Wednesday, May 10, 2017

योगी आणि उप-योगी

saamna के लिए चित्र परिणाम

सदा मरे त्याला कोण रडे अशी मराठी भाषेतली उक्ती आहे. कुठल्याही घरात कुटुंबात नेहमी रडणारे एखादे मुल असले, मग त्याच्याकडे कोणी गंभीरपणे बघत नाही, की त्याची फ़ारशी दखल घेतली जात नाही. आधी घरातले आप्तस्वकीय व नंतर शेजारपाजारचे लोकही अशा मुलाच्या कितीही आक्रोश करण्याने विचलीत व्हायचे बंद होतात. कारण त्याच्या तक्रारीत दम नसतो. तर नुसते रडून भोकांड पसरून इतरांचे लक्ष वेधून घेण्यापलिकडे त्याचा अन्य काही उद्देशही नसतो. हे हळुहळू लोकांच्या लक्षात येते आणि मग काही प्रसंगी त्या मुलाची तक्रार रास्त असूनही कोणी त्याची दखल घेण्याचेही सौजन्य दाखवत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची अवस्था आजकाल तशीच होत चालली आहे. रोज उठून भाजपा, मोदी व राज्यातील भाजपा नेतृत्वाखालचे सरकार, यांच्यावर टिकेची झोड शिवसेनेने उठवली आहे. पण अशी टिका खरेच योग्य वा गरजेची आहे काय, याचे कुठलेही भान या पक्षाला उरलेले नाही. अशा स्थितीत आसपासच्या लोकांनी टाईमपास म्हणून त्या भांडणाची मजा घ्यावी तसाच काहीसा प्रकार रंगलेला आहे. रोज शिवसेनेच्या मुखपत्रातून वा पक्षप्रमुखांच्या वक्तव्यातून भाजपाच्या केंद्र वा राज्य सरकारवर कुठला तरी आरोप केला जातो. पण त्याच सरकारांमध्ये आपणही सहभागी आहोत, याचे साधे भानही राखले जात नाही. खरेच भाजपा व त्याचे सरकार इतके नालायक व निरूपयोगी आहे, तर त्यातून बाहेर पडायचे साधे पाऊल शिवसेना कशाला उचलत नाही? एका साध्या पावलाने महाराष्ट्रातील निरूपयोगी भाजपा सरकार बरखास्त होऊ शकते आणि गांजल्या मराठी शेतकरी कष्टकर्‍यांना भाजपाच्या जाचातून मुक्ती मिळू शकते. हे एकट्या शिवसेनेच्या हाती आहे, मग अशी शिवसेना तेच निरूपयोगी भाजपा सरकार टिकवून ठेवण्यासाठी अशी उप-योगी कशाला बनून राहिली आहे?

कधीकाळी शिवसेना हा महाराष्ट्रात भाजपापेक्षाही मोठा व बलशाली पक्ष होता. त्याच्याच आश्रयाने भाजपाने राज्यात आपले बस्तान बसवले. हे सत्य कोणी नाकारत नाही. पण आपले बस्तान बसवताना भाजपाने आपला पाया व संघटन विस्तारली. त्याच काळात शिवसेनेने आपल्या संघटनेकडे दुर्लक्ष केले व नेत्यांच्या बेबनावात सेना विस्कळीत होत गेली. सेनेच्या या आत्मघातकी राजकीय डावपेचांना भाजपा जबाबदार नसून, सेनेतली गटबाजी तटबाजी कारणीभूत आहे. नारायण राणे वा राज ठाकरे यांच्यासारखे खंदे कर्तबगार नेते सेनेला सोडून जाण्याने पक्षाचे नुकसान झाले. त्याची भरपाई करण्यात सेना नेतृत्वाने कोणती पावले उचलली? नसतील तर त्यामुळेच सेना खचत गेली आणि त्याच काळात मोदीसारखा नेता मिळाल्याने देशभर भाजपा वितारत फ़ोफ़ावत गेली. त्यात भाजपाचा काय दोष आहे? आपले होणारे नुकसान टाळण्याची चतुराई सेना दाखवू शकली नाही, हा भाजपाचा दोष होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या वाढल्या शक्तीचा दावा कृतीने सिद्ध करीत भाजपाने आजचे यश मिळवले आहे. त्याच्या नावाने नाके मुरडण्यातून सेनेला आपले पुनरुत्थान करता येणार नाही. त्यापेक्षा अधिकाधिक शक्ती व बुद्धी आपली संघटनात्मक वाढ करण्यात खर्ची घातली, तर भाजपाला त्याची ‘जागा’ दाखवता येईल. पण तितकीच गोष्ट शिवसेना वा तिचे विद्यमान नेतृत्व करू शकलेले नाही. किंबहूना तितकेच करण्याची इच्छाही नसलेल्यांच्या हाती आज सेनेची सुत्रे गेलेली आहेत. त्यामुळे मग नुसते शिव्याशाप देत बसण्यापलिकडे काही काम उरलेले नाही. त्याचा विपरीत प्रभाव म्हणूनच लोकांवर पडत असून, सेनेनेच निरूपयोगी ठरवलेल्या भाजपाच्या सत्तेमध्ये अतिशय निरूपयोगी असलेल्या खात्यांवर समाधान मानत राजकारण करावे लागते आहे. निरूपयोगी अशा खात्यांवरही लाथ मारण्याची हिंमत सेना नेतृत्व आज दाखवू शकत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

घरातल्या एखाद्या म्हातार्‍याने नव्या पिढीतल्या कर्त्या पोराला अखंड शिव्याशाप देत त्यांच्याच मेहरबानीवर जगावे, तशी काहीशी लाचार झालेली व्यक्ती आसपासच्या लोकांची सहानुभूती मिळवते. पण सतत अशा कुरबुरी करीत राहिले, मग त्याचीच हास्यास्पद अवस्था होऊन जाते. लोक म्हणू लागतात, पोरगा इतकाच नालायक असेल तर त्याला सोडून निघून का जात नाही, म्हातारा वा म्हातारी? फ़ार कशाला इतकाच नालायक मुलगा निघाला असेल, तर त्यालाच घरातून हाकलून लावावे ना? त्यापैकी काहीही जमत नसेल तर असे नावाने वा वयाने मोठे लोक गावाच्या टिंगलीचा विषय होतात. कर्त्या पोरासमोर म्हातार्‍यांची कोणी दखलही घेईनासे होऊन जाते. तशीच काहीशी दुर्दशा शिवसेनेने आज स्वत:ची करून घेतली आहे. रोज भाजपाला व राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वहायची. पण त्याच्याच कृपेने सत्ताही उपभोगायची, अशी अगतिकता नशिबी आलेली आहे. कारण आपल्यापाशी तितके कर्तृत्व नाही, याचीही खात्री आहे. म्हणूनच नाकर्त्याच्या संसारात भागी केलेली आहे आणि रोज त्याच्या नाकर्तेपणाचे लाभही उठवले जात आहेत. शिवसेना हिंमतीसाठी ओळखली जात होती. ती अशी अगतिक व अधिकारपदांची लाचार झालेली, तिच्या जुन्या पाठीराख्यांनाही रुचणारी नाही. मग नव्याने त्या पक्षाकडे कोणी आकर्षित होण्याचा विषय दूरची गोष्ट झाली. अभिमान वा सन्मान कर्तृत्वाच्या पायावर उभे असतात आणि वाटचाल करतात. आश्रीताप्रमाणे जगण्याला सन्मान म्हणत नाहीत. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून स्वाभिमान जागवला जात नाही किंवा त्याच्यावर जगतो असेही नाटक रंगवता येत नाही. उलट त्यातून दिवसेदिवस आपणच हास्यास्पद होत जातो. समोरच्याने काही बोलायचीही गरज उरत नाही. कारण आपली अगतिकता आपण कृतीतूनच जगासमोर सादर करीत असतो.

उत्तरप्रदेशात योगी सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफ़ी केली आणि महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार असून तसा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकलेले नाहीत. म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख फ़डणवीसांना निरूपयोगी म्हणत आहेत. हरकत नाही. पण त्या निरूपयोगी मुख्यमंत्र्याच्या सरकारमध्ये निरूपयोगी ठरलेल्या मंत्रालये वा खात्यांना कवटाळून शिवसेना कशाला बसली आहे? त्याचेही स्पष्टीकरणे देऊन टाकावे ना. विधानसभेत विरोधकांनी कर्जमाफ़ीच्या मागणीसाठी रणकंदन माजवले, तेव्हा सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. ते सरकार निरूपयोगी असेल तर त्यात शिवसेनेचे मंत्री व आमदारही त्याच सरकारी नाकर्तेपणात सहभागी होतेच की. त्यापैकी एकाही आमदार मंत्र्याने कसोटीचा प्रसंग आला, तेव्हा आपण शेतकर्‍यांना ‘उपयोगी’ नसल्याचेच सिद्ध करून दाखवले ना? सेनेसे सर्व आमदार मंत्री मुग गिळून गप्प बसले आणि नंतर पक्षप्रमुख मुख्यमंत्र्यांनाच निरूपयोगी घोषित करीत आहेत. त्याच मुख्यमंत्री व सरकारचे काही घटक शिवसेनेचे मंत्रीही आहेत. अशा स्वपक्षीय निरूपयोगी मंत्र्यांना पक्षातून हाकलण्याची हिंमत तरी पक्षप्रमुखांनी दाखवावी. सेनेने पाठींबा काढून घेतला किंवा तसा पवित्रा घेतला, तरी भाजपा सरकारला कर्जमाफ़ीचा विषय निकालात काढावा लागेल. पण शेतकर्‍यांच्या कर्जमाफ़ीसाठी डझनभर मंत्रीपदे सोडायचेही धाडस आजच्या पक्षप्रमुखात नाही. ही शिवसेनेची शोकांतिका होऊन बसली आहे. ज्याला आतून किर्तन बाहेर तमाशा म्हटले जाते, तसला खेळ रंगला आहे. खळबळ माजवण्यात उपयोगी असल्याने वर्तमानपत्रे अशा वक्तव्यांना प्रसिद्धी देत असली, तरी जनमानसात मात्र शिवसेनेची प्रतिमा खालावत चालली आहे. त्याची प्रचिती नंतरच्या निवडणुकीत येत असते. केजरीवालना ती अलिकडेच आली. पुढल्या काही वर्षात शिवसेनेलाही येईल. पण तोवर त्यातून सावरण्याची वेळ मात्र गेलेली असेल.

4 comments:

  1. Yapudhe shivsene var lihine mhanje Penatali shai fukat ghalavanya sarkha ahe...

    ReplyDelete
  2. भाऊ; सेना आता पू्र्वीची राहिली नाही हे सत्य पचवा।

    ReplyDelete
  3. सांगूनही काही उपयोग होण्याचे लक्षण दिसत नाही. दुर्दैव हे की हितकारक सल्ला पाळण्याऐवजी सल्ला देणाऱ्याला दूर लोटले जाते.

    ReplyDelete