गेल्या वर्ष अखेरीस वा यावर्षाच्या आरंभी दक्षिणेच्या तमिळनाडू राज्यात राजकीय उत्पात सुरू झाले. त्याच दरम्यान ‘इंडीया टुडे’ या माध्यम समुहाने आपला वार्षिक वैचारिक सोहळा प्रथमच चेन्नई येथे योजलेला होता. त्यात तिथले अनेक नामवंत व मान्यवर सहभागी झालेले होते. जयललितांच्या आकस्मिक निधनामुळे नावारूपाला आलेल्या शशिकला तेव्हा तामिळनाडूच्या नव्या भाग्यविधाता मानल्या जात होत्या आणि म्हणूनच या वैचारिक सोहळ्याचा शुभारंभ चिन्नम्माच्या हस्ते समई प्रज्वलित करून झालेला होता. त्यानंतर विविध कारणांनी तामिळनाडू राज्यात अराजक माजत गेलेले आहे. त्या सोहळ्यात सहभागी होताना दिलेल्या मुलाखतीमध्ये, कमला हसन या सुपरस्टार चित्रपट कलावंताने अनेक वादग्रस्त विधाने केलेली होती. त्यापैकी एका विधानाने धमाल उडवून दिली व त्यातून एक मोठे आंदोलन उभे राहिले. सुप्रिम कोर्टाने प्रतिबंध घातलेल्या जलिकटू म्हणजे बैलाच्या खेळाला नव्याने मान्यता मिळावी, अशी कमला हसनची मागणी होती आणि तो तमि्ळी संस्कृतीचा मोठा सोहळा असल्याच्या त्याच्या विधानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अखेर तशी मान्यता देणारा नवा कायदा वा कायद्याची दुरूस्ती राज्यसरकारला करावी लागली होती. त्याच त्या सोहळ्यात व तिथे दिलेल्या मुलाखतीमध्ये कमला हसन याने आपल्या राजकारण प्रवेशाविषयी व्यक्त केलेली भूमिका मात्र त्याला पाळता आलेली दिसत नाही. कारण त्याच्या राजकारण प्रवेशाचा साफ़ इन्कार करताना राजकारणात कोणी प्रामाणिक व चांगला राहू शकत नाही, असे त्याने ठामपणे सांगितले होते. अजून त्याला एक वर्ष उलटले नसताना तोच सुपरस्टार मुख्यमंत्री व्हायला उतावळा झाल्यासारखा वागताना दिसतो आहे. गेल्या दोनतीन महिन्यात त्याने मारलेल्या कोलांट्या बघितल्या, तर त्याच्यातली अगतिकता लपून राहू शकलेली नाही.
३७ वर्षापुर्वी देशात पुन्हा इंदिराजी प्रचंड मतांनी निवडून आल्या, तेव्हाच भारतीयांना कमला हसन हे नाव परिचित झाले. त्यापुर्वी त्याने तामिळी चित्रपटात अनेक भूमिका रंगवल्या व नाव कमावलेले होते. पण १९८० च्या सुमारास रति अग्निहोत्री या अभिनेत्रीसह कमला हसन प्रथमच हिंदी पडद्यावर आला. ‘एक दुजे के लिये’ नामक चित्रपटातून उत्तर व दक्षिण भारतातील टोकाचा विरोधाभास असलेल्या भिन्न संस्कृतीतील एक तरूण व तरूणी, आपली भाषा परस्परांना समजावू शकत नाहीत. पण एकमेकांची प्रेमाची भाषा समजू शकतात, असे त्याचे कथानक होते. मात्र अखेरीस ते दोघेही आपापल्या भाषिक वा सांस्कृतिक बंधनांना झुगारताना आत्महत्येचा मार्ग चोखाळतात, असे काहीसे कथानक होते. त्या चित्रपटाने हिंदी पडद्याला नवी नायिका दिली तर तामिळीत कायम राहूनही हिंदी पडदा व्यापणारा नवा अभिनेताही कमला हसनच्या रुपाने रसिकांना मिळाला. त्यानंतर त्याने अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या, तरी आपला तामिळी वारसा सोडला नाही, की तामिळी अस्मितेला सोडून भारतीय होण्याचा हव्यास केला नाही. तो काळ जयललिता, शिवाजी गणेशन वा एमजीआर अशा जुन्या पिढीतील कलावंतांच्या अस्ताचा होता आणि तेव्हाच दोन नवे तारे तामिळी चित्रपट क्षितीजावर उगवले होते. त्यातला एक कमला हसन होता, तर दुसरा रजनीकांत उर्फ़ शिवाजी गायकवाड होता. कमलाने अभिनयाचे नवनवे पल्ले ओलांडले आणि त्याच काळात तामिळी प्रेक्षकांना भुरळ घालणार्या पराक्रमी नायकाची रिकामी जागा भरून काढण्याला रजनीकांतने प्राधान्य दिले. आज तेच दोघे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत आणि त्यात रजनीकांतची जितकी हुकूमत आहे, तितका कमला हसन यशस्वी होऊ शकलेला नाही. योगायोग असा, की आता तेच दोघे समकालीन एकाच वेळी राजकारणात पदार्पण करायला निघाले आहेत.
या दोघांपैकी आधी रजनीकांतने आपल्या राजकारण प्रवेशाचा संकेत दिला होता. तेव्हा कमला हसन मात्र टाळाटाळ करीत राहिला होता. मात्र काही महिन्यातच कमला हसनचा धीर सुटला आहे. त्याने राजकारण म्हणजे उकीरडा म्हटल्यापासून सात महिन्यात तिथे झेपच घेण्य़ासाठी उतावळेपणाने वर्तन आरंभलेले आहे. रजनीकांत मात्र अतिशय सावधपणे कुणाला मनाचा थांगही लागू दिल्याशिवाय पावले उचलतो आहे. कमला हसन कितीही लोकप्रिय असला, तरी रजनीकांत याच्याइतकी मतदारात याची पत असेल किंवा नाही, याची लोकांना शंका आहे. रजनीकांतने यापुर्वी तशी चुणूक दाखवलेली आहे. आताही राजकारणात येण्याचे संकेत दिले तरी त्याने कुठलीही घाईगर्दी केलेली नाही. मात्र कमला हसन उतावळ्यासारखा काहीही करताना दिसू लागला आहे. आधी त्याने द्रमुकच्या एका सोहळ्यात व्यासपीठावर हजेरी लावून आपण तिकडे झुकत असल्याचे संकेत दिले होते. मग काही आठवड्यापुर्वी केरळात जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांसमवेत भोजन सोहळा पार पडला. तेव्हा आपला ‘आवडता रंग’ भगवा नसल्याचे सांगून आपण भाजपासोबत जाणार नसल्याचा इशाराही त्याने दिला. त्यामुळे तो जयललिता नंतरच्या राजकारणात पुरोगामी आघाडीचे नेतृत्व करील वा स्वत:चा कुठला तरी पक्ष काढून डाव्यांशी हातमिळवणी करील; अशा अटकळी बांधल्या जात होत्या. इतक्यात आता दिल्लीचे वादग्रस्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कमलासोबत भोजन करायला चेन्नईत येण्याच्या बातम्या झळकल्या. त्याच्या राजकारणात कितीसे तथ्य असू शकते? कारण काही दिवसांपुर्वीच याच कमला हसनने राजकीय क्षेत्रात आपण रजनीकांतच्या सोबत काम करणार असल्याचेही मतप्रदर्शन केलेले होते. राजकारणात प्रवेश करण्यापुर्वीच इतकी धरसोड चकीत करणारी नाही काय? की कमला हसन उतावळा होऊन भरकटत चालला आहे?
आपला रंग भगवा नाही, असे कमला हसन याने स्पष्ट केले असल्याने त्याच्यामागे तमाम भाजपा विरोधक एकवटले तर नवल मानायचे कारण नाही. पण आपल्याला नव्याने सुरूवात करायची आहे, असेही तो म्हणला होता. सहाजिकच केजरीवाल यांनी आपला नवा पक्ष दक्षिणेत रुजवण्यासाठी या अभिनेत्याकडे आशाळभूतपणे बघितले तर नवल नाही. मागल्या लोकसभा निवडणूकीतही केजरीवाल यांच्या पक्षातर्फ़े अनेक उमेदवार मैदानात उतरले होते. पण एकूण तामिळनाडूत त्यांना २० हजार मतेही मिळू शकलेली नव्हती. सहाजिकच आता लोकप्रिय अभिनेत्याचा चेहरा पुढे करून, आपला जम बसवण्याचा त्यांचा मतलब असेल, तर गैर मानता येणार नाही. पण सर्वकाही इतके सोपे नसते. यापुर्वीही अनेक लोकप्रिय कलावंतांनी हा जुगार खेळून झालेला आहे. म्हणूनच कमला हसन यांना खात्री वाटत नसावी. खरे तर त्यांचा द्रविडीयन अस्मितेकडे असलेला कल बघता त्यांनी द्रमुकची कास धरणे योग्य ठरले असते. पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचा हव्यास असल्याने तिथे त्यांची डाळ शिजणे अशक्य आहे. आधीच एम. के. स्टालीन त्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेले आहेत. मग आम आदमी पक्षात कमला हसन यांचे काय होणार? अशा सुपरस्टारना आपणच सर्वोच्च वाटत असतो. मग तशीच धारणा असलेल्या केजरीवाल यांच्याशी त्यांचे जुळावे कसे? एका म्यानात दोन तलवारी मावत नाहीत. मग केजरीवाल व कमला हसन एकत्र कसे नांदावेत? जिथे त्यांनी आम आदमी पक्षाच्या शाखा काढल्या, तिथे स्थानिक प्रभावी नेत्याला पक्षातून हाकलण्य़ाची वेळ केजरीवाल यांच्यावर आलेली आहे. मग तामिळनाडूत काय वेगळे होऊ शकते? आरंभी भले वाटेल आपण ‘एक दुजे के लिये’ जन्माला आलेलो आहोत. पण अशा प्रेमकथेचा शेवट आत्महत्या हाच असतो ना? अभिनय कारकिर्दीचा अस्त होत असताना कमला हसन पुन्हा पहिल्या गाजलेल्या चित्रपटाच्या कथानकाकडे वळले आहेत काय?
चपखल टिप्पणी.या कलाकाराचे नाव कमलाहासन असे आहे.हसन म्हटले अन्य धर्माचा बोध होतो.
ReplyDeleteकमलहासन, जसे चंद्रहास. तमिळमध्ये शेवटी न किंवा म येतो.
Deleteभाऊ, यात मला मतविभाजनाची सोय कुणीतरी चालवलीय असे वाटते. कमल हसन स्वतंत्र निवडणूकांसाठी उभा राहिला तर सीट शेअरिंगला द्रमुक जुळवून घेणार नाही. आणि जुळवून घेतले तरी जुन्या भागीदारांना डावलून कमल च्या पदरात अपेक्षित जागा पडणार नाहीत. त्यामुळं अद्रमुक विरोधातली मत स्थिर पण प्लेयर्स वाढतील. आणि अद्रमुकला त्याचा निश्चित फायदा होईल. कारण त्यांच्या पक्षातही खदखद असली तरी शशिकाळाचा प्रभाव ओसरल्यासारखा असल्यामुळे पुन्हा सत्तेसाठी फेवरीट अद्रमुक च असेल असे आज तरी वाटते.
ReplyDeleteकमल हासन या माणसाला तमिळनाडूमध्ये काडीमात्र जनाधार नाही . इतकेच काय तमिळ जनता राजकारणाच्या बाबतीत इतकी बेभरवशाची आहे की त्यामुळे रजनीकांत सारखा सुपर स्टार देखील जपून पावले टाकतो आहे . मध्यंतरी त्याने आपल्या मुलीबरोबर ट्विटरवरचे खेळ केले ते खेळ देखील जनता विसरलेली नाही . आपल्या मुलीला धर्मांतर केल्याबद्दल त्यांने शुभेच्छा दिल्या होत्या .कमल हसन हा जरी जन्माने अय्यंगार ब्राह्मण असला तरी त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे त्याचे डाव्या विचारांशी असलेले सख्य व हिंदू धर्माशी असलेले उघड वैर आता लपून राहिलेले नाही व आम तमिळ जनता मात्र आजही कपाळाला भस्म किंवा कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही त्यामुळे कमलची इथे डाळ शिजणे अशक्य आहे
ReplyDeleteआण्णद्रमुक सोबत राहुन कोण मोदींना फायदा करून देइल याकडे माझे डोळे लागले आहेत....
ReplyDelete