मागली तीनचार वर्षे कॉग्रेसला खुप वाईट गेली आणि त्यातून सावरण्याची आशाही अनेकांनी सोडून दिली होती. कारण सोनिया गांधींनी जी सत्ता मिळवून दिलेली होती, ती पक्षाला टिकवता आलेली नाही आणि राहुल गांधी आपल्या चमत्कारीक वागण्याने पक्षाला अधिकाधिक गाळात घेऊन गेले होते. त्यातून पक्षाचे पुनरुत्थान करणे कोणाला शक्य झाले नाही. ते व्हायचे असेल, तर ते राहुल यांच्या करवीच झाले पाहिजे, अन्यथा पक्ष रसातळाला गेला तरी चालेल; अशी एकूण कॉग्रेसजनांची मनस्थिती आहे. सहाजिकच दिवसेदिवस कॉग्रेसची घसरगुंडी चालूच राहिली. अशा पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यात कॉग्रेसमध्ये नवी जान आलेली दिसते. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे अमेरिकेच्या दोन विद्यापीठात जाऊन राहुल गांधी यांनी भाषणे दिली व मुलाखतीही गाजवल्या. त्या मुलाखती वा भाषणांची नेहमीप्रमाणे इथे टिंगलटवाळीही झालेली आहे. पण अनिवासी भारतीयांसमोर राहुलनी बाजी मारली, अशी त्यांच्या चहात्यांची खात्री पटलेली आहे. विरोधातील लोकांनी काहीही म्हटले म्हणून बिघडत नाही. आपल्या अनुयायी व चहात्यांनी पाठराखण केल्यास नेत्यालाही चेव चढत असतो. इथे राहुलच्या नव्या मुलूखगिरीमुळे कॉग्रेसमध्ये चैतन्य पसरले असेल, तर त्या पक्षासाठी तो आशेचा किरण मानायला हरकत नाही. याखेरीज त्याच दरम्यान नेहरू विद्यापीठात डाव्यांनी निवडणूका जिंकल्या आहेत आणि दिल्ली विद्यापीठातही भाजपाच्या संघटनेला पराभूत करून कॉग्रेसी विद्यार्थी संघटनेने बाजी मारलेली आहे. सहाजिकच मोदी लाट ओसरली आणि कॉग्रेसच्या स्वागताला देशातला मतदार सज्ज होत असल्याचा सुगावा अशा लोकांना लागला आहे. त्यात किती तथ्य आहे, त्याचा शोध घेण्यापेक्षा त्यामुळे कॉग्रेस नव्या जोमाने कामाला लागली असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे.
कुठल्याही सत्ताधारी पक्षाला निवडणूका जिंकल्यावर आपली लोकप्रियता दिर्घकाळ टिकवता येणे अवघड काम असते. भाजपा किंवा नरेंद्र मोदीही त्याला अपवाद असू शकत नाहीत. पण मागल्या तीन वर्षात मोदींनी आपली जादू कायम राखून अनेक नव्या राज्यात भाजपाला सत्तेवर आणून बसवले आहे. याचा अर्थ मोदीलाट कायम आहे किंवा त्यांच्या कारभारावर लोक भलतेच फ़िदा झालेले आहेत, असा अजिबात होत नाही. त्यांच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय वा धोरणाने लोक अस्वस्थ असू शकतात. किंवा भलेही विरोधात विचार करू लागलेले असतात. पण सत्तेतील पक्षाला नाकारण्यासाठी काही वेगळा समर्थ पर्यायही लोकांना हवा असतो. हाती असलेले नाकारून लोक अराजकाला सामोरे जायला कधीच तयार होत नाहीत. म्हणूनच लोकसभेनंतर बिहारमध्ये नितीश यांना यश मिळू शकले, तर दिल्लीत केजरीवाल यांनी पुन्हा बाजी मारून दाखवली होती. पण तितक्या संघटितपणे व प्रयत्नपुर्वक भाजपाला पर्याय होण्याची तयारी अन्य कुठल्या पक्षाने दाखवली नाही, त्याचा लाभ भाजपाला मिळत गेला. त्याचे विश्लेषण मग मोदीलाट कायम असल्याचे होत राहिले. खरे़च मोदीलाट इतकी प्रभावी असती, तर गोव्यात भाजपाला दणका बसला नसता, की बंगाल तामिळनाडूत भाजपाला मोठे यश मिळवता आले असते. पण तसे घडलेले नाही. तामिळनाडूत जयललिता बहूमत घेऊन गेल्या आणि बंगालमध्ये भाजपाला नामधारी चंचूप्रवेश करण्याइतकेच यश मिळू शकले. उलट जिथे कॉग्रेसच विरोधातला प्रमुख पक्ष होता, तिथे भाजपाला दैदिप्यमान यश मिळालेले दिसले. हे भाजपाचे कर्तॄत्व असण्यापेक्षा कॉग्रेसचा नाकर्तेपणा होता आणि त्याला पक्षातील अनुत्साह जबाबदार होता. ताज्या घडामोडींनी तो उत्साह परतला असेल, तर स्वागतच करायला हवे. कारण आता भाजपाला झूंज देऊनच विजय मिळवावा लागेल.
लौकरच मोदींचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या गुजरातच्या विधानसभा निवडणूका होणार असून, त्यानंतर काही महिन्यातच कर्नाटक व हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवड व्हायची आहे. या तिन्ही राज्यात भाजपा व कॉग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. बाकी अन्य कुठलाही पक्ष मैदानात नाही. ही बाब लक्षात घेतली, तर राहुल गांधी यांनी आपल्या अनुयायांना दिलेले स्फ़ुरण किती महत्वाचे आहे, ते लक्षात येऊ शकेल. कुठल्याही लढतीमध्ये विजयासाठीच लढावे लागत असते. त्यात लढणारा वा झुंज देणारा सेनापती असला, मग लढणार्यांना जोश चढत असतो आणि तोच चमत्कार घडवू शकत असतो. राहुल गांधी तसे लढाईच्या पवित्र्यात उतरले असतील, तर ते कॉग्रेससाठी मोठे वरदान मानता येईल. म्हणूनच त्यांच्या अमेरिकेतील वक्तव्ये वा भाषणे याविषयी इथले शहाणे कोणत्या प्रतिक्रीया देतात, त्याला काडीमात्र महत्व नाही. त्यापेक्षा राहुलच्या या दौर्याने त्यांच्याच पक्षात किती चैतन्य निर्माण झाले, ही बाब अगत्याची आहे. ते चैतन्य निर्माण झालेले दिसते. कारण त्यानंतर दिल्ली विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाने भावी विजयी राजकारणाची नांदी झाली, असे अनेक विश्लेषकांनाही वाटत आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांचे यश खरेच इतक्या मोठा बदलाची चाहुल असल्याचे यापुर्वी कधी सिद्ध झालेले नाही. तसे असते तर सातत्याने नेहरू विद्यापीठात आपल्याच संघटनेचा झेंडा फ़डकत ठेवणार्या डाव्या पक्षांना कधीच देशाची सत्ता हस्तगत करता आली असती. पण साठ वर्षात विद्यापीठातल्या निवडणूका अविरत जिंकणार्या डाव्यांना बंगाल केरळबाहेर कुठे मोठा राजकीय पराक्रम करून दाखवता आलेला नाही. सहाजिकच कॉग्रेसने दिल्ली विद्यापीठातील यशाचे किती कौतुक सांगावे, त्याला मर्यादा आहेत. पण कारण कुठलेही असो, राहुलच्या वक्तव्ये व अमेरिका दौर्याने कॉग्रेसजनात उत्साह आहे, ही बाब कोणालाही मान्य करावीच लागेल.
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूका जिंकाव्या लागतात आणि निवडणूका जिंकण्यासाठी मतदाराला आपल्या बाजूने ओढण्याला महत्व असते. अधिकाधिक मतदाराला आपले मत पटवून त्याला मतदान केंद्रापर्यंत ओढून आणण्याला प्राधान्य असावे लागते. ते संघटनात्मक बळावर अवलंबून असते. तिथे कॉग्रेस पक्षाची जी पिछेहाट झाली आहे, ती कशी भरून काढली जाणार? याचे उत्तर मात्र अशा कॉग्रेसजनांनी, नेत्यांनी वा अभ्यासकांनी अजून दिलेले नाही. शिवाय मतदार कुठल्या निकषावर मतदान करतो. त्याकडेही पाठ फ़िरवून चालणार नाही. जे काही उपलब्ध आहे, त्याविषयी कितीही नाराजी असली, तरी त्यापेक्षा उजव्या उत्तम काही पर्यायाला पेश केले नाही, तर लोक हाती असलेले सोडून पळत्याच्या मागे लागत नाहीत. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बंडखोर नेते व राज्यसभेतील खासदार ॠतुब्रत बानर्जी यांनी एका खास मुलाखतीमध्ये त्याचीच ग्वाही दिलेली आहे. गंगा धाब्यापासून जमना धाब्यापर्यंत हा देश पसरलेला नाही. तो आसेतुहिमाचल पसरलेला खंडप्राय देश आहे. त्यामुळेच हे दोन धाबे वसलेल्या नेहरू विद्यापीठातील निवडणूकांचा देशाच्या जनमानसावर किंचीतही परिणाम होत नाही, असे त्यांनी म्हटलेले आहे. म्हणूनच राहुल गांधी यांनी अमेरिका दौर्यात वा कॉग्रेसच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठात काय केले, त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणूकीत त्या पक्षाची संघटना कितपात झुंज देणार, याला प्राधान्य असायला हवे आहे. ती संघटना किती मजबूत आहे आणि जनमानसात किती रुजलेली आहे, त्यावर निकालांचे भविष्य अवलंबून असणार आहे. राहुल चालना देऊ शकतात व उत्साह वाढवू शकतात. पण जादूने संघटना उभारू शकत नाहीत. याचा विचार कॉग्रेसमध्ये वा त्यांचे हितचिंतक म्हटल्या जाणार्या कोणी केला आहे काय? अन्यथा जाहिरात जोरात आणि गोदामात माल नाही, अशी स्थितीच व्हायची ना?
पप्पु can't dance, साला
ReplyDeleteYou are absolutely correct sir, 1.congress has to change their mentality, 2. they should find someone outside gandhi dynasty like jotirdatya shinde who has quality to lead the team, but it will never happen
ReplyDeleteकाही पत्रकार म्हनतायत की मोदीजी विषयी नाराजी आता रेल्वे,बस मध्ये पन लोक बोलुन व्यक्त करतायत.ही शायनिंग इंडिया ची गत होन्यैची सुरूवात आहे पन मोदीजी ना घालवून लोक कोनाला आननार याचे उत्तर कोन देत नाही.
ReplyDeletebhau Raj Thakare baddal apla mat kay ?
ReplyDeletehyavar ekhada lekh lihava apan...