राष्ट्रपती निवडणूकीमध्ये देशभरच्या मते फ़ुटल्याचा खुप गवगवा झाला नाही. संसदेपासून विधानसभांपर्यंत मोठ्या संख्येने अनेक आमदार खासदारांनी आपल्या पक्षाच्या भूमिका झुगारून मतदान केल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. त्यात नुसती विरोधी गोटातील मते फ़ुटलेली नाहीत, तर सत्ताधारी भाजपाच्याही गोटातील मते फ़ुटलेली आहेत. भाजपाची संख्या नगण्य असल्याने त्यावर फ़ारशी चर्चा झाली नाही. पण राजस्थान विधानसभेत झालेल्या मतदानात भाजपाची सात आठ मते फ़ुटल्याचे स्पष्ट झालेले आहे. तिथे भाजपाच्या आमदारांची संख्या व कोविंद यांना तिथून मिळालेली मते, यांची सांगड बसलेली नाही. जिंकताना त्याचा फ़ारसा परिणाम झाला नसल्याने त्याची चर्चा झाली नाही. पण विरोधी गोटातील मते सर्वत्र फ़ुटलेली असल्याने त्याची खुप चर्चा झाली. कारण विरोधकांच्या उमेदवार मीराकुमार यांचा मोठा पराभव झालेला आहे आणि अपेक्षेपेक्षा कोविंद यांना मते वाढलेली आहेत. त्यात सर्वात धक्कादायक फ़ाटाफ़ुट संसदीय मतांची झालेली आहे. भाजपा व एनडीए यांची मते अर्थातच कोविंद यांना मिळणार हे निश्चीत होते. पण त्याच्याही पुढे जाऊन कोविंद यांना ११२ खासदारांनी पसंती दाखवली. त्यात अण्णाद्रमुक, तेलंगणा समिती, तेलगू देसम आणि बिजू जनता दल व मुलायमचे तीन खासदार समाविष्ट आहेत. पण त्या संसद सदस्यांची एकत्रित संख्या ५८ इतकी आहे. म्हणजेच त्याच्याही पलिकडे इतर सदस्यांनी कोविंद यांना मते दिलेली दिसतात. त्यात मग अन्य कडव्या भाजपा विरोधी पक्षांच्या सदस्यांचा समावेश करावाच लागतो. असे कोण आहेत, ज्यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेशी दगाफ़टका केला, हे विरोधी गोटाने शोधून काढणे अगत्याचे आहे. २०१९ ची निवडणूक एकजुटीने भाजपा विरोधात लढवण्याच्या आणाभाका घेणार्या विरोधकांसाठी ती प्राथमिक अट आहे.
विरोधी गोटातील ५४ मते ही थोडीथोडकी नाहीत. यातला मोठा हिस्सा कॉग्रेस, तृणमूल वा तत्सम पक्षांकडून आलेला असणार. कारण तृणमूलचे ४० तर कॉग्रेसचे ५५ पेक्षा जास्त खासदार संसदेत आहेत. त्यापैकीच अनेकांनी दगाबाजी केलेली असू शकते. यापैकी ममतांना आपल्या पक्षात दगाफ़टका होण्याची शंका नव्हेतर खात्रीच होती. म्हणून तर त्यांनी आपल्या सर्व संसद सदस्यांना कोलकात्यात येऊनच मतदान करण्याचा फ़तवा काढलेला होता. तरीही त्यांच्यातले किमान २० संसद सदस्य विरोधात गेले असावेत, अशा अंदाज बांधता येतो. त्याच्या आसपास संख्येने कॉग्रेसमध्येही दगाबाजी झालेली असू शकते. त्यांच्याखेरीज आम आदमी पक्षाचे चार सदस्य लोकसभेत आहेत आणि त्यांनी आधीपासूनच कॉग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याचे सांगुन टाकलेले होते. तरीही एकूण संख्या ४०-४५ च्या पुढे जात नाही. म्हणजे फ़ुटीरांची संख्या मोठी दिसते. इतकी मोठी संख्या पक्षाच्या भूमिकेला लाथाडणार असेल, तर २०१९ पुर्वीच विरोधकांच्य किल्ल्याला खिंडार पडल्याचा पुरावा समोर आलेला आहे. त्याची डागडूजी केल्याखेरीज पुढल्या गमजा करण्यात अर्थ नाही. सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला किती पक्ष वा नेते उपस्थित राहिले, याला काडीमात्र अर्थ नसून, त्यापैकी किती पक्ष व त्यांचे अनुयायी ठामपणे भाजपा विरोधातल्या लढाईला समर्थपणे सामोरे जातील, याला महत्व आहे. पण त्याची फ़िकीर कॉग्रेससह कुठल्या विरोधी पक्षाला दिसत नाही. राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद निवडून आल्याचे जाहिर झाल्यावर विरोधकांच्या प्रतिक्रीया बघितल्या, तर त्यांना काय चुकले त्याचाही अंदाज बांधला आलेला नसावा असेच वाटते. कारण कोणीही आपल्या गोटातल्या फ़ाटाफ़ुटीविषयी चिंता व्यक्त केली नाही. उलट तत्वाची वा विचारसरणीची लढाई होती, अशीच पोपटपंची कायम चालू ठेवलेली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना भाजपा यांच्या बेरजेपेक्षाही अधिक मते कोविंद यांना पडली. त्याकडे बघता विधानसभेत शिवसेना वगळताही भाजपाच्या बाजूने १४५ मते पडलेली दिसतात. त्याचा उपरोधाने उल्लेख करताना मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणाले, २२ अदृष्य हात आपल्या मागे उभे असल्याने आपल्याला सरकार पडण्याचे कुठले भय उरलेले नाही. त्यांनी शिवसेनेला टोमणा म्हणून हा उल्लेख केला. कारण शिवसेनेच्या एका नेत्याने जुलै महिन्यात मोठा भूकंप होण्याची धमकी दिलेली होती. पण प्रत्यक्षात भूकंप सरकारपेक्षा विरोधकांनाच हादरून टाकणारा झाला. थोडक्यात शिवसेनेने धमक्या देण्याला अर्थ उरलेला नाही, असेच देवेंद्र यांनी आपल्या उपरोधातून सिद्ध केलेले आहे. सेनेने पाठींबा काढून घेतला, तरी आपल्यामागे बहूमताचा आकडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यातून सूचित केले आहे. कारण त्यांना अधिकची २३ मते मिळालेली आहेत आणि हे २३ आमदार शिवसेना वा भाजपाचे नाहीत, हे निकालाच्या आकड्यातूनच स्पष्ट झालेले आहे. उद्या कसोटीची वेळ आली, तर बहूमत सिद्ध करायच्या वेळी आपण या २३ जादा आमदारांना विधानसभेत उभे करू शकतो, असेच फ़डणवीसांना सांगायचे आहे. त्यातून मग शिवसेनेची हवा काढून घेतली गेलेली आहेच. पण महाराष्ट्रात राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्या गोटात किती वाताहत झालेली आहे, त्याचीही प्रचिती आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटिल यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीने गैरहजेरी लावली. विरोधी एकजुटीत आपण नसल्याचेच राष्ट्रवादीने कृतीतून दाखवलेले आहे. काहीशी तीच गोष्ट अनेक बिगर भाजपा राज्यातही आहे. तिथे विरोधकांना एकजुट दाखवता आलेली नाही, किंवा जिथे कॉग्रेस थेट भाजपा विरोधातला पक्ष आहे, तिथे कॉग्रेसला स्वपक्षातही एकजुट सिद्ध करता आलेली नाही. मग २०१९ मध्ये कुठला चमत्कार घडणार आहे?
विधानसभा हा विषय वेगळा आहे. संसदेतील ५४ खासदारांनी पक्ष विरोधी मतदान करण्यातून काय संकेत दिलेत, त्याला अधिक महत्व आहे. त्या खासदारांना आगामी लोकसभेत निवडून येण्यासाठी आपापल्या पक्षाच्या उमेदवारीतून विजयाची खात्री उरलेली नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यापैकी अनेकजण असे असू शकतील, की आज आपल्या मूळ पक्षात टिकून रहातील आणि संसदीय मतदानाच्या आधी पक्षांतर करून भाजपात जायला उत्सुक असतील. मागल्या लोकसभेत असे अनेक कॉग्रेसजन उमेदवारी घेऊन भाजपात दाखल झालेले होते आणि विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. पक्षबांधणीच्या आपल्या मोहिमेत सध्या अमित शहांनी १२० लोकसभेच्या जागा लक्ष्य केल्या आहेत. आजवर भाजपाने कधीही न जिंकलेल्या या १२० जागा आहेत. त्या जिंकण्याचा मनोदय शहांनी व्यक्त केला आहे. याचा अर्थ आतापासून तिथे संघटनात्मक बांधणी चालू केलेली असून, शक्यतो निवडून येऊ शकणारा उमेदवार मिळवण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. जिथे भाजपा दुबळा आहे, तिथे असा स्थानिक आजच निवडून आलेला प्रतिनिधी पक्षात आणून, त्याला उमेदवारी दिल्यास भाजपाला तशा जागा जिंकणे सोपे होणार आहे. सहाजिकच ज्यांनी राष्ट्रपती निवडणूकीमध्ये कोविंद यांना मते देताना आपल्या पक्षाशी दगाबाजी केली; त्यांचे लक्ष पुढल्या निवडणूकीवर असू शकते. तशा खासदारांनी उमेदवारीचे आश्वासन घेऊनच त्यांनी कोविंदना मते दिलेली असू शकतात. ही बाब लक्षात घेतली, तर ५४ फ़ुटलेल्या मतांचे गांभिर्य लक्षात येऊ शकते. पण त्याची कुठलीही गंभीर दखल कॉग्रेस वा अन्य विरोधी पक्षीयांनी घेतलेली दिसली नाही. मग हे लोक २०१९ ची कोणती तयारी करीत आहेत? मागल्यापेक्षा मोठा दणदणित पराभव स्विकारण्याची तयारी तर हे पक्ष करीत नसावेत ना? कारण यापैकी कोणा पक्षाने वा नेत्याने अजून तरी फ़ुटलेल्या मतंविषयी मिमांसा जाहिरपणे केलेली नाही.
Kinwa ha virodhi pakshancha bha ja pa la besawadh karnyacha daav asoo shakato... karan tyancha umedwar nivadoon yenyachi shakyata navatich...
ReplyDeleteBhau Antar-rasthriy ghadamodi baddal liha
ReplyDeleteआत्तापर्यंतच्या लेखात तुम्ही जे मोदी-शाह जोडीचे राजकारण उलगडून सांगत त्याचा अंदाज मी बरोबर लावलेला असे . पण क्रॉस-वोटिंग ची खेळी ही अत्यंत सूक्ष्म आहे . मस्त पकडलत ! ता.क - bhautorsekar.in वर लेख update करत जा .
ReplyDelete