Thursday, September 28, 2017

आडवळणातले डाव-पेच

narayan rane के लिए चित्र परिणाम

गेल्या काही महिन्यांपासून नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या रंगात आलेल्या होत्या. त्यावर विश्वास ठेवायचा तर एव्हाना नारायण राणे भाजपात जाऊन राज्य सरकारमध्ये मंत्रीपदीही विराजमान झालेले बघायला मिळाले असते. पण अजून त्यापैकी काहीही झालेले नसून, नवनव्या वावड्या उडवल्या जात आहेत. त्यातली नवी बातमी अशी आहे, की दसर्‍याच्या मुहूर्तावर राणे नवा पक्ष स्थापन करणार असून, त्यांना भाजपा ऐवजी एनडीएमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. अगोदरच त्या आघाडीत तीसचाळीस पक्षांचा भरणा आहे. त्यापैकी अनेकांची नावेही आपण कधी ऐकलेली नाहीत. आता त्यात आणखी एका नावाची भर पडणार आहे. शेतकरी संघटना म्हणून जो पक्ष आघाडीत आधीपासून होता, त्याचे सदस्य म्हणून सदाभाऊ खोत यांना दुसर्‍या फ़ेरीत मुख्यमंत्री फ़डणवीस यांनी राज्यमंत्री म्हणून समावून घेतले होते. पण तदनंतरच्या घटनांनी त्याच पक्षात दुफ़ळी माजून सदाभाऊंची पक्षातून हाकालपट्टी झाली. आता बहुधा तो पक्ष एनडीए आघाडीत राहिलेला नसावा. त्याचे मंत्री सदाभाऊंनी नवा पक्ष आरंभलेला असून, तो एनडीएत सहभागी करण्यात आला असावा. तशीच आणखी एका पक्षाची बहुधा एनडीएत भर पडेल. त्याचे नाव अजून निश्चीत व्हायचे आहे. त्याचा नेताही ठरलेला आहे. राणे यांना मंत्रीमंडळात सहभागी करून घेताना उरलेल्या सत्ता समिकरणाला धक्का लागू नये म्हणून बहुधा ही व्यवस्था करण्यात आली असावी. कारण राणे यांना भाजपामध्ये समाविष्ट करून घ्यायला शिवसेनेचा विरोध होताच. पण भाजपातीलही काही लोक त्याविषयी समाधानी नव्हते. त्यातून ही नव्या पक्षाची पळवाट काढण्यात आलेली असावी. त्याचा अर्थ असा, की राणे यांचा राजकीय उपयोग भाजपाला करून घ्यायचा आहे. पण त्याचा तोटा मात्र भाजपाला नको आहे. मग त्यातून नेमके काय साधले जाऊ शकते? राणे यांचा भाजपाला नेमका कोणता उपयोग होऊ शकतो?

पहिली गोष्ट म्हणजे मागल्या विधानसभा मतदानात भाजपाने राज्यात मोठी बाजी मारलेली असली, तरी कोकणात मात्र भाजपाची मोठी पिछेहाट झालेली होती. तेव्हाच शिवसेनेने आपले प्राबल्य कोकणात दाखवून दिलेले आहे. अलिकडेच झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणूकीत रत्नागिरीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादन केली आहे आणि सिंधूदुर्गात राणे यांनी आपला वरचाष्मा राखून दाखवला आहे. तेव्हा राणे कॉग्रेसमध्येच असल्याने तिथली जिल्हा परिषद कॉग्रेसने जिंकली होती. पण जिंकलेल्या उमेदवारांची नोंदणी राणे यांनी मोठ्या चतुराईने कॉग्रेसच्या नावाने केलेली नसल्याने, उद्या ह्या सदस्यांनी पक्ष सोडला तरी त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ शकत नाही. पण तिथले कॉग्रेसचे नामोनिशाण पुसले जाऊ शकते. राणे यांनी वेगळा पक्ष स्थापन करून सत्तेत सहभाग घेतला, मग भाजपालाही सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेत सोबत घ्यावे लागणार आहे. पर्यायाने तिथे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला आव्हान देणारा पर्याय भाजपाच्या हाती येणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष निष्क्रीय व नामशेष झाले म्हणून भाजपाला मुसंडी मारणे शक्य झालेले आहे. तुलनेने राज्यातूल राजकारणातले आव्हान म्हणून शिवसेनाच शिल्लक आहे. तिला हैराण करण्यासाठी राणे बहुमोलाची कामगिरी भाजपासाठी बजावू शकतात. आतापर्यंत सत्तेबाहेरचे म्हणून राणेंनी सेनेवर हल्ला चढवला आहे. पण एनडीएत सहभागी होऊन जेव्हा ते शिवसेनेवर हल्ले करू लागतील ,तेव्हा वेगळाच अनुभव येणार आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेला कुठलीही तक्रार करता येणार नाही. तीन वर्षे सत्तेत राहून शिवसेना भाजपाला लक्ष्य करीत असेल, तर त्याच आघाडीत राहून नारायण राणेही त्याचीच पुनरावृत्ती शिवसेने बाबतीत करू शकतात. त्याबद्दल भाजपाला दोष देता येणार नाही. किंबहूना तोच मोठा राजकीय डाव आहे.

राणे हेच कॉग्रेसमधील एकमेव आक्रमक नेता शिल्लक होते. त्यांनी पक्ष सोडल्याने आता त्यात दम राहिलेला नाही. त्यामुळे एका बाजूला भाजपाचा राज्यातील महत्वाचा प्रतिस्पर्धी परस्पर निकालात निघाला आहे. शिवाय आघाडीत येऊन व सत्ता उपभोगून सतावणार्‍या शिवसेनेला तिचेच पाणी पाजण्याची सोय, राणे यांच्या आगमनामुळे होणार आहे. मात्र अशी काही व्यवस्था असू शकते, असा कोणी राजकीय अंदाज वर्तवला नव्हता. दहा वर्षापुर्वी राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हाचा त्यांचा उत्साह किंवा आवेश आज शिल्लक राहिलेला नाही. पण अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देण्याची त्यांची शिवसैनिक प्रवृत्ती मात्र कायम आहे. त्यामुळेच त्यांना सत्तापद बहाल करून शिवसेना विरुद्ध शिवसेना, असा काहीसा विनोदी खेळ भाजपाचे चाणक्य खेळू बघत आहेत. यात शिवसेनेच्या दुखण्य़ावर बोट ठेवण्याचा खरा डाव आहे. नारायण राणे हे सेनेचे जुने दुखणे आहे. अनेक शिवसेना नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून गेले तरी आज त्यापैकी अनेकांना शिवसैनिक विसरून गेले आहेत. मात्र नारायण राणे हा त्याला एकमेव अपवाद आहे. राणे यांनीही जुनेपाने विसरून सेनेकडे पाठ फ़िरवलेली नाही. संधी मिळाली तेव्हा घेऊन किंवा संधी शोधून, शिवसेना नेतॄत्वाला बोचकारे काढण्य़ाचे व्रत त्यांनी कायम राखलेले आहे. सहाजिकच आगामी काळात एन्डीएत राणे दाखल झाले, तर शेलार वा सोमय्या यांनी आजवर कशीबशी संभाळलेली आघाडी राणेंकडे सोपवली जाणार, असाच त्यातला खरा डाव आहे. त्यामुळे सेनेला घरचा आहेर अशीच खेळी भाजपा खेळतो आहे. पण तितकेच नाही. राणे मंत्रीमंडळात दाखल झाल्यावर खर्‍या पाताळयंत्री राजकारणाला आरंभ होऊ शकेल. मागल्या तीन वर्षात शिवसेनेत नाराजी वा आमदार फ़ुटू शकतात, अशा अनेक वावड्या उठत राहिल्या व आजसुद्धा उठत असतात. त्यात लुडबुड करण्याची खरी कामगिरी राणेंना करायची खेळी यात असू शकते.

यातली एक बाब अजून कोणी लक्षात घेतलेली नाही. राणे सत्तेत दाखल झाले तर सेनेच्या मंत्र्यांना त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसावे लागणार आहे. शिवसेना ते सहन करणार आहे काय? तिथे एकत्र बसणार्‍या मंत्र्यांशी राणे यांचाही संपर्क होणार आहे. ज्यांचे काम राणे यांच्या खात्याशी येईल अशा शिवसैनिक व आमदारांना त्यांच्याकडे जावे लागेल आणि त्यातून कोणाविषयी काय काय कंड्या पिकवल्या जातील, त्याचा अंदाजही आज बांधता येणार नाही. ही राणे यांची खरी पात्रता भाजपा वापरू बघत आहे. मागल्या तीन वर्षात सत्तेत सहभागी होऊन जे धोरण शिवसेनेने सत्तेवर आसूड ओढण्यासाठी चालविले होते, त्याची चव शिवसेनेलाच चाखायला लावणे हा यातला खरा डाव आहे. सहकारी व कार्यकर्त्यांना चुचकारून जवळ घेणे वा फ़ोडणे यात राणे कायम वाकबगार राहिले आहेत. अन्यथा बाळासाहेबांच्या हयातीत इतके आमदार वा शिवसैनिक आपले अनुयायी करणे, अन्य कोणाला कधी साधलेले नव्हते. सहाजिकच उद्या जेव्हा राणे मंत्रीमंडळात व एनडीएत असतील, तेव्हा त्याचा नेम सतत नाराज दुखावलेल्या शिवसैनिकांकडे असणार आहे. कॉग्रेस सोडताना त्यांनी शिवसेनेत काही आमदार पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले. त्यात फ़ारसे तथ्य नसेल. पण तशी शक्यता असेल तर त्यांना आपणच जवळ करून सेनेला शह देऊ; अशी त्यातली खरी गर्भित धमकी आहे. त्याचा उहापोह त्यांनी केलेला नाही किंवा माध्यमातही त्याविषयी फ़ारशी चर्चा झालेली नाही. सतत धमक्या देऊनही सेना नेतृत्वाला सत्तेतून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्याचा अर्थ पक्षात सर्वकाही आलेबेल नाही. आतापर्यंत त्याचा नेमका फ़ायदा भाजपा घेऊ शकला नसेल. पण राणे यांचा त्यासाठीच वापर करून घेण्य़ाची खेळी या नव्या व्यवस्थेमध्ये नसेल, असे कोणी म्हणू शकत नाही. किंबहूना त्यासाठीच आडवळणाने राणे यांना एनडीएत आणण्याची पळवाट काढलेली असू शकते.


8 comments:

  1. भाऊ काही अंशी खरे असले तरी आता पुलाखालून बरेच पाणी वाहलेले आहे .
    राणेंच्या गुंडागर्दीला आताचा तरुण शिवसैनिक घाबरणारा नाही . तोही तोडीसतोड उत्तर देईल . मग हा गुण वगळला तर राणेंकडे उरतं तरी काय ?

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    उत्तम विश्लेषण. माझ्या मते उद्धव यांनी सरळ काडीमोड घ्यावा. भले २५ आमदार फुटले तरी चालतील. त्या बदल्यात मराठी माणसाच्या ज्या सदिच्छा मिळतील त्या अक्षरश: अमोल असतील.

    आजून निवडणुकींना दोन वर्षं आहेत. या खेळीला उशीर केला तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली असा आरोप होऊ शकतो. उद्धवांना लगेच काहीतरी निर्णय घेणं भाग आहे. कदाचित शिवसेना सरकारातून बाहेर पडून बाहेरून पाठींबा देण्याची खेळी करता येईल. (हे कितपत व्यवहार्य आहे ते ठाऊक नाही)

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला, एवढे खंबीर नेतृत्व असताना, एका स्थानिक आमदाराची एवढी नितांत गरज का पडावी? लाट ओसरली तर नाही ना?

    ReplyDelete
    Replies
    1. विंचू मारण्यासाठी नेहमी दुसर्याचे पायताण वापरावे यातच शहाणपण आहे.

      Delete
    2. योगेश काळेSeptember 29, 2017 at 10:36 AM

      पिंजऱ्यात आडकलेल्या वाघाला उंदीरच योग्य...

      Delete
  4. राणेंचा बाबतीत हे सर्व चांगले नसेल

    ReplyDelete
  5. शिवसेना पुर्विच संपलीय.

    ReplyDelete