Sunday, November 19, 2017

नेहरू इंदिरा मोदी (पूर्वार्ध)

Image may contain: 1 person, smiling, close-up

खरे तर १९६४ सालातच नेहरू युग संपलेले होते. किंबहूना नेहरूंचे कडवे टिकाकार आचार्य अत्रे यांच्यासह अनेकांनी नेहरूंच्या निधनाचे वर्णन ‘युगांत’ एका युगाचा शेवट, असे केलेले होते. पण म्हणून नेहरूयुग संपलेले नव्हते. त्यांच्या जागी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले व त्यांनी पाकिस्तानला युद्धात हरवून आपली प्रतिमा उभी केली होती. मात्र त्या युद्धाचा शेवट झाल्यावर दोन देशातल्या वाटाघाटीसाठी ताश्कंदला गेलेले शास्त्री जिवंत माघारी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी इंदिराजी देशाच्या पंतप्रधान झाल्या. एकप्रकारे नेहरूयुग कायम होते. अगदी इंदिराजींची आपली छाप भारतीय राजकारणावर पडली त्यालाही नेहरूयुगच म्हणावे लागेल. कारण पित्याने जो पाया घातला होता, त्यावरच इंदिराजी कर्तबगारी गाजवू शकल्या होत्या. अर्थात त्यांचा नातू राहुल वा पुत्र राजीव यांच्यापेक्षा इंदिराजी प्रचंड कर्तबगार होत्या आणि म्हणूनच पित्याच्या छायेतून बाहेर पडून त्यांनी आपली छाप देशाच्या राजकारणावर पाडली. त्यांचे राजकारण व व्यक्तीमत्व इतके प्रभावी होते, की त्यात आरंभी कॉग्रेस विरघळून गेली आणि हळुहळू एकूण देशाचे राजकारणाही इंदिराजींच्या व्यक्तीमत्वाने कायमचे प्रभावित होऊन गेले. त्यांच्या समकालीन राजकारणात वा नंतरच्या तीन दशकात त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या जवळपास फ़िरकू शकेल, असा नेता भारतीय राजकारणात उदयास आला नाही. कोणी तितका प्रयासही केला नाही. अपवाद नरेंद्र मोदी हाच होता. मात्र त्याचा सुगावा भाजपाला तेव्हा लागला नाही की भारतीय राजकीय अभ्यासकांनाही त्याची चाहुल लागली नाही. किंबहूना यापैकी अनेक राजकारणी वा अभ्यासकांना हुकूमशहा व प्रभावी राजकीय व्यक्तीमत्व; यातला फ़रकच कधी समजला नाही. म्हणूनच त्या काळात अशा दिवाळखोरांनी इंदिराजींना हुकूमशहा होण्यापर्यंतच्या कडेलोटावर नेवून ठेवले होते. आज नरेंद्र मोदी यांच्यावरही तसेच आरोप आक्षेप चालू आहेत. पण यापैकी कोणालाही दोन्ही व्यक्तीमत्वांबद्दल भारतीय जनतेला इतका विश्वास व आपुलकी का वाटली, त्याचा शोध घेण्याची गरज वाटलेली नाही. भारतीय पत्रकार, अभ्यासक वा राजकारणी इतक्या उथळ झापडबंद विश्लेषणात मशगुल राहिले, की त्यांना कधी भारतीय जनमानसाच्या गाभ्यापर्यंत जाण्याची गरजच भासलेली नाही. आपल्या छापील व ग्रंथप्रामाण्यवादी मतांशी असे जाणकार कायम एकनिष्ठ राहिले. त्यांना कधी वास्तविक जनमताचा वेध घ्यायची गरज भासली नाही. परिणामी त्यांना भारतीय राजकारणातले तपशील, प्रसंग व घडामोडी किंवा सनावळी पाठ असतात. पण ज्या उलथापालथी झाल्या, त्या व्यक्तीमत्वांच्या भोवती जमलेल्या जनतेने केल्याचे भान अजून आलेले नाही. इंदिराजी वा नरेंद्र मोदी ह्या व्यक्ती जादुगार नव्हत्या किंवा नाहीत. त्यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वाने कायम सामान्य भारतीयांच्या मनाला भुरळ घालण्यात यश संपादन केलेले आहे. त्याचा परिणाम निवडणूकांवर पडून जय-पराजय झालेले आहेत. त्यासाठी त्यांनी राजकीय डाव खेळले आहेत आणि इतर अनेक घटकांचा खुबीने वापर करून घेतला आहे. पण त्याचा शोध घेणे किंवा त्याची छाननी करण्याचा विचार कधी जाणत्यांच्या मनात आला नाही.

पन्नास वर्षापुर्वी पंतप्रधान झाल्यानंतर इंदिराजींचा बोलबाला सुरू झाला. तात्कालीन परिस्थितीने त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडलेली होती. पण ती पडल्यावर त्यांनी स्वयंभूपणे आपले व्यक्तीमत्व वा राजकारण उभे करण्यात कुठली कसर ठेवली नाही. पित्याचा वारसा त्यांना आयता मिळाला, म्हणून सत्तेची सुत्रे त्यांच्याकडे आयती चालत आली. तितके नरेंद्र मोदींचे नशिब बलवत्तर नव्हते. पण मुख्यमंत्री होण्याची एक संधी मिळाल्यावर त्यांनी पुढल्या प्रत्येक प्रतिकुल परिस्थितीवर मात करताना पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. १९६७ सालात इंदिराजींनी कॉग्रेसचे प्रथमच सार्वत्रिक निवडणूकीत नेतृत्व केले आणि त्यांना जितके यश मिळालेले होते, नेमके तितकेच यश सत्तेचाळीस वर्षांनी नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालात मिळवले. विरोधाभास इतकाच होता, की इंदिराजींनी जे बहूमत लोकसभेत तेव्हा मिळवले, ते तोपर्यंतच्या कॉग्रेससाठी किमान संख्या होती. उलट मोदींनी २०१४ सालात भाजपाला प्रथमच लोकसभेत बहूमतापर्यंत नेवून ठेवले, ती भाजपासाठी सर्वाधिक संख्या होती. अशा इंदिराजी पाच वर्षे थांबल्या नाहीत. त्यांनी पुढली लोकसभा निवडणूक आपल्या मर्जीनुसार घेऊन दोनतृतियांश बहूमत संपादन केले होते आणि २०१९ साली मोदी नेमके त्याच स्थितीत आलेले आहेत. त्यामुळे १९६७ सालातल्या इंदिराजी व २०१७ चे नरेंद्र मोदी एकाच टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहेत. अर्धशतकानंतरही राजकीय परिस्थिती किती समसमान आहे, ते तपासून बघता येईल. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ सालात होईल असे आज म्हणता येईल. त्यापासून मागे ५० वर्षे गेले तर काय स्थिती होती? देशातला प्रत्येक राजकीय पक्ष व नेता इंदिराजींच्या विरोधात बोलत होता. कॉग्रेसच्या विरोधात रान उठलेले होते. अशा स्थितीत देशासाठी आपणच योग्य नेता आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान व कसोटी इंदिराजींसमोर आलेली होती. आज नरेंद्र मोदी त्यापेक्षा वेगळ्या स्थितीत आहेत काय? २०१९ साली काय होईल, असा प्रश्न विचारला जातो आहे आणि त्याची उत्तरेही शोधली जात आहेत. ती शोधताना वाजपेयी वा अन्य कुठल्याही नेत्याशी मोदींची तुलना अगत्याने होत असते. पण इंदिराजींच्या कारकिर्दीशी वा कालखंडाशी मोदींची तुलना करायची हिंमत कोणा अभ्यासक विश्लेषकाची होत नाही. तिथेच मग त्यांनी मांडलेले गणित चुकून जाते आणि उत्तरेही चुक्त जातात. याचे एकमेव कारण कुणाला १९८४ पुर्वीची इंदिराजी बघायची नसते, की त्यांच्याशी मोदींची तुलना करायचीही भिती वाटते. हीच मोठी गफ़लत होऊन बसलेली आहे. अर्थात तेव्हाही नेहरूशी इंदिराजींची तुलना केली जात होती. पण नेहरू व इंदिरा ही अगदी दोन भिन्न टोकाची व्यक्तीमत्वे असल्याने तेव्हाही इंदिराजींच्या बाबतीतले बहुतेकांचा आडाखे चुकतच राहिलेले होते. आज इंदिराजी व मोदींची तुलना होत नाही, म्हणून आडाखे चुकत असतात.  (अपुर्ण)
(‘इंदिराजी ते मोदी अर्थात १९६४ ते २०१४’ या आगामी पुस्तकातून)

2 comments:

  1. भाऊ आपल्या विश्लेषणात्मक लेखाशी मी सहमत आहे.

    ReplyDelete