सव्वा दिन वर्षापुर्वी एका कार्यक्रमानिमीत्त तात्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईत आले होते. तिथे बोलताना त्यांनी भारतीय सुरक्षेचा कसा पोरखेळ आधीच्या काळात झाला, त्याचे संदर्भ दिलेले होते. दोन पंतप्रधानांनी भारताच्या सु्रक्षेशी पोरखेळ केल्याने आपले परदेशातील डिप असेट मारले गेले, असेही त्यांनी म्हटलेले होते. पण त्याचा अर्थ अनेक शहाण्यांना लागला नाही आणि तात्काळ पर्रीकर यांच्यावर प्रश्नांच्या फ़ैरी झाडल्या गेल्या होत्या. पण त्याचवेळी नव्याने आपल्याला परदेशात आपले असेट निर्माण करावे लागतील आणि त्यातूनच देश अधिक सुरक्षित होऊ शकेल, असेही पर्रीकरांनी म्हटलेले होते. पण त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. उथळ पाण्याला खळखळात फ़ार असे आपल्या भाषेत म्हटले जाते. त्याचा अनुभव उथळ बुद्धीवादी वर्गामुळे नित्यनेमाने येत असतो. अभ्यासक व जाणकारच इतके निर्बुद्ध झालेले आहेत, की त्यांचे आकलन शून्य! त्यातले अनेकजण परकीय हस्तक म्हणूनच इथे दगाबाजी करीत असतील, तर यापेक्षा काय वेगळे होऊ शकते? मागल्या दहाबारा वर्षात भारतात युपीएचे राज्य होते. त्याच कालखंडात भारताच्या सुरक्षेचे धिंडवडे उडवणारे निर्णय घेतले गेले आहेत. किंबहूना मोक्याच्या जागी पाकचे वा शत्रूदेशाचे हितचिंतक बसल्यासारखे निर्णय घेतले गेले आहेत. पर्रीकर यांनी त्याकडेच लक्ष वेधलेले होते. भारतात परकीय हस्तकांचा वरचाष्मा झालेला असून, सरकारी कामकाजातही शत्रूचे हस्तक ढवळाढवळ करू लागले असल्याचेच संरक्षणमंत्र्यांना सांगायचे होते. माध्यमात, पत्रकारितेत वा विविध मोक्याच्या जागी पाकिस्तानी भूमिकेला प्राधान्य देणारे व देशाला हानी पोहोचवणारे लोक येऊन बसले आहेत. याकडे पर्रीकरांनी लक्ष वेधले होते. अशी माणसे कायद्याच्या चौकटीत देशद्रोह करीत आहेत, असे तुम्ही सिद्ध करू शकत नसता. पण त्यांच्या वागण्याबोलण्यातून नेमके तेच चाललेले असते.
पाकिस्तानला भारताशी थेट युद्धात जिंकणे शक्य नसल्याचे उमजल्यावर त्यांनी आपली रणनिती बदलली आणि भारताच्या बलस्थानालाच पोखरून काढण्याचा डावपेच आखला. त्यातून प्रयत्नपुर्वक मागल्या दोनतीन दशकात भारतामध्ये मोक्याच्या जागी आपले हस्तक आणुन बसवलेले आहेत. त्यापैकी कोणी मोठ्या विद्यापीठात प्राध्यापक असतील, कोणी चित्रपट कलावंत म्हणून पुढे आणले गेले असतील. कोणी माध्यमात संपादक पत्रकार म्हणून बसवलेले आहेत आणि कोणी सरकारी पदांवर सुद्धा बसलेले दिसतील. त्यांनी पाकिस्तानला भारताची कुठली गुपिते पळवून द्यायची नसतात, किंवा भारताच्या विरोधात हत्यार हाती घेऊन युद्ध पुकारायचे नसते. त्यांनी आपापल्या जागी बसून भारताला मजबूत राखणार्या जागा, स्थाने वा भूमिकांना पोकळ करून टाकायचे असते. सहाजिकच त्यांच्यावर कुठला देशद्रोहाचा आरोप होऊ शकत नाही, किंवा खटला भरला जाऊ शकत नाही. अरुंधती रॉय, सुधींद्र कुलकर्णी, बरखा दत्त यासारखे अनेक चेहरे आपल्यासमोर आहेत. त्यांच्या बोलण्याचा वा त्यांच्या कृतीचा आपल्याला अनेकदा राग येतो. त्यांचे वर्तन वा वक्तव्य पाकिस्तानला पुरक व भारताला मारक असल्याचे आपल्याला कळत असते. पण त्यासाठी त्यांना शिक्षा फ़र्मावणारी कुठलीही कायदेशीर तरतुद आपल्या हाती नसते. त्यांच्या कृतीतून त्यांनी इथल्या कायदे व नियमांचा आधार घेऊन, भारताच्या राष्ट्रावादाला खिळखिळे करायचे असते. कुठल्याही देशाची शक्ती त्याच्या पैशात, श्रीमंतीत वा हत्यार आदी साधनांमध्ये अजिबात नसते. त्यांची शक्ती राष्ट्र म्हणून जोपासलेल्या अभिमानात सामावलेली असते. तो जितका सामर्थ्यवान असतो, तितकी मग बाकीची साधने परिणामकारक ठरत असतात. तो अभिमान ढासळून टाकला, मग बाकीची साधने निकामी व परिणामशून्य होऊन जातात. उपरोक्त पाकप्रेमींवर तोच अभिमान पोखरून काढण्याची जबाबदारी असते.
ही माणसे कधी उदयास आली तेही थोडे तपासून बघता येईल. जेव्हा भारतात देवेगौडा सरकार होते आणि ते पडल्यावर इंद्रकुमार गुजराल सरकार काही काळ सत्तेवर आले, त्यानंतर या लोकांचा उदय झाला. गुजराल यांनी पंतप्रधान असताना आपल्या अधिकारात भारताच्या गुप्तचर खात्याचे पंख छाटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच पाकिस्तान वा अन्य शेजारी देशात असलेले भारताचे हस्तक वा गुप्तचर उघडे पडले. त्यापैकी अनेकजण मारलेही गेले. असे हस्तक निर्माण करण्यात व त्यांची जोपासना करण्यात कित्येक वर्षे खर्ची पडलेली असतात. गुजरालनी भारतीय सुरक्षेचा असा विचका उडवला. नंतर १९९८ सालच्या लोकसभा निवडणूका झाल्या आणि प्रथमच सोनिया गांधींनी राजकारणात उडी घेतली. कॉग्रेसच्या प्रचारासाठी सोनियांनी सभा घेण्यास आरंभ केला आणि त्याच वेळी भारतातली पहिली वृत्तवाहिनी ‘स्टारन्युज’ नावाने सुरू झाली. बरखा दत्त हिच्यापासून तमाम पाकप्रेमी पत्रकार त्याच वाहिनीच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांच्या माथी मारले गेले. इतर वाहिन्यांचे पेव फ़ुटायला खुप वेळ गेला. पण दरम्यान या वाहिनीच्या माध्यमातून एका ठराविक विचाराचे पत्रकार माध्यमात पेरण्याची प्रक्रीया सुरू झालेली होती. त्यांनी पडद्यावर ज्यांना विचारवंत व अभ्यासक म्हणून पेश केले, त्यात प्रत्येकजण देशाभिमानी असण्यापेक्षा देशाभिमानाची सातत्याने टवाळी करणाराच असावा, याला योगायोग मानता येणार नाही. ज्यांनी ह्या वाहिनीचे वृत्तसंकलन वा सादरीकरण संभाळले, त्या एनडीटीव्ही कंपनीचे भांडवल कुठून आले? त्या पहिल्या स्टारन्युज वाहिनीचा तात्कालीन प्रमुख पीटर मुखर्जी आज शीना बोरा हत्याकांडातला आरोपी म्हणून गजाआड आहे. असा या लोकांचा इतिहास आहे. म्हणजे एका बाजूला पाकिस्तानातले भारताचे गुप्तचर संपवण्यात आले आणि इथे पाकप्रेमी हस्तक निर्माण करण्यात आले.
अशा बुद्धीमंत व अभ्यासक इत्यादींनी इतके काहुर माजवले होते, की त्यांच्याच दबावाखाली भाजपाच्याही संयुक्त सरकारला त्यांच्याच कलाने निर्णय घ्यावे लागत होते. दिल्ली-लाहोर बस वा समझोता एक्सप्रेस अशा योजना वाजपेयींनी कुणामुळे आणल्या? त्यातून कुठली दोस्ती दोन देशात होऊ शकली? वाजपेयी बसने लाहोरला गेले आणि नंतर कारगिल युद्धाची नामुष्की आली. सांगायचा मुद्दा इतकाच, की वाजपेयींचे सरकार भाजपाचे असूनही त्याच्या निर्णयांना असे पाकप्रेमी प्रभावित करीत होते. त्या वाजपेयींच्या पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून विराजमान झालेले सुधींद्र कुलकर्णी, आज पाकप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यासाठी त्यांच्या तोंडाला काळे फ़ासले गेले, तरी त्यांना त्याचा अभिमान वाटतो. गेल्या दोन दशकात पाकिस्तानने भारतात मोक्याच्या जागी आणून आपले हितचिंतक कसे बसवले, त्याचे उत्तर यात सापडू शकते. वरकरणी तुम्ही त्यांच्या कुठल्याही कृतीला देशद्रोह ठरवू शकत नाही. पण त्यांच्या प्रत्येक उक्ती कृतीतून भारतीय सेना, देशाभिमानाचे खच्चीकरण करण्यात त्यांचा पुढाकार दिसेल. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या लोकांची भलतीच तारांबळ उडाली. कारण अशा अनेकांना आपापल्या बिळातून बाहेर पडून पाकच्या मिठाला जागण्याची अगतिकता आलेली आहे. कुठल्याही भारत-पाक वादात ते सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने उभे ठाकलेले दिसतील. कधी पुरस्कारवापसी म्हणून तर कधी ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा देणार्या दिवाळखोरांच्या समर्थनाला ते पुढे सरसावलेले दिसतील. कधी अफ़जल गुरू, याकुब मेमनच्या गळ्यातला फ़ाशीचा दोर काढून घेण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केलेली दिसेल. अशा मोक्याच्या जागी ठाण मांडून बसलेल्यांना अंगावर घेऊन पुन्हा राष्ट्राभिमानाची जोपासना भारतात करणे, मोदी सरकारसाठी सोपे नव्हते. पण मागल्या तीन वर्षात या लोकांना चतुराईने उघडे पाडण्यात मोदींनी कमालीचे यश मिळवले आहे.
प्रखर देशाभिमानामुळेच व्हियतनाम सारख्या चिमुकल्या देशाने युद्धात अमेरिकेला जेरिस आणले होते.
ReplyDeleteसखोल आणि तंतोतंत विश्लेषण
ReplyDeleteKhup chchan lekh. Sarvana deep asset mhanje kay he kalave mhanun asha shabdansathi krupaya tip dyavi. Dhanyavad.
ReplyDeleteअंजन !
ReplyDelete