भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याच पक्षाच्या मोदी सरकारवर झोड उठवली आहे आणि त्यांचे सहाजिकच विरोधी गोटातून फ़ार कौतुक चालले आहे. तेही स्वाभाविक आहे. कारण सिन्हा यांनी विरोधकांच्याच आरोप व विषयांचे समर्थन केलेले आहे. सिन्हा हे भाजपा सत्तेत आल्यापासून नव्हेतर, मोदी सत्तेत येण्याच्या आधीपासूनच पक्षाच्या नव्या नेतृत्वाचे टिकाकार राहिले आहेत. पण त्यांचा संताप समजू शकतो. त्याच्याच सुपुत्राला पक्षाने उमेदवारी देत सिन्हा यांचा पत्ता काटला होता. त्याचा राग सिन्हा यांच्या मनात असला तर चुकीचे मानता येणार नाही. त्यांचेच समकालीन समजल्या जाणार्या लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांनी सुद्धा असेच सूर काही काळ लावलेले होते. अलिकडे त्यांची शांती झालेली असली तरी खदखद संपलेली नाही. पक्षात वा बाहेर कोणी फ़ारशी दखल घेत नसल्यामुळे असेल, जोशी-अडवाणी थंडावले आहेत आणि त्यांची जागा सिन्हा यांनी घेतली आहे. तसे बघितले तर सिन्हा हे आरंभापासून भाजपावाले किंवा संघाच्या मुशीतले नाहीत. सव्वीस वर्षापुर्वी देशाचे सोने गहाण ठेवावे लागले, तेव्हाचे अर्थमंत्री अशी त्यांची मुळातली ख्याती आहे. चंद्रशेखर सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते आणि दिवाळखोरीतून देश बाहेर काढण्यासाठी त्यांनीच देशाचे अब्जावधी रुपयाचे सोने गहाण टाकलेले होते. निदान आज तितकी देशाची दुर्दशा झालेली नाही, हे सिन्हाच मान्य करतील. पण पक्षाची सत्ता आल्यावर त्यांची कुठेच वर्णी लागलेली नसेल, तर त्यांनी मळमळ व्यक्त करणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी जी आपलाच पक्ष व सरकारवर झोड उठवली आहे, त्याची या निमीत्ताने कॉग्रेस पक्षातील जयराम रमेश यांच्या वक्तव्याशी तुलना करण्यासारखी आहे. त्यांनीही मागल्या चार वर्षात स्वपक्षाच्या धोरणे व नेतृत्वावर अतिशय सौम्य भाषेत टिका केलेली आहे. सिन्हांच्या चहात्यांनी रमेश यांची कितपत दखल घेतली होती?
२०१३ च्या मध्यास देशात युपीएचे सरकार होते आणि राहुल गांधी यांच्यासमोर देशाचे पंतप्रधानही नतमस्तक व्हायचा तो काळ होता. मनमोहन सरकारने काढलेला एक अध्यादेश राहुलनी चार वर्षापुर्वी याच दरम्यान फ़ाडून टाकलेला होता. तर तो आपल्या दरबारात आलेला असूनही त्यावर सही करण्याचे धाडस तात्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी करू शकलेले नव्हते. त्याच फ़ाडाफ़ाडीमुळे सात समुद्रपार देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नाचक्की झाली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी तर ‘पाणवठ्यावर रडगाणे गाणारी गावठी महिला’ अशी मनमोहन यांची टवाळी केलेली होती. अशा काळात त्याच कॉग्रेस पक्षातले मंत्री व अभ्यासू नेते जयराम रमेश, यांनीही आपल्या पक्षाच्या वाटचालीतले धोके समोर आणण्याचे धाडस केलेले होते. त्यांनी सिन्हा यांच्याप्रमाणे आपल्या नेते व सरकारवर टिकेची झोड उठवली नव्हती. तर मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याची सावध भाषा केलेली होती. त्यांचे शब्द किती योग्य भविष्यवाणी ठरली, ते पुढल्या वर्षभरातच सिद्ध झाले. पण जेव्हा तसा इशारा रमेश यांनी दिला, तेव्हा त्यांची राहुलनी पाठ थोपटली नव्हती, की चिदंबरम यांनी रमेश यांच्या विधानाला पुष्टी देण्याचे धाडसही केलेले नव्हते. उलट सत्यव्रत चतुर्वेदी यांच्यासारख्या उठवळ प्रवक्त्याने त्याच इशार्याला मोदीभक्ती ठरवून रमेश यांनी भाजपात दाखल होऊन मोदींची आरती ओवाळावी, अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे मोदींचे यश रोखले गेले नाही, की रमेश यांचे कुठले नुकसान झाले नाही. कारण रमेश स्वपक्षाच्या भल्यासाठी येऊ घातलेला मोठा धोका दाखवत होते. उलट सिन्हा मात्र आपली कुठे वर्णी लागत नाही, म्हणून वैफ़ल्यग्रस्त झालेले भाजपा नेता आहेत. पण पक्षाने त्यांची गळचेपी केलेली नाही, की त्यांची पक्षातून हाकालपट्टी केलेली नाही.
रमेश यांचे आणखी एक विधान अगत्याने इथे सांगितले पाहिजे. २०१३ च्या अखेरीस रमेश म्हणाले होते, राहुल गांधी कॉग्रेसची संघटना नव्याने बांधत आहेत. पण त्यांच्यासमोर २०१९ सालात लोकसभा जिंकण्याचे ध्येय आहे. उलट आम्ही कॉग्रेसजन मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणूका जिंकण्यच्या चिंतेत आहोत. मोदींसाठी २०१४ ही एकमेव संधी आहे. राहुल गांधींच्या बाजूने त्यांचे वय आहे. ही निवडणूक गमावली तर मोदी संपणार आहेत. पण राहुलना भविष्य आहे. ही भाषा सौम्य नव्हती तर सूचक होती. २०१४ ची निवडणूक दार ठोठावते आहे, याचे राहुलना भान नाही, त्यामुळे कॉग्रेसच नामशेष होईल; असेच रमेशना म्हणायचे होते. पण सत्य बोलायचे धाडस करणार्याला कॉग्रेस पक्षात स्थान नसल्यानेच त्यांनी सोज्वळ भाषेत आपल्या नेत्याच्या दिवाळखोरीला झाकण्याचा प्रयास केला होता. तोच खर ठरला. २०१३ पासून राहुल २०१९ ही तयारी करीत आहेत आणि २०१७ मावळत आले तरी त्यांना तशी कुठलीही जुळवाजुळव करता आलेली नाही. उलट आता चार वर्षांनी त्याच जयराम रमेशना नवे वास्तव अधिक स्पष्ट शब्दात बोलण्याची सक्ती झालेली आहे. अलिकडेच रमेश यांनी स्पष्टपणे म्हटले, की कॉग्रेस पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे आणि आमचे नेते सलतनत गमावलेल्या सुलतानाप्रमाणे मस्तवालपणा करण्यात गर्क आहेत. यापेक्षा कॉग्रेस नेतृत्व वा राहुल गांधींचे योग्य वर्णन कोणी करू शकणार नाही. पण त्याची किती सिन्हाप्रेमींनी दखल घेतली? कारण त्यापैकी कोणालाही सत्याला सामोरे जाण्याची हिंमत राहिलेली नाही. चिदंबरम वा राहुल अशांनी रमेश यांच्या विधानांची वेळोवेळी दखल घेतली असती, तर त्यांना आज यशवंत सिन्हांचे कौतुक करण्याची नामुष्की आली नसती. कारण खरेच मोदी जिंकले नसते आणि कॉग्रेसची इतकी दुर्दशा झाली नसती. हा रमेश व सिन्हा यांच्यातला फ़रक आहे.
यशवंत सिन्हा आपली कुठे वर्णी लागत नाहीत म्हणून नाराज आहेत, तर जयराम रमेश आपल्याच पक्षाची रसातळाकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी अगतिक झाले आहेत. पक्षाने मंत्रीपद दिले असतानाही त्यांनी राहुलच्या चुका किंवा मोदींचे आव्हान स्पष्टपणे दाखवण्याची हिंमत केलेली होती. त्यातून व्यक्तीगत रोष पत्करण्याचीही तयारी राखलेली होती. नेमकी उलटी कथा सिन्हा यांची आहे. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांना शह देत हुर्रीयतच्या नेत्यांना भेटायचा आगावूपणा केलेला होता. किंवा पक्षाच्या सरकारवर टिकेची झोड उठवलेली आहे. आज सिन्हांचे कौतुक करणारे माजी अर्थमंत्री चिदंबरम, वाजपेयींच्या कारकिर्दीत अर्थमंत्री असलेल्या यशवंत सिन्हांची निंदानालस्ती कशाला करत होते? यशवंत सिन्हा खरेच अर्थशास्त्रात इतके पारंगत असतील, तर चिदंबरम यांनी तेव्हाही सिन्हांच्या धोरणांचे गोडवे गायले असते. तेव्हा निंदा आणि आज कौतुक, हेच तर राजकारण असते. त्याचा वास्तवाशी संबंध नसतो. उलट रमेश यांची विधाने खरी ठरली आहेत आणि राहुलनीही त्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. आपण उर्मटपणे वागलो म्हणून सत्ता गेली, असे राहुलनी अमेरिकेतील मुलाखतीत मान्य केले. आता गुजरातच्या मोहिमेवर असतना कॉग्रेसच्या चुका मोदींना पंतप्रधान होण्यास मदतीच्या ठरल्या, अशी कबुली राहुलनी दिलेली आहे. पण कॉग्रेसच्या चुका म्हणजे श्रेष्ठी वा पर्यायाने राहुलच्याच चुका होत्या ना? त्यावेळी रमेश यांनीच त्याकडे बोट दाखवलेले होते ना? तिकडे बघायला राहुलना वेळ मिळाला होता काय? आज सिन्हांचे कौतुक करण्यात रममाण झालेल्यांनी तेव्हा जयराम रमेश यांच्या इशार्याची गंभीर दखल घेऊन काही केले असते, तर मोदी सरकारच्या नावाने आज बोटे बोडत बसायची वेळ त्यांच्यावर कशाला आली असती? तेव्हाचे सोडून द्या, आजतरी रमेश काय म्हणतात, त्याकडे वळून बघायचे शहाणपण अशा सिन्हा चहात्यांना कुठे सुचते आहे?
Sinha worked as Minister of Finance from November 1990 to June 1991 in Chandra Shekhar's Cabinet. You canot criticize him for his short span of 7 months for the gold issue. He was succeeded by the wel know Madhu Dandavate as finance minister. Please try to find, are there any facts in his blog? If yes, then take is positively. Except Rajnathji & Sushmaji, why most of the main ministers of this Govt is from Rajyasabha? Does it mean they don't want people leaders who speaks freely.
ReplyDeleteह्या साहेबांना भाऊंचा लेख आणि त्यातला रोध समजावून सांगावा लागेल असे वाटते... असो...
ReplyDeleteभाऊ, विषयाला छान आकार दिलाय...