Thursday, December 15, 2016

चोराच्या उलट्या बोंबा

(माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ति)


RBI deputy governor chakraborty के लिए चित्र परिणाम
सामान्य माणसाला रांगेत उभे करून त्याच्या कष्टाच्या कमाईचे पैसे सरकारने सक्तीने बॅन्केत जमा करायला लावले. कारण मोठ्या उद्योगपतींनी बुडवलेली कर्जे मोदी सरकारला माफ़ करायची आहेत, असा आरोप राहुल गांधी गेला आठवडाभर करीत आहेत. अशाच प्रकारचे विविध आरोप सतत दिड महिना चालू आहेत. त्यात कितीसे तथ्य आहे, ते तपासण्याची कोणाला गरज नसते. कारण कोणालाच सत्याची पडताळणी करण्याची कधी गरज वाटत नाही. अलिकडेच सरकारने किंवा रिझर्व्ह बॅन्केने एक लाख कोटी रुपयांची अशीच बुडीत कर्जे माफ़ केल्याचा खुप गवगवा झालेला होता आणि त्याचा जाब अर्थमंत्री अरूण जेटलीना विचारण्यात कॉग्रेसच्याच नेत्यांचा पुढाकार होता. मग त्याचे खुलासेही झाले होते. बुडीत कर्जे किंवा थकलेली निकामी कर्जे, म्हणजे कर्जदार त्याचा लाभदायक वापर करू शकलेला नसल्याने व्यवहारात नसलेली खाती; असा त्याचा तांत्रिक अर्थ असल्याचा खुलासा जेटली यांनी केलेला होता. त्यावरूनही खुप भाष्ये झालेली होती. जे खातेदार वा कर्जदार आपण घेतलेले कर्ज फ़ेडण्याच्या अवस्थेत नाहीत, त्यांना झाकण्याचा हा उद्योग असल्याचे आरोप झाले आणि खुद्द कॉग्रेसकडूनच झाले. पण ही तांत्रिक भाषा अर्थशास्त्रात कुठून व कोणी आणली, त्याचा खुलासा मात्र अशा जाणत्या अर्थशास्त्र्यांनी कधी केला नाही. मात्र तेच कॉग्रेसनेते आपणच साठ हजार कोटी रुपयांची शेतकर्‍यांची कर्जे माफ़ केल्याचे श्रेय़ अगत्याने घेत असतात. तेही कर्ज माफ़ केले ती शेतकर्‍यांवर केलेली मेहरबानी अजिबात नव्हती. ज्या बॅन्का बुडीत होत्या आणि ज्यांनी गैरलागू मार्गाने कर्जवाटप केलेले होते, त्यांना पाठीशी घालण्याचा तो उद्योग होता. आत्महत्या करणारा शेतकरी कधीच बॅन्केचे कर्ज घेत नाही की त्यामुळे आत्महत्येची वेळ त्याच्यावर येत नाही. पण हे नाटक यथास्थित रंगवले गेले. त्याचा कसलाही गंध नसलेले राहुल गांधी आता अर्थशास्त्री झालेले आहेत.

भारतीय बॅन्कांकडे पैसे नाहीत म्हणून सक्तीने जनतेचा पैसा बुडीत बॅन्केत आणला गेला, असा त्यांचा नवा अर्थसिद्धांत आहे. किंबहूना बुडीत बॅन्का वा तिथली बुडीत कर्जे भागवण्यासाठी असा काही उद्योग करावा लागतो, हा त्यातला नवा सिद्धांत आहे. तोच खरा मानायचा असेल, तर त्यांच्याच आशीर्वादाने चाललेल्या युपीए सत्तेने २०१३ सालात लाखभर कोटी रुपयांची थकलेली उद्योगपती व कंपन्यांची कर्जे माफ़ करताना कुठल्या रकमेचा बॅन्कांमध्ये सक्तीने भरणा केला होता? त्यांनी लाखभर कोटी रुपयांची उद्योगांची कर्जे माफ़ करण्यासाठी बॅन्कांमध्ये भरपूर पैसे होते, असे त्यांना म्हणायचे आहे काय? की त्यासाठी अधिकच्या नोटा छापून बॅन्केत भरणा करून त्यातून कंपन्यांची कर्जे माफ़ केली गेली होती? बड्या कंपन्यांची बुडीत कर्जे माफ़ करण्याची प्रथा कॉग्रेसच्याच जमान्यात सुरू झाली आणि अगदी विजय मल्या नामक इसमाला कुठल्याही तारणाशिवाय इतकी मोठी हजारो कोटी रुपयांची कर्जेही युपीएच्याच कारकिर्दीत दिली गेलेली आहेत. त्यातला एकही पैसा मोदी सरकारच्या कारकिर्दीत दिला गेलेला नाही. मग राहुल वा त्यांचे सवंगडी कसली बोंब ठोकत आहेत? आम्ही बुडव्यांना कर्जे दिली आणि तुम्ही वसुल करत नाही, म्हणून गुन्हेगार असला अजब मामला नाही काय? बुडव्यांना बिनतारणाचे कर्ज देणारा हरिश्चंद्राचा अवतार आणि त्याला पकडण्यात कसूर केली म्हणून मोदी सरकार आरोपी? म्हणजे मॅनेजरने करोडो रुपये चोराच्या हवाली करायचे आणि दाराबाहेर बसलेल्या राखणदाराने निसटून गेलेल्या चोराला रोखले नाही, म्हणून त्याच मॅनेजरने कांगावा करायचा. यापेक्षा हे सर्व नाटक वेगळे आहे काय? ज्या उद्योगांना बुडीत कर्ज म्हणून बाजूला सारून ठेवलेले आहे, त्यांना बुडावायला कर्जे दिली कोणी? त्याबद्दल कोणीच कसा बोलत नाही? चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे यापेक्षा काही वेगळे असते काय?

२०१३ सालात रिझर्व्ह बॅन्केचे तात्कालीन डेप्युटी गव्हर्नर चक्रवर्ति यांनी पत्रकार परिषद घेऊन बॅन्कांनी एक लाख कोटी रुपयांची बुडीत कर्जे कशी हिशोबातून बाजुला केलीत त्याचा तपशीलच सादर केलेला होता. किंबहूना त्याच चक्रवर्ति यांनी तेव्हाच अशा तांत्रिक शब्दाचा आडोसा घेऊन उद्योगपतींना बुडीत कर्जे माफ़ करण्याच्या बॅन्कींगच्या लबाडीवर टिका केलेली होती. तेव्हा जेटली किंवा मोदी देशाचे अर्थमंत्री नव्हते; तर चिदंबरम अर्थखाते संभाळत होते. त्यांना चक्रवर्ति नावाचा कोणी रिझर्व्ह बॅन्केत डेप्युटी गव्हर्नर आहे आणि त्याने बुडीत कर्जाविषयी बॅन्का लबाडी करीत असल्याचा खुलासा केल्याचे ठाऊकच नव्हते काय? राहुल गांधी तेव्हा झोपा काढत होते काय? कुठल्या तोंडाने ही माणसे अशी बेताल बोलू व थापा मारू शकतात? आज ज्यांना कंठ फ़ुटलेत त्यापैकी कोणालाही तीन वर्षापुर्वीच्या अशा बुडीत कर्जाच्या माफ़ीविषयी काहीच ठाऊक नव्हते काय? राहुल गांधी अर्थशास्त्री होईपर्यंत कोणालाच हा नवा सिद्धांत माहित नसावा. बहुधा असे सगळेच शहाणे राहुल चिंतनातून बाहेर पडून, नवा अर्थसिद्धांत मांडण्याच्या प्रतिक्षेत असावेत. अन्यथा सरकार गरीबांच्या नोटा घेऊन कंपन्यांचे कर्ज माफ़ करणार, ह्या महासिद्धांतावर प्रश्न विचारले गेलेच असते. पण जे अर्थशास्त्री असतात, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असतो ना? मग ते अमर्त्य सेन असोत किंवा मनमोहन सिंग असोत, त्यांनी काही सांगितले, मग तिला काळ्या दगडावरची रेघ समजायचे असते ना? सहाजिकच राहुल गांधी नवे अर्थशास्त्री झाले असतील, तर ते काय बडबडतात, त्याचा विचार करण्यापेक्षा त्यांच्याच सुरात सूर मिसळून बोलणे भाग असते. पुढचे मागचे काही तपासण्याची कुठलीही गरज नसते. २००७ ते २०१३ या कालखंडात बॅन्कांनी अशा बुडीत कर्जाची रक्कम जवळपास पाच लाखावर नेऊन ठेवली होती, तेव्हा हे अर्थशास्त्री कुठल्या चिंतनात मग्न होते?

ही आकडेवारी आज कोणी नव्याने सांगितलेली नाही किंवा शोधलेली नाही. चिदंबरम अर्थमंत्री असताना आणि राहुल रिमोटने देशाचा कारभार हाकत असतानाच्याच चक्रवर्ति नामे डेप्युटी गव्हर्नरने सादर केलेली आकडेवारी व तपशील आहे. त्याची दखल या दोन महोदयांनी तेव्हाच घेतली असती, तर बॅन्कांची प्रकृती सुधारण्याचे उपाय तेव्हाच हाती घेतले जाऊ शकले असते. विजय मल्यासारख्या बदमाशाला बुडीत कर्जातून सावरण्यासाठी नव्याने कर्ज बहाल करण्याचे पाप, त्याच कालखंडात घडलेले आहे, याचा विसर पडून चालणार नाही. गहाण वा तारण ठेवायला काहीही नसताना बॅन्कांनी कोट्यवधीची कर्जे अशा बदमाशांना देण्याची प्रथा, राहुलचे पणजोबा नेहरूंच्याच जमान्यात सुरू झाली होती. त्यांचेच वारस आज बॅन्केत सामान्यांनी पैसे जमा केल्यावर ती रक्कम उद्योगपती पळवण्याच्या अफ़वा पिकवत आहेत. आपापले उल्लू सिधे करण्यासाठी अनेकजण राहुलच्या सिद्धांताला लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी झटत आहेत. कारण कोणालाही सत्याची चाड उरलेली नाही. चिटफ़ंड फ़सवा असतो. पण झटपट लाभाचे गाजर दाखवणारा असतो. त्याचे आकर्षण असायचेच. आधीचा बुडाला म्हणून नंतरचा तोच जुगार खेळायला कधी मागेपुढे पहात नाही. आपण त्याच समाजाचे घटक आहोत. आपल्याला वास्तवाशी काय कर्तव्य? आजचा दिवस मोलाचा! कलको किसने देखा? ही आपली मानसिकता आहे. तेव्हा आपल्याला फ़सवणारे देव वाटतात, सत्याला मात्र आपण सत्वपरिक्षेला उभे करत असतो. रक्तशोषण करणार्‍या ढेकूण मच्छरांचा निर्मूलनासाठी काही तास नाक मुठीत धरून जगण्याचा संयम नसलेल्यांना शोषणापासून कोण वाचवू शकेल. उलट असा माणूस सर्वात मोठा गुन्हेगार असतो. कारण फ़सणे-फ़सवणे सोपे असते आणि समजणे वा समजावणे अवघड काम असते.

4 comments:

  1. Chor Manager ...! Manager chya mage lapun loot karnare, ani itar.... saglyancha burkha mast fadlay, Bhau tumhi...! Great .. Thx.

    ReplyDelete
  2. भाऊ दररोज लाखो रुपयांच्या नविन दोन हजारांच्या नोटा सापडत आहेत...
    त्यावर लिहा ना...

    ReplyDelete
  3. अतिशय मुद्देसूद,परखड परीक्षण भाऊ!
    आता नवीन नोटांच्या बॅॅंकेबाहेरील बंडलबाजीवर प्रकाश टाकता आला तर पहा.
    धन्यवाद!

    ReplyDelete