Thursday, March 16, 2017

मायावतींचे भवितव्य

mayawati के लिए चित्र परिणाम

आपल्या दारूण पराभवातून सर्वाधिक धक्का बसला असेल, तर तो बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना बसला आहे. कारण गेल्या दोन दशकात त्यांनी जे मनुवादाचे भूत उभे केले होते, ते आता सामान्य मतदाराच्या मानगुटीवरून उतरले असून, अजून मायावतीच त्यांनी निर्माण केलेल्या भुलभुलैयातून बाहेर पडायला तयार नाहीत. अर्थात त्यासाठी जग वा तोच सामान्य मतदार थांबायला राजी नसतो. एखाद्या भूमिका वा प्रचाराचा जनमानसावर काही काळ प्रभाव पडत असतो. कोणी हे सत्य नाकारू शकत नाही. पण त्या प्रभावाचा लाभ उठवून अधिकाधिक लोकांवरील त्या प्रभावाला विश्वासात परावर्तित करण्यातून प्रभावाचे बळ वाढत असते. उलट तो प्रभाव क्षीण होऊ लागला, मग प्रभाव पाडणार्‍यांचे पितळ उघडे पडू लागत असते. मनुवाद किंवा त्यातून मागास पिछाड्यांची दिर्घकालीन दुर्दशा, हा तसा नवा विषय नाही. दिडदोन शतकापासून भारतीय समाजात जी जातीय वा सामाजिक धुसळण सुरू झाली, त्यातून हा विषय सतत ऐरणीवर येत राहिला आहे. त्याचा सर्वाधिक लाभ मायावतींनी दशकभर उचलला. पण हे करताना त्यांनी थोडे जरी प्रामाणिक प्रयास त्याच दलित पिछड्यांच्या उद्धारासाठी केले असते, तर त्यांचा मतदार वाढत गेला असता. पण सत्तेच्या मागे धावताना मायावतींनी नेहमी आपल्याच आचारविचारांना बेधडक तिलांजली दिलेली होती. मात्र त्याविषयी कोणी शंका घेतली वा सवाल उभा केला, मग त्यांना आपण दलित की बेटी असल्याचे स्मरण व्हायचे. बाकीच्या वेळी त्या एखाद्या राजकन्येसारखी हुकूमत गाजवत राहिल्या. सोनिया गांधी वा राहुल-प्रियंका यांच्यापेक्षा मायावतींचे वर्तन किंचितही भिन्न नव्हते. म्हणूनच त्यांनाही लोकसभेतील दारूण पराभवाने जाग आली नाही आणि विधानसभेतला अभूतपूर्व पराभव त्यांना पत्करावा लागला आहे. पण अजूनही कांगावखोरीतून बाहेर पडण्याची इच्छा त्यांना झालेली दिसत नाही.

एकविसाव्या शतकाने मायावतींचा उत्तरप्रदेशातील उदय बघितला. त्यांनी सत्तेपर्यंत एकहाती मजल मारून दाखवली. ती त्यांना दलितच नव्हेतर समाजातील कुठल्याही जातीपंथांच्या लोकांनी दिलेली अपुर्व संधी होती. पण तिचा उपयोग जनतेला दिलासा देण्याकरीता करण्यापेक्षा मायावती आपली तुंबडी भरण्यासाठी सत्तेचा वापर करीत गेल्या. आज त्यांच्या भावाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे आणि खुद्द मायावती राजमहालात जीवन जगत असतात. पण याच दरम्यान सामान्य दलिताच्या किंवा सामान्य जनतेच्या झोळीत त्यांनी काय टाकले, त्याचे उत्तर नकारार्थी आहे. त्यामुळेच लोकसभेच्या मतदानात त्यांना जबरदस्त फ़टका बसला. नंतर एक एक करीत त्यांचे निकटचे सहकारी त्यांच्यावर गंभीर आरोप करीत पक्षातून बाहेर पडत गेले. मौर्य नावाचा त्यांच्या पक्षाचा विधानसभेतील विरोधीनेता, काही महिन्यांपुर्वी पक्षातून बाहेर पडला. त्याने केलेल्या आरोपात नवे काहीच नव्हते. बहनजी पैसे घेऊन पक्षाची उमेदवारी विकतात. त्यातून त्यांनी कोट्यवधीची माया जमवली आहे, हा मौर्याचा आरोप नवा नव्हता. तीच मायावतींची ख्याती होती. २०१६ संपण्यापुर्वी एकाच दिवशी मायावतींनी शंभर कोटीहून अधिक रोख रक्कम बॅन्क खात्यात जमा केली. अशा गोष्टी त्यांच्या दलित वा गरीब असण्याची साक्ष झाल्या होत्या. त्याचा स्पष्ट आरोप करायला अनेकजण दबकत होते. कारण मायावतींवर आरोप म्हणजे मनूवादाचा उलटा प्रत्यारोप, ही भिती तयार झाली होती. पण लोकही सत्य जाणून होते. म्हणूनच हक्काच्या जमवलेल्या मतदाराच्या पलिकडे अन्य जातीपातीतून मायावतींना प्रतिसाद दिलेला मतदार त्यांना सोडून गेला. त्याची प्रचिती लोकसभा निकालातून आली. त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार लोकसभा गाठू शकला नाही आणि राज्यसभेत बसलेल्या मायावतींना उरलेली मुदत संपल्यावर त्याही सभागृहात निवडून येणे अशक्य होणार आहे.

आज विधानसभेत मायावतींच्या पक्षाचे फ़क्त १९ आमदार निवडून आले आहेत आणि राज्यसभेत जाण्यासाठी मायावतींना किमान ४० आमदारांची मते मिळणे गरजेचे आहे. पण तितके आमदार त्यांच्यापाशी नाहीत. म्हणूनच पुढल्या वर्षी मायावती राजकारणात कुठे असतील, अशी शंका आतापासून व्यक्त केली जात आहे. जया भादुरी यांच्यापासून कोणालाही राज्यसभेच्या जागा वाटणार्‍या मुलायमचीही स्थिती दयनीय आहे. त्यांच्या पक्षाला राज्यसभेतही आपल्या जागा गमावण्यापलिकडे काहीही शक्य राहिलेले नाही. पण निदान आज मुलायम लोकसभेत आहेत आणि २०१९ सालातही निवडून येतील, अशी अपेक्षा आहे. पण मायावतींना तितके तरी शक्य होईल काय, असा प्रश्न आहे. कारण मायावती आजही २२ टक्के विखुरलेली मते घेऊन तिसर्‍या क्रमांकावर टिकल्या आहेत. पण विधानसभेत त्यांना ४० जागा निवडून आणणे शक्य झालेले नसेल, तर लोकसभेची एक जागा जिंकणे कितपत शक्य होऊ शकेल? थेट जनतेतून निवडून येण्यासाठी हक्काचे मतदार पाठीशी असावे लागतात आणि ठरल्या जागी त्यांचे केंद्रीकरण असायला हवे. मायावतींकडे २०-२२ टक्के विखुरलेली मते असल्यानेच त्यांना अधिकची मते कुठून तरी मिळवावी लागतील. तरच या २२ टक्के मतांचा चेक कॅश होऊ शकतो. आणखी एक बाब अशी, की दलितांच्या सर्व जातींची मते मायावती आपल्या खात्यात टिकवू शकलेल्या नाहीत. मुस्लिमांवर मोठा भरवसा दाखवून त्यांनी मांडलेली गणिते फ़सली आहेत. म्हणूनच आगामी मतदानात त्यांना साथ देणारा कितीसा मुस्लिम त्यांच्याकडे टिकून राहिल, याचीच शंका आहे. इतक्या शिखरावर पोहोचलेल्या मायावतींची ही घसरगुंडी, राजकीय अभ्यसकांसाठी एक धडा आहे. लोकप्रियता मिळवणे जितके कठीण असते, त्यापेक्षाही ती टिकवणे अवघड असते. लोकप्रियतेतून विश्वास संपादन करण्यात उणिव राहिली, मग घसरगुंडी अपरिहार्य असते.

राजकारणात शिरलेले लोक आपली तुंबडी भरून घेण्याला प्राधान्य देतात, हे कोणी नाकारू शकत नाही. पण राजकीय यशाचे लाभ उठवताना जनतेलाही खुश ठेवावे लागत असते. तिच्या जीवनातही थोडाफ़ार बदल झाल्याचा अनुभव त्या सामान्य लोकांना यावा लागतो. मायावती मुलायमच्या व्यक्तीगतच नव्हेतर कौटुंबिक जीवनात आलेला आमुलाग्र बदल बघणार्‍या सामान्य मतदाराच्या जीवनात, तसूभरही स्थित्यंतर झालेले नाही. मग त्यांना अशा आपल्याच जातीपातीच्या नेत्यांच्या संपन्नतेविषयी शंका येऊ लागतात. असुया सतावू लागते. आपल्या यतना वेदनांचा बाजार मांडून कमाई करणार्‍यांविषयी कमालीचा संताप जनमानसात उफ़ाळू लागतो. त्याचे परिणाम मग मतमोजणीतून समोर येतात. मायावतींना त्याचाच फ़टका बसला आहे. कारण त्यांनी पाठीराख्या मतदाराच्या भावनांची वा गरजांची काडीमात्र फ़िकीर केलेली नाही. म्हणूनच दलित की बेटी पंतप्रधान व्हायला सज्ज होत असताना, पिछड्या मागास जातीपातीच तिला सोडून अन्यत्र वळल्या आहेत. आपण राजकन्या वा सरंजामदारी नसून सामान्य गरीबाइतकेच संवेदनशील आहोत, याची प्रचिती पुन्हा आणून देणे; हाच त्यातला एकमेव मार्ग आहे. मायावतींना तो अनुसरणे कितपत शक्य आहे, त्याची यापुढे परिक्षा होणार आहे. कारण लोकसभा विधानसभा पराभवानंतरचा मार्ग मोठा खडतर आहे. आपली पाळेमुळे शोधत जाण्यातच पुनरुत्थान असू शकते. फ़क्त आरोप वा कांगावखोरी यापुढे कामी येणार नाही. पुन्हा शून्यातून पक्षाची उभारणी व त्यासाठी विश्वासू सहकारी कार्यकर्त्यांची फ़ौज उभी करणे भाग आहे. नाहीतर राहुल गांधी यांच्या मार्गाने अरेरावी करीत उरलासुरला बसपा संपण्याला वेळ लागणार नाही. वास्तवाला सामोरे जाऊन व ते स्विकारूनच त्यात बदल घडवता येतो. वास्तव नाकारून कुठलाही बदल शक्य नसतो. मायावतींचे भवितव्य त्यांच्याच हाती आहे.

3 comments:

  1. २२ टक्के मते म्हणजे काय ते ध्यानात घ्या. She is not getting written off so easily.

    ReplyDelete
  2. Bhau is excellent political assesser.

    ReplyDelete