भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत येत नाहीत आणि आले तर बोलत नाहीत, अशी तक्रार करून हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा पराक्रम विरोधकांनी केला होता. एका बाजूला राहुल गांधी म्हणत होते, की आपल्याला सत्ताधारी पक्ष संसदेत बोलू देत नाही. दुसरीकडे तक्रार होती, की पंतप्रधान बोलत नाहीत. पण वस्तुस्थिती नेमकी कशी उलटी असते, ते लोकही बघत असतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलले ते राज्यसभेने ऐकून घेतले होते. त्यात सिंग यांनी मोदी वा त्यांच्या निर्णयावर अतिशय कडवी टिका केलेली होती. नोटाबंदी म्हणजे संघटीत लूटमार असल्याचा धादांत आरोप सिंग यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी कुठला पुरावा दिला नाही. तरीही पंतप्रधान मोदींसह त्यांच्या सहकारी सत्ताधारी सदस्यांनी ती टिका निमूट ऐकलेली होती. त्यात कोणी व्यत्यय आणला नव्हता. पण जेव्हा मोदी बोलतात, तेव्हा मात्र त्यांनी कुणा विरोधकावर टिका करू नये, असा आग्रह असतो. लोकशाहीत व संसदीय कामकाजात सभ्य भाषेचा वापर व्हावा, ही अपेक्षा असते आणि मोदींनी त्या मर्यादेचा भंग केव्हाही केलेला नाही. तसे असते तर सभापतींनी त्यांचे शब्द कामकाजातून काढून टाकण्याचा निर्णय दिला असता. पण तसे एकदाही होऊ शकलेले नाही. कारण मोदी अतिशय बोचरी टिका करण्यात वाकबगार आहेत आणि शब्दात कुठेही पकडले जाऊ नये, याची त्यांना उत्तम समज आहे. पण मनमोहन सिंग यांच्यापासून कॉग्रेसच्या अनेक नेत्यांना तशा मर्यादा कधीही पाळता आलेल्या नाहीत. म्हणूनच मग त्यांची तारांबळ उडत असते. मोदी बोलले तरी पंचाईत आणि नाही बोलले तरी तक्रार होत असते. बुधवारी अशीच काहीशी परिस्थिती राज्यसभेत उदभवली. उपसभापती कामकाज चालवित असताना पंतप्रधान बोलायला उभे राहिले आणि सराईतपणे त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर अशा शब्दात हल्ला चढवला, की दुखले खुप पण शब्दात कोणी त्यावर बोट ठेवू शकला नाही.
नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक चूक असल्याचा दावा सिंग यांनी केला होता आणि पुढे जाऊन त्यालाच संघटीत लूट वा दरोडेखोरी म्हणून हिणवले होते. पण दरोडेखोरी कशी आहे, त्याचा कुठलाही पुरावा किंवा खुलासा सिंग देऊ शकले नव्हते. उलट त्यांच्याच दहा वर्षाच्या कारकिर्दीत देशातले सर्वात भयंकर मोठे घोटाळे व जनतेच्या पैशाची लूटमार झाली; म्हणून सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला होता. लाखो करोडो रुपयांची हेराफ़ेरी झाल्याचे न्यायालयानेच निश्चीत करून, मनमोहन सरकारचे अनेक निर्णय स्थगीत वा रद्दबातल केलेले होते. नंतर मोदी सरकारच्या काळात त्याच विषयात नवे निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यावर, सरकारी तिजोरीत काही लाख कोटी रुपये महसुल रुपाने जमा झाले. मनमोहन सरकारचे ते निर्णय रद्द झाले नसते, तर जनतेच्या तितक्या अफ़ाट रकमेची लूट झालेली होती, ती परत मिळू शकली नसती. पण इतकी अफ़ाट लूट होत असताना मनमोहन सिंग त्रयस्थ म्हणून तिकडे काणाडोळा करीत राहिले होते. याला संगनमताने केलेली लुट नाहीतर काय म्हणायच्रे असते? पण सिंग यांनी आपल्या अंतरंगात एकदाही डोकावून बघितले नाही, की आपल्या कारकिर्दीतील अशा राजरोस लुटमारीवर कधी साफ़ खुलासा केला नाही. जेव्हा खुलासा विचारला गेला, तेव्हा आपल्या अपरोक्ष काही गोष्टी घडल्याचे सांगून हात झटकलेले होते. असा माणूस कुठल्याही पुराव्याशिवाय मोदींवर संघटित लूटमारीचा आरोप संसदेत करतो, तेव्हा त्याला लाजलज्जा आहे किंवा नाही, असा प्रश्न पडतो. त्याचे वर्तनच त्याची बेअब्रु करीत असते. साध्या सरळ भाषेत यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. मनमोहन सिंग यांची आज हीच प्रतिमा आहे. अलिकडल्या काळात त्यांनी आपल्या वागण्यातून व बोलण्यातूनच स्वत:ची खुप विटंबना करून घेतली आहे. त्यापेक्षा अधिक विटंबना कोण करू शकतो?
अशा मनमोहन सिंग यांच्या आजवरच्या धुतल्या चेहर्यावरचा मुखवटा राज्यसभेत बोलताना मोदींनी टरटरा फ़ाडला. अतिशय नेमक्या शब्दात सिंग वर्तनातील दुटप्पी गोष्टी समोर आणल्या. देशाच्या सत्तर वर्षाच्या वाटचालीत पस्तीस वर्षे मनमोहन सिंग कुठल्या ना कुठल्या राष्ट्रीय आर्थिक निर्णय प्रक्रीयेत सहभागी होते आणि त्याच कालखंडात देशातील सर्वात मोठमोठे घोटाळे होऊन गेले. पण इतक्या मोठ्या अफ़रातफ़री होऊनही, कुठेही सिंग यांच्या अंगाला डाग लागला नाही. आजवरच्या प्रदिर्घ राजकारणात इतकी चतुराई दुसरा कुणी राजकीय नेताही दाखवू शकलेला नाही. म्हणूनच राजकारण्यांसाठी सिंग हा आदर्श असल्याचे सांगताना, मोदींनी मारलेला टोमणा सिंग यांच्यासह कॉग्रेसजनांना कमालीचा बोचला. रेनकोट घालून बाथरुमध्ये आंधोळ करण्याची ही मनमोहन कला शिकण्यासारखी असल्याचे मोदी म्हणाले. त्याचा अर्थ घोटाळे व अफ़रातफ़रीच्या पावसातही सिंग सुके ठणठणित राहू शकतात. ही भाषा सभ्य असली तरी रक्तबंबाळ करून सोडणारी होती. अतिशय सामान्य माणसालाही उमजू शकणारी होती. त्या मोजक्या शब्दातून मोदींनी मनमोहन सिंग म्हणजे चारित्र्यसंपन्न वा निष्कलंक असल्याचा मुखवटा टरटरा फ़ाडून टाकला. कॉग्रेसचाही चेहरा त्यामुळे फ़ाटला. त्या यातनांमुळेच त्यांना बोंबा मारणे भाग होते आणि म्हणूनच मोदींचे भाषण संपुर्ण ऐकण्यापुर्वीच कॉग्रेस सदस्यांनी सभात्यागाचा आव आणुन पळ काढला. हेच नेहमीचे झाले आहे. एक वर्षापुर्वी स्मृती इराणी यांनीही असेच ठाम उत्तर द्यायला सुरूवात केल्यावर कॉग्रेसने सभागृहातून पळ काढला होता. आपल्या शिव्याशाप ऐकून घ्यायला पंतप्रधान जागेवर बसले पाहिजेत आणि त्याला उत्तर दिले जाते, तेव्हा मात्र शेपूट घालून पळ काढायचा, अशी रणनिती झालेली आहे. शेपूट घालायची रणनिती कधी विजयाकडे घेऊन जात नसते, हे त्यांच्या कधी लक्षात येणार आहे?
आता मनमोहन सिंग यांच्यावरील घणाघाती टिकेसाठी मोदींनी क्षमा मागावी, असा आग्रह कॉग्रेसकडून धरला जात आहे. अशा आग्रहांनीच नरेंद्र मोदीना पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवले, याचेही या दिवट्यांना भान राहिलेले नाही. अशा आग्रहाला शरण जाऊन मोदींनी एकदाही माफ़ी मागितलेली नाही. उलट त्यातूनच गुजरातसारख्या एका मध्यम आकाराच्या राज्याचा हा मुख्यमंत्री; देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंत मजल मारू शकला. गुजरातच्या दंगलीसाठी वा तिथे हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांची माफ़ी मोदींनी मागावी, यासाठी दहाबारा वर्षे सातत्याने मोहिम राबवली गेली. पुढे लहानसहान बाबतीत सतत मोदींच्या माफ़ीचे आग्रह धरले गेले. कधी मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारली म्हणून, तर कधी कुठल्या मुलाखतीत कुत्र्याच्या पिल्लाचे उदाहरण दिले म्हणून, मोदींकडे माफ़ी मागण्याचे आग्रह सतत धरले गेले. पण त्यांनी एकदाही अशी माफ़ी मागितली नाही. पण माफ़ीचा आग्रह धरण्यासाठी कॉग्रेससह विरोधकांना सतत नवनवी निमीत्ते मात्र पुरवलेली आहेत. किंबहूना विरोधकांची असली माफ़ीच्या आग्रहाची मोहिम बंद पडू नये, असाच मोदींचा प्रयास राहिला आहे. कारण अशा प्रत्येक माफ़ीच्या आग्रहातून मोदींची लोकप्रियता अधिकाधिक वाढत गेली आहे. त्यांच्या राजकीय यशाचे शिखर अधिक उंच झालेले आहे. पण आपल्या मागणी वा आग्रहातील फ़ोलपणा मात्र विरोधकांच्या लक्षात येऊ शकलेला नाही. म्हणूनच तोच चुकलेला वा फ़सलेला आग्रह सातत्याने पुढे रेटला जात आहे. मोदींचे हात असे ‘अत्याग्रही’ अधिकाधिक बळकट करत गेले आहेत. मनमोहन यांची माफ़ी मागण्याचा आग्रह धरून मोदींच्या त्याच नेमक्या बोचर्या शब्दांना अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य मोदीविरोधक करीत आहेत. पण मनमोहन सिंग यांचे तेच नेमके वर्णन सामान्य माणसाला सहज पटणारे आहे. म्हणून त्याचा उहापोह अधिक होण्यापेक्षा त्यावर तात्काळ पडदा पडण्यात फ़ायदा असल्याचेही ज्यांना लक्षात येत नाही, त्यांना काळ तरी कसा माफ़ करील?
मोदिचे भाषण ऐकणे एक पर्वणीच असते , नाहीतर राहुलचे बोलणे म्हणजे शब्द बापुडा केवळ वारा !
ReplyDeleteWa wa..
ReplyDelete