Thursday, July 6, 2017

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

अवार्ड वापसी गैंग के लिए चित्र परिणाम

दिल्लीहून वल्लभगड हरयाणा येथे रेल्वेने जाणार्‍या जुनैद नामक मुस्लिम तरूणाचा एका जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची बातमी झपाट्याने देशभर पसरली होती. पण चार दिवसांपुर्वी बंगालच्या बशिरहाट येथे मोठ्या जमावाने हिंदू वस्तीत घुसून जाळपोळ व मारहाण केल्याची बातमी बंगालच्याही इतर शहरात येण्यास दोनतीन दिवस उलटून जावे लागले आहेत. याला पुरोगामी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. कारण बंगालमध्ये पुरोगामी मानल्या जाणार्‍या तृणमूल कॉग्रेसची सत्ता असून, त्या दंगलग्रस्त भागात पत्रकारांनाही जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. पण आसपासच्या सामान्य लोकांनी त्या दंगल व हिंसाचाराचे आपापल्या मोबाईल कॅमेराने चित्रण केले आणि सोशल मीडियात टाकल्यामुळे गडबड झाली. अन्यथा आजही बंगालकडे कोणाचे लक्ष गेले नसते आणि अवघ्या देशातले पुरोगामी गोरक्षकांच्या हिंसाचाराचे प्रवचन झोडत बसले असते. पण सोशल मीडियातल्या त्या चित्रणाचा उपयोग करून अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक वाहिनीने बशिरहाटच्या त्या पुरोगामी हिंसाचाराला वाचा फ़ोडली आणि चिकाटीने ती बातमी ठळकपणे मांडण्याचा अट्टाहास केला. म्हणून सत्य जगासमोर येऊ शकले. पण या गडबडीत गोरक्षकांच्या नावाने शंख करीत जुनैदच्या नावाने टाहो फ़ोडणार्‍यांचे त्यामुळे मोठेच हाल होऊन गेलेले आहेत. जुनैदसाठी आपला मानवाधिकाराचा पुरस्कार परत देणार्‍या हाशमीबाई कुठल्या कुठे बेपत्ता झाल्या आहेत आणि जंतरमंतर येथे ‘नॉट इन माय नेम’ म्हणून तमाशा रंगवणारेही गुपचुप फ़रारी झाले आहेत. मंगळवार बुधवारी ममता बानर्जी यांच्या ‘जमाते पुरोगामी’ गोटातल्या कोणाच्याही डोळ्यात बशिरहाटच्या शेकडो घरांची राखरांगोळी झाली, त्यासाठी अश्रूचा एकही ठिपका शिल्लक उरलेला नाही. सगळे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन गेले आहेत.

फ़रकही लक्षात घेण्यासारखा आहे. दादरी असो किंवा वल्लभगड असो, तिथे जे कोणी जमावाकडून मारले गेले, त्यांच्या घरी जायला वा त्यांच्या आप्तस्वकीयांना भेटायला कोणी अडवणूक केली नव्हती. प्रत्येक वाहिनीचा पत्रकार व कॅमेरा तिथे जाऊन मृताच्या कुटुंबियांना काय हवे म्हणून विचारत होता आणि आपल्याला न्याय हवा असे त्यांचे शब्द देशाला ऐकवण्याची माध्यमात स्पर्धा चालू होती. पण रिपब्लिक वगळता अन्य कुठल्या वाहिनीला बशिरहाटच्या हिंसाचारात न्याय देण्याची गरज वाटली नाही. आणि कोणाला तशी हिंमत करता येईल? जमाते पुरोगामीची देशातल्या बुद्धीजिवी वर्गावर इतकी दहशत आहे, की हिंदू मारला गेला वा त्याच्या घराची राखरांगोळी झाली, याची बातमी देणेच पुरोगामी गुन्हा असतो ना? तात्काळ तुमच्यावर प्रतिगामी असल्याचा शिक्का बसण्याचा धोका असतो. म्हणूनच कोणाला तिकडे बशिरहाटला जाण्याची बुद्धी झाली नाही, की तिकडे जाण्यास बंदी घातलेली असल्यामुळे अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा साक्षात्कार होऊ शकलेला नाही. याला पुरोगामीत्व म्हणतात. अर्थात बंगालमध्ये हे काही नव्याने होते आहे असे नाही. ममता बानर्जी यांना दुसर्‍यांदा विधानसभेत बहूमत मिळाल्यापासून त्यांनी बंगालच्या हिंसक व धर्मांध मुस्लिमांनाच आपले कार्यकर्ते बनवून आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यासाठी हिंदू देवस्थानाच्या विश्वस्तपदी कडव्या धर्मांध मुस्लिम मौलवींनाही नेमले आहे. अशा प्रत्येक कृतीतून त्यांनी आपल्याला बंगालच्या हिंदू वस्तीविषयी काडीमात्र आस्था नसल्याचे संकेत वारंवार दिलेले आहेत. त्याच्याच परिणामी आता बशिरहाटची दंगल पेटलेली आहे. ती तिथेच थांबवली असती, तर नियंत्रणाखाली आली असती. पण ममतांनी पोलिसांनाही हातपाय हलवू दिले नाहीत आणि दंगलखोरांनी पोलिस वहानेही जाळण्याचा पराक्रम केलेला आहे. पण म्हणून जमाते पुरोगामी मंडळींना जाग आलेली कोणाच्या बघण्यात आहे काय?

याविषयी राज्यपालांची काही लोकांनी भेट घेतली, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना कारवाईचा सल्ला दिला. तर राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा प्रत्यारोप करून ममतांनी विषयावर पांघरूण घातले आहे. पण बशिरहाट वा बदुरिया आदी भागात पसरलेल्या दंगल हिंसाचाराविषयी बोलायचा प्रयत्नही केलेला नाही. यात नवे काहीच नाही. मागल्या वर्षी याचप्रकारे कालियाचक या तालुक्याच्या गावात हजारोचा मुस्लिम जमाव एकत्र आला आणि त्याने पोलिस ठाण्यावरच हल्ला चढवला होता. तिथली कागदपत्रे व इमारत पेटवून दिली होती. वहाने व घरेही जाळली होती. पण देशाच्या कानाकोपर्‍यातून जमाते पुरोगामीकडून निषेधाचा सूर कुठे उमटला नव्हता. कारण हिंसा कोणी केली याला महत्व आहे, त्यात कोण मारला जातो याला प्राधान्य आहे. त्यात मरणारा हिंदू असला तर त्याची दखलही घेण्याची गरज नसते आणि असे राजकीय पुरोगामी लोकांना वाटते असेही मानायचे कारण नाही. चार वर्षापुर्वी अशाच घटना आसाममध्ये घडत होत्या आणि त्याविषयी बातमी देण्याची गरज नसल्याचे पांडित्य पुरोगामी संपादक राजदीप सरदेसाई यांनी सोशल मीडीयातून प्रकट केलेले होते. गुजरात दंगलीत जितके मुस्लिम मारले गेले, तितके आसाममध्ये हिंदू मारले जाण्यापर्यंत त्या दंगलीची दखल घेण्याची गरज नाही, असे ते पुरोगामी पांडित्य होते. त्यावर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या, तेव्हा राजदीपने आपले शब्द मागे घेऊन माफ़ी मागितली होती. पण त्या उत्स्फ़ुर्त प्रकटनातून पुरोगामी विचार कसा चालतो, त्याची साक्ष मिळालेली होती. आताही बशिरहाटच्या हिंसाचारानंतर सगळी जमाते पुरोगामी म्हणूनच चिडीचुप आहे. बोलणार काय? हिंदू मारला म्हणून कुठले अश्रू ढाळणार? मुस्लिमाकडून हिंदू मारला तर पुरोगामी राज्य व्यवस्थित चालू असते आणि बिगर मुस्लिमाकडून मुस्लिम मारला गेला, मग पुरोगामीत्व धोक्यात येत असते ना?

मागल्या महिनाभर कुठे जमावाकडून गोमांसाच्या निमीत्ताने मुस्लिम मारला गेल्यावर सातत्याने गळा काढणारे अकस्मात बेपत्ता झालेले आहेत. सवाल इतकाच आहे, की देशातील गोरक्षकांकडून चाललेली हिंसा थांबली आहे काय? की त्याचा निषेध करताना बशिरहाटविषयी बोलावे लागेल, म्हणून जमाते पुरोगामीच्या अनुयायांची दातखिळी बसलेली आहे? अकस्मात सगळेच्या सगळे पुरोगामी अवाक कशाला झालेले आहेत? बशिरहाटच्या हिंसेनंतर पुरोगामी जगतामध्ये शुकशुकाट पसरला आहे. ममतांना जाब विचारण्याची जबाबदारी कोणाची आहे? हळुहळू पुरोगामी म्हणजे जिहाद असे जाहिर करायची तयारी झालेली असावी. बाकी सारे प्रतिगामी अशी घोषणा एकदा करून टाकली म्हणाजे काम संपले. कारण आजकाल वाहिन्यांच्या चर्चा बघितल्या, तर शेरवानी व लफ़्फ़ेदार टोप्या घातलेले मौलवी आणि कॉम्रेड म्हणवून घेणारे सर्व डावे, एकसूरात एकाच भाषेत बोलत असतात. एकाच भूमिकेत आलेले आहेत. त्यापैकी एक गट जमाते इस्लामी म्हणून आजवर ओळखली गेली होती. आता दुसर्‍या जमातीला जमाते पुरोगामी नावाने पुरक पंथ म्हणून ओळख व्हायला हरकत नसावी. अशा लोकांची गंमत म्हणजे ते अगत्याने इफ़्तार पार्ट्या करतात आणि त्त्यामध्ये खरे मुस्लिमही बिन टोपीचे असतात. पण पुरोगामी लोक मात्र अगत्याने टोप्या घालून इफ़्तार करतात. दादरीचा अखलाख मारला गेल्यावर त्यांना उमाळा येतो आणि वल्लभगडच्या जुनैदसाठी त्यांच्या डोळ्यातला अश्रूंचा झरा आटत नसतो. पण बशिरहाट वा तत्सम हिंसाचार होऊन हिंदूंवर बेतले, तर त्यांना सवड नसते. त्यांचे कान बहिरे होऊन जातात, त्यांची वाचा बसत असते. दोनतीन दशकांनंतरचा भारत त्यांना जमाते पुरोगामी नावाने ओळखू लागला तर नवल मानण्याचे कारण नाही. एक मात्र निश्चीत असे लोक संघ व हिंदूत्वाच्या प्रचार प्रसाराचे काम सोपे करून ठेवत आहेत.

(इथे वापरलेला जमाते पुरोगामी ही शब्दयोजना माझी नसून फ़ेसबुक मित्र ‘शेकुलर गुरू’ उर्फ़ गुरू सावंत याची आहे.)


9 comments:

  1. भाऊ मस्त लेख.... जमाते पुरोगामी शब्दाचे श्रेय मूळ लेखकाला जाहीरपणे देण्याचा तुमचा मोठेपणा भावला.

    ReplyDelete
  2. पण या अति शहाण्या बंगाली हिंदूंच्या डोक्यात प्रकाश कधी पडणार कोण जाणे .......!! याना फक्त कम्युनिस्ट माहिती अथवा ममतेची तृणमूल काँग्रेस ....!! कोलकात्यात तर काली मातेच्या उत्सवात काळे पडदे लावून , आवाज होणार नाही अश्या पद्धतीने साजरी करावी अशी स्थानिक मुसलमानांची अपेक्षा.......... तारकेश्वर देवस्थान मध्ये एक मौलवींची मुख्यपदी नेमणूक .........!!

    ReplyDelete
  3. जमाते पुरोगामींच्या ह्या अशा वागण्यामुळे कायदेभंग करणे हा आपला मुलभूत आधिकार आहे असा समज एका विशिष्ट वर्गाचा झाला आहे,
    इथले कोणतेच कायदे आपल्याला मोडण्यासाठीच बनवले आहेत
    ते फक्त आपणच मोडलेच पाहिजेत,
    पण ते इतरांनी पाळलेच पाहिजेत
    जय पुरोगामी
    होवो अधोगामी

    ReplyDelete
  4. आता स्वच्छ भारत मानसिकता अभियान राबवण्याची गरज आहे

    ReplyDelete
  5. आता स्वच्छ भारत मानसिकता अभियान राबवण्याची गरज आहे

    ReplyDelete
  6. खरोखर खुप छान !! फुरोगामी-देशद्रोह्यांच्या गालावर सणसणीत लाफा (चपराक)
    जमाते-पुरोगामी ..........too good...!!!

    ReplyDelete
  7. भाऊंचे लिखाण नेहमीच वास्तवाला धरून असते. एकाच देशातील दोन भिन्न जातीच्या लोकांची राजकीयदृष्ट्या चालवलेली फरफट त्यांनी योग्यरित्या मांडली तसेच रोजच चिउकाउच्या गोष्टी सांगाव्यात तशी प्राईम टाईमला एकांगी चर्चा करणाऱ्या माध्यमांच्या फसव्या भूमिका त्यांनी उघडकीस आणल्या आहेत. भाऊंच्या लिखाणास अशीच धार चढत राहो हिच इच्छा.

    ReplyDelete
  8. स्वकीयानीच आपल्या माणसांचा घात करण्याची परंपरा महाराजांच्या वेळेपासुन चालू आहे।दीदी राजदीप,बरखा,त्याचे कसोशिने पालन करतात।

    ReplyDelete