गुजरातमध्ये विधानसभा निवडणूकीचे वेध लागले आहेत आणि त्यासाठीच कॉग्रेसचे भावी अध्यक्ष तिथे लागोपाठ दौरा करू लागले आहेत. विद्यमान उपाध्यक्ष व भावी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी नुकतेच एका भाषणात भाजपाचे आभार मानले. २०१४ च्या निवडणूकीत भाजपाने कॉग्रेसचा दारूण पराभव केल्याबद्दल राहुल यांनी भाजपाचे आभार मानले आहेत. कारण त्या पराभवाने कॉग्रेस व राहुल यांचे डोळे उघडले, असा त्यांचाच दावा आहे. तसे घडले असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कुठलाही पराभव किंवा अपयश हा काही शिकवून जात असतो. त्यामुळेच कॉग्रेसचा भावी अध्यक्ष अशा पराभवातून काही शिकला असेल, तर उत्तम गोष्ट मानली पाहिजे. परंतु काय धडा भाजपाने दिला व राहुल त्यातून काय शिकले त्याचे कुठलेही विवेचन त्यांनी केलेले नाही. मग शिकले काय असा प्रश्न पडतो. कारण त्यांनी पराभवात धडा काय होता, तोही समजून घेतलेला दिसत नाही. अन्यथा जेव्हा राहुल गुजरातमध्ये पोरखेळ करत होते, तेव्हा स्मृती इराणी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन अमेठी या गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात कशाला फ़िरत होत्या, ते त्यांच्या लक्षात आले असते. मागल्या लोकसभा निवडणूकीत महिनाभर आधीपर्यंत भाजपाने अमेठीत आपला उमेदवार निश्चीत केला नव्हता. अखेरच्या क्षणी भाजपाने तिथे स्मृती इराणी यांना धाडले आणि त्यांनी अशी मुलूखगिरी केली, की आरामात जिथे राहुल जिंकत होते, तिथे त्यांचे मताधिक्य जबरदस्त खाली आले. ते मताधिक्य किती व कशामुळे खाली आले, तोच मागल्या पराभवातला धडा आहे. पण त्याची दादफ़िर्याद अजून राहुल गांधींना लागलेली नाही. तर त्यापासून शिकण्याचा विषयच कुठे येतो? आज अमेठीतली स्थिती काय आहे, त्याचाही थांगपत्ता राहुलना लागलेला नसेल, तर ते स्वपक्षाला पराभवाच्या छायेतून कसे बाहेर काढणार आहेत?
१९९९ सालात अमेठीत प्रथमच सोनिया गांधींनी निवडणूक लढवली व त्या बहूमताने विजयी झालेल्या होत्या. एकूण मनांपैकी ६७ टक्के मते मिळून त्या जिंकल्या होत्या. आज तिथले राहुल समर्थक मानले जाणारे पिढीजात राजे संजय सिंग, तेव्हा भाजपा उमेदवार होते आणि त्यांनाही अवघी १७ टक्केच मते मिळवता आली होती. मग पाच वर्षांनी सोनियांनी तो बालेकिल्ला आपला पुत्र व घराण्य़ाचा वारस राहुल गांधी यांना सोपवला. तेव्हाही ते मताधिक्य कायम राहिले होते. त्यांनी २००४ सालात ६६ टक्के मते मिळवून विजय संपादन केला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती २००९ सालात करताना राहुलनी ७१ टक्के मते जिंकली होती. हा अलिकडला इतिहास आहे. एकूणच अमेठी वा रायबरेली हे गांधी घराण्याचे कसे बालेकिल्ले आहेत, त्याची ही आकडेवारी बोलकी आहे आणि तिला कोणी आव्हान देऊ शकत नव्हता. स्मृती इराणी तिथे पोहोचल्या त्याची ही पार्श्वभूमी होती. त्याचे आणखी एक कारण आहे. सहसा आजवर कुठे अशा बालेकिल्ल्यात गांधी घराण्याला आव्हान देण्याचा अन्य पक्षांनीही प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे़च अमेठी हा बालेकिल्ला राहिला. किंबहूना आजवरच्या निवडणूका बारकाईने अभ्यासल्या तर आपोआप जे मतदान होते, त्यात मोठया संख्येने लोक उदासिन राहिले आहेत. म्हणजे ५०-६० टक्के यापेक्षा अधिक मतदान सहसा होत नाही. मोदींनी राष्ट्रीय राजकारणात उडी घेतल्यानंतर प्रथमच अशा उदासिन मतदाराला घराबाहेर काढून मतदान करायला भाग पाडण्य़ाची मोहिम प्रयत्नपुर्वक राबवली गेलेली आहे. अमेठीत असो किंवा देशभरात असो, मतदानाचे प्रमाण वाढवण्याला अमित शहा व नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिलेले आहे. लोकसभा त्यांनी थेट बहूमताने जिंकताना केलेले प्रयास राहुलनी बघितलेले नसले तर समजू शकते. पण निवडणूकांच्या निकालाचा काटेकोर अभ्यास करणार्यांनी तरी त्यात किती लक्ष घातले आहे?
१०५२ सालात भारतातल्या लोकसभा निवडणूका सुरू झाल्या. तेव्हापासून तीनचार प्रसंगीच साठ टक्केहून अधिक मतदान झालेले आहे. त्यातला विक्रम १९८४ सालात इंदिरा हत्येनंतरचा होता. म्हणजेच बहुतांश प्रसंगी भारतातला मतदार मोठ्या संख्येने उदासिन राहिलेला आहे. १९८४ चे विक्रमी मतदान ६४ टक्के होते आणि २०१४ सालातले मतदान ६७ टक्के आहे. इंदिरा हत्येपेक्षा अशी कुठली मोठी घटना २०१४मध्ये घडली होती? नसेल तर मतदान कशाला वाढले? २००९ सालात मतदान ५८ टक्के होते. म्हणजेच त्याच्या तुलनेत पाच वर्षांनी ८ टक्के मतदान वाढले. की मोदींनी आपल्या प्रयत्नातून ते मतदान तितक्या टक्क्यांनी वाढवून घेतले? वाढलेले मतदान मोठ्या संख्येने भाजपाच्या पारड्यात गेले असेल, तर त्यांचेच पारडे झुकलेले रहाणार ना? त्यानंतर भाजपाने जिंकलेल्या विधानसभा बघितल्या तरी प्रत्येकवेळी त्या पक्षाने बुथ व्यवस्थापन चोख ठेवून मतदानाची टक्केवारी वाढवलेली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या वाढलेल्या मतदानात दिसलेला आहे. उत्तरप्रदेशात मायावती व मुलायम यांनाही भाजपाने पराभूत केल्याचे कौतुक खुप झाले. पण तो पराभव वाढल्या टक्केवारीने केला, हे कोणाच्या लक्षात आले नाही. त्यापुर्वी उत्तरप्रदेश विधानसभा मतदान ५० टक्केच्या आसपास घुटमळत होते. मोदी-शहा जोडीने ती टक्केवारी थेट ६४ च्याही पुढे नेलेली आहे. यात दहाबारा टक्के उदासिन मतदार त्यांनी घराबाहेर काढला आणि त्याची मते त्यांनाच मिळाली. याचा अर्थ कोणी शोधला आहे काय? धडा तिथेच सामावलेला आहे. राहुल गांधीच्या अमेठीतील विजयाला स्मृती इराणी कोमेजून टाकू शकल्या, त्याचेही पुरावे त्याच आकडेवारीत सामावलेले आहेत. राहुल वा त्यांच्या कुणा सहकार्याने त्याचा शोध तरी घेतला आहे काय? नसेल तर त्यातला बोध तरी कसा घेता येणार व त्यातून काय शिकणार?
आधीच्या दोन लोकसभा जिंकताना राहुलना मिळालेली मते ३ लाख ९० हजार आणि ४ लाख ६४ हजार होती. तिसर्या वेळी म्हणजे स्मृती इराणी समोर असताना ती मते केवळ ५० हजाराने कमी झाली. पण भाजपाला तर ३ लाख मते मिळाली. मग ती मते आली कुठून? त्याचे उत्तर वाढलेल्या मतदानात आहे. आधीच्या दोन वेळी अमेठीतले एकूण मतदान सहा ते साडेसहा लाखाच्या आसपास घोटाळलेले होते. पण स्मृती मैदानात आल्या आणि अमेठीत मतदानाचा जोर वाढला. विक्रमी मतदान झाले आणि तब्बल पावणे नऊ लाख मतदानाचा पल्ला गाठला गेला. वाढलेल्या सव्वा दोन लाख मतातला मोठा हिस्सा स्मृती इराणी घेऊन गेल्या. त्यामुळे राहुलची मते फ़ारशी घटलेली नसली, तरी त्यांच्या विजयाचे मतधिक्य प्रचंड प्रमाणात घटलेले दिसून आले. २०१४ च्या निवडणूकीचा हाच धडा होता. मात्र पराभूत होऊनही कॉग्रेस, राहुल, मायावती वा मुलायम कोणताही धडा शिकले नाहीत. पण त्यांना शिकवलेल्या धड्याला पुन्हा गिरवण्याची तयारी अमित शहांनी विधानसभेच्या वेळी केलेली होती. म्हणून मग तीन वर्षांनी पुन्हा एकदा राहूल व इतरांना धडा शिकण्याची वेळ आली. पण धडा कोणता तोही उघडून बघायची इच्छा नसेल, तर अपयश वगळून पदरी काय पडू शकते? विधानसभेत राहुलनी मोठी मुलूखगिरी उत्तरप्रदेशात सर्वात आधी सुरू केली. पण आजवर कॉग्रेसला कधी मिळाले नाही, इतके भयंकर अपयश मात्र राहुलनी मिळवून दिले. त्यांच्या कष्टाशिवाय कॉग्रेस जितके यश मिळवू शकत होती, त्यालाही राहुलनी अपशकून केलाच. पण खुद्द राहुलच्या अमेठी या लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या पाचपैकी एकही जागा कॉग्रेसला जिंकता आली नाही. उलट भाजपाने त्यापैकी चर जागा जिंकून बालेकिल्ला ढासळून टाकलेला आहे. पण शहाजादे धडा कुठे शिकायला तयार आहेत? त्यांना धडा कुठला तेही जाणून घेण्याची इच्छा नसेल, तर काय व्हायचे?
गेल्या साडेतीन चार वर्षात भारतीय राजकारणातला नवा धडा एकच आहे. आपली जमिन सुपीक असल्याने सर्वाधिक पीक येण्याच्या गमजा करण्याचे दिवस संपलेले आहेत. जमीन सुपीक असून भागत नाही. त्या जमिनीची मशागत करणे व पीकासाठी कष्ट उपसणे, हा नवा धडा आहे. मोदी-शहांनी निवडणूका हे मशागतीचे क्षेत्र बनवून टाकलेले आहे. जो अधिक मेहनत करील व अधिकाधिक मतदारांना घराबाहेर काढेल, त्याला यश असा हा नवा धडा आहे. पुढल्या लोकसभा म्हणजे २०१९ च्या सार्वजनिक निवडणूकीत अमित शहांनी ३०० जागा जिंकण्याचे जे ध्येय निश्चीत केले आहे. त्यामागे हेच तंत्र आहे. त्यांनी असलेल्या वा बांधील मतदारातून आपल्या वाट्याला येईल, त्यावर समाधानी रहायचे नाही असा निर्धार केलेला आहे. जो मतदार उदासिन असतो व टाळाटाळ करतो, त्यालाही मतदान केंद्रात आणून अधिकची मते मिळवण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. थोडक्यात मागल्या लोकसभेत ६७ टक्के मतदान झाले असेल, तर आगामी मतदान ७५ टक्केपर्यंत घेऊन जायचे, हे गणित आहे. त्याचा अर्थ बाकीच्या पक्षांची मते कायम राहिली तरी भाजपाची मतांची संख्या व पर्यायाने विजयाचे पारडे फ़िरू शकते. तेच तर या जोडगोळीने करून दाखवलेले आहे. पण त्यातला धडा विरोधक शिकायला तयार नाहीत आणि आपल्या सुपीक जमिनीत कष्टाशिवाय मिळणार्या पीकावर सगळे खुश आहेत. तिथेच भाजपा विरोधक मागे पडत चालले आहेत. भाजपाच्या प्रयत्नानंतरही अजून ३०-३३ टक्के मतदार देशात उदासिन आहे आणि त्यातला मोठा हिस्सा खेचून आणण्याचे आव्हान विरोधक पेलू शकले, तर भाजपाला इतके मोठे विजय संपादन करणे सोपे रहाणार नाही. मात्र त्यासाठी मेहनत मशागतीची गरज आहे. जो विरोधक बकवास बंद करून ती मशागत सुरू करील तोच टिकून राहिल. राहुलच्या आवाक्यातले ते काम आहे असे मानणारे मुर्खाच्या नंदनवनात जगत आहेत.
मस्तच हं भाऊ
ReplyDeleteबरोबर भाऊ .. २०१४ च्या निवडणूकिच्या वेळेस "एक बूथ १० यूथ" योजना आणून अमित शाह यान्नी मतदानाचा टक्का वाढवला.
ReplyDelete"कळतय पण वळत नाही" अशी परिस्थिती आहे ही.
ReplyDeleteभाऊ निवडणुकीच्या जिंकण्याचा कौशल्यात शहा आणि मोदींजींचा आता तरी कोण हात धरू शकत नाही हे मान्य.मात्र प्रत्येक वेळी ते उपयोगी नाही होऊ शकत.2019 ला मोदींना 2014 च्या दिलेल्या भल्या मोठ्या आश्वासनाची पूर्तता केली की नाही हे सांगावे लागेल. सध्या राहुल गांधी हे निश्चितच मोदींना पर्याय नाहीत.पण 1989 ला सुद्धा कुठे राजीव गांधींना पर्याय होता.तरीही इतके पाशवी बहुमत असुन सुद्दा लोंकांनी राजीव गांधी यांना नाकारलं होतच की..त्यामुळे 300 चा आकडा तसा सोपा नाहीये अन्यथा पुन्हा 2004 साली इंडिया शायनिंग चं झालं तसं 2019 ला अच्छे दिन च होऊ नये म्हणजे झालं..
ReplyDeleteआताच मोदीजी नी गुजरात मधल्या ७ लाख पन्नाप्रमुखांना संबोधित केले.पन्ना प्रमुखाकडे प्रत्येकी ४० मतदार असनार आहेत.म्हनजे किती कार्पोरेट मायक्रो मॅनेजमेंट आहे.आणि मोदी विरोधी लोक, पत्रकार इंग्रजी वेबसाइटवरून खुप बदनामी करतायत.पन गुजराती लोक ते वाचनार की bjp _च्या पन्ना प्रमुखाबरोबर बाहेर पडनार मतदानादिवशी
ReplyDeleteखूप छान विश्लेषण
ReplyDelete