसे फ़लक घेऊन मिरवणे सोपे असते. त्यापेक्षा कॉम्रेड गोविंद पानसरे यांना समजून घेणे अवघड असते. म्हणूनच अशा व्यक्ती, त्यांचे चेहरे वा फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली जाते. किंबहूना त्यांच्या विचारांना गाडण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी त्यांच्याच घोषणांचा चतुराईने उपयोग केला जात असतो. त्याचे ताजे उदाहरण म्हणून दिल्लीत रंगलेल्या जवानाच्या आत्महत्येकडे बघता येईल. ‘परिवर्तनाच्या दिशा’ या आपल्या पुस्तकात पानसरे लिहीतात, ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’
पानसरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे खुनी पकडण्यासाठी खुप कल्लोळ झाला. त्याच्यावरून खुप राजकारण रंगले. पण पानसरे हा एक विचारही असतो आणि त्याच विचारामुळे पानसरे या व्यक्तीमत्वाला महत्व प्राप्त झालेले असते. अशी व्यक्ती समाजातील शोषक वा मस्तवाल वर्गासाठी धोका असतो. कारण त्याचे विचार समाजाला बदल घडवून आणायला प्रवृत्त करणारे असतात. समाजाला आत्मपरिक्षण करायला भाग पाडणारे असे विचार शोषणातला मोठा अडथळा असतो. म्हणून पानसरे वा तत्सम व्यक्तीला संपवण्याचा सोपा उपाय, त्याचे विचार भ्रष्ट वा विकृत करण्यात सामावलेला असतो. त्यासाठी पानसरे यांचे देव्हारे माजवायचे आणि त्यातच त्यांचे विचार चिणून टाकण्याचा खेळ केला जातो. त्याची सुरूवात विचार करण्याला प्रतिबंध घालून तयार भूमिका माथी मारण्याची असते. सामान्य जनतेने विचार चिकित्सा करू नये तर दिले आहे, तेच सत्य समजून मान्य करावे, असे प्रयास होत असतात. पानसरे यांनी उपरोक्त पुस्तकातून त्याचाच उहापोह केला आहे., ते काय म्हणतात? शोषक चलाख असतात आणि शोषितांच्या हिताचे विचार मांडणार्यांनाच शोषक अंकित करून टाकतात. आपण आजकाल त्याच जमान्यातून जात आहोत. त्यामुळे आपल्यासमोर काय मांडले जात आहे आणि त्यातले खरेखोटे काय, त्याची चिकित्साच होऊ दिली जात नाही. संपुर्ण सत्य लोकांसमोर येऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली जात असते. तसे नसते तर दिल्लीत आत्महत्या करणार्या जवानाविषयी सत्य समोर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न झाला असता. पण त्या घटनेविषयी कुठलाही प्रश्न विचारण्याची मुभा दिली जात नाही. माजी सेनापती जनरल व्ही के सिंग यांनी तसा मुद्दा उपस्थित करताच, त्यांच्यावर आरोपांचा भडीमार झाला. पण सिंग काय म्हणाले, त्याचा उहापोह होऊ दिला गेला नाही. राहुल गांधी वा केजरीवाल यांनी जे आत्महत्येचे राजकारण चालविले आहे, ते महान उदात्त कार्य असल्याचा परिपुर्ण देखावा तयार करण्यात आला. त्याच्याखाली रामकिशन ग्रेवालचे सत्य दडपून टाकण्याची पराकाष्टा करण्यात आली. काय आहे ते सत्य?
एक माणूस भिवानी हरयाणातून दिल्लीला येतो. आपल्याला निवृत्तीवेतन पुरेसे मिळाले नाही, म्हणून संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहीतो. ते मंत्र्याला मिळण्यापुर्वीच आत्महत्या करतो आणि मग तात्काळ सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची राजकीय स्पर्धा सुरू होते. पण हा माणूस पत्र योग्य जागी देण्यापुर्वीच आत्महत्या कशाला करतो? त्याच्या सोबत तेव्हा कोण होते? त्याला अपायकारक द्रव्याच्या गोळ्या कुठून मिळाल्या? त्याने मृत्यूपुर्वी आपल्या पुत्राला फ़ोन करून विषप्राशनाची माहिती दिली, तर त्यांचे संभाषण कोणी रेकॉर्ड केले? कसे रेकॉर्ड झाले? पिता विषप्राशन केल्याचे सांगत असताना भावनाविवश होण्याऐवजी एक पुत्र त्याचे संभाषण रेकॉर्ड करू शकतो काय? हे रेकॉर्डींग विनाविलंब काही तासात माध्यमांपर्यंत कोण पोहोचवतो? ज्या मंत्र्याच्या नावाने पत्र लिहीले आहे, त्याच्यापर्यंत ते पोहोचत नाही, पण माध्यमे मात्र ते दाखवायला आधीपासून सज्ज असतात. ह्यातली कार्यतत्परता थक्क करून सोडणारी नाही काय? ही आत्महत्या झाल्याची बातमी येताच राहुल गांधी व केजरीवाल कामधंदे सोडून तिथे धाव घेतात आणि त्यांना अटक झाल्याचे समजताच त्यांच्या पक्षाचे अन्य नेते कार्यकर्ते विनाविलंब तिथे गोळा होऊन धिंगाणा करतात. याप्रकारे घटनाक्रम घडत असताना कोणी त्याचा संगतवार विचार तरी करायचा की नाही? मग हा विषय बाजूला पडतो आणि पोलिसांनी राहुल केजरीवालना रोखलेच कशाला? असा प्रतिष्ठेचा विषय निर्माण होतो. यात तारतम्य वा तर्कबुद्धीला कुठे वाव आहे काय? २०१२ मध्ये शेकड्यांनी निदर्शक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जमलेले होते. दोन मिनीटे बाहेर येऊन त्यांना भेटण्याची सवड न झालेले राहुल, आज इतके विनाविलंब अशा जागी कसे पोहोचू शकतात? निर्भया प्रकरणी राष्ट्रपतींना निवेदन द्यायला निघालेल्या तरूण व वयोवृद्धांना पोलिसांनी झोडपून काढले होते. किंवा निर्भयाच्या मृत्यूनंतर गुपचुप तिचा अंत्यसंस्कार आटोपण्यात आला. तेव्हा नागरिक म्हणून कोणाला त्या अंत्यसंस्कारात हजर रहाण्याचा अधिकार नव्हता काय? हा नवा अधिकार अलिकडेच राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला आहे काय? गेल्या दोनतीन दिवसात हे प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील. पण त्यावर विचार करण्याची मुभा कोणी दिली आहे काय?
कारण आता आपल्याला स्वत:चा विचार करण्याची मुभा राहिलेली नाही. विचारस्वातंत्र्य म्हणजे समाजातील मोजक्या लोकांची चैन आहे. त्यांनी विचार म्हणून त्यांचा माल आपल्या गळ्यात मारायचा असतो आणि आपण डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवावा, अशी आपल्याला सवलत दिलेली आहे. अन्यथा रामकिशन ग्रेवालच्या विचित्र आत्महत्येचे अनेक पैलू समोर आणले गेले असते. फ़ार कशाला राहुल गांधी आत्महत्येचे शौकीन असल्याचीही माहिती समोर आली असती. २००९ साली विदर्भातल्या एका गावात शेतकर्याने आत्महत्या केली, त्याच्या विधवेला भेटायला राहुल गेलेले होते. मग २०१० साली संसदेत बोलताना त्यांनी कलावतीचा उल्लेख केला. त्यामुळे त्या महिलेला देशव्यापि प्रसिद्धी मिळाली. पुढे काय झाले? दिड वर्षाने कलावतीच्या जावयानेही आत्महत्या केली आणि त्याची कोणी दादफ़िर्यादही घेतली नाही. राहुल तिकडे फ़िरकले नाहीत, की नवर्याने आत्महत्या करण्याच्या फ़ेर्यातून कलावतीची कन्याही सुटली नाही. मग राहुलनी कलावतीच्या घरी जाऊन काय साध्य झाले होते? तेव्हा तरी त्यांच्याच हाती सत्ता होती आणि मनमोहन सिंगांना राहुल आपल्या तालावर नाचवत होते. जर तेव्हा आत्महत्या करणार्याच्या सांत्वनाला जाऊन राहुल काही करू शकले नसतील, तर आज हाती सत्ता नसताना त्यांना रामकिशनच्या कुटुंबाला भेटून काय साधायचे होते? आज राहुलच्या त्या भेटीचे कौतुक सांगणार्यांनी तेव्हाही कलावतीच्या नवर्यासाठी असेच अश्रू ढाळलेले होते आणि मग सगळेच सर्वांना विसरून गेले. रामकिशनचेही कौतुक दोन दिवसाचे आहे. असे आत्महत्या करणारे किंवा मारले जाणारे मृतदेह; हे राजकारणातल्या दगडफ़ेकीचे धोंडे असतात. एकदा मारून झाला, मग कुठे जाऊन पडला त्याची कोणाला फ़िकीर नसते. त्याची मिमांसा होत नाही की होऊ दिली जात नाही. कारण सर्व प्रसार-प्रचार साधने शोषकांच्या हाती आहेत आणि शोषितांच्या हिताचा विचार शोषकांच्या तिजोरीत गहाण पडलेला आहे. हे सांगणार्या व समजावणार्या पानसरेंना फ़लक घोषणांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेले आहे. खरा पानसरे वा त्यांचा विचार कुणापर्यंत पोहोचू नये आणि समाजाने विचारांना प्रवृत्त होऊ नये, याचा पक्का बंदोबस्त केलेला आहे.
Jabardast... Congress hi deshala lagleli kid aahe.. aani aata he aap wale tyani tar khupch disappoint keley... Aanna Basle bajula aani he visarle aannala...
ReplyDeleteभाऊ,मनमोहन सिंहना राहुल नाचवत होते??? हे अशक्य आहे राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार ते किल्ली देत होते बाकी यांच्याबद्दल नबोललेले चांगले
ReplyDeleteनमस्कार भाऊ,
ReplyDeleteतुमच्यापर्यंत पोचण्यासाठी इथे लिहितोय.नंतर कंमेंट डिलीट केलीत तरी चालेल.
स्वराज इंडिया नामक एका संस्थेने 'भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान' अशी स्पर्धा आयोजित केली आहे. अर्थात काँग्रेसी अथवा कुणी संघ द्वेष्टाच यामागे असणार हे उघड आहे.
त्यासंबंधात फेसबुक वा व्हाट्सऍप वर भुंकणाऱ्यांना फटकावण्यासाठी मी तुमचे जुने लेख शोधत होतो. पण इतक्या मोठया संग्रहात ते सापडणे जरा कठीणच आहे. आपण आपल्या ब्लॉग मध्ये सर्च ऑप्शनची सुविधा ठेवलीत तर बरे होईल.
धन्यवाद
apratim ...fakt apratim ..yalach mhantat nirbhid nispaksha patrakarita
ReplyDelete